Hemangi Sawant

Romance

3.4  

Hemangi Sawant

Romance

सोबतीचा पाऊस

सोबतीचा पाऊस

12 mins
2.5K


आजही तो क्षण आठवतोय मला. मी पहिल्यांदाच पुण्याला जाणार होती. ऑफिसच्या कामानिमित्त आणि तिकडेच आमची पहिली भेट झालेली. जायचं म्हणुन लवकर आवरून झोपायच ठरलं. तस वन डे रिटर्न यायचं होत, म्हणून काही पॅकिंग नव्हती. आज लवकर झोपावं लागणार होतं नाही तर सकाळी जाग आली नसती. आईचा ओरडा पडल्यावर गप्प झोपावं लागलं. झोप काही केल्या येत नव्हती. पण झोपलो नाही तर ट्रेन मिस झाली असती म्हणून झोपावं लागलं. डोळे बंद करून पडले होते, पण झोप काही केल्या येईना. विचार करता करता कधी झोपले हे देखील कळले नाही. 


आईच्या आवाजाने जाग आली, घडाळ्यात पाच वाजले होते. धडपडत उठून बसले. अलार्म कसा झाला नाही म्हणून बघितले तेव्हा कळलं. कसा होईल सकाळचे साडे चार वाजले होते. 'ही आई पण ना, पाचच्या नावाखाली तिने मला अर्धातास आधीच उठवले होते.' का... तर म्हणे, "तुझीच तय्यारी नाही होत मग करतेस घाई म्हणून उठवलं." काय बोलणार यावर. मी गप्पपणे बाथरूममध्ये निघून गेले. बाहेर भरपूर पाऊस पडत होता की कोसळत होता देव जाणे. पण खूप जोरात आवाज मात्र येत होता. 


स्वतःच आवरून चहा नाश्ता करत होते की, आई ने विचारले" जायलाच हवं का..?" नाही म्हणजे बाहेर खुप पाऊस आहे ना.." मी गप्पपणे तिच्याकडे एक थंड नजरेने बघितले. (मी मनात, 'मला नाही ग हौस एवढ्या पावसात त्या पुण्यात जायची. पण तो खडूस बॉस बोलला जा नाही तर प्रोमोशन नाही. म्हणून जावं लागतंय.') माझ्या नजरेने कदाचित तिला तीच उत्तर मिळालं असावं तशी ती गप्प किचनमध्ये निघून गेली मला प्रवासाच खायचं बांधून द्यायला. 


मी देखील पुढ्यातले पोहे अक्षरशः तोंडात कोंबत घडाळ्यात पाहिलं. आधीच उशीर आणि त्यात हा बाहेर पाऊस. सगळं आवरून निघाली एकदाची त्या पावसात. सकाळचे साडे सहा झाले होते तरीही बाहेर अंधारून आलेलं. छान हवा सुटली होती. वाटत होत पांघरूण घेऊन झोपून द्यावं, पण कसलं काय. ते नशीब आपलं नाही अस म्हणत मी ऑटोसाठी निघाले. आईच्या पाया पडून बाहेर पडले आणि दारातच ऑटो मिळाली. लगेच देवाचे आभार ही मानले. 


ऑटोमध्ये बसुन मी त्या बाहेर पडणाऱ्या पावसाला एन्जॉय करत होते. थंडावा हवेत जाणवत होता मस्त अंग शहारले. पाण्याची काही स्पंदने तोंडावर येत होती, गुदगुदल्या झाल्यासारख वाटलं. एवढ्या त्या छान वातावरणात मधेच रिक्षावाला केकटला, "ओ ताई पैसे द्या मला दुसर भाड ही घ्यायचं आहे." अस वाटत होतं की बोलाव पैसे घेऊन पळुन जाणार नाहीये, पण मनाला आवरलं. पैसे देऊन स्टेशनवर पोहोचली, तिकीट काढली आणि ठाण्याला जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभी राहून ट्रेनची वाट बघत होती. मोबाईलवर नजर जाताच टेंशन. ती ट्रेन पंधरा मिनिटांमध्ये ठाण्याला पोहोचणार होती. 


