Bal Zodage

Horror Thriller

4.5  

Bal Zodage

Horror Thriller

उतारा

उतारा

9 mins
1.0K


      सांज होऊ लागली होती.सूर्याची तांबूस-केशरी रंगाची मलूल किरणे पश्चिम क्षितिजावर पसरली होती.आकाशात पाखरांचे थवे किलबिलत घरट्याकडे चालले होते.गुरेढोरे गाव जवळ करु लागली होती. इतस्थ शेपूट वर करून उड्या मारणारे वासरू आणि त्याला बघून हंबरणारी गाय, गुरांच्या घुंगरांचा आवाज नि रातकिड्यांच्या ' किर्र किर्र ' आवाजाने वातावरण आल्हादायक झाले होते. जोगवलेली गुरे पाहून गुराखी समाधानी झाले होते.


    गाव आता हाकेच्या अंतरावर आले होते. कुत्र्यांचा भूकण्याचा आवाज , कोंबड् कलकलाट, जात्यावरच्या ओव्यांचा आवाज , भाकरी थापण्याचा आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता.ओठ्यावर मुला-बाळांना अंगाखांद्यावर खेळवत दिवसभरचा काबाडकष्ट करून आलेला थकवा घालवत बसली होती पुरुष मंडळी. 


    गेले दोन दिवस सखुबाईच्या घरची चूल पेटली नव्हती. कारण ती आजारी होती. हातावरचे पोट , काम केल्याशिवाय खायाला मिळत नसे. शेजारच्या गंगुबाईने दिलेल्या अन्नावरच तग धरून होती सखुबाईची मुले ! आज मात्र सकाळपासून त्यांच्या पोटात अन्नाचा एक कणही गेला नव्हता. संजय पोटात असतानाच सखुबाईच्या नवऱ्याचे अपघाती निधन झाले होते. तेव्हापासून तीच  

त्या दोघांचे पालनपोषण करीत होती. मिळेल ते काम ती करत होती. 


    सकाळीच मालुताईंनी डोहाळे जेवणाची भांडी घासायला रात्री ये, असे सखुबाईला सांगितले, तेव्हा तिने तब्येत बरी नसल्याने येता येईल असे वाटत नसल्याचे त्यांना सांगितले होते. पण भुकेने व्याकुळ झालेले मुलांचे चेहरे बघून तिने आजार झटकला. तोंडावर सपासपा पाणी मारले. केसांचा बुचडा बांधला. साडी नीटनेटकी करून ती मालुताईकडे निघाली.


    संजयच्या पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. घरात काय खायाला मिळते का ते बघण्यासाठी त्यांने उतरंडीची एक एक करत सारी  गाडगी- मडकी खाली उतरली, पण त्यात त्याला काहीच खायला मिळाले नाही. त्यामुळे तो वैतागत घराबाहेर आला.संगीताकडे रागाने बघत तिला म्हणाला, "ताय, आयनं खायाला ठिवल्यालं , त्येच काय झालं ?" त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते. काकुळतीच्या स्वरात तो तिला म्हणाला ,"ताय, गंगुकाकूच्यातन् वायसी भाकरी आण की मला लय भूक लागलीया गं!" गेले दोन दिवस तिनेच तर खायाला दिले होते. शेजाऱ्याला सारखे सारखे त्रास देणे बरे नाही, या विचाराने तिने गंगुबाईकडे भाकरीसाठी जाणे टाळले, म्हणूनच ती त्याला समजुतीच्या स्वरात म्हणाली , आरं संजू , शेजाऱ्याला सारखं सारखं तरास द्यायचा नसतु. जरा दम काड, आय येयीलच इतक्यात." आईला यायला उशीर अजूनही वेळ लागणार होता. भुकेवरुन संजयचे लक्ष विचलित करण्यासाठी त्याला गप्पात रंगवायचे या विचाराने तिने त्याला काहीतरी भन्नाट सांगायचे ठरवले. गंगुकाकूने सांगितलेली बयाकाकूला भुताने झपाटल्याची वार्ता ती त्याला सांगू लागली. संगीताला मोठी माणसे गप्पागोष्टी करताना त्यांच्यात बसून ऐकायची सवय होती. त्यामुळे बयाकाकूला भुताने झपाटल्याची वार्ता संपूर्ण माहीत होती. ती वार्ता त्याला सांगण्याच्या हेतुने ती म्हणाली, " आरं, सुंदीच्या आयला काय झालंय तुला ठावं हाय का?"


" न्हाय ग, काय झालं सांग की."संजय तिला म्हणाला.

" आरं, तिला भूतानं झपाटलंय म्हण !" ती.

" कवा ? कुठं ? सांग की ग ताये " तो.

" मध्यान्हीचा सूर्य आग वकत होता आन बयाकाकू मसनवाट्यातन घरला येत हुती. तवा धाडकण ती खाली आपटली. तिच्या तोंडातून फेस येत हुता.अंग पोळत हुतं." ती.

" भूत झपाटतं तवा आसं हुतं व्हय! " तो.

" लय वाडूळ पाय खोडत हुती. म्हणजीे भुतानं गोळसलं आसंल आसं गंगुकाकू म्हणत हुती." ती.

" ये आजून काय काय ठाव हाय ते सांग की मला." तो.

"काय बी येड्यावाणी बडबडतीया. पण डाक्टरचं औषाद चालू हाय. " ती.

" त्येनं फरक पडला आसंल नव्हं ." तो.

" कशाचं काय , रात झाली की,तिचं आंग इस्त्यावाणी तापतंय .आन त्येच्यात ती येड्यावाणी काय बी बडबडतीया . " ती.

" आता बयाकाकूचं कसं व्हायचं ग ? " तो.

" गंगुकाकू सांगत हुती , सांच्याला दिवरुषाला बोलवलंय." ती.

" त्यो काय करतु ?" त्याने कुतहलाने तिला विचारले.

" त्यो मंत्रानं भूत उतरतु. " ती.

" ये ताये मला बगायचं हाय, कसं भूत उतरवत्यात ते " तो.

 "आरं,लहान पोरांनी बगायचं नसतं म्हणं,आन आयला कळलं तर लय वरडंल बग." ती.

" न्हाय मला बगायचं हाय. म्या जाणार हाय. तू आयला नग सांगू." तो.

" म्या न्हाय सांगितलं आन दुसऱ्याकडनं समजलं तर आय तुझ्याबरुबर मला बी बडवंल." ती.


    हट्टाला पेटलेल्या संजयने तिचे काहीच ऐकले नाही. त्याला नवीन काही तरी जाणून घेण्याची संधी मिळाली होती. त्याला ती संधी दवडवायची नव्हती. त्यामुळे आपल्या या कृत्यामुळे होणाऱ्या परिणामाला सामोरे जाण्याची त्याने मनाची तयारी केली होती. 


    बयाबाईच्या घरी शेजारच्या आया - बाया जमा झाल्या होत्या. कमळाआजी तिला भाजी-भाकरी चारायचा प्रयत्न करत होती. कारण डॉक्टरने अन्न खाल्ल्याशिवाय औषध घ्यायचे नाही, असे सांगितले होते.बयाबाई मात्र तोंडात कोंबलेला घास थुंकत होती. शेवटी लाडीगोडी लावत कमळाआजीने तिला दुधातला भाकरीचा काला चारला. थोडे तरी अन्न पोटात गेल्यामुळे सर्जेराव म्हणजे बयाबाईच्या नवऱ्याने तिला गोळ्या जबरदस्तीने चारल्या. तेवढ्यात देवऋषपण करणारा तुकाअण्णा तिथे आला. कपाळावर, हातावर, दंडावर विभूतीच्या पांढऱ्या पट्ट्या ओढलेल्या मिशित ओठ झाकलेले, गळ्यात विविध रंगी मण्यांच्या व रुद्राक्षाच्या माळा ,छातीपर्यंत वाढलेली दाढी , अंगात छाटणी व धोतर , हाताच्या बोटामध्ये नक्षत्रांच्या अंगठ्या , जुजबी अशी ठेंगणी आकृती म्हणजे तूकाअण्णा देवऋषी !


      तुकाअण्णाने त्याच्या झोळीतून काही बाही काढले.त्याची बयाबाई समोर विशिष्ट पध्दतीने मांडणी केली. त्यानंतर त्याने एका लिंबाला मुठीत धरून तिच्या डोक्यावर धरुन काहीतरी मंत्र पुटपुटले व मानेला विशिष्ट प्रकारे झटका देऊन तिच्या खांद्यावरून पायापर्यंत आणून त्याच्या दोन काफी केल्या. त्यानंतर त्याला हळद - कुंकू लावून त्याने पुन्हा अंगारा हाताच्या अंगठा व बोटामध्ये धरून तशाच प्रकारे तिच्या अंगावरून फिरवत मंत्र पुटपुटले. त्यानंतर तो अंगारा तिला लावला.तरीही बयाबाई बडबडतच होती वेड्यासारखी!तुकाअण्णा सर्जेरावला म्हणाला, " गड्या, निबार भूतानं झपाटलंय वाटतं हिला.त्याला उतारा ठिेवायला लागंल."

"सांगा की अण्णा, कसला उतारा ठिवायचा त्यो." सर्जेराव तुकाअण्णाला म्हणाला.

 "काय न्हाय, नसती दोन अंडी,बाजरीच्या दोन भाकऱ्या आन त्यावर झणझणीत हिरव्या मिरच्याचा खर्डा ठिव म्हणजी झालं." तुकाअण्णा त्याला म्हणाला.

"कसा करायचा उतारा ? कुठं ठिवायचा त्यो ?" सर्जेरावने त्याला विचारले.

"अंडी शिजवून त्येच्या दोन कापी करायच्या, त्याला थोडी चटणी-मीठ व हळद-कुंकू लावायचं मग केळीच्या पानावर पयली भाकरी ठिवून तीच्यावर खर्डा ,लिंबू अंड्याच्या कापी ठिवायच्या. त्यानंतर ह्यो उतारा नदीच्या काठावर म्हणजी मसणवाट्याच्या जरा आलीकडं ठिवायचा आन परत फिरायचं, परत फिरल्यावर मागं वळून बघायचं न्हाय हे धेनात ठिव. आरं सर्जू , हिला डाक्टरकडं नेहलं हुत का ?" तुकाअण्णा त्याला म्हणाला.

 " व्हय नेहलं हुत की , डाक्टरनं औषद बदलून दिलंय." सर्जेराव त्यांना म्हणाला.

" बरं बरं आसुदी .औषद दिलं म्हणून माझ्या मंत्रात फरक पडणार न्हाय. तीच्याकडं ध्यान दी. चल, म्या जातू आता घरला ." असे म्हणत तो देवऋषी तेथून निघून गेला.

 

    मघापासून हे सर्व टक लावून संजय पाहत होता. ह्या नवीन माहितीच्या दालनात तो तल्लीन झाला होता.पण त्याची ही तल्लिनता भंग पावली जेव्हा अंडी आणि भाकरीचे नाव निघाले. आतापर्यंत झोपलेले त्याच्या पोटातील भुकेचे कावळे जागे झाले होते. आता त्यांना आवरणे कठीण होते. ह्या घडीला तरी भूक शमविणे हेच त्यांचे जणू ध्येय आणि उद्दिष्ट झाले होते. उताऱ्याचे जेवण खायाचे हे त्याने मनोमन ठरवले. पण एवढ्या काळ्याकुट्ट अंधारात नदीच्या काठापर्यंत जायचे कसे ? ह्या विचारात त्याने बयाकाकूचे घर सोडले.


     घरी कंदील नाही वा बॅटरीही नाही आता करायचे काय? उतारा खायाला जायचे कसे ? ह्या विचारात मग्न होता .एवढ्यात त्याच्या घरासमोरील झाडाखाली खुरुड्यात कोंडलेल्या कोंबड्यांच्या आवाजानं त्याचे लक्ष त्या झाडाकडे गेले.त्यावेळी त्याला त्यावर काहीतरी चमकत असल्याचे दिसले. त्याचा उजेड पडत होता. त्याने संगीताला विचारले, "ताय, त्या झाडावर काय चमकतंय ?"

" आरं, ते काजवं हायत." संगीता त्याला म्हणाली.


     संजयची ट्यूब पेटली. त्याला नदीच्या काठापर्यंत जाण्यासाठी दिेवा मिळाला होता. तो लग्बगीने घरात गेला व प्लास्टिकची पारदर्शक पातळ बॅग घेतली. झाडाजवळ जाऊन काजवे पकडण्याचा प्रयत्न करू लागला. पण ते काही सापडत नव्हते. शेवटी तो झाडावर चढला.मोठ्या महत्प्रयासाने त्याने दोन-चार काजवे पकडले. बॅगेेला वर गच्च पकडून तो घरी आला. तेव्हा त्या काजव्यांकडे पाहत संगीता त्याला म्हणाली, " आरं, मरतील की त्ये. त्येनला हवा कुठन मिळायची.नामूदादा सांगत हुता म्हणं पक्षी, प्राणी, कीडं मकुडं आन माणसाला सुदीक आक्सिजन म्हणजे हवा जिवंत राहण्यासाठी लागतीया." 

" मग म्या काय करू? मला हे पाहिजीत ."संजय म्हणाला.

" आरं, त्याला बारीक भोकं पाड त्यामुळं त्येनला हवा मिळंल. थांब म्या अगरबत्ती पिटवून आणती.त्येनं भोकं पाडू." संगीता म्हणाली. तिने प्लास्टिकच्या बॅगेला भोके पाडली. आता संजयची नदीकाठी जाण्यासाठी लागणारी बॅटरी तयार झाली होती. त्याला डोळ्यासमोर फक्त तो अंडी-भाकरीचा उतारा दिसत होता. तो तीला म्हणाला, " म्या गोयंद्याकडन खेळून येतु." संगीता पुढे काही बोलण्यागोदर तो तेथून पसार झाला.


     काजव्यांच्या उजेडाने अंधार कापित संजय नदीकाठी मार्गक्रमण करत होता. आपल्याला खायाला मिळणार या सुखद विचाराने गाणे गुणगुणत चालला असताना त्याला रडणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येऊ लागला.तसा तो जरा चरकला , पण पुन्हा त्याच्या मनात आले, अरे असे एखादे कुत्रे रडतं, त्याला काय भ्यायचे ! आणि पुन्हा तो ताडताड चालू लागला.आता उतारा त्याच्या दृष्टीपथात आला होता.त्यामुळे तो अतिशय आनंदीत झाला होता.इतक्यात टिटव्यांचा कालवा सुरू झाला, मध्येच घुबडाचे घुत्कारण्याने आवाज कानी पडताच तो थबकलाच !  त्याच्या काळजात धडकी भरली. घामाने त्याचे अंग डबडबले होते. त्याचे एक मन म्हणत होते,भुकंनं मेलु तरी चालंल पण आता पुढं जायाचं न्हाय.आणि ह्या विचारानं तो दोन पावले मागे सरकलाही, एव्हढ्यात दुसरे मन म्हणत होते, आरं, माणसानं कसं जवानासारखं पुंढं पुढंच जायाचं आसतं,आरं, सकाळपासन उपाशी हायीस आणि समुर चांगलं आन्न तुजी वाट बघतंय. लेका, भिवून उपासी मरण्यापेक्षा खाऊन मेलेलं बरं ! कसला इचार करतुयास , चल हु पुंढं.  या विचाराच्या व्दंदात भुकेने व्याकूळ झालेल्या मनाने त्याला पुढे ढकलले.


     तो आता उताऱ्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. त्याने सभोवार एक वेळ पाहिले कोणीही नसल्याची खात्री केल्यानंतर उतारा उचलण्यासाठी तो खाली वाकणार इतक्यात नदीच्या पैलतीरावर एक महाकाय काळीकुट्ट अमानवी आकृती त्याला हात हलवताना दिसली. अगदी राक्षसासारखी दिसत होती. त्याला बघून तो भीतीने गर्भगळीत झाला. त्याचे होते नव्हते ते अवसान गळाले.घाबरुन त्याची चड्डी ओली झाली होती. आता आपले सगळे काही खरं नाही असे वाटू लागले. अंग थरथर कापत असतानाच तो खाली कोसळा. तेव्हढ्यात आकाशात वीज चमकली आणि त्या प्रकाशात नदीच्या पैलतीरी असलेली ती अमानवी आकृती राक्षसाची नसून ते एक झाड होते, हे त्याला कळल्यावर त्याचा जीव भांड्यात पडला आणि तो आनंदाने बेभान झाला. कुठुन त्याला अवसान आले अन त्या आनंदाच्या भरातच तो ताडकन उठला व दोन पावले चालून त्याने तो उतारा उचलला आणि गावाच्या वाटेने निघाला.

    

 आता त्याची भीती पूर्णपणे मेली होती. आईला व ताईलापण ह्यातले खायाला द्यावे असा विचार आला , पण आई हा उतारा आहे म्हटल्यावर खाऊ द्यायची नाही.उलट आपल्याला मारच खावा लागेल असे वाटल्याने त्यांने एकट्याने उतारा खायाचे मनाशी पक्के केले व रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडुपाआड गेला. अंड्याला लावलेला अंगारा, हळद-कुंकू शर्टाला पुसले. लिंबाच्या कापी फेकून दिल्या. अंड्याचा आणि भाकरीचा तुकडा एक एक करत घेऊन खाऊ लागला. अतिशय रुचकर लागत होते ते जेवण ! त्या काळ्याकुट्ट अंधारात तो भुतासारखा एकटाच जेवत होता. त्याचे पोट टच्चून भरल्याने तो ढेकर देत होता. घराकडे जाताना वाटेत असलेल्या बोरिंगचे त्याने पाणी प्यायला.स्वर्गसुख मिळाल्याच्या आनंदात तो घरी परतला .

     

आई त्याची वाटच बघत होती. त्याला बघताच ती त्याला म्हणाली,"संजूबाळा, कुठं गेला हुता? म्या समद्या दोस्ताकडं जाऊन आली." खरे सांगितले तर आई बदडून काढेल , या भितीने त्याने आजचा मार उद्यावर ढकलणे पसंत केले. कारण एवढे मस्त जेवलेल्या अन्नाचे त्याला पाणी करायचे नव्हते. त्यामुळे त्याने शेवटी थाप मारायची हे मनाशी पक्के करून तो आईला म्हणाला, " आय, आगं गोयंद्याकडंच निघालू हुतु खेळायला पण वाटत धन्या भेटलं, त्यो म्हणाला,'घरी चल' म्हणून त्याच्या घरी खेळायला गेलु हुतु." 


    "बरं ठीक हाय, जा हात धूऊन यी, मालुताईंने पुरणपोळीचं जेवाण दिलंय. आमी अजून जीवलु न्हाय." त्याची आई त्याला म्हणाली.त्याच्या आवडीचे पुरणपोळीचे जेवण होते पण त्याचे पोट भरले होते. आवडीची पुरणपोळी बघून त्याच्या जिभेला पाणी सुटले, पण पोट टच्चुन भरल्यामुळे खाऊ शकत नव्हता. वरती बघत तो त्याच्या नसीबा मनात ल्या मनात हसत आईला म्हणाला, "आगं, म्या धन्याकडं जिवून आलुया, तुमी घ्या जीवून, माझ्या वाटणीचं ठिवा काडून सकाळच्या पारी खायीन." संगीताला कडकडून भूक लागली होती. ती काकुळतीला येऊन आईला म्हणाली,"वाड की लवकर जेवायला !" भुकेलेल्या संगीताला बघून आईने दोघींना जेवायला वाढून घेतले. 


      पदराने धुतलेला हात पुसत सखुबाई संगीता व संजयला म्हणाली,"म्या बयाबायला बघून यीती .तुमी दोघं हितच थांबा." 

 त्यावर संजय आईला म्हणाला, "आय, म्या बी यीतु की बगायला."मुलाच्या हट्टीपणामुळे ती त्याला बायाबाईच्या घरी घेऊन गेली.

 

      बयाबाईने दारातच उभे राहून हसतमुखाने त्यांचे स्वागत केले. घरात गेल्यानंतर सखूबाई तिला म्हणाली, "बयाबाय, आता बरं  दिसायला लागलीया. बायी, तुकाअण्णाचं दिवरुषपणच लय भारी!" त्यावर बयाबाई म्हणाली , "व्हय की" आणि त्या दोघी गप्पात रंगून गेल्या.

 

    हा सगळा प्रकार पाहून संजय मनातल्या मनात हसत होता; तर त्याच्या जीभेवर अजुनही त्या उताऱ्याची चव रेंगाळत होती आणि त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागले होते देशपांडे गुरुजींचे अंधश्रद्धा निर्मूलनावरचे व्याख्यान,'भूत, मंत्र-तंत्र, बुवाबाजी हे निव्वळ थोतांड आहे. ही अंधश्रद्धा आहे. विज्ञानच या जगाला तारणार आहे!'


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror