तिच्या डायरीतून
तिच्या डायरीतून
घाईघाईत समिधा बेडवरून उठली अन किचन मध्ये गेली,स्वतःच स्वताला ओरडत उशीर झाला म्हणून धडपडत कुकर लावला,चहा ठेवला गॅस वर ,अन अजून एक ग्रीन टी बनवू लागली, गडबड चालू होती. चेहऱ्यावर येणारी बट सावरत मधेच,उठला का??? उशीर झालाय अशी दोन वेळा ओरडून झाल होत. खिडकीतून बाहेर लगबग दिसत होती, लहानगी शाळेसाठी धावत होती, कुणी कामावर जायला पळत होत तर कुणी असच चालत होत. प्रसन्न चेहऱ्यान.फ्रीज मधून दूध बाहेर काढलं तिने.डाएट बिस्कीट हि काढली डब्यातून. कढई मध्ये रवा घेतला भाजण्यासाठी,उपमा होता आज ब्रेकफास्ट मध्ये.
उठ रे किती वेळ ?? झोपशील
तिचा कोमल आवाज आता लटक्या रागात येत होता. शेवटी थकून तीच गेली बेडरूम मध्ये. बेडवर एका कोपऱ्यात न विस्कटलेली चादर घडी घालून ठेवली होती, दोन उश्या एकावर रचल्या होत्या,ज्यावर दोन हार्ट कोरले होते. कोपऱ्यात एक कपल फोटो होता, खिडकीत लवबर्डस लटकलेले.
सगळं नीटनेटकं होत, तिच्या समोर होत. ती काही वेळ तशीच शांत पाहत होती अचानक तशीच बसली खाली भोवळ आल्यासारखी.
कुकरच्या शिट्टीने भानावर येत परत
ती उठली अन किचन मध्ये गेली.
चहा ने उखळून उखळून जीव सोडला होता ते पातेलं हातानेच खाली उतरल जोरात चटका लागला हाताला तेव्हा डोळ्यात पाणी तरळतल. डाएट बिस्कीट परत ठेवली, ग्रीन टी बेसिन मध्ये ओतला.रवा परत होता त्या जागी गेला. दूध फ्रीज मध्ये गेलं.
किचन ची लाईट बंद करत पुन्हा ती सोफ्यावर येऊन बसली.
मोबाईल वाजला, तिने उसासा घेत उचलला.
ती फक्त एकत होती, समीर साने यांच्या ऑफिस मधून बोलतोय,समीर ने अकॅसिडेंटल मेडिक्लेम काढला होता, नॉमिनी मिसेस. समिधा समीर साने तुम्ही आहात. काही प्रोसेससाठी तुम्हाला यावं लागेल ऑफिसमध्ये.
तिने तो फोन ठेवला अन तशीच सुजलेल्या डोळ्यांनी भिंतीवर हार लावलेल्या समीरच्या फोटो कडे बघत राहिली.
डोळ्यातून पाणी आपोआप ओघळत होत. कंठ दाटला होता पण आवाज मात्र फुटत नव्हता.