ते १००० रूपये
ते १००० रूपये
एक नाते असेही आहे, जिथे बोलण्याची मर्यादा ठरविली जात नाही. जिथे कोणत्याही प्रकारचा संकोचही नसतो आणि आविर्भावही नसतो. जिथे केवळ निरागस प्रेम आणि ते नातं म्हणजे अर्थातच बहिण-भावाचं नातं.
खरं तर, आम्हा बहिण-भावाचं नातंही अगदी असंच. घरात शेंडेफळ काय ते मीच. त्यामुळे दादा नेहमी नरमाईच्याच भूमिकेत. गंमतीची गोष्ट म्हणजे एखाद्या कार्यालयीन क्षेत्रात {officeमध्ये} जितकं bossing होत नसेल ना, तितकं किंबहुना त्याहीपेक्षा कितीतरी पटीने अधिक माझ्याकडून दादावर bossing होतं. आणि बिचारा ऐकतोही. त्यामुळे आहेच लाखात एक तो! नेहमी झुकतं माप घेणारा. कधी वाटले नव्हते एकदा सहज बोलून गेलेले माझे शब्द एवढे लक्षात ठेवेल! त्याचं झालं असं...
साधारणतः पाच एक वर्षांपूर्वीची गोष्ट. रविवारी दुपारच्या वेळेस आई, मी आणि माझा भाऊ आम्ही तिघेही TV पाहत होतो. आणि त्या दरम्यान एका जाहिरातीमध्ये एका छान अशा मुलीचा घेरदार ड्रेस बघून मी पटकन बोलून गेले - "आई, हे बघ, मला हा असा ड्रेस घे." मी पटकन बोलून गेले खरे! पण तेव्हा मला जराही कल्पना नव्हती मी पटकन बोलून गेलेले काही शब्द दादा इतकं मनावर घेईल आणि एवढं लक्षात ठेवेल! त्यावेळी दादा आमच्या येथून काही अंतरावर असलेल्या एका मोठ्या शहरातील कॉलेजमध्ये शिकतच होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सोमवारी तो तिकडे गेला खरा, पण बहुधा त्याच्या डोक्यात माझे तेच शब्द घोंघावत होते.
म्हणून की काय, तेव्हापासूनच एक महिनाभर जेवणाची हेळसांड केली. शिक्षणासाठी शहरात असल्यामुळे जेवणाची सोय तिकडेच केली होती. दरवेळीप्रमाणे याही वेळेला महिन्याचे खानावळीचे २,२०० रूपये बाबांनी त्याला सोमवारी सकाळी जातानाच दिले. बरोबर एक महिन्यानंतर रक्षाबंधन होते. माझं आपलं तेचं "दादा तू कधी येणार?, दादा तू कधी येणार?, पटकन ये, नाही तर तुला गोंडाचं बांधणार!" बरं का इथेही प्रेमळ bossing चालूच.
ठरल्याप्रमाणे एका दिवसाची अधिकची सुट्टी घेऊन दादा आला. माझी आपली रक्षाबंधनच्या काही दिवस आधीपासूनच गडबड. कोणती राखी बांधायची? त्या राखीचा रंग कोणता निवडायचा? त्याच्यावरची नक्षी कशी असावी? वगैरे, वगैरे. शेवटी अनेक दुकानातल्या काका-मामा-दादांची डोके फिरवून एक छान अशी लाल रंगाची, टपोऱ्या मोत्यांची नी लखलखीत ठासर खड्यांची आणि या सगळ्यांना सामावून घेणाऱ्या सुबक अशा फुलाची राखी निवडली. मग मोठ्या उत्साहाने मोर्चा घराकडे वळवला. दादा येणार होता ना! मग काय उत्साहाला पारावारच नव्हता. असंच असतं बहिण-भावाचं नातं. स
मोर असल्यावर एकमेकांचे "जानी दुश्मन" आणि समोर नसल्यावर आपोआप डोळ्यांच्या कडा एकमेकांना शोधू लागतात. "अगदी तुझं-माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना."
दादा रक्षाबंधनच्या आदल्या दिवशीच आला होता. आल्या आल्या नेहमीप्रमाणे घट्ट अशी मिठी मारली. साहजिकच आहे ना, जवळजवळ एक महिन्याने भेटलो होतो आम्ही! दुसऱ्या दिवशी दोघांनाही - “राखी कशी आहे याची उत्सुकता दादाला” आणि “इकडे काय खाऊ मिळणार याची भली मोठी उत्सुकता मला.”
बंधूराजेंना पाटावर बसवून "मी निवडलेली राखी नक्कीच आवडणार" या कौतुकाने ती राखी बांधली आणि ओवाळणीत काय खाऊ मिळणार या प्रतिक्षेत असलेल्या माझ्या नजरेला "एकावर एक, एकावर एक" अशी घडी मारलेली १००० रूपयांची नोट दिसली. खरं सांगायचं तर मला आनंदच झाला नव्हता. कारण, लहानपणापासूनच सवय लागली होती १० रूपयाच्या करकरीत नोटेची आणि सोबत छोट्याशा कॅडबरीची. मी लगेचच पैसे नको बोलले, कारण त्या एकावर एक पडलेल्या घड्या खूप काही सांगून गेल्या. आणि त्यात तब्येतीची हेळसांड होतीच सोबतीला. तरीही दादाने पाटावरून उठून ती १००० रूपयांची नोट जबरदस्तीने हातात दिली आणि हातात नोट टेकवत "तेच शब्द" बोलून गेला - "बाय, तोच ड्रेस घे, जो तू TV मधल्या जाहिरातीत पाहिला होता." टचकन डोळ्यात पाणी आले. एरवी खोड्या काढून-काढून रडवणारा, यावेळी मात्र खोड्या न काढता आणि डोक्यात न मारताच डोळ्यांत पाणी साठवून गेला. बाबांनी दिलेल्या २,२०० रूपयांमधून त्याने १००० रूपये आधीच काढून ठेवले होते. आणि दोन वेळच्या खानावळीचं रूपांतर एका वेळच्या खानावळीत केलं. आज जरी मोठमोठ्या भेटवस्तू मिळत असल्या तरी त्या घडीवर घडी असलेल्या त्या १००० रूपयांची सर कशालाच नाही.
ते केवळ पैसे नव्हते, तर त्याने एकवेळच्या भुकेला मारलेला फाटा होता, आणि पोटाला काढलेला चिमटा होता. खरंतर त्यावेळी कमवतही नव्हता, पण बाबांनी दिलेल्या त्याच पैशातून त्याने कमवलेल्या त्या १००० पुढे आज लाख रूपये जरी ठेवले तरी त्याची ना तुलना होऊ शकते ना त्याची इतर कोणत्याही मौल्यवान वस्तूपुढे किंमत कमी होऊ शकते.
बहिण-भावाचं नातं असतंच वेगळं. कितीही एकमेकांसोबत भांडत असले, एकमेकांच्या खोड्या काढत असले, रूसत असले, रागावत असले तरी मायेचा ओलावा ही तितकाच असतो. म्हणूनच म्हणावेसे वाटते-
“बहिण-भावाचं हे नातं थोडं हटके आहे,
पण सगळ्यांत गोड आहे.”