तोच समोरून एक कल्याण ट्रेन आली आणि माझा जीव भांड्यात पडला. सकाळ असल्याने काहीच गर्दी नव्हती. एवढी जागा होती की तुम्ही कोणत्याही सीटवर झोपु शकत होता. मग एक सीटवर बसून मी ठाणे येण्याची वाट बघत बसले. बाहेर अजूनही पाऊस कोसळत होता. थंड वारा येताच अंगावर शहारे उभे राहत होते. 

काही बोला, पण तो पाऊस आहे ना तो एवढा गोड आहे की, तो आला की मन कस आनंदी होते. वातावरण एकदम मस्त होत. एकदम रोमँटिक आणि त्यात आपल्या आवडत्या वेक्तीचा सहवास हवा हवासा वाटतो. तो सोबत असला की पाऊस पडावासा वाटतो आणि आपण त्या आवडत्या वेक्तीच्या खांद्यावर आपले डोके ठेवून निवांत पडून राहायचं. तो प्रवास कधी संपूच नये असं वाटत नाही...!!


ठाणे स्टेशनवर पोहोचताच मी धावत प्लॅटफॉर्मवर नंबर पाचवर जाऊन उभी राहिली. तेवढ्यात पुण्याला जाणाऱ्या ट्रेनची घोषणा झाली. कोणत्याही क्षणात ट्रेन येण्याची ती घोषणा होती. मी तय्यारच होते जसे यौध्ये जायचे ना लढायला त्याच पध्दतीने मी देखील ट्रेनमध्ये चढायला तय्यार होते. तोच पुण्याला जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली. सगळे चढले म्हणून मी देखील चढले. ती ट्रेन देखील लगेच सुरू झाली. त्या डब्यात उभं राहायला ही जागा नव्हती आणि माझा बॉस नाचून सांगत होता त्या ट्रेन ने जाशील तर झोपून जाशील. एवढा राग येत होता काय सांगू. मग कानात हेडसेट टाकून गाणी ऐकत उभी राहिली. त्यात तो ट्रेनमधल्या बाथरूमचा वास जीव नकोस करत होता. 


बघता बघता ट्रेन एक एक स्टेशन पार करत होती. बाहेरील दृष्य मनाला अजून ताज तवानं करत होत. त्या पावसाने काय जादू केली होती कोण जाणे सगळीकडे हिरवी शाल पांघरावी तसच वाटत होतं. त्यात रंगीबेरंगी फुले वाऱ्यासोबत डोलत होती. त्यावर बसलेला भुंगा मात्र फुलांवर बसून चांगलाच ताव मारत होता. सकाळचा ब्रेकफास्ट असावा. सकाळ झालेली पण त्या सुर्यदेवाने दर्शन काही दिले नाही. कदाचित त्याने देखील त्या पावसामुळे दांडी मारली असावी. अचानक कुठून तरी डोंगराच्या दिशेने मोठं मोठे ढग येत आणि पाऊस पाडून जात. झोपलेल्या प्रत्येक प्राणी, पक्षाला फ्रीमध्ये अंघोळ घालावी तसे ते घालून परतत होते. 




हे सगळं मी ट्रेन मध्ये बसून टिपत होती. पावसाळ्यात निसर्ग किती जवळून जगता येतो नाही....!! त्याचाच आनंद मी घेत होते. परत एकदा पावसाला सुरुवात झाली. आणि आम्ही ही ट्रेन ने एक-एक स्टेशन पार करत होतो. मधेच एका भोगद्यामध्ये गाडी गेली आणि सगळीकडे छोटे मोठे धबधबे वाहताना दिसले. तो क्षण मनाला आनंद देऊन गेला. कस का होईना आज हे मी सुख अनुभवत होती. 


तोच एका बाईने मला तिकीट विचारली म्हटलं "काकी मला शिवाजीनगरला उतरायचं आहे" त्यांनी आपण आधी उतरणार आहोत असं सांगून स्वतःची सीट मला दिली. मग काय निसर्ग अजून जवळ बघता येणार होता. मी काच हळूच वर केली आणि थंड वारा मनाला स्पर्शून गेला. 


हळू हळू मी सगळी स्टेशन मागे टाकत पोहोचली एकदाची शिवाजीनगरला. मला घ्यायला एक तिकडच्या ऑफिसमधला येणार होता म्हणून मी त्याला कॉल केला. नंबर बॉसने देऊन ठेवला होता म्हणून नशीब. खुपदा कॉल केल्यावर एक कॉल लागला. "हॅलो, मिस्टर अनय..? मी रेविका बोलतेय. मी स्टेशनला पोहोचली आहे. तुम्ही कुठे पोहोचला आहात..??" समोरून, " हा मॅडम मी देखील पोहोचलो आहे. तुम्ही स्टेशन बाहेर या मी बाहेरच उभा आहे."



मी गेली तर एक पाच फूट वैगेरे असेल. अंगात एक ब्लॅक जॅकेट, तोंडावर रुमाल गुंडाळला होता. खाली घातलेली जीन्स तर चिखलाने माखलेली असा त्याचा तो अवतार बघून मलाच हसु आला. तस कोणालाही आलाच असत. मग मीच पूढे जाऊन हाय हॅलो केलं. पावसाने ही उसंत घेतली होती. मग एक कप चहा होऊन जाऊदे अस त्याने म्हणताच मी एका पायावर तय्यार झाले. काय करणार प्रवासाचा शिन कमी व्हावा एवढीच इच्छा. दोघांनी दोन कप गरमा-गरम चहा घेतला आणि आम्ही निघालो. छान बाईक होती त्याची. बुलेटची. पहिल्यांदाच बसणार होते अशी अनोळखी वेक्तीच्या बाईकवर, पण दुसरा ऑपशन ही नव्हता. आणि तो एवढा घ्यायला आलाय आणि आपण ऑटोने जाणे मला आवडणार नव्हते. मग आम्ही निघालो. 


ऑफिसमध्ये पोहोचलो काम काही जास्त नव्हते. उगाचच नळ बोलावले आहे अस वाटलं. पण बॉसने पाठवले त्याला कोण नाही बोलणार. काम झालेले. अनयच ही काम झालं होतं म्हणुन तो बाहेर गेला. तिकडच्या मॅनेजर ने काम संपलं तुम्ही जावा अस बोलताच माझा राग आता तळपायावरचा मस्तकात जात होता. फक्त एका तासासाठी मला मुंबईहून पुण्याला बोलावले होते. तशीच उठून आणि मी निघाले. लंच ही नाही केला,म्हणून पोटात कावळे ओरडत होते. बस स्टॉप वर उभी राहून मी बस ची वाट बघत होती आणि त्यात हा मुसळधार पाऊस. मग सगळी चीड चीड होत होती. काय करणार पोटात काही नसले की डोकही चालत नाही, हे काय उगाच बोलत नाही हे आज कळलं.



तोच अनय माझ्यासमोर बाईक घेऊन उभा राहीला. आधी मला राग आला की "हा कशाला आता माझा पिच्छा करतोय", पण मग तोच बोलला. " मॅडम काही खाल्लं नाही ओ तुम्ही. चला हॉटेलमध्ये जाऊया. मलाही भूक लागलीये." 

मग मी विचार केला एवढ्या मोठा पुण्यात कुठे शोधायचं हॉटेल जाऊ याच्या सोबतच. काही वाईट घडलंच तर गणु आहेच. आणि आपला पेपर स्प्रे देखील. मग जाऊन बसले बाईकवर. आधी आम्ही छान हॉटेलमध्ये दाबून खाल्ल. मग मीच काही तरी बोलायच म्हणुन विषय काढला, "काय ओ मुंबईला परत जायची ट्रेन किती वाजताची आहे...?"

"मॅडम आता ट्रेन डायरेक्ट सहा वाजताची".. इकडे अशाच ट्रेन असतात. मी मात्र काय करू एवढा वेळ याचा विचार करत बसले. मग तोच बोलला की, "मॅडम बघा हा म्हणजे तुमच्याकडे एवढा वेळ आहे. आता जाऊ देखील शकत नाहीत, तर तुम्हाला चालणार असेल तर मी तुम्हाला पुणे फिरवू शकतो. हा पण त्यात माझा काही वाईट हेतू नाही. पण जर तुम्हाला वाटत असेल तरच. कारण माझाही अर्धा दिवस गेलाच आहे. घरी जाऊन फक्त लोळण्यापेक्षा फिरून आलो असतो म्हणून विचारल. बघा विचार करा. नसेल पटत तर ठीक आहे. मला वाईट नाही वाटणार."

मग मी विचार केला की जर गेली तर फिरेन. पण त्याने आपल्याला काही त्रास दिला तर मग काय..?! पण तसही एवढा वेळ आपण करणार काय आहोत. तसा मुलगा काही वाईट वाटत नाहीये. मग मी मनाशी ठरवत हो म्हटलं. खर तर घाबरलेच होते पण देवावर विश्वास ठेवुन तय्यार झाले. 

मग आम्ही आधी एकविरा आईच्या मंदिरात जाण्यासाठी निघलो. तिकडे जातानाचा रस्ता एव्हढा सुंदर होता. आजूबाजूला छोटे मोठे बंगले. मधेच एक कौलारु घर समोर अंगण. त्या अंगणात बकऱ्या, कोंबड्या तर कुठे गाई म्हशी चरत, फिरत होते. 

पावसामुळे काही ठिकाणी तळे ही साठली होती.


मंदिरात दर्शन घेऊन आम्ही पवना डॅमकडे निघालो. त्याची बडबड चालूच होती. खूप काही म्हाहित होत त्याला. मधेच मी बाईक थांबवायला सांगितली. माझ्या समोर मोकळं माळरान होत. दूरवर पसरलेली हिरवी शाल. चारी बाजूला नजर जाईल तेवढे डोंगररांगा आणि त्यावर कोसळणारे धबधबे. ते निसर्गरम्य नजरेत कैद करून ठेवावेसे वाटत होते. त्या माळरानात काही गुरे मज्जेत हिरव्या गवतावर ताव मारत होते, तर काही पक्षी सिहासनावर बसावे तसे त्यांच्या पाठीवर विराजमान होऊन फिरत होते. 




अचानक आलेल्या त्या पावसाने आम्ही दोघेही पळत एका पडक्या झोपडीत शिरलो. त्याने स्वतःकडाचा रुमाल मला देऊ केला. समोरील टपरीच्या बाजूला एक आजोबा मके भाजून विकत होते. माझा लक्ष त्या मक्यावर गेलं आणि मला भुकेची जाणीव झाली. ते कदाचीत त्याला कळले की काय म्हणुन त्यानेच ,"मका खायचा का..?"विचारलं. मी मात्र मानेनेच होकार दिला. 

पळत जाऊन त्याने मके आणले. बाहेर पाऊस आणि हातात मका म्हणे स्वर्गसुख. मका खाऊन आम्ही परत आमचा मोर्चा पवना डॅमकडे वळवला. रिमझिम पाऊस होताच आणि अनोळखी सोबत. छान वाटत होते. तो देखील अंतर ठेवून वागत होता. मग मी ही मनापासून त्याच्याशी गप्पा मारल्या. 




पवना डॅम जवळ पोहोचताच मला एक मोर दिसला. आयुष्यात मोर फक्त चित्रात आणि टीव्ही वरच पाहिला होता. मग काय मी गेले पळत. तो मोर मस्त आपला पिसारा फुलवून नाचत आहे असाच वाटेल बघणाऱ्याला. पावासाने अजून एक गोष्ट मला देऊ केली होती. "पावसात नाचणारा मोर." मी हे सर्व डोळ्यात भरून घेत होते. अनय आणि मी मग डॅमवर गेलो त्या भरलेल्या डॅममध्ये मी थोडी जवळ उतरली. तिकडे खूप लोकं ही होतीच जी पावसात डॅमची मज्जा लुटत होते. तोच एक बदकांचा ग्रुप माझ्या जवळ येऊन पुढे गेला. मी त्यांच्यामागे धावली पण तोपर्यंत ते आत निघून गेले होते. 





मग की देखील बाहेर आले. हे सर्व तो लांबून बघून हसत होता. त्याच्याजवळ येत मी त्याला ओरडणारच होते की, माझा पाय सरकला आणि मी पडणारच होते की, त्याने मला झेलले. एक क्षण काहीच कळत नाही की काय होतंय. त्याच्या त्या डोळ्यात मी हरवून गेली काही क्षणांसाठी आणि तो आला. सोबतीचा पाऊस. पण तो क्षण अजूनही आठवला तरी अंगावर शहारे येतात. 




आम्ही परतीच्या वाटेला लागलो.. आता तो शांत होता आणि माझी बडबड चालु होती. कदाचित मी आता जास्त कम्फर्टेबल झाली असावी. त्याने एक ठिकाणी जातानाचा रस्ता बदलला तो कळताच मी त्याला विचारले. पण त्याच्या तोंडातुन एक शब्द फुटेनात. मला आता भीती वाटू लागली. पण काही केल्या तो बाईक थांबवत नव्हता. बाईकची स्पीड आता वाढत चालली होती. एक क्षण वाटलं आपणच चुकलो, उगाच अनोळखी वर विश्वास ठेवला. त्याला विनवणी करून ही तो काहीच ऐकत नव्हता. मी मनात गणुकडे धाव घेतली. मनात प्रार्थना करायला सुरुवात केली. आता जे होईल त्याला सामोरे जायचे हे मनाशी पक्के करून मी माझे डोळे बंद केले. मला माझे मरण दिसत होते. तोच बाईक थांबल्याची जाणीव झाली.




डोळे उघडले तर आम्ही एका जागी होतो. त्याने मला वर हात करून काही तरी दाखवायचा प्रयत्न केला. मी पाहिले आणि बघतच राहिले. ते बघताना माझ्या डोळ्यातून कधी अश्रु आले कळलंच नाही. माणसाचे मन काहीही विचार करू शकते हे मला तेव्हा जाणवले. आम्ही पायऱ्या चढुन वर आलो आणि समोर होता तो भलामोठा गणपती. हो माझा लाडका गणु. अक्षरशः आकाशाला पोहोचेल एवढा मोठा होता. त्याचे रूप मी डोळ्यात भरत होते. आणि माझ्या गालावर एक थेंब येऊन विसावला. तो आलेला. सोबतीचा पाऊस.




काय करणार सोबतीचा मित्र तो. जिथे आपण तिथे तो. असा हा पाऊस. एक क्षण मी सर्वकाही विसरून त्या पावसात उभी राहून फक्त आनंद घेत होती त्या आकाशा एवढ्या गणुच. आणि सोबत मुसळधार पावसाच. मग अनय पूढे येत त्याने मला मंदिरात नेलं. "काय मॅडम घाबरला ना तुम्ही..??"तुम्हाला काय वाटलं किडण्याप करतोय तुम्हाला हो ना...? आणि तो जोर जोरात हसु लागला. एक क्षण मला ही हसु आले स्वतःच्या विचारांवर. मी ओशाळातच हसले. " अरे तू अचानक अस केलंस ना म्हणून घाबरले.." सॉरी हा" 

मी लगेच कान धरून माफी मागितली. 'पण एक सांग तुला मधेच गणु कसा आठवला.' "अहो तुम्ही बोलता बोलता खुपदा त्याच नाव घेतलं म्हणून इकडे घेऊन आलो." छान वाटलं मला कोणीतरी आपल्याला आवडत म्हणुन काही तरी केलं. हा असा पहिलाच वेक्ती मी पाहत होते. नाही तर लोक फक्त स्वतःची काम असतील तरच आपल्याशी गोड बोलतात. 

"मॅडम मी काय बोलतो एक जागा आहे जाऊया का तुम्हाला आवडेल ते..." हो चालेलं जाऊ, पण आधी हे मॅडम बोलणं बंद कर मग जाऊया तू सांगशील तिथे." यावर आम्ही दोघेही मनमुरादपणे हसलो. 


परत एकदा त्याला डोळ्यात साठवून आम्ही निघालो त्याचा निरोप घेऊन. एक टेकडी वर. जवळच होती. आकाश काळ्या ढगानी भरलं होत. कोणत्याही क्षणात मोठा पाऊस येऊ शकत होता. आम्ही बाईकची स्पीड वाढवली आणि पोहोचलो. टेकडीवरुन समोरच सर्वकाही सुंदर दिसत होता. समोरून काळे ढग हळू हळू त्या खाली असलेक्या गावांना आपल्या वशमध्ये करू पाहत होते. एक-एक करत ते पुढे येत होते आणि मला जे दिसलं ते अविस्मरणीय होतं. त्या ढगांसोबत पाऊस पडत पुढे पुढे येत होता. मी पाऊस अनुभवला पण आज तो मी डोळ्यांनी बघत होते. माझ्या डोळ्यांनी. तो क्षण तिथेच थांबावा असच ते दृष्य होतं. काही वेळ आम्ही तसच बघत होतो पाऊस. अनुभवत होते मी, तो पाऊस. नेहमी अंगाला, मनाला स्पर्श करणारा पाऊस आज माझ्याशी बोलायला चालुन येत आहे असा तो अनूभव मी आयुष्यभर जपण्यासाठी मनात भरून ठेवत होती. 




मग काही वेळ बसवून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. अचानक त्याचा चेहरा कोमेजल्यासारखा वाटून गेला. माझी तिकीट काढून आम्ही ट्रेनसाठी उभे होतो. आज खुप काही घेऊन जात होते. मनाच्या प्रत्येक कप्प्यात आठवणी भरून ठेवत होते. कधी वाटलं तर त्या आठवणी परत जगून घेता याव्यात म्हणुन. जाताना न विसरता अनयचे मनापासून आभार मानले. अनोळखी शहरात आपलासा वाटणारा एक मित्र भेटुन गेला होता. 


ट्रेनमध्ये चढताना मन उगाचच बैचेन होत होते. पण थकव्यामुळे असेल असं मन स्वतःला पटवून देण्याचा प्रयत्नही करत होते. एक विंडोसीट बघून मी बसली. अनयला बाय करत, पुन्हा भेटु नक्की अस प्रॉमिस देत माझी ट्रेन निघाली परतीच्या प्रवासाला. 


आज मी या प्रवासातून खूप काही सुंदर क्षण घेऊन जाणार होते. निसर्ग, पाऊस, गणु आणि अनय. आमची पहिली भेट.

आकाशात काळे ढग जमा होत होते आणि तो परत बरसण्यासाठी सज्ज झाला होता. असा हा पाऊस पूर्ण प्रवासात माझा सोबती बनून राहिला. 


घरी पोहोचताच अनय ला व्हाट्सएप केला. त्याचाही रिप्लाय आला. कदाचित तो वाटच बघत होता असच काही जाणवलं. मग खुप गप्पा झाल्या. आता आम्ही रोज गप्पा मारत असतो. कॉल वर बोलणे ही होते. कदाचित त्या प्रवासाने मला नवीन मित्र तर दिलाच पण प्रेम करायला ही शिकवले. आज एक वर्ष पूर्ण झालं त्या प्रवासाला. म्हणुन आज आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत. अनय आज मला भेटायला मुंबईत आलाय. पण आज मी देखील त्याला काही तरी गिफ्ट देणार आहे. माझ्या प्रेमाची कबुली. आज त्याला मी प्रपोज करणार आहे. त्याच उत्तर मला म्हाहित आहे, पण तरीही एकदा नक्कीच विचारेन. 

एका कॉपीशॉपमध्ये आम्ही भेटलो. "हेय कशी आहेस..?"

"मी नेहमी सारखीच मस्त..!" अन तू..? "मी पण",त्याने हसुन सांगितलं.

गप्पा झाल्या आणि मी त्याला विचारलं. "अनय जरा बोलायच होत बोलू का..?" "तु कधी पासून परवानगी घेऊ लागली. बोल ना." 

"अनय माझं तुझ्यावर प्रेम आहे" म्हणजे बघ तुझं नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. 

"ओ मॅडम या क्षणाची मी एक वर्ष वाट बघितली आहे आणि तुम्ही सांगत आहात काही प्रॉब्लेम असेल तर..!"

"माझ तर त्याच दिवशी तुझ्यावर प्रेम जडलं होत, जेव्हा तु मनापासून त्या गणपतीच्या पाया पडत होतीस. त्या निसर्गात फुलपाखरा सारखी बागडत होतीस. त्या पावसाला अनुभवत होतीस." 


त्याने माझा हात आपल्या हातात घेतला आणि आपले ओठ त्यावर टेकवले. आणि बाहेर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कदाचित त्याच्याही मनात तेच असाव. 

आम्ही त्या पावसासोबत मनाने आज एकत्र झालो. बाहेर पाऊस आनंदाने नाचत आहे असच वाटत होतं. बाहेर पडलो आणि एकाच छत्रीत चालत गेलो. दूरपर्यंत.. त्या पावसात दिसेनासे होईपर्यंत... 

पाऊस मात्र जोरदार कोसळत होता. जस की माझ्या ही पेक्षा जास्त त्यालाच आनंद झाला असावा. 

असा तो सोबतीचा पाऊस प्रेम करायला शिकवून गेला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance