Dr.Smita Datar

Inspirational

1.0  

Dr.Smita Datar

Inspirational

थोडं खरकट सांडाव

थोडं खरकट सांडाव

2 mins
9.0K


                सोनालीने किचन नेपकिन ने ओटा दोन वेळा स्वच्छ पुसला. किचन नेपकिन डस्टबिन मध्ये टाकला. मायक्रोवेव्ह बंद आहे न पाहिलं. भिजत घातलेलं कडधान्य सासूबाईनी रोवळीवर उपसलं. थोडं पाणी आणि चार दोन चटोर मटक्या इथ तिथं उडाल्या. सासूबाई नी रोवळीवर झाकण घातलं.सोनाली मुलांचे सकाळचे शाळेचे डबे डायनिंग टेबलवर काढून ठेवत होती.ओट्यावर पहुडलेल्या त्या टवाळ मटक्या तिला सहन झाल्या नाहीत. झरदिशी पुढे होत तिने किचन नेपकिन घेतला, आणि पाणी व मटक्या टिपून डस्ट बिन मध्ये टाकल्या.सासूबाईना हसू फुटलं. सोनाली ची टापटीप म्हणजे कळसच. त्या सोनालीला म्हणाल्या, अग बेटा, घराचं स्वयंपाक घर आहे हे, थोडी सांडलवंड चालायचीच . कधी पीठ मीठ सांडायचं, तर कधी तेल तिवली लवंडायचीच. ओटा पण त्या सांडलेल्या अन्नाने तृप्त होत असेल बर. दिवाळी ला आई नाही का तेलाची धार सोडते डोक्यावर आणि गालावर सुवासिक बोटे उमटवते , तसं ओट्यालाही त्या स्नेहाळ स्पर्शाने बर वाटत असेल.

                 स्वयंपाकघर कसं ना नांदत हवं . भांड्याला भांड थोडसे लागलंच पाहिजे. घुंगरांचा आवाज आला की नाचाचे पदन्यास सुचतात ना , काहीसं तसच. स्वयंपाकघर थोडं अस्ताव्यस्त असण, फडताळातल्या डब्यांनी आपापल्या जागा सोडण, कधी लक्ष देऊनही दूध उतू जाणं आणि अंदाज घेऊन केलेला स्वयंपाकही उरण, म्हणजेच गृहिणीच स्वयंपाकघर. घरात सुद्धा थोडा पसारा असला न तर आवरणारयाला काहीतरी केल्याचं समाधान मिळ्त. नाहीतर घर आणि हॉटेल मध्ये फरक तो काय? कधी मधी सुगरणीचा स्वयंपाकही बिघडवा. कधी मीठ कमी जास्त पडाव, तरच रुचकर चवीच मोल आहे बर. 

                  संसार न या स्वयंपाकघरासारखाच आहे. नात्यांची भांडी एकमेकांवर आपटणार. कधी मोठे, तर कधी हळुवार आवाज त्यातून निघणार. मोठे आवाज कर्कश्श होत नाहीत न, हे बघण्याची जबाबदारी आपली. सुख दु:ख्खाच मीठ कमी जास्त होणार . कधी नात्यांच्या अग्रक्रमाचे डबे उलटे पालटे होणार. भावनांची सांडलवंड होणार, त्याचे चिकट, ओशट ओहोळ काही काळ वाहणार. ते वेळीच टिपून, पुसून घेण शाहण्या माणसाच काम. स्वयंपाकघरात कसं साठवणीचे पदार्थ कोरड्या जागी आणि भाज्या, फळ ओल सामान वेगळ्या जागी ठेवतो न आपण , तसच कडू आठवणी लांब ठेवाव्यात, गोड आठवणीचा ओलावा असू द्यावा मनाशी. इतक करूनही संसारात रोज काही शिजणार, काही उरणार, उरलेल्याला परत फोडणी देऊन ताज करावं लागणार आणि अगदीच टाकाऊ असेल तर त्याची विल्हेवाट लावावी लागणार.आणि हो, सगळ्यांना आवडणारा काय बेत करावा, हा जसा जागतिक प्रश्न असतो, तसच सगळ्यांना पटेल असं कसं वागावं हा भुंगा असतोच सोबतीला. पण त्यातच मजा आहे, उद्याची आशा आहे. टोकाची स्वच्छ्ता नको, तशी अजागळ घाणही नको. थोडं लिम्पत, थोडं शिंपत, थोडं सांडत संसाराचं हे स्वयंपाकघर नांदत ठेवलं पाहिजे बाई.

               सोनाली मन लावून ऐकत होती. म्हणाली, “तुम्ही किती छान बोलता आई.” मी तिला थोपटलं आणि दोघी उद्याच्या डब्यांमध्ये काय द्यायचं याची चर्चा करण्यात रंगून गेलो.  

                                                                                       


Rate this content
Log in