Bal Zodage

Tragedy

4.0  

Bal Zodage

Tragedy

नाका कामगार

नाका कामगार

9 mins
350


     संपूर्ण भारतात लॉकडाऊन लागू होऊन एक महिना उलटून गेला होता आणि सरकारने त्याची मुदत पुन्हा वाढवली होती. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा सोडल्या तर बाकी सर्व सेवा बंदच होत्या. थोडक्यात काय तर औषधांची व किराणा मालाची दुकाने , दुध व भाजीपाल्याची विक्री तीसुद्धा फक्त ठराविक वेळीच चालू ठेवण्याची परवानगी होती. त्यामुळे पोलिसांचा पहारा सोडला तर जवळपास सर्वच रस्ते निर्मनुष्य झाले होते. बगीचे, चौपाट्या , पर्यटनस्थळे, प्रार्थना स्थळे बंद होती, त्यामुळे सर्वत्र भकास वातावरण भासत होते. सर्वजण आपापल्या घरात बंदिस्त होती, अगदी जेलबंद असल्यासारखी ! ज्याच्याकडे पैसापाणी होता त्यांना लॉकडाऊनचा आर्थिक तान जाणवत नव्हता . परंतु ज्यांचे हातावरचे पोट आहे त्यांची फारच आबाळ चालली होती. संसाराचा गाडा चालवताना त्यांचा जीव मेटाकुटीला येत होता. हनुमंत हा त्यापैकीच एक होता. हिकडून तिकडून बेडाबेड करत आतापर्यंत त्याने घर चालवले होते. पण यापुढे कसे चालवायचे ? याची त्याला भ्रांत पडली होती . त्यात दहा बाय दहाच्या खोलीत एवढे दिवस बंदिस्त राहुन त्याची मुलेही कंठाळली होती. त्याने आतापर्यंत ' बाहेर कोरोना आहे , तेव्हा बाहेर जाऊ नका ' असे त्यांना सांगत त्यांना घरातच खिळवून ठेवले होते.

         संकटामध्ये भरीस भर म्हणून की काय त्यादिवशी त्यांच्या चाळीत एक कोरोनाचा पेशंट सापडला होता.त्यामुळे ती संपूर्ण चाळ सिल करण्यात आली होती. नागरिकांना केवळ नैसर्गिक विधीसाठीच घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली होती. कालपर्यंत कोरोनाव्हायरसचे पेशंट लांबच्या येरीयात सापडत असल्याच्या बातम्या त्याच्या कानी येत

होत्या, परंतु आता ही महामारी त्याच्या चाळीत पोहचली होती. ह्या व्हायरसमुळे आजारी पडले तर कोणीही जवळ येत नाही. एकटेच रहावे लागते इस्पितळात आणि दुर्दैवाने एखाद्याचा त्यात मृत्यू झाला तर त्याच्या अंतिम संस्काराकरीता नातेवाईक कोणीही स्मशानात येत नाही. केवढे हे दुर्दैवी मरण ! अशी शत्रूवर सुध्दा पाळी येऊ नये असे त्याला वाटत होते.आपल्यावर पाळी आली तर.....! आपला वंशच बुडेल. या भितीने त्याचा चेहरा उतरुन गेला होता.

           त्याच्या पत्नीबरोबर म्हणजे जास्वंदीबरोबर यासंदर्भात बोलतेवेळी तो म्हणाला , " आगं जास्वंदे, कामबी बंद हाय. तु बघतीस घर चालवताना किती दमछाक होते ती. आणि त्यात ही बला आपल्या चाळीत आलीय. तुला काय वाटतं? काय करावं आपण? " तेव्हा ती त्याला म्हणाली, " आव , एवढं कशाला काळजी करताय ! गावाकडं जावूया की आपण. जगायसाठी तिकडं काय तरी कामधाम मिळंलच की. मामांजीसनी बोला ह्याबद्दल." त्याला जास्वंदीचे म्हणणे पटले आणि त्याने लगेच आपल्या वडिलांना म्हणजे शिदाप्पा यांना फोन लावला.

"बापू , इकडं पोरांची लय आबाळ उठलेय. आमच्या चाळीत एक पेशंट सापडलाय. म्हणून गावाकडं यायचं म्हणतोय ! तिकडं कामधाम मिळंल का ? " त्यावर शिदाप्पा त्याला म्हणाले, " अरं ,यी की हिकडं . कामाचं काय तरी हुईल. आरं तु आमच्या जवळ आसला म्हंजी आमी बिनघोरी झालु बघ." हे ऐकून हनुमंतला मनावरचा तान हलका झाल्यासारखा वाटला.

            राज्यात वाहतूक सेवा बंद होतीच पण जिल्हा बंदीसुध्दा लागू करण्यात आली होती. त्यामुळे गावी जायाचं कसं हा प्रश्न त्याला भेडसावत होता. त्याच्या चाळीचे सिल काढण्यात आले होते. गावी जाण्याची समस्या सोडवण्यासाठी त्याने सरळ पोलीस स्टेशन गाठले. त्याने हवालदाराला आपल्या समस्येबाबत सविस्तर माहिती दिली. सुदैवाने तो हवालदार बीडकडचा म्हणजे त्याच्या भागाकडचा होता. हनुमंतची समस्या ऐकून त्याला त्याची दया आली. त्याने त्याच्या समस्येबाबत चांगला कानमंत्र दिला आणि खुशीतच घरी परतला.

           

          'फादर सिरीयस स्टार्ट इमिजिएटली ' ही गावाहून आलेली तार त्या पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दाखवत तो हात जोडून त्यांना म्हणाला, " साहेब, माझे वडील लय सिरीयस हाय , मला माझ्या परिवाराला घेऊन गावी जायाचं हाय . तेव्हा तुम्ही परवानगी द्यावी ही कळकळीची विनंती हाय, साहेब ! आपण परवानगी दिलीत तर लय उपकार होतील आपलं. " पोलीस प्रमुखालाही त्याची दया आली व त्यांनी त्याला गावी जाण्याबाबतचे परवानगीपत्र दिले.अत्यंत अवघड गणित सुटल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वहात होता.

            सुर्योदयापुर्वीच हनुमंत त्याच्या परिवाराला घेऊन गावी जाण्यासाठी निघाला होता. सुरुवातीला मुले आनंदाने हिकडे-तिकडे बघत चालत होती, कारण कित्येक दिवसांनी  त्यांच्या चाळीच्या बाहेरील जग त्यांना पहावयास मिळाले होते. जसे की,अपघाताने दिर्घकाळ बेडरिडन असलेली व्यक्ती प्रथमच बाहेरील जग पाहते व ती जसी आनंदीत होते अगदी तसाच आनंद या मुलांना वाटत होता. परंतु त्यांचा तो उत्साह दिर्घकाळ टिकला नाही. त्यांचे पाय चालून दुखु लागले. शेवटी एका मुलाला हनुमंतने आपल्या खांद्यावर घेतले. त्याच्या एका हातात सुटकेस ज्यामध्ये त्यांची कपडे व इतर महत्वाचे सामन ठेवले होते.

जास्वानंदीने दुसऱ्या मुलाला काखेला घेतले होते तर डोक्यावर गावी पोहचेपर्यंत पुरेल एवढे खाण्यापिण्यासाठी लागणारे सामान होते. सकाळचे नऊ वाजले होते , पण ऊन्हाळ्याचे दिवस असल्याने ऊन्ह चांगले तापू लागले होते. त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वहात होत्या . त्यांच्या नाकातोंडाला लावलेले मास्कही ओले झाले होते. मुलांनी बिस्किटे तरी खालली होती, पण त्या दोघांनी काहीच खालले नव्हते.हनुमंत रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाकडे बोट दाखवत जास्वंदीला म्हणाला , " त्या झाडाखाली बसून आपण नास्टा करुया का ? " त्यावर जास्वंदीने मानने होकार दिला व ते सर्वजण झाडाच्या सावलीत सर्वजण नास्ता करायला बसले. नास्ता झाला, घटकभर आरामही केला आणि पुन्हा मार्गस्थ झाले.

          सुर्य आग ओखत होता. वाऱ्याचा मागमूसही नव्हता. त्यामुळे अंगाची लाही-लाही होत होती. त्यांच्या सावल्या त्यांच्या पायात घुटमळत होत्या.अशात हनुमंत आणि त्याची पत्नी गप्पा मारत वाट हलकी करण्याचा प्रयत्न करत होते. कोरोनाव्हायरस या महामारीबद्दल बोलतेवेळी हनुमंतला माता सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर ऐकलेले भाषण आठवले जे त्याने जास्वंदीला सांगितले 'आपल्या देशावर ज्या काळी ब्रिटिशांचे राज्य होते, त्या काळात मुंबई प्रांतामधील मुंबई, पुणे, अहमदाबाद या शहरात प्लेग या संसर्गजन्य रोगाची साथ पसरली होती. सुरुवातीला ताप यायचा त्यानंतर काखेत गोळा यायचा आणि तीन-चार दिवसात माणूस गतप्राण होत होता. कोंबड्यांचा साथीचा रोग आल्यावर जशा कोंबड्या पटापट मरतात तशीच आवस्था तेव्हा माणसाची झाली होती. अशा परिस्थितीत सावित्रीबाईं फुले यांनी त्या रुग्णांची खूप सेवा केली .आपल्या जिवाची परवा न करता त्यांनी वेळप्रसंगी त्या रुग्णांना स्वतःच्या खांद्यावर घेऊन इस्पितळात पोहचवले होते. शेवटी ह्या रुग्णांची सेवा करता-करता त्यांनाही त्याचा संसर्ग झाला व त्यातच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.' हे ऐकल्यानंतर जास्वंदीच्या डोळ्यात पाणी आले.

             कडक ऊन्हात चालून त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. तहानेने जीव व्याकूळ झाला होता. त्याच्या घशाला कोरड पडली होती. तरीही जे काही थोडेफार पाणी शिल्लक होते ते त्याने स्वतः न पिता आपल्या मुलांना व पत्नीला पिण्यास दिले. पुढे वाटेत येणारे गाव हाकेच्या अंतरावर राहिले होते. त्या गावात पाणी नक्की मिळेल या आशेने ती दोघे झपाझप पावले टाकत त्यांनी गावात प्रवेश केला होता . रस्त्याकडील जवळ जवळ सर्व घरात पाणी मागितले पण कोरोनाव्हायरसच्या भितीने त्यांना कोणीच पाणी दिले नाही. त्याच्या घशाला कोरड पडली होती, तर शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे त्याला चक्कर येत होती. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली थोडे बसावे म्हणून जास्वंदीच्या मदतीने तिकडे जाऊ लागला. तेवढ्यात त्याची नजर रस्त्याकडेला पडलेल्या बिस्लरीच्या बाटलीकडे गेली आणि त्याला हायसे वाटले! त्या बाटलीत जेमतेम दोन-चार घोटच पाणी असेल. बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तसेच वाटत होते त्याला. त्याने ती बाटली उचलल्यावर त्यातील पाणी पिणार एवढ्यात जास्वंदी त्याला म्हणाली, " आवो, दुसऱ्याने उष्टवलेले पाणी पिणार हायंस का ! आजारीबिजारी पडाल, तेवा नका हो पिऊ ते पाणी." हे ऐकून व्याकुळतेने तो तीला म्हणाला, " आगं , पाण्याविना जीव कासाविस झालाय माझा ! कायबी होऊ दे मी नाह्य त्याची फिकीर करत. आगं आता माझा जीव पाण्याविना तडफडतोय. हे बघ जास्वंदे , हे पाणी मी पिणारच." असे म्हणत त्याने आधाशासारखे त्या बाटलीतील पाणी प्यायला.त्यानंतर त्याला थोडे बरे वाटले. पण त्याचे समाधान फार टिकले नाही. प्रखर सूर्य किरणांनी त्याचे चार घोट पाणी गायब केले होते. एक-दिड किलोमीटर चालल्यावर त्याला खूप तहान लागली. त्याच्या घशाला कोरड पडली होती.शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे त्याला चक्करही येत होती.पाणी प्यायल्याशिवाय गत्यंतर नव्हती. तो इकडे-तिकडे पाण्याचा शोध घेत असता, त्याचे लक्ष रस्त्यापासून थोडे दुर असलेल्या डबक्याकडे गेले. त्यात हिरवट-काळपट पाणी होते. हे घाणेरडे पाणी जास्वंदी पिऊ द्यायची नाह्य. ती मुलांना खावू देत असताना त्याने क्षणाचाही विलंब न करता त्या डबक्यात उतरला आणि कशाचाही विचार न करता त्यातील पाणी घटाघट प्यायला. आता त्याला स्वर्गानंद झाला होता.

           सांज होऊ लागली होती. दिवसभर चालून ते सर्वजण थकले होते. त्यांचे शरीर भेंडाळले होते. त्यामुळे त्यांना विश्रांतीची नितांत गरज होती. एक फर्लांभर अंतरावर दिव्यांचा प्रकाश दिसू लागल्यावर त्यांना जवळच गाव असल्याचा अंदाज आला आणि थकलेल्या शरीरात पुन्हा जोर आला. झपझप पावले टाकत त्यांनी गाव जवळ केला. त्यांची मुले पारावर ' कुरकूरे ' खात-खात खेळत होती. जास्वंदी स्वयंपाक करण्यात मग्न होती. हनुमंतच्या पोटात मळमळायला लागले होते. त्याला उलटी आल्यासारखे वाटत होते. धरणीला पडूनही आराम त्याला वाटत नव्हता. तो इकडून तिकडून हालत होता. जास्वंदीने त्याला विचारले, " काय होतंय , वो ?" त्यावर हनुमंत उतरला, " आगं, पोटात मळमळ होतंय. ओलटी आल्यासारखं ......" आणि बोल अर्धवट असतानाच भडाभडा तो उलट्या करु लागला. जास्वंदीने कालवण शिजायला टाकून ती त्याला आधार द्यायला आली. उलट्या होता होता त्याच्या पोटात कळ मारु लागली, म्हणून तीचा आधार घेऊन तो संडासला गेला. पाण्यासारखे संडासला होत होते. उलटीजुलाबाने तो पार पेकाळून गेला होता. त्याला संडासला जाण्यचीही ताकत उरली नव्हती. हतबल होवून जास्वंदी रडू लागली. तीच्या रडण्याचा आवाज ऐकून गावातील लोक जमा झाले. त्यांनी त्याला दवाखान्यात नेहले. डॉक्टरने तपासल्यावर ऍडमीट करायला सांगितले. जास्वंदी पुन्हा रडू लागली. तेव्हा त्यातील एकजण काळजीच्या सुरात तीला म्हणाला, " का रडता, ताई ?" तेव्हा ती त्याला म्हणाली," दादा, माझ्याकडं पैसे न्हायत ऍडमीट करायला." एवढे बोलून पुन्हा रडू लागली. तीला धीर देत तो इसम तीला म्हणाला," काळजी करु नकोस, ताई, आम्ही करु तो खर्च. " हे ऐकून तीचा जीव भांड्यात पडला. त्याला ऍडमीट करुन त्याच्यावर उपचार सुरू झाले. ते सर्वजण तीला म्हणाले, " ताई, तु एवढ्या रात्रीचे इथे कशी राहशील.चल तुला सोडतो आमच्या संघटनेच्या कार्यालयात. तीथे रहा. रात्रभर आम्ही थांबतो दवाखान्यात. सकाळी सावकाश ये सगळं आवरुन." ही माणसे देवासारखी धावून आली म्हणून बरे नाही तर काय झाले असते माझे, या विचाराने तीच्या डोळ्यातून अश्रु घळघळ वाहत होते. त्या कार्यालयात तीला महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा फोटो दिसला. तीने नम्रतापूर्वक त्यांना हात जोडले.

            हनुमंतने सर्व हकिकत डॉक्टरांना सांगितल्यामुळे त्याच्यावर योग्य पध्दतीने उपचार सुरू होते.दुसऱ्या दिवशी सलाईन व औषधे चालूच होती. जुलाब आता नियंत्रणात आले होते. पण उलट्या मात्र कमीअधिक प्रमाणात होत होत्या. त्याचे कोविड चाचणी करिता स्वँब घेण्यात आले होते.जास्वंदी त्याची सुश्रुषा करत त्याला धीर देत होती. हनुमंत तीला म्हणाला," बापुला कळवलं का गं ?" त्यावर ती त्याला म्हणाली," आवो, ते घाबरून जातील म्हणून न्हाय कळवलं. "

" ऍडमीटबद्दल हवं तर नको सांगुस, पण कळवायला पाहिजे." तो म्हणाला.

" बरं, कळवती त्यांना." ती म्हणाली. नर्सने संपलेली सलाईन काढून दुसरी लावली. त्यानंतर ती जास्वंदीला म्हणाली," पेशंटच्या जास्त जवळ बसू नका. थोडे अंतर ठेवून बसा. मास्क अजिबात काढू नका. पेशंटबरोबर स्वतःचीही काळजी घ्या." तीने मान डोलावून सकारात्मक प्रतिसाद दिला.

            तीन दिवस झाले होते. त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने ऑक्सिजन लावला होता. आज त्याचा कोविड चाचणीचा रिपोर्ट येणार होता. जास्वंदीला या गोष्टीचे दडपण आले होते. पण त्याची जाणीव त्याला होऊ देत नव्हती. कोविड चाचणीचा रिपोर्ट येणार हे तीला मदत करणाऱ्या गावकरी मंडळींना असल्याने तेही दवाखान्यात आले होते. डॉक्टरने रिपोर्टचा लिफापा खोलून पाहिला आणि चिंतीत होऊन म्हणाले, " त्यांना ताबडतोब सरकारी इस्पितळात ऍडमीट करावे लागेल, कारण रुग्ण कोविड फॉजिटीव्ह आलाय. मी अँबुलन्सची व्यवस्था करतो." हे ऐकून जास्वंदी माणसिक धक्क्याने कोसळली होती. तीला सावरण्याचा प्रयत्न ती गावकरी मंडळी करत होती. अँबुलन्समध्ये ठेवण्या अगोदर एकवेळ डोळे भरुन त्याला पाहताना तिच्या डोळ्यातून नकळतपणे अश्रु वाहत होते. हनुमंतला कळून चुकले होते की, आपल्याला कोरोना झालाय ते. त्यामुळे त्यानेही तीला डोळे भरुन पाहिले. त्यानंतर त्याला घेऊन अँबुलन्स सरकारी इस्पितळाकडे रवाना झाली.

             दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावत चालली होती. गेली दहा हनुमंत व्हेंटिलेटरवर होता. डॉक्टर म्हणायचे डायबेटीस असल्याने त्याची प्रकृतीत बिघडत चालली आहे. यातून तो वैद्यकीय क्षेत्रातील चमत्कारच मानला जाईल आणि तो व्हावा हीच मनापासून ची इच्छा ! ती धायमोकलून रडत होती आणि तिच्याबरोबर तीची मुलेही ! सगळे संपलेय असेच तिला वाटत होते. तरीही तीची देवावर अपार श्रद्धा होती. देव चमत्कार नक्की घडवेल व माझा नवरा बरा होईल. पण अखेर सगळे अंदाज चुकीचे ठरले. डॉक्टरांनी हनुमंतचे निधन झाले होते. त्याची मुले पोरकी झाली होती. जास्वंदीने हबरडा फोडून बोलू लागली," आवो, आसंकसं मला सोडून जाताय. मला बी घेऊन जायचं नाही का! " रडत रडतच ती गावकरी मंडळींना म्हणाली," ह्यांच्या बापूना बोलवा." पण लॉकडाऊन असल्याने कोणालाही येता येत नव्हते. तिला लांबूनच त्याचा पारदर्शक प्लास्टिकमधून दाखवला व अंत्यविधीला स्मशानभूमीत घेऊन गेले.

            त्या मंडळातील महिला तीला धीर देत होत्या, ' पोराबाळांना घडव. तुझा नवरा तुझ्याबरोबर असेल तुझ्या सहवासात घालवलेल्या आठवणीरुपी. हिम्मतीने जग आणि मुलांना जगव, घडव चांगलं.' तीची नजर सावित्रीबाईंच्या फोटोकडे गेली आणि तिला त्याने सांगितलेले ती प्लेगच्या साथीतील योगदान आठवले. तिने निश्चय केला, मुलांचे संगोपन करता करता सावित्रीबाईंच्या वाटेने उर्वरित जीवन व्यतीत करण्याचा! ' आणि तिने माता सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा संघ ' या संस्थेमधून समाज सेवेला , रुग्णसेवेला आरंभ केला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy