Amruta Salunkhe

Others

3.3  

Amruta Salunkhe

Others

बंध

बंध

5 mins
832


         प्रत्येक नात्याचं एक वलय असते, जे आपापल्या जागी एक वेगळे वलय निर्माण करते. जसे की : माय-लेकाचे नाते, बाप-लेकिचे नाते, सख्ख्या मित्र-मैत्रिणींचे नाते. पण एक असेही नाते आहे ज्याची संक्षिप्त ओळख म्हणजे “तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना”, अर्थातचं बहिण-भावाचं नातं.


      बहिण-भावाचं नातं असतंच वेगळं. अगदी जीवाभावाचं. इथे वयाचं अंतर कमी असो वा जास्त, याचा फरकचं पडत नाही; कारण या गोड नात्यातील बंध त्याही पलीकडचा असतो. या दोघांमध्ये लहान-मोठा कोणीही असला तरी एखाद्या गोष्टीवरून वाद झालाचं नाही असं शोधूनही एखाद उदाहरण सापडणार नाही. आणि त्यात TVच्या रिमोटवरून होणारी भांडणे म्हणजे Tom and Jerry. अशावेळी इथे लहान- मोठ्याचा प्रश्नचं येत नाही. मजेशीर गोष्ट म्हणजे संपूर्ण दिवसभरात दोघांनाही एकाचं वेळी TV पहायची असते. अर्थात इथे सामना जिंकते ती बहिणचं. बरं अशावेळी बंधूराजही काही बोलू शकत नाही; कारण भाऊरायांची सगळी गुपिते, सगळे पराक्रम बहिणीकडेचं कुलूपबंद असतात ना!

      

TVच्या रिमोटवरून होणारी भांडणे तशी कोणाला नवीन नाहीत. हि भांडणे जेव्हा एखाद्या खाऊच्या डब्ब्यापर्यंत जाऊन पोहोचतात, तेव्हा कुठे युद्धाला सुरुवात होते. मग दोघांपैकी एकाला एक छान असा लाडू म्हणजे जबरदस्त फटका मिळाला कि मगचं ज्वालामुखी शांत झालेला असतो. तोपर्यंत बहिणीच्या वेण्या ओढून झालेल्या असतात, शिवाय इकडे भावाच्या डोक्यावरचे केस हातात येत नसली तरीदेखील असतील तेवढी केसं ओढून झालेली असतात. मग रागारागामध्ये एकमेकांच्या वस्तू तोडून-मोडून एकमेकांवर मिसाईल 🚀सोडल्याप्रमाणे फेकून झालेल्या असतात. पण शेवटी-शेवटी एकमेकांची खोडी काढण्यात मागे न हटणारे दोघेही जेव्हा मिळून ओरडा खातात तेव्हा कुठे भांडण थांबतं. पण फक्त थांबतं, संपलेलं नसतं. आणि तसंही लगेच भांडणं संपवतील ती बहिण-भाऊ कसले?

      

पण इथे सतत भांडणं होतात असेही नाही हं! इथे Tom and Jerry सारखी प्रेमळ भांडणं जरी होत असली तरी तेवढंच प्रेमही आहे. म्हणून तर दरवर्षी रक्षाबंधनला कित्येक बहिणी स्वत:च्या हातानेचं आपल्या भावासाठी राखी तयार करतात. आणि भाऊही यात मागे नसतो, बरं का! बहिणीला काय द्यायचं याचे नियोजन आधीपासूनचं चालू असते. मग त्यासाठी पैसे कसे जमवायचे,वगैरे वगैरे. समोर एकमेकांसोबत कितीही भांडत असले तरी एकमेकांच्या रक्षणासाठी नेहमीचं तत्पर असतात. दोघेही एकमेकांना दाखवत नसले तरी आपल्या बहिणीला कोण काही बोलत तर नाही ना याची पूरेपूर काळजी घेणारा भाऊ हा लहान-मोठा नसतोचं, तर तो त्यावेळी बहिणीची संरक्षक ढाल असतो, एक बाप असतो. आणि इकडे बहिण जी बंधूराज घरात उशीरा आल्यानंतर वडिलांच्या राजापासून वाचवणारी दुसरी आईचं असते.

      

दुर्दैव म्हणावे की सुदैव, ठाऊक नाही! बघा ना, कित्येक ठिकाणी अशीही काही उदाहरणे पहावयास मिळतात, जिथे वयाच्या आणि अनुभवाच्या मानाने खूपचं लवकर वडिलांचे छत्र हरपल्यामुळे कित्येक भाऊ आपल्या बहिणीच्या पाठिमागे एका भक्कम वडिलांसारखे उभे असतात. आणि कित्येक बहिणी आईच्या मायेला भुकेल्या असणाऱ्या भावांना आईची माया देतात. इतर सर्व नात्यांपेक्षा हे नातं अनोखं आहे,कारण इथे वय बघून बोलण्याची मर्यादा ठरवली जात नाही.

      

इथे एकमेकांना उपदेशही केला जातो, सल्लाही दिला जातो आणि सूचनाही. छोट्या बहिणीला किंवा छोट्या भावाला आजूबाजूच्या परिस्थितीमुळे नकळत आलेले शहाणपण शांतपणे समजून घेतात ती हिचं भावंडं. एकमेकांच्या विचारांना समजून घेण्याचा बंध मुळातचं इथे रुजलेला असतो. वेळप्रसंगी बहिणीवरचा ओरडा खाणारा भाऊ आणि भावावरचा ओरडा खाणारी बहिण आपण अनेकदा पाहिली असतीलचं. जीभेचे चोचले पुरविण्याचे एक हक्काचं व्यासपीठ म्हणजे बहिणचं. शिवाय ते पूर्ण करण्याशिवाय दुसरा पर्यायचं नसतो ना! कारण, त्याचं बहिणींची कितीतरी कामे याचं भाऊरायांवर अवलंबून असतात. आणि त्यात जर घरात शेंडेफळ म्हणून भाऊचं असेल तर मग त्यांचे जीभेचे लाडही पूर्ण करा आणि त्यांची उरलीसुरली सगळी कामेही करा! पुढे कोणताचं पर्याय नसतो. पण, जोपर्यंत बहिणीने काढलेल्या रांगोळीला बंधूराजेंची दाद मिळत नाही, तोपर्यंत बहिणीला हि समाधान मिळत नाही. इतरवेळी भावाने कितीही चिडवले तरी चारचौघात मात्र बहिणीची स्तुती करणारा भाऊ कधीचं थांबत नाही. नवीन नोकरीला लागल्यानंतर पहिल्या-वहिल्या कमाईतून इतर सर्व खर्चांची बेरीज-वजाबाकी करण्याआधीचं काही पैसे बाजूला काढून त्यातून काही ना काही तरी भेटवस्तू आणणारा भाऊ हा निराळाचं असतो. अगदी पहिल्या कमाईपासून ते बहिणीच्या लग्नापर्यंत स्वतंत्र पैसे केवळ बहिणीसाठीचं बाजूला काढणारा भाऊ हा काही निराळाचं असतो.

       

प्रेमाचे शब्द फक्त नवरा - बायकोमध्ये आणि मित्र -मैत्रिणींमध्येचं व्यक्त होतात असे नाही! इथेही व्यक्त होतात. फक्त ते व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. इथे प्रेम व्यक्त केलं जातं ते शब्दाांतून नव्हे तर अल्लड - अवखळ खोड्यांतून अन्   भांडणातून आणि जबाबदारीच्या जाणिवेतून. आपला भाऊ कसाही असो - शिकलेला असो किंवा नसो, मोठा असो वा लहान, साधा शेतकरी असो वा बडा अधिकारी, बंगल्यात राहत असो वा झोपडीत. थोडक्यात काय,,,, तर त्याचा status कसाही असला तरी तो प्रत्येक बहिणीच्या काळजाचा तुकडाचं असतो. आणि आपली बहिण साधीसुधी, भोळीभाबडी कशीही असली तरी प्रत्येक भावाच्या नजरेत ती bestचं असते. पहा ना, आईच्या पश्श्चात प्रत्येक भावाच्या मायेचा पदर बहिणचं असते. म्हणूनचं तर, दोघेही एकमेकांसोबत कितीही भांडत असले तरी दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत कोणत्या तिसऱ्या व्यक्तीमुळे अश्रू पाहूचं शकत नाही.

       

लग्नमंडपातून पाठवणीच्या वेळेस एकवेळ मुलगी वडिलांच्या नजरेला नजर लावून आणि गळ्यात गळे घालून ढसाढसा रडेल, पण सतत वेण्या ओढणाऱ्या आणि सतत खोड्या काढणाऱ्या भावाच्या नजरेला नजर लावून निरोप घेणं म्हणजे काळजावर दगड ठेवण्यासारखचं आहे. बहिणीच्या लग्नात सगळ्यांचं हवं-नको-ते बघण्यात व्यस्त राहणारा भाऊ त्यातूनही आपल्या बहिणीला काही कमी तर पडत नाही ना, याची पूरेपूर काळजी घेणारा भाऊ तोचं असतो जो स्वतःला बहिणीसमोर strong, strong म्हणवतो. पाठवणीच्या वेळेस स्वतः मात्र अगदी शेवटी उभा राहतो कारण त्याचीही हिंमत नसते भरल्या डोळ्यांनी बहिणीला निरोप देण्याची. भाऊ रक्ताचा असो वा मानलेला, भाऊ तो भाऊचं असतो. आणि बहिण ती बहिणचं - प्रत्येक भावाची एक “lifetime secret box.”  

असं हे भाऊ-बहिणीचं नातं,,,,

       “थोडं अल्लड अन् थोडं अवखळ,

        थोडं खोडकर अन् थोडं प्रेमळ”

        काय गंमत आहे ना! समोर असताना एकमेकांचे पक्के शत्रू. पण, मोठेपणी आपापल्या मार्गाने वेगळे झाल्यावर एकमेकांपासून दूर होतात, तेव्हा ताई कधी येणार गं? आणि दादा कधी येणार रे तू? असे प्रश्न विचारून स्वतःचं स्वतःला समजावत बसायचे. समोर असल्यावर नाक मुरडायचं आणि समोर नसल्यावर आपणचं शोधत बसायचं. “जा बाईsss जा तू एकदाशी तुझ्या सासरी” असं म्हणणारा भाऊ आपल्या बहिणीला माझ्यापेक्षाही जास्त प्रेम देणारा नवरा मिळू देत म्हणून मनातुनचं देवाला प्रार्थना करत असतो. आणि हो,,,,, भावाला जर कोणी काही बोललं तर सगळ्या मर्यादा सोडून जीवाच्या आकांताने भांडणारी, लढणारी बहिण - “माझा दादा असा great आहे आणि अमूक एका गोष्टीत best आहे”, असा कौतुकाचा पाढा सांगताना थकतचं नाही.

       मोठे झाल्यावर संवाद जरी कमी होत असला तरी भाऊ-बहिणीच्या नात्याची वीण, त्याचा बंध हा तितकाचं घट्ट असतो जितका तो लहानपणी असतो.

शेवटी काय... तर

          “मुद्दामचं खोड्या काढणाऱ्या भावाला,

           उगाचंच रूसणारी बहिण पाहिजेचं.”


Rate this content
Log in