Hemangi Sawant

Drama Romance Tragedy

4.8  

Hemangi Sawant

Drama Romance Tragedy

तुटलेले नाते

तुटलेले नाते

4 mins
1.6K


किती हळवे असते नाही आपले मन. क्षणात हसते, तर क्षणात रुसते. क्षणात कोणावर तरी जडते. तसंच तिचंही... तिने पहिल्यांदाच त्याला पाहिलं. सहा फूट हाईट. गोरा रंग. डोळ्यावर चष्मा. ब्लॅक पॅन्ट आणि लाईट ब्लू कलरचा शर्ट. नवीन ऑफिसमध्ये तो तिला पहिल्यांदाच दिसला. त्याच क्षणी स्वतःचे हृदय तिने त्याला देऊ केलं. 


इतर मैत्रिणींकडून येत्या आठवड्याभरात ओळखही काढली. तो सिंगल म्हणून ही मात्र खूश झाली. मग रोज येता जाता त्याला बघणं. त्याच्या बोलण्याची स्टाईल, चालण्याची स्टाईल. अगदी वेडी झालेली ती. म्हणजे तशा ऑफिसमधल्या सगळ्याच मुली त्याच्यावर फिदा होत्या. पण ही मात्र जास्तच. 


धाडस करून एकदा तो कॉफी पीत असताना जाऊन ओळख काढली. "हाय... मी प्रांजल. न्यू जॉईन झालेय." त्याने फक्त एकदा बघितले आणि परत कॉफी पिऊ लागला. पण ती आज ओळख करूनच जायचं ठरवून आलेली.


परत एकदा तिने स्वतःचा खाऊच डबा पुढे करत विचारलं, घेणार का..? त्याने फक्त एक हलकी स्माईल देत नको म्हटलं. "घ्या ओ पैसे नाही घेणार मी", असं बोलताच त्याला हसू आलं. मग गप्प एक बिस्कीट घेत खाऊ लागला. ती झालेली ओळख पुरेशी होती त्यांच्या नात्याला. 


हळूहळू मैत्री आणि मैत्रीचं प्रेमात कधी रूपांतर झालं हे त्यांनाही नाही कळलं. आता ती बॉस होती ऑफिसमध्ये नाही, रिअल लाइफमध्ये. छान चालू होतं त्यांचं. फिरणं, एन्जॉय करण. एकत्र घालवलेला वेळ तिच्यासाठी सर्वांत महत्त्वाचा होता. अशीच दोन वर्षं कशी झाली हे त्यांनाही कळलं नाही. छान चालू असताना एके दिवशी त्याने तिला भेटायला बोलावले. ती रोजच्यासारखी हसत त्याला भेटायला गेली. पण तिला काय माहित होते की आज काय वाढून ठेवलंय तिच्यासाठी पुढे. 


त्यांच्या रोजच्या कॅफेमध्ये तो तिची वाट बघत होता. ती येताच तिने त्याला मिठी मारली, त्यानेही मारली. पण त्या मिठीत तो आपलेपणा नव्हता. त्याचं तिला जरा वाईट वाटलं.

 

कॉफी मागवत तिने त्याला, का बोलावले म्हणून विचारताच.. त्याने फक्त "यापुढे हे नाते मला टिकवता येणार नाही", एवढेच म्हणत तो उठून निघूनही गेला.


एक क्षण तिला कळलंच नाही काय झालं. स्वप्न बघत आहोत असं तिला वाटलं. पण ते सत्य होतं जेव्हा वेटर त्यांची कॉफी घेऊन आला. आता समोर दोन कप कॉफी होती. पण तिच्यासोबत ती पिणारा तो मात्र केव्हाच निघून गेलेला. 


कशीबशी दोन कप कॉफी तिने संपवली आणि बिल पे करून तडक घरी निघाली. डोक्यात फक्त एकच वाक्य घुमत होतं, "यापुढे हे नाते मला टिकवता येणार नाही", का..? कशाला..? काय प्रॉब्लेम आहे.. न सांगता तो निघून गेलेला. 


घरी आली आणि तडक आपल्या रूमध्ये जात तिने त्याला कॉल केला. नंबर बंद दाखवत होता. एका क्षणी वाटलं नंबर बंद आहे की, मलाच ब्लॉक केलंय. मनाला पटवून तिने परत परत कॉल केले पण मोबाईलमध्ये एकच वाक्य येत होतं. "तुम्ही डायल करत असलेला नंबर बंद आहे. जरा वेळाने पुन्हा प्रयत्न करा." ती रात्र उशी भिजून गेलेली. 


स्वतःला सावरत दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेली. तोच दिवस शेवटचा आपल्या आयुष्यातला आहे असा भास तिला झाला. ऑफिसमध्ये पूर्वीसारखाच तो, पण एका केबिनमध्ये बसून छान कॉफीचा एकएक घोट घेत होता. 


लंचमध्ये कानावर आलं की प्रमोशनसाठी तो बॉसच्या मुलीसोबत लग्नासाठी तयार झाला. येत्या रविवारी त्यांचा साखरपुडाही आहे असं कानावर आलं. तिच्या मात्र पायाखालची जमीन सरकली. काही लोक तिच्या आणि त्यांच्या नात्यालाही नावं ठेवत होते. फक्त टाईमपास होता. तो तिला मूर्ख बनवत होता आणि ती बनली. यावर टाळ्या देऊन सगळे हसत होते. तिला काय करावे सुचेना. बस उठली वॉशरूममध्ये निघून गेली. परत आली ती नोकरी सोडण्याचा निर्णय घेऊनच. तडक अर्ज भरून तिने तो जॉब सोडला.


प्रमोशनखातर स्वतःच्या प्रेमाचा बळी त्याने घेतला होता. एवढं स्वस्त झालंय का प्रेम... 


तिने मनाशी पक्क करत रात्र जागवली. सकाळी उठुन बॅग भरत ती गावी निघुन गेली... आई-वडिलांजवळ. काही दिवस त्रास झाला. शेवटी प्रेम जे केलं होतं. पण त्याने मात्र ते टाईमपास समजून सोडून दिले होते एका प्रमोशनसाठी. स्वतःला सावरत एक वर्ष कधी गेलं कळलंच नाही. 


काही कारणास्तव पुन्हा मुंबईत येणं झालं. त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. पण स्वतःच्या मनावर ताबा ठेवत तिने इकडे ज्यासाठी आलोत ते करून निघू असं मनात ठरवलं. 


स्वतःच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी आज ती परत एकदा मुंबईत आलेली. पण लग्नात परत त्यांची भेट झाली. आधीसारखं त्याच्या चेहऱ्यावर ते तेज नव्हतं. तो टापटीपपणाही गेलेला. तिला बघताच तो शुध्दीत आला. भेटायची इच्छा होत असल्याने एका संधीची वाट बघत असतानाच त्याला ती मिळाली. ती समोरून येत होती. त्याने तिला बाजूला घेत तिची तो माफी मागू लागला. भेटण्यासाठी होत जोडू लागला. मग तिने भेटायचं ठरवलं. "उद्या दहा वाजता त्याच कॅफेमध्ये", सांगत ती निघून गेली.


आजही तोच लवकर येऊन तिची वाट पाहत होता. ती आली पण आधीसारखी स्माईल नव्हती. त्याने मिठी मारण्यासाठी म्हणून पुढे येताच तिने फक्त हात पुढे केला. ती बसताच तिने वेटरला कॉफीची ऑर्डर दिली. तो बोलू लागला... मी खरंच खूप मोठी चुक केली गं... तुझ्यासारख्या माझ्यावर खरं प्रेम करणाऱ्या मुलीला सोडून मी त्या बॉसच्या मुलीसोबत लग्न केलं. आधी चांगली वागायची ती, पण नंतर नंतर तिच्यातला सायकोपणा बाहेर येऊ लागला. मला कोणासोबत बघितलं की, घरी गेल्यावर जेवायला द्यायची नाही. माझा मोबाईल तर रोज चेक करते. रात्रीची झोप नाही. अशाने माझी तब्येत बिघडत आहे. मीच चुकलो... तुला सोडून त्या मूर्ख मुलीशी लग्न केलं. माफ करशील का गं मला..." त्याने आपली मान खाली झुकवली. 


"आपण परत एकत्र येऊ. मी तुझ्यावर आधीसारखं, त्याहून जास्त प्रेम करेन." अशी वचनं तो तिला देत होता. 


पण तिच्या चेहऱ्यावर फक्त एक स्माईल होती. वाफाळलेली कॉफी समोर होती. तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि एकदा कॉफीकडे आणि ती बोलू लागली, "जसं एखादी काच तुटल्यावर ती जोडता येत नाही ना, तसंच आपलं हे नातं ही पुन्हा जोडणं मुश्कील आहे." आणि ती तिथून उठून निघून गेली. 


तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बराच वेळ बघत राहिला. कितीतरी वेळ तो तसाच बघत होता. स्वतःच्या नशिबाला कोसत...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama