Bal Zodage

Inspirational

4.6  

Bal Zodage

Inspirational

मुसूंडा

मुसूंडा

7 mins
791


   तारवटलेल्या गहू पाहून मुरलाला गहिवरून आलं. गव्हाच्या रोपट्यांना कवेत धरून तो हमसाहमशी रडू लागला. मदतीच्या आशेचे सर्व मार्ग बंद झाल्यामुळे तो हतबल, हताश झाला होता. शिवारात सर्वांची पिकं डौलात डोलत होती. मात्र मुरलाचं पिक करपू लागलं होतं. कारण मुरला पूर्णपणे सामुदायिक विहिरीच्या पाण्यावर अवलंबून होता. त्याची पाळी एक महिन्यांनी येणार होती. इतरांच्या सामुदायिक विहिरी व्यतिरिक्त स्वतःच्या मालकीच्या विहिरी होत्या. त्यामुळं पाण्याची पाळी खूप उशिरानं आली तरी त्यांना फरक पडणार नव्हता. पण मुरलाचं तसं नव्हतं. तो वरुणराजाच्या कृपादृष्टीवर व सामुदायिक विहिरीवर अवलंबून होता. तो हतबलतेनं विचारांच्या तंद्रीत स्वतःला हरवून बसला असताना पाठीमागून हळुवारपणे त्याच्या खांद्यावर हात ठेवला गेला, तसा " आँ " करून त्यानं मागं वळून पाहिलं. तेव्हा त्याला त्याची पत्नी, कस्तुरी दिसली. ती त्याला म्हणाली, " धनी, मघापासून तुमच्या मागं उभं राहून बघतिया, तुम्ही रडताय ते. काव,काय झालं रडायला ? "

" सोन्यासारखं घव्हाचं पीक जळाय लागलंय. पाण्याच्या पाळीची वाट बघत राह्यलो तर पालापाचोळा व्हईल त्याचा." केविलवाणा चेहरा करत तो तिला म्हणाला.

" आव, मग कुणाची तर पाण्याची पाळी घ्या की मागून. आपली पाळी देऊ त्यांना नाहीतर पाण्याचं पैसं देऊ त्यांना. " ती त्याला म्हणाली.

" मस्त समद्यांना इचारलं, समदी न्हाय म्हणाले, अगं, सुखाबापू तर म्हणालं की, तुला पाळी देवून माझी काय जनावर उपाशी मारू ! तेंच्यासाठी मका आन गाजरं लावल्यात, तवा पाणी मिळणार न्हाय." हे बोलता बोलता मुरलाचं डोळं भरून आलं.

" असं म्हणालं व्हय मामांजी. हाक मारंल तवा हातातलं काम टाकून त्यांची काम केली आपून, ते उलटून पडत्याल असं वाटलं नव्हतं, जाव द्या, धनी ह्यो भावबंदकीचा तिडा हाय, तवा काळजी करु नका. हिमतीनं मार्ग काढा. तुमी न्हाय का पैरकऱ्याचा बैल पांगळा झाला तवा समद रान तुमी बैलाच्या खांद्याला खांदा देऊन कोळपलं हुतं. तवा म्या तुमच्या बराबर हाय. " त्याला धीर देत ती म्हणाली.

" आगं, वड्याला पाणी असतं तर म्या कावडीनं पाणी आणून पाजलं असतं घव्हाला. पण काय करणार ? दोन वरस म्हणावा तसा पाऊस पडलाच न्हाय." तो म्हणाला.

" धनी, इचार करा, काय तरी मार्ग नक्कीच निघंल." ती म्हणाली.

     पत्नीचं सर्व म्हणणं पटल्यानं ह्यातून मार्ग काढण्यासाठी तो हळूहळू विचारमग्न झाला. काही क्षणात कठीण प्रश्नाचं ऊत्तर सापडल्याच्या अर्विभावात तो हरखून कस्तुरीला म्हणाला, " आपून आपल्या रानात हिर पडली तर...! काय झ्याक हुईल न्हाय !" ती झटकन म्हणाली," हिर पाडायला पैसं कुठून आणायचं ? का माझं दात देऊन पाडायची ! " त्याचा मात्र विहीर पाडण्याचा विचार पक्का झाला होता. निश्चयाच्या स्वरात तो तिला म्हणाला,"आगं, आपून स्वतःच्या कष्टानं हिर पाडायची आपल्या रानात. हिरीला पाणी लागलं तर आपलं कायमचं नाचारपण हाटंल. पोर-बाळांचं शिकशान हुईल. आग, परवा सासणेमास्तर भेटलं हुतं. ते म्हणत हुतं, आपली पोरं लय हुशार हायती. पयल्या नंबरानं पास हुत्यात, मग तर कस्तुरे, करायचं का कष्ट पोरांसाठी, पाडायची का हिर आपून ? "

" आव, आपून दर दिस आपल्या रानात हिर पाडायला घालवलं तर पोटापाण्याचं काय ? " ती म्हणाली.

" दिवसा आपून बंदाऱ्यावर काम करायला जायचं आन् रातच्याला खंजिलाच्या परकाशात हिर पाडायचं काम करायचं. मग हाईस का तयार ?" तो म्हणाला.

" धनी, म्या तयार हाय, कवा सुरू करायचं तेवडं सांगा." ती म्हणाली.

" उद्याच पाणक्याला बघतु. एकादा चांगला दिवस बघू आन् कामाला सुरुवात करू." मुरला तिला म्हणाला.

     विहीर पाडायच्या कामाच्या उदघाटनाची तयारी झाली होती. सर्व भावकी मंडळी सांगितलेल्या वेळेला हजर झाली होती. सर्वजण पाणक्यानं दाखवलेल्या जागेच्या चहुबाजूंनी उभी होती. कस्तुरीनं मुरलासोबत जागेची पूजा करून घेतली. मुरलानं भावकीतील वयोवृद्ध आणि सत्शील व्यक्ती म्हणजे दामुअण्णाला उदघाटन करायला सांगितले.

      दामूअण्णा हातात टिकाव घेऊन धरणीमातेला माथा टेकत म्हणाला," हे माय, तु ह्या लेकराच्या कष्टाला यश दे. तुझं त्यो नक्की पांग फेडंल. " त्यानंतर दामुअण्णानं टिकावाचा घाव हाणल्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि उदघाटन संपन्न झालं. मुरलानं दामुअण्णाच्या पाया पडून सगळ्या उपस्थितांचं तोंड गोड केलं. त्यानंतर त्यानं टिकावानं कणा कणा खंदून कस्तुरीला पाट्या भरून देऊ लागला, आणि बघता बघता त्यानं पंधरा फूट व्यासाचा वर्तुळाकार चांगला तीन इंच विहिरीचा खड्डा खणला होता.

      उदघाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी निघाले होते.वाटेनं जाता-जाता काहीजण मुरलावर शेरेबाजी करत होते. एकजण म्हणाला," तुला ठावं हाय का, आरं, मुरलानाना सहज जरी शेतातनं चालला तरी दगडं-धोंडं गोळा करून बांधाला टाकत्यात, मला तर तेंच हे वागणं येड्यावानी वाटतंय." दुसरा हसत-हसत म्हणाला आरं लका, हे तर कायच न्हाय. आरं, रस्त्यानं चालला तर शेणाच्या पवट्या प्लास्टिकच्या बॅगत भरतंय आन् शेतात निहून टाकतंय."

तिसरा ह्यांचं संभाषण ऐकून कुस्तिकपणे म्हणाला," कशाचं काय घिवून बसलाय, राव आरं , दोघांनं हिर पाडायची म्हणजी काय खायचं काम हाय व्हय! दहा-बारा गडी लावून सुदीक हिर पाडायचं काम उरकत न्हाय तिथं हे कसं करत्याल? ये जेल्या, तुक्या लका हेंचं काय चाललंय रं ? मुरला आन् कस्तुरीवयनी काय मशीन हाय व्हय. ध्या-रातचंं काम केल्यावर मरायचीच हायती. तवा कवा गचकत्याल त्याचा नेम न्हाय."

हे ऐकल्यावर सदुबुवा चांगलाच गरम झाला. तो त्यांच्यावर खेकसतच त्यांना म्हणाला," आरं कार्ट्यांनो, मगापासन ऐकतुया तुमी लय चेष्टा करताय मुरलाची. आरं लेका हो, त्याच्या ग्वाची तर सर यील का रं तुमाला ? मुरलाच खरा धरणीमातेचा सेवक हाय, म्हणून तो अशी सेवा करतुया. तो आपल्या शेतातनं जाताना धरणीमातेच्या पाया पडल्याशिवाय जात न्हाय. एक ना एक दिवस काळीआय त्याला पावंल आन् त्याचं नक्की भल हुईल. बांबलीच्यांनो, जा गुमान घरला आपापल्या." सदूबुवा दामूअण्णाचा धाकटा भाऊ होता. दामूअण्णानंतर त्याला भावकीतील लोक मान देत होते. त्यामुळं त्यांचं बोलणं ऐकून ती पोरं वरमली आणि कान कापल्यागत आपापल्या घरी निघून गेली.

     रात्रीचे आठ वाजून गेले होते. मुरला व कस्तुरी आपलं जेवणखान उरकून विहिरीच्या कामाला निघाली होती. त्यांची मुलं लवकरच झोपी गेली होती. जवळपासच्या सर्व वस्त्यांवर सामसूम होती. दिवसभर काबाडकष्ट करून थकल्यामुळं जेवणं उरकल्यानंतर काही वेळातच सर्वजण झोपी गेले होते. फक्त कुत्र्यांचा आवाजच काय तो त्यांच्या साथीला होता. रातकिड्यांची ' किर्र किर्र ' आवाज ऐकतच मुरला व कस्तुरी नियोजित विहिरीच्या ठिकाणी पोहोचले होते. पौर्णिमेचं टपोर चांदणं पडलं होतं, त्यामुळं आज चांगलाच कामाचा उरक होईल या विचारानं त्यानं शर्ट काढला आणि धोतर खोचून खंदायला सुरुवात केली. अंगात ईर्षा आणि हिंमत जागृत झाल्यामुळं मुरला अगदी सहजपणे खंदक होता. दिवसामागून दिवस जात होते आणि त्याबरोबर ती विहीरसुध्दा खोल-खोल जात होती. दोघंही ह्या कामात इतके मग्न असत की बारा काय किंवा एक काय कधी वाजायचे ते त्यांना कळत नव्हतं. ते दोघेजण अगदी झपाटल्यासारखं काम करीत होते. रात्रीच्या थोड्याशा विश्रांतीनंतर ते पुन्हा सकाळी साडेपाच वाजता उठून शाणघान काढून, घर व आवार स्वच्छ करून बंधाऱ्यावर कामाला जात असत. ही त्यांची दिनचर्या विहिरीचे काम होईपर्यंत नित्याचीच झाली होती.

      विहीर खोदण्याच्या कामाला सुरुवात करून दीड महिना कधी उलटून गेला ते त्यांना कळलेच नाही. विहीर चांगली एक पुरुषपेक्षा जास्त खोल खाली गेली होती. आणि खाली पाषाण लागल्यामुळं यापुढं सुरुंगाचा वापर केल्याशिवाय विहिरीचं खोदकाम होणं शक्य नव्हतं. म्हणून मुरलानं आवश्यक ती सर्व सामग्री आणली होती. रात्रीच्या निरव शांततेत मुरलानं पेटवलेल्या सुरुंगाचा आवाज अगदी गावापर्यंत पोहोचत होता. सुरंग फुटल्यानंतर निघालेलं दगड व माती कस्तुरी विहिरीबाहेर आणून टाकत होती. कामाच्या अतिव त्रासानं मुरलाचं आणि कस्तुरीचं अंग न अंग दुखत होतं. त्या विहिरीतच ते दोघं एकमेकांचं दुखरं अंग चोळत होते आणि पुन्हा नव्या जोमानं कामाला लागत होते. त्यांच्या हिम्मत व जिद्दीमुळं विहीर दिवसेंदिवस खोल खोल जात होती.

     मुरलाच्या विहिरीची गावात चांगलीच चर्चा चालत होती. अधूनमधून गावकरी मंडळी विहीर बघायला येत होती. त्यांच्या हिम्मतीचं व जिद्दीचं कौतुक करत होती. पूर्वी जे लोक त्या दोघा नवराबायकोला विहीर पाडायचं काम करणार म्हणून वेडा समजत होती. त्यांची चेष्टा करत होती ते आता त्यांची तोंड भरून स्तुती करीत होते. कोडकौतुकामुळं मुरला व कस्तुरीला अधिक बळ येत होतं, आणि विहिरीचं काम नेटानं होत होतं. चांगली अडीच पुरुष विहीर खोल गेली होती.

      दिवस-रात्रीच्या कामानं दोघांचीही शरीरं अगदी भेंडाळून गेली होती. कस्तुरी तर आज पारच थकून गेली होती. तिच्या अंगात त्राण नसल्यासारखी दिसत होती. कारण तिला तीन आघाड्यांवर काम करावं लागत होतं - बंधाऱ्यावर काम करणं , विहिरीवर काम करणं व घरात स्वयंपाक करणं त्यामुळे ती मुरलाला म्हणाली," धनी, आता न्हाय व्हायचं मला हे काम. पार शिणलंय शरीर, डोकं गरगरायला लागलंय. माझ्या डोळ्यापुढं अंधारी आलीया... " असं म्हणता म्हणता कस्तुरीचा तोल जाऊन ती खाली पडणार इतक्यात मुरलानं तिला अलगद झेललं. त्याचं लक्ष नसतं तर कस्तुरीचं डोकं फुटलं असतं आणि तिच्या जीवावर बेतलं असतं. तिला छातिशी कवटाळत व पाठीवर थोपटत तो म्हणाला," आगं, जरा धीर धर, पायजे तर आपून थोडीशी इसरांती घिवूया. पण काम पूरं करूया. माजा धरणीमातेवर इसवास हाय. ती आपल्याला न्हाय नाराज करणार ! लागंल गं पाणी, म्या धरलंय तुला तवा चढ हळूहळू पायऱ्या, घरी जाऊनच इसरांती घिवूया." त्याचाही आवाज आता थकल्यासारखा येत होता.

      शरीरं जरी थकली होती तरी मंझिल त्यांना गाठायची होती. त्यामुळं त्यांनी मनाचा हिय्या केला आणि दुसऱ्या दिवशी रात्री त्या दोघांनी पोरांचं मटामट मुकं घेतलं व ते दोघंही कंदिलाच्या प्रकाशात विहिरीच्या दिशेनं निघाले.अमावस्येची रात्र होती. सर्वत्र भयान काळाकुट्ट अंधार दाटला होता. वारा मंदपणे वाहत होता. रातकिडे ' किर्र किर्र ' करत रात्र जागवत होते. चालता चालता तो तिला म्हणाला, " कस्तुरे, आता पाणी बघितल्या बिगर काय थांबायचं न्हाय. पाणक्यानं तीन परसावर पाणी लागंल असं सांगितलं हुतं. अजून अर्धा परुस बाकी हाय. दहा-बारा दिस नेटानं काम केलं तर तीन परसापातुर नक्कीच पोहचू आपण. तवा थोडसं सोस माज्यासंग."

" धनी, माज्या जीवात जीव असंल तवर म्या हार न्हाय मानायची. म्या तुमाला साथ दिईन." कस्तुरीच्या या बोलण्यानं त्याची हिम्मत वाढली. दोघंही कंदील घेऊन हळूहळू विहिरीत उतरले. मुरलानं पहारीनं खंदायला सुरुवात केली. प्रत्येक घावागणिक " अ ह्याँ ! " असा आवाज निघत होता. त्याचं उघडं अंग कडाक्याच्या थंडीतसुद्धा घामानं डबडबलं होतं. खंदताना उडणारी माती मिश्रित धूळ त्याच्या अंगावर बसली होती आणि कंदिलाच्या प्रकाशात ती सोन्यासारखी चमकत होती. खणलेलं दगड-माती कस्तुरीला भरून देता देता तोही पार भेंडाळून गेला होता.पण तरीही त्याचं खंदणं चालूच होतं. पहारीचा एक जोराचा घाव घातला तसा त्याच्या तोंडावर पाण्याच्या चीळकांड्या उडाल्या, विहिरीत जणू कारंजाच तयार झाला होता. मुरला आनंदानं बेभान होत कस्तुरीला म्हणाला, " आगं कस्तुरे, बघ हितं केवडा मुसूंडा फुटलाय ! " कस्तुरीनं ते पाहिलं आणि आनंदानं त्याला घट्ट मिठी मारली. दोघांचंही डोळं आनंदाश्रूंनी भरलं होतं.त्याचं स्वप्न पुर्ण झालं होतं. काही क्षणातच पाणी त्याच्या घोट्याला लागलं होतं. त्यांनी मनापासून केलेल्या अखंडित कष्टाला पाहून धरणीमातेला जणू पान्हा फुटला होता !


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational