ती अमावस्येची रात्र !
ती अमावस्येची रात्र !


कडूस पडू लागलं, तशी पाखरं आपल्या घरट्याकडं धाव घेऊ लागली. गुराखी गुरंढोरं घेऊन घराकडं परतू लागली. दिवसभर काबाडकष्ट करून शिणलेलं अंग ओट्यावरील घोंगड्यावर काही जणांनी टाकलं होतं, तर काहीजण आपल्या मुलाबाळात रमली होती. पिंपळ पानावरील सूर्यास्ताच्या कोमल किरणांना पाहून अजित मोहीत झाला होता. मघापासून तो बालपणीच्या मित्रांची त्या पिंपळाच्या पारावर बसून वाट पाहत होता. हळूहळू एकेक करत सर्वजण त्या पारावर जमा झाले. त्यातला त्याचा दिलीप नावाचा मित्र अजितला म्हणाला, "आज सकाळीच मुंबईवरून आलास तवा कंटाळला न्हाहिस नव्हं ?" त्यावर अजित म्हणाला," अरे, कसला कंटाळा ! मी आरामबसनं आलोय." सुरेशनं आणलेल्या भाजलेल्या शेंगा खातखात ते सर्वजण गप्पात गढून गेले होते. कधी जेवणाची वेळ झाली हे त्यांना कळलंच नाही. रमेशची बहिण जेवायला बोलवायला आली तेव्हा कुठं त्यांच्या गप्पांना अर्धविराम मिळाला. अजित येणार म्हणून रमेशच्या आईनं बोकडाच्या मटणाचं कालवण केलं होतं. रमेशनं अगोदरच त्याला जेवणाचं आमंत्रण दिलं होतं.
जेवण आटोपल्यानंतर रमेशच्या घराच्या ओट्यावर पुन्हा सर्व मित्र जमले आणि त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या आणि रात्रही गडद काळोखी रंगानं रंगली होती. पण गावात दिव्यांचा प्रकाश असल्यानं त्या काळोखाची तीव्रता जाणवत नव्हती. रंगलेल्या गप्पांचा भंग करीत रमेश अजितला म्हणाला , " आरं अजित, लय येळ झालाय, गड्या आन आज अमुशाबी हाय तवा रहा इथंच. " त्यावर अजित म्हणाला, " नाही मित्रा, मी जाणार आहे. बॅटरी आहेच की माझ्याकडे."
" आमुशाच्या येळी भुताखेताचं भ्या आसतं तवा एकटा जाऊ नगस. आमी तुला वड्याच्यावर म्हणजी माऊलेआईच्या टेकावर सुडतू तुला. मग तिथून जा खुशाल एकटा." दिलीप त्याला म्हणाला.
" हे बघा, माझा भुताखेतांवर अजिबात विश्वास नाही. त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही, मित्रांनो ! माणूस मेला म्हणजे त्याचा दगड झाला असे मी समजतो. तुम्ही खेड्यात राहून अजूनही अंधश्रद्धाळूच राहिलात ! चला, जाऊ द्या मला. " शूर जवानासारखी छाती फुगवून रमेशच्या खांद्यावर हात ठेवत अजित सर्व मित्रांना उद्देशून म्हणाला.
" आरं, येड्यावानी कसा करायला लागलाय. चार बुकं शिकला म्हणजी लय अक्कल आली असं समजू नगस. येळ काय सांगून यीती व्हय." रमेशची आई काळजीच्या सुरात अजितला म्हणाली. परंतु त्यानं कोणाचंही ऐकलं नाही.तो तेथून सर्वांना हात मिळवून वस्तीवर जाण्यास निघाला.
हळूहळू उजेडातला गाव त्यानं मागे टाकला व अंधारात आल्यावर क्षणभर थांबला. त्यानंतर तो चालू लागला तसे त्याच्या डोक्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अरुणकाकांचे विचार घुमू लागले,' या जगात भूतबित अस्थित्व, जादुटोणा, भाणामती, करणी, वगैरे काहीही नाही. कमकुवत, दुबळ्या मनामुळे तुम्हाला भूतबाधा होणे, भुत दिसणे असे प्रकार घडतात असे वाटते, परंतु प्रत्यक्षात तसे काहीही नसते. बालपणी सहवासात आलेल्या व्यक्तीमुळे , आजुबाजुच्या सामाजिक परिस्थितीमुळे रुजलेले संस्कार हे मनामध्ये खोलवर घट्टपणे रोवलेले असतात. त्यामुळे त्याचे समूळ उच्चाट्न करणे फार कठीण असते. लहानपणी भुताखेताच्या गोष्टी ऐकल्या असतील, वाचल्या असतील, पाहिल्या असतील अथवा भयावह अपघात पाहिले असतील तर त्या त्या ठिकाणी अथवा प्रसंगी ते ते आठवत असते. कारण आपल्या अंतर्मनाच्या संगणकावर आयुष्यातील सर्व बऱ्या-वाईट गोष्टींची सचित्र, चलतचित्रासह नोंद झालेली असते, होत असते.' दगडाला ठेचकाळल्यावर त्याच्या विचारांची तंद्री भंग पावली.
भानावर आल्यावर त्याला कळलं की तो ओढ्यातील वाटेवर चालत होता. काही वेळानं त्याला त्याच्या समोरुन एक काळ मांजर झपकन निघून गेलेलं दिसलं. त्यांच्या मनात त्या मांजराबद्दल विचारचक्र सुरु झालं, काळ मांजर कोणीच पाळत नाही. मग एवढ्या रात्रीचं हे मांजर ओढ्यात आलं कसं ? इतक्यात ते भेसूर आवाजात ' म्याव... म्याव... ' करु लागलं त्यासरशी त्याच्या काळजात भितीनं धस्स झालं. भिती दूर करण्यासाठी तो गाणं गाण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा त्याच्या तोंडातून ' आयेगा... आयेगा... आयेगा आनेवाला... आयेगा ! ' हे हिंदी हॉर्र फिल्मचं गाणं गायलं जावू लागलं. हे असं कसं होतंय त्याला काहीच कळत नव्हतं.कोणीतरी अमानवीय शक्ती त्याच्यावर नियंत्रण तर करत नाही ना ! असं त्याला वाटत होतं. घुबडाचा घुत्कारानं, कुत्र्याचं रडण्यानं, टिटव्यांचं ' टि... टिहुक... टि... टिहुक ' ओरडण्यानं आणि रातकिड्यांच्या ' किर र्र ... किर र्र ... ' आवाजानं ती अमावस्येची रात्र अतिशय भयानक झाली होती. त्यानं बालपणी ऐकलेल्या अक्राळविक्राळ राक्षसाच्या भयकथा, चेटकिणीच्या गोष्टी आणि त्यानं गमंत म्हणून पाहिलेला ड्रॅकुला इंग्लिश भयपट त्याच्या मनपटलावर तरळू लागला आणि तो घाबरून थरथर कापू लागला, त्याला दरदरुन घाम फुटला, त्याची बोबडीच वळली. त्याला वाटू लागले, ' झक मारली आणि मोठ्या फुशारक्या मारत अंधारात ते पण अमावस्येच्या रात्री वस्तीवर यायला निघालो.'
भितभितच त्यानं बॅटरी एकवेळ सभोवार फिरवली. झाडं स्तब्ध उभी होती,जणू ती घाबरल्यासारखीच भासत होती. पायाला दगड बांधल्यासारखा तो पावलं टाकत चालला होता.मनाला भितीपासून दूर नेण्यासाठी त्यांनं खिशातला मोबाईल काढला व रमेशला फोन लावला.पण पलिकडून कोणीतरी भलत्याच इसमानं फोन उचलला आणि ती व्यक्ती घोगऱ्या आवाजात विक्षिप्तपणे मोठमोठ्यानं खदाखदा हासत बोलू लागली, " बरा सापडलास आमच्या तावडीत ! आता तुजी खैर न्हाय !" म्हणत त्यानं भेसूर आवाजात किंकाळी फोडली, तसा अजित घाबरून गर्भगळीत झाला. त्यानं झटकन फोन कट केला. आता त्याला मागे जाणं शक्य नव्हतं कारण गाव बराच मागे राहिला होता आणि पुढं जायचं त्याला महासंकट वाटत होतं. तो सुधूरबुधूर होवून गपकन खाली बसला. घामानं संपूर्ण कपडे भिजले होते. चड्डीत मुतायचंच काय ते बाकी होतं. त्याच्या पायात त्राण उरला नव्हता. हातपाय गळून गेलं होतं. तो समजून गेला होता, आपलं आता काही खरं नाही.
आईचं ऐकलं असतं तर हे वाट्याला आलं नसतं. आई म्हणाली होती, 'अजित बाळा, आज आमुशा हाय तवा कुणाला तरी सुपतीला घिवून यी न्हाय तर रम्याच्या घरीच राहा आन सकाळच्यापारी यी. आरं, यिरीवाळीचं निराळं आसतं.तवा बिगीनं यी वस्तीवर आपल्या लय रात करू नगस . ' मित्रपण सोबतीला येतो म्हणाले होते, परंतु त्यांचंही ऐकलं नाही. त्यामुळंच आज आपल्या जीवावर बेतलं आहे. या विचारात असतानाच त्याला दुरवरून कोणीतरी त्याला हाक मारल्याचा आवाज येत होता," ये आजित म्या येतुया , थांब." आवाज त्याच्या ओळखीचा वाटत होता. पण एवढ्या रात्रीचं कोण येत असेल हे त्याला काही कळेना. पण कोणी तरी सोबती येतेय ह्या सुखद विचारानं धीर आला होता. त्यानं आवाजाचा कानोसा घेतला. तेव्हा आवाज हळूहळू मोठा होत असल्याची जाणीव झाली. याचा अर्थ ती व्यक्ती जवळ येत होती. आता तो इसम त्याच्या अगदी जवळ म्हणजे पुढ्यातच येऊन उभा होता. पण अंधारात त्याला ओळखणं शक्य नव्हतं. म्हणून त्यानं बॅटरीचा प्रकाश मोठ्या कष्टानं त्याच्यावर टाकला. तेव्हा कळलं तो बालपणीचा जिवलग मित्र श्रीरंग होता. त्यानं त्याच्या सर्वांगावर खालून वरून बॅटरीचा उजेड फिरवला. तेव्हा त्याला त्याच्या पेहरावाची कल्पना आली,पायात स्लीपर, अंगात पट्ट्याचा लेहंगा व मनगटापर्यंत ठिपक्या ठिपक्यांचा अंगरखा, खुरटी दाढी, पीळदार मिशा डोक्यावरचे केस इतस्तत विखुरलेल...वाऱ्याच्या मर्जीनं, किरकोळ शरीरयष्टी होती त्याची ! त्याचा चेहरा तर दोन दिवस उपाशी असल्यासारखा भासत होता. अजित व त्यांचे सर्व मित्र श्रीरंगला रंगा म्हणत असत. त्याच्याकडे कटाक्ष टाकत अजित त्याला म्हणाला, " अरे रंगा, तु कसा काय आलास ?" तेव्हा श्रीरंग म्हणाला," आरं, रम्यानं मला सांगितलं , तु एकलाच चाललाय वस्तीवर , म्हणून म्या तुज्या सुपतीला आलुया. आता म्या हाय तवा घाबरु नगस." हे ऐकल्यावर त्याच्या वाळक्या देहाकडे पहात अजित त्याला म्हणाला, " तू काय करणार आहेस ! मघापासून उठायचा प्रयत्न करतोय, पण मला जागणं उठता येत नाही. भितीनं अंगातलं अवसान निघून गेलंय. बघ हातपाय थंडगार पडलेत." आजितचा हात धरत श्रीरंग अजितला म्हणाला," म्या हाय न्हवं. चल उठ बर आता ." तसा अजितनं त्याच्या हाताला धरलं. अन एका झटक्यात त्याला उठवून उभा केलं. आश्चर्यचकीत होत तो श्रीरंगकडे पाहतच राहिला. त्यानं उत्सुकतेनं श्रीरंगला विचारले , " रंगा, अंगानं वाळका असूनसुद्धा मला कसं काय उठवलंस ? कमाल केली बुवा !" श्रीरंग स्वतःच्या शरीराकडे पाहत म्हणाला, " शिऱ्यार वाळकं हाय पण मातीकाम करून त्ये काटक झालंय. पर त्ये जाऊ दे. चल बरं, लय उशीर झालाय. तुला माऊलेआईच्या टेकाला सोडलं की म्या जाईन जेवायला. लय भूक लागलिया, गड्या !" त्यावर अजित त्याला म्हणाला, " अरे, भूक लागली तर जेवून यायचं होतं." तेव्हा श्रीरंग म्हणाला, " याड लागलंय का तुला ! ठाव न्हाय व्हय, लका जेवायला मला लय येळ लागतुय त्ये. तवापातूर तु जिता राह्यला आसता का रं . लका , भिवून मेला आसतास की ! " ते दोघंही बरोबरीनं गप्पा मारत चालले होते.
गप्पाच्या ओघात अजित म्हणाला, " अरे रंगा, आता तू दारू सोडलीस काय रे ? " त्यावर श्रीरंग म्हणाला, " कशाची दारू आन कशाचं काय ! त्या गाडवीनंच माजा घात केला." काळजीच्या सुरात अजित त्याला म्हणाला," घात ! कसला घात ? रंगा, मला खरं काय ते सांग."श्रीरंगनं या विषयाला बगल देत त्याला विचारलं," माजं जाऊ दीे तुजं सांग की, लका. किती वरसानं भिटतुया आपण. काय करतुयास?" त्यावर अजित म्हणाला ," काय सांगू तुला ! मुंबईला सरकारी कार्यालयात नोकरीला आहे. मुलगा कॉलेजात शिकतोय. तसं बरं चाललंय. "
" बाबा तुजं बरं झालं. लय शिकलास म्हणून सायबाची नौकरी मिळाली. तुझ्या मागं पोरंबी शिकायला लागली. आमच्या घराचा इस्कुट झाला बघ!"
"काय झालं, सांगशील का मला ."
" बायकु काम करून आणायची पैका आन म्या दारूत उडवायचो. शिकायच्या वयात पोरं माजी कामं करायला लागली. या दारुनं मला झपाटलं हुतं कायमचंच!" आवंढा गिळत तो अजितला म्हणाला , " अजित, गड्या माजं एक काम करशील का ?"
" अरे रंगा, तुझं कसलंही काम असंल तरी करीन. बोल लवकर काय काम ते."
"आरं, पोरास्नी धडूत-कापडं आन खायाला आणलंय म्या. येवडंं दिशील का ? आरं बायकु माह्यारला रुसून गिलीया. आता ती शाप यायचं न्हाय म्हणलीया. तिजंबी बराबर हाय. एका मेनात दोन तलवाऱ्या कस्या राहतील ?"
" म्हणजे तु दुसरं लग्न केलंस की काय! न्हाय न्हाय ,लका इक खायाला पैका न्हाय आन दुसरं कशाला लगीन करतुया. दारु न्हवं का तिची सवत. म्हणूनशान ती कायमची सुडून गिलीया. पोरांची लय आठवण यितीया, गड्या ! तवा येवडं माजं काम कर. लयी उपकार व्हत्याल तुजं माज्यावर !"श्रीरंगाच्या हातातील कापडाची व खाऊची पिशवी घेत अजित त्याला म्हणाला," काळजी करू नकोस. हे पोहचवतो आणि तुला दिल्याचंही कळवतो. पण मावलेआईच्या टेकावर तर सोड मला."
" बघ की तु कुठं उभा हायीस ते ." श्रीरंग अजितला म्हणाला. अजितनं मागे वळून पाहिलं तर ओढा खाली दिसत होता. अजितनं श्रीरंगला घट्ट मिठी मारली. हातात हात मिळवून निघताना श्रीरंगला म्हणाला," रंगा, आज तुझ्यामुळं मी सुखरूप माझ्या घरी जात आहे.फार उपकार केलेस तू माझ्यावर ! अरे, तु एकटा कसा काय जाशील गावात ?"
" आरं, आमचं उभं आयुष्य गेलं या मसणवाट्यात. लका, भुतंपण आपल्याला घाबरत्यात." असं म्हणताना खदाखदा दोघंही हसली.आणि आपापल्या दिशेने दोघेही निघाली.
आता ठिकठिकाणी वस्त्या असल्यानं कुत्र्याच्या भुंकण्याची तरी साथ मिळणार होती. त्यामुळं अजितची भीती नाहीशी झाली होती. एक एक वस्ती ओलांडत अजितनं घर जवळ केलं. तेव्हा त्याचं कुत्र त्याच्या अंगावर भुंकत येऊ लागलं.
" काय रे, ओळखलं नाहीस का ?" म्हणल्यावर त्याची ताठ उभी असलेली शेपटी खाली पाडून हलवू लागला. अजितला त्यानं ओळखल्याची जाणीव झाली. तेवढ्यात दादा उठून बसले.त्यांच्या पाठोपाठ त्याची आईसुद्धा उठली. दादा म्हणाले, " लय उशीर केलास !" " मित्राबरोबर गप्पागोष्टी करण्यात वेळ गेला."
" सुपतीला कुणालातरी आणायचं हुतं." आई म्हणाली.
" कशाला पाहिजे सोबतीला ! आलो एकटाच." अजित दोघांकडं पहात म्हणाला.
" एकटा ! एकटा आलास व्हय." दादा त्यांच्याकडं पहात त्याला म्हणाले.
" गावातनं एकटाच निघालो होतो , पण ओढ्यात आल्यावर मला फार भीती वाटू लागली. भितीनं गर्भगळीत होऊन मी गपकन खालीच बसलो. कारण अंगात माझ्या त्राण उरला नव्हता. पण आपल्या किसनदादाचा श्रीरंग धावतच आला माझ्या सोबतीला. त्यानंच मला मावलेआईच्या टेकावर सोडलं. हे बघा त्यानं त्याच्या पोरांना कपडालत्ता आणि खायाला दिलंय ." हे ऐकून त्याच्या आईला भोवळच आली. दादा तर आवाक होऊन त्याच्याकडं पहात त्याला म्हणाले, " काय !रंग्या ! आरं, त्याला मरून दोन वरीस सरली. काय तर तुला भास झाला असावा." अजित त्यावर म्हणाला, " नाही दादा, खरंच रंगानं सोबत दिली म्हणून मी सुखरुप तुमच्यापर्यंत आलो, नाही तर भीतीनं माझी पाचावर धारण बसली होती. त्यावर आईनं त्याला विचारले," सांग बरं, कसा दिसत हुता?" अजितनं घडलेली संपूर्ण हकिकत त्या दोघांना सांगीतली. तेव्हा दादा त्याला म्हणाले, " आरं, रंग्या मेल तवा त्याच्या अंगावर त्वा बघितलेली कापडंच हुती." दोघांच्याही डोळ्यात आनंदानं पाणी तराळलं. त्यांचा मुलगा सुखरुप भुताच्या तावडीतून, श्रीरंग म्हणजे भुताच्या मदतीनं सहिसलामत घरी परतला होता. त्याच्या आईनं त्याला जवळ घेऊन त्याचे मटामटा मुके घेत ती म्हणाली," रंगाचा तुज्यावर लय जिव हुता. म्हणताना त्यो तुज्यासाठी धावून आला. पॉर मेल पण सरगी सोन्याचं झालं !" आईला आवंढा गिळवला नाही अन डोळं पाण्यानं भरून आलं. किती वेळ तर दादा व आईनं त्याचा हात सोडला नाही. अजित त्यांना म्हणाला, " मी उद्या रंगाच्या सासरवाडीला कपडे आणि खाऊ ध्यायला जाणार आहे. मला लवकर उठवा. "
" आता कुठंबी जायाचं न्हाय बघ, आजू " आई व दादा काळजी सुरात त्याला म्हणाली. अजित विनवणीच्या सुरात त्यांना म्हणाला , " मला जायचे आहे . रंगाला तसा मी शब्द दिलाय. तेव्हा तुम्ही मला आडवू नका ."
अजितच्या झोपेत चावळण्याचा आवाज ऐकून त्याची पत्नी, सीमाला जाग आली. तिनं त्याला गदागदा हलवलं. तेव्हा अजित डोळं चोळत उठला व अंधारात इकडं तिकडं पहात आश्चर्यानं त्याच्या पत्नीला म्हणाला , " तु कधी आलीस गावाला ?" त्यावर सीमा त्याला म्हणाली, " मी गावाला नाही आणि तुम्हीही नाही. आपण दोघंही मुंबईतील आपल्या फ्लॅटमधील बेडरूममध्ये आहोत.काय चावळताय , ' तुम्ही मला आडवू नका.' काय झालं. स्वप्न पडलं का ! " सीमनं त्याला विचारलं. तेव्हा भानावर येत अजित म्हणाला," सीमा, म्हणजे मी गावी नाही तर...! आपल्या बेडरूममध्ये आहे. त्याला हायसं वाटलं.त्यानं जोराचा सुस्कारा टाकत सीमाला म्हणाला, " अग सीमा, किती भयानक स्वप्न पडलं मला ! " सीमानं त्याचं भिजलेलं टी शर्ट काढलं व टॉवेलनं त्याचं अंग पुसून घेतलं आणि त्यानंतर ते दोघंही गाढ झोपी गेले.