प्रेमापलिकडच प्रेम
प्रेमापलिकडच प्रेम


दाराची बेल तीन चार वेळा वाजली म्हणून किचन मध्ये असलेल्या मालतीबाई पिठाने भरलेल्या हातानेच दार उघडायला धावल्या. दार उघडल तर दारात दोन्ही हातात दोन पिशव्या घेऊन प्रतापराव उभे.मालती बाई कपाळावर आठ्या पाडत रागात परत किचन मध्ये धावल्या.त्यांच्या मागे प्रताप राव हि गेले. एकदा बेल ऐकू येते ना, लहान मुलांसारखं काय उत्साह असतो हो तुम्हाला दार उघडे पर्यँत बेल वाजवायचा, कालच शेजारचे नेने म्हणत होते, वाहिनी तुमच्या बेल चा आवाज फार होतो, आम्हाला त्रास होतोय त्याचा.मालतीबाई प्रतापरावांना पाणी देत बोलल्या. ओट्यावर पिशव्या ठेवत प्रतापराव बोलले,त्या नेण्याला सांग,आम्ही आमची बेल वाजवतो तुला काय त्याच.स्वता एवढा खोकत असतो टीबी झाल्यासारखा त्याला आम्ही काय म्हणतो का हम्म.
तस बाईंनी डोळे मोठे करत पुरे...चा सूर ओढला.. तेवढ्यात हळूच एका पानाच्या विड्यात बांधलेला अबोली चा गजरा प्रतापराव बाईंच्या डोक्यात माळू लागले तस बाईंनी त्यांना झटकल. काय करताय हे,कुणी येईल ना. प्रतापराव लडिवाळ पणे गजरा अजूनच घट्ट करत बोलले,कोण येतय अन आलं तर येयु दे कि, काय करतोय मी अस हम्म.... बाई गालात गोड हसल्या अन त्याना दूर लोटत बोलल्या, इतकी वर्ष झाली पण तुमच्यातल लहान मुलं काय मोठं होत नाहीये. वय झालय आपलं आता मिस्टर राजवाडे.
बर मग? प्रतापराव बाईंना मधेच अडवत सामानाच्या मोकळ्या झालेल्या पिशव्यांची घडी करत बोलले. प्रेमाला वय असत का मिसेस राजवाडे?
अस हि आज काय तो म्हणे प्रपोज डे आहे वाटत.
तश्या मालती मागे वळत ,डोक्याला हात लावत बोलल्या,बस पुरे आता. हे वय आहे का आपलं डे साजरे करायचं ?
ते दूधवाल्या भैय्याच दूधाच बिल किती डे द्यायच राहीलय ते बघा आधी. सकाळीच आला होता तो? आणि काय हो..
एरवी मी एकादशी कधी आहे, अस जरी साधं विचारल तरी, तुम्ही आठ्या पाडत म्हणता, विचार तुझ्या पांडुरंगालाच.
मग हे बर लक्षात राहत हो तुमच्या?
प्रतापराव मान हलवत, हरल्याची भूमिका घेत हॉल मध्ये येऊन बसले. काही वेळात बाई हि आल्या. तुम्हाला किती वेळा समजावू मी, जरा बघून घेत जा न भाजी. ती मेथीची जुडी आतून किती खराब आहे, माझा किती वेळ जातो सगळं सावरायला ते, काय मेले एक एक भाजीवाले पण फसवतात.अन हल्ली या डोळ्यांना हि काय झालंय काय माहिती सगळं धुसर धुसर दिसतंय. अस म्हणून बाई हि दम टाकत चष्म्याची काच पुसत बसल्या सोफ्यावरच.
प्रतापरावांनी एकदा होकाराची मान हलवली अन परत पेपर मध्ये डोकं घुसवून बसले. खरतर त्या मुंबई मधल्या 1बीएचके घरात हि दोनच पाखर राहायची. संसाराची तीस वर्ष एकत्र काढल्यावर नवरा बायको कमी आई वडील च झाले होते ते एकमेकांचे. त्या घरात प्रत्येक गोष्टीत दोघांच्या आठवणी साठल्या होत्या. चेहऱ्यावर सुरकुत्या वयानुसार पडत होत्या पण नातं मात्र अजून हि तेवढंच कोवळं होत दोघांच. हल्ली बाई जरा जास्त हलक्या झाल्या होत्या मनाने, जरास हि बोललेलं लगायच त्यांच्या मनाला.प्रतापराव अश्यावेळी फार संभाळून वागायचे. तीस वर्षांपूर्वी हि दोन मन एका बंधनात जोडली गेली होती. बाई म्हणजे त्याकाळात दुसऱ्या शर्मिला टागोर सारख्याच. तशीच गालावर खळी, सावळ्या पण सुबक, लांब सडक केसांचा घातलेला बुचडा.अंगाने सडसडीत, केसात अबोलीची फुल गुंफलेली. कपाळावर गोंदण त्याच्या खाली दोन्ही भवयाच्या मध्ये मोठी गोल टिकली. सोजवळ,सालस रूप.
प्रतापराव मात्र उंचपुरे,उजळ,अंगान सडसडीत,मिचमीचे डोळे,डोळ्यावर चष्मा, बेलबॉटम पॅन्ट , फुल्ल कॉलर चा शर्ट, शमी कापुर सारखा केसांचा पडता कोंबडा. त्याकाळी त्यानी मॅट्रिक पूर्ण करून कारकून म्हणून लागले कंपनीत ते तिथंच चिकटून राहिले शेवट पर्यंत. मालती बाई वयात आल्या म्हणजे सोळाव्या वर्षी लग्न करून त्या प्रतापरावांच्या जीवनात आल्या. त्याकाळी मोठी चार लोक जे ठरवतील ते योग्य अस काहीस वातावरण होत. कोल्हापुर ची मालती मग मुंबईकर झाली एकदाची. नाही म्हंटल तरी ती बावरली होती अनोळखी शहरात. तश्या अबोल बाई कोवळ्या वयात फार समजून उमजून वागायच्या. डोक्यावर पदर, घरात माणसांची रेलचेल सगळं अगदी खेटून असायच.एकांत तो कसला. अश्यातही त्यांनी समजून घेतलं. दोघांनी एकत्र पहिला पिक्चर पहिला तो हि लग्नानंतर एका वर्षानंतर.....
सगळं अलबेल चाललेलं तरी प्रतापरावांना बाईंची जरा काळजी वाटायची. मी जर नसलो तर हीच कस व्हायचं ,हा प्रश्न त्यांना सतवायचा.कारण बाई सतत घाबऱ्या गुबऱ्या राहायच्या, जास्त बोलण नाही, जेवढ्यास तेवढं. कुठे बाहेर गेल तरी प्रतापरावांच्या पाठीच. कधी कोणती तक्रार नाही की हट्ट हि नाही,जे दिल ते पदरात घेतलं अस त्यांच होत.देवभोळ्या नाही पण श्रद्धा अपार होती पांडुरंगावर. त्या फक्त शरीराने इथे राहतात कि काय असा प्रश्न पडायचा कधी कधी प्रतापरावांना. ते बोलायचे हि याबाबत बाईंशी, तर बाईचं उत्तर ठरलेलंच ,तुम्ही आहे तोवर मी आहे. जिथं तुम्ही तिथं मी.
प्रतापरावांनी शेवटी कंटाळून अस बोलयचच बंद केलं.पण एका प्रसंगाने मात्र त्यांच्या डोळ्यात चांगलच अंजन घातल त्यावेळी, कि बाई भोळ्या नाहीत तर खमक्या हि आहेत.
प्रतापरावांच्या कंपनीत एक मोठा घोटाळा झाला होता. प्रतापरावांना उघड्या डोळ्यांनी सगळं दिसत होतं.पण काही करू शकत नव्हते.त्यांच अस्वस्थपण हल्ली घरी पण जाणवायला लागलं होतं. हरवल्यासारखे राहायचे.जेवणात लक्ष नाही की बोलण्यात. काही विचारलं तर काही नाही ऑफिस मध्ये कामाचा ताण आहे अस म्हणून वेळ मारून न्यायचे.मालतीबाईंनी बघून बघून घेतलं अन एकदा त्यांची शपथ घेऊन बोलत केलं. पहिल्यांदा प्रतापराव लहान मुलासारखे ढसाढसा रडले. मनातली घुसमट मोकळी केली. ऑफिस मधला गैरव्यवहार उघडकीस आणला तर माझी नोकरी हि जाईल वरून बदनामी होईल हि भीती त्यांना सतावीत होती. ते सगळं बघू हि शकत नाही अन बोलू हि शकत नाही अशी अवस्था त्यांची झालेली.
बाईंनी त्यांना धीर दिला. त्यांचा हात हातात घेऊन विचारलं.तुमच मन काय सांगतय ते तुम्ही करा. तुम्हाला वाटतय ना कि नोकरी जाईल वैगरे तर त्याची काळजी करू नका. मी भाजीपोळी चा व्यवसाय सुरु करेन.आपला संसार दोघांचा आहे मग मी हि करेन कि मदत. तीन वेळे ऐवजी दोन वेळ खाऊ पण फक्त तुम्ही अस कुढत राहू नका आतल्या आत.उद्या एकेकाळचे पैलवान आण्णानां गावी समजल त्यांचा मुलगा असा कमकुवत आहे मनाने तर काय वाटेल त्यांना. सासूबाई काय म्हणतील. तुम्ही धिरान घ्या.मी आहे तुमच्या सोबत.
प्रतापरावांना वाटायच,बाईंना फक्त चुल आणि मुल शिवाय काही कळत नाही पण त्यांचा गैरसमज दूर झाला होता. पुढे प्रतापरावांनी कंपनीच्या मेंन बॉडी ला पत्रव्यवहार करून घडत असलेला प्रकार कळवला. खूप उलथापालथ झाली. प्रतापरावांना नोटीसी आल्या,चौकशीहोईपर्यंत घरी बसवल गेलं,किमान पाच महिने ते घरी होते. बाईंनी पण कधी जाणवून दिल नाही,अश्यात बाई तीन महिन्याच्या पोटुश्या होत्या.प्रतापरावांनी प्रयत्न हि केला दुसरीकडे नोकरी धरण्याचा,पण त्यांचा भूतकाळ त्यांना नोकरी देत नव्हता.बाईंनी डबे सुरु केले, चार पाच करत करत आता पंधरा डब्यांवर आलं होतं. बाई थकायच्या,पण दाखवायच्या नाहीत, तेलाचा होणारा त्रास,भाज्या मनातून उतरल्या होत्या. डब्यातून मिळणाऱ्या पैश्यातून सामान भरायचं.उरलेली बचत.प्रतापराव डबे पोचवायचे, स्वयंपाकात मदत करायचे.आवरू लागायचे.बाईंचा त्रास त्यांना दिसत होता पण काही करू शकत नव्हते,अश्यात बाईंना सातव्या महिन्यात गावावरून न्यायला आले, त्यांना आरामाची गरज होती म्हणून. प्रतापरावांनी हि सांगितलं मी बघतो तू राहा गावी,सगळं नीट होईल. पण बाईंनी ठणकावून सांगितल,मी काही जायची नाही,नवव्या महिन्यात बघू,तोवर माझा नवरा आहे माझी काळजी घ्यायला. प्रतापराव निशब्द होते,त्यांना काय बोलव समजत नव्हतं. पुढे तब्बल पाच महिन्यांनी घोटाळा समोर आला अन प्रतापरावांना कामावर परत घेतलं गेलं.तेही बढती देऊन. तेव्हा देखील अगदी कळवळून रडले ते,अक्षरशा पाय हि धरले त्यांनी बाईंचे, अगदी आई बनून उभ्या होत्या बाई त्यांच्या पाठिशी.
पुढे बाई गावी आल्या पहिलं पुत्ररत्न झाल ज्याच नाव शेखर ठेवलं.
घरचे पाठी असताना हि त्या काळातही दोघांनीही एकावरच थांबायचा निर्णय घेतला. जरा झाली कुरबुर पण हे दोघे एकमत होते,पुढे शेखरच बालपण,शाळा, आभ्यास सगळ्यात कशी वर्ष निघून गेली दोघांनाही समजल नाही. एकदा कॉलेज मध्ये असताना शेखर याची मित्रांसोबत काही वाद झाला,थोडीमारी हि झाली,प्रकरण घरापर्यंत आलं हे जेव्हा बाईंना समजल तेव्हा बाईंनी पहिल्यांदा त्याला चारबोट लावली,बापाने आणि मी किती खस्ता खाल्या आहेत त्याच्यासाठी याची उजळणी केली.काटकसर जन्माला गेली,दोघेही थकले होते,पुढे चाळ पडून टोलेजंग इमारत झाली,त्यातच त्यांच आता वन बिचके फ्लॅट झाला. शेखरला मास्टर साठी परदेशात जायचं होत, बाई नाही म्हणत होत्या,एकुलत्या एक तोही असा लांब.पण प्रतापरावांना काळाची गरज,अन मुलाच भविष्य म्हणून साठवलेली सगळी पुंजी खर्ची केली अन त्याला परदेशी धाडला. पुढे चार वर्षं तो तिथे अन हि दोघ इथे,कधी काळी फोन यायचा एवढंच तोही रात्री पररात्री कारण इथे दिवस तर तिकडे रात्र,अश्यात हि दोघ जगायचे मुलाचा एक आवाज ऐकण्यासाठी. हलकेच डोळे पानवायचे पण त्याला कधी भासू दिल नाहि.
शिक्षण झालं परत आला लग्न हि अगदी थाटामाटात झालं त्याच. मनासारखी अगदी गोंडस अनघा सून बनून आली बाईंची. चार महिने सुखात गेले सगळं चांगलं चालल होत. तेवढ्यात शेखरं ने यूएसए ला सेटल व्हायच सांगितल.अनघाच काही नव्हतं तिला कुठेही चालणार होत, पण शेखर हट्टाला पेटला होता.काळानुसार त्याला धावायचं होत. प्रतापरावांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याने नाही ऐकलं,तुम्ही हि चला तिथेच अस बोलला तो.पण हे वरवरच वाटलं त्यांना.बाई सुन्न पडल्या होत्या, लहानपणी डोळ्याआड जरी झालं लेकरू तर जीव कासावीस व्हायचा अन आता कायमचा दूर जाणार, कस तोडून टाकू शकतो.शेवटी व्हायच तेच झालं, शेखर सेटल झाला परदेशात. त्याला जाऊन आता दोन वर्षे झाली,कधी कधी फोन येतो तेवढाच काय तो.फक्त महिन्याला पैसे मिळतात न चुकता एवढं खरं. प्रतापराव त्याला पेन्शन म्हणतात ज्याच्यासाठी आयुष्य काढलं त्याच्याकडून मिळणारी भरपाई.
बाई मधे मधे सगळा राग अनावर झाला तर दोष देतात प्रतापरावांना,त्याला शिक्षणालाच तिकडे धाडलं नसत तर त्याला तिकडची धुळ लागली नसती अस म्हणून त्या मोकळ्या होतात. प्रतापराव अश्या वेळी शांत राहतात.बाई आजारी हि पडल्या होत्या शेखर गेल्यावर,त्यावेळी मात्र प्रतापराव मनातून पूर्ण हलले होते, बाई म्हणायच्या मी खूप छळलं ना तुम्हाला आयुष्यभर, आता मी गेले की जगा मनासारखं,जपा स्वताला.
प्रतापराव तेव्हा बाईंचा हात हातात घेऊन म्हणाले, जस तू म्हणायचीस ना तसच माझं हि आहे ..तू आहे तोवर मी आहे.
अन अस बर मी तुला जाऊन देईन,तुझ्या त्या पांडुरंगाला विटेवर रहायच नसेल मग.
बाई हळूहळू सावरल्यात आता.बाईंना जेवढा त्रास झालाय आयुष्यभर त्याची भरपाई म्हणून हल्ली जरा जास्तच लहान होतात प्रतापराव.प्रत्येक क्षणाला बाईंना आनंद देता येईल याचा प्रयत्न करतात.
बाईंना सगळं कळत असत पण त्यांनाही ते सुखवणार वाटत अन प्रतापराव खुश असतात म्हणून त्याहि काही बोलत नाहीत. एकमेकांचा आधार घेत,हि दोन पाखर नव्याने आयुष्य जगातयत.हल्ली प्रतापरावांनी नवीनच खूळ घेतलय डोक्यात,रोज संध्याकाळी गार्डन मध्ये धावत असतात.बाई हसत हसत म्हणाल्या एकदा मिस्टर राजवाडे हल्ली गार्डन च्या फेऱ्या वाढल्यात तुमच्या काय...? हम्म भानगड काय?? लगेच प्रतापराव उचलून धरत बोलले, होतर आता घरात भाव च देईना कुणी, तर म्हंटल चला जरा बाहेर बघू काय!
हो तर बघा कि कुणी नकटी, मग मी बघते तुमच्याकडे.बाई लटक्या रागात म्हणाल्या.
हल्ली गॅलरीतल गुलाब पण रोज नव्याने खुलत,झोपाळा आहे एक पण बाई त्यावर बसून त्यांच्या देवाच वाचन करत असतात. प्रतापराव अधून मधून किचन चा ताबा घेतात ,बाईंच्या मते पसारा घालतात.असो दिवसाची संध्याकाळ हि दोन तरुण जीव एकत्र चहा पिऊन घालवतात. हल्ली साखर जरा कमी...चा पाढा चालू असतो बाईंचा पण प्रतापराव मात्र, चालत कि तेवढं अस म्हणून वेळ मारून नेतात.
जीवनाच्या शेवटाकडे जाणारे हे दोघ काय कटकट करायची रोज, अस कितीस उरलंय ते आयुष्य ,अस म्हणून रोज नव्याने उडतात अन जगतात. शेवट कधी??? ते कुणालाच माहिती नाही पण आलेला क्षण आपला !अस म्हणून एकमेकांचा हात हातात घेऊन कोवळं हसतात. वयानुसार सुरकत्या पडल्यात अंगावर पण मन मात्र अजून विशीतच आहे हो दोघांच.अश्या प्रत्येक आयुष्याच्या शेवटाकडे जाताना उडू पाहणाऱ्या पाखरांना दिर्घायुष्य लाभो हिच ईच्छा.