संवेदनशिलता
संवेदनशिलता


जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे .मी इ.चौथीचे स्काॅलरशीपचे वर्ग घेत असे,पण घर शाळेजवळ असल्याने मी मुलांना डिसेंबर ते मार्च परीक्षा होईपर्यंत घरी बोलवायची ५ ते ८ रोज एक पेपर सोडवून घेवून त्याची चर्चा करून तपासणे असे काम मी करत असे.
मी अरण्येश्वर विद्या मंदीर मधे पण नू.म.वि.चा एक विद्यार्थी माझ्याकडे येत असे.त्याचे पालक त्याच्या वर्तणुकीला खूप वैतागले होते.त्यांना कोणीतरी माझा पत्ता दिला.त्या मुलाचे नाव सोहम .सोहमचे पालक मला भेटायला आले .आणि थोडक्यात सोहमचे वागणे,बोलणे,मला सांगितले तो ही स्काॅलरशीपला बसलेला होता.आणि त्याला शिकवण्याची विनंती त्यांनी मला केली.मी आव्हान स्विकारले .तो फक्त आठवड्यातून तीनच दिवस यायचा.पण माझी मुलं व त्याची वेळ मी एकत्र केली नाही.त्याला पूर्ण दोन तास स्वतंत्र वेळ दिला.
एका रविवारी सोहम छान आवरून घरी आला, आम्ही दोघेही छान सतरंजी अंथरूण त्यावर बसलो. त्याच्या शाळेची,मित्रांची चौकशी केली त्याला जरा बोलते केले. आधीच तो फारच धीट होता. त्याच्या मनाची चलबिचल थांबवली आणि मी माझ्या बुद्धिमत्ता या विषयाकडे वळाले. सोहमला विचारले "बाळा, एक मांजराचे पिलू आहे, त्याला लागलेय त्याला नीट चालता येत नाही आणि पिलाला रस्ता ओलांडायचा आहे तू काय करशील?"
सोहम म्हणाला "मी त्याला दगड मारेल आणि त्याची मजा बघत बसेल"
मी शांत बसून त्याला दुसरा प्रश्न विचारला "सोहम, एक आंधळे बाबा आहेत, त्यांना रस्ता ओडायचा तर , तू काय करशील "
सोहम म्हणाला" बाई, मी त्यांची मजा बघेन"
आता मात्र मी
जरा आश्चर्यचकीत झाले. मनात म्हटले म्हणूनच आईबाबा वैतागलेले दिसतात याच्यावर...
मी त्याला जवळ घेतले.त्याला छोटीशी कथा सांगितली.जर सोहमला लागलय त्याला चालता येईना तर त्याच्या मित्रांनी त्याचा हात धरून त्याच्या घरी त्याला व्यवस्थित सोडले.
तसेच आंधळ्या आजोबांना त्याच्याच मित्रांनी रस्ता ओलांडायला मदत केली ..आता सांग तुला काय वाटते.
सोहम म्हणाला "बाई मला लागल्यावर मित्रांनी मदत करायलाच हवी. पण आंधळ्या आजोबांनाही त्यांनी मदत केली कशाला करायची मदत त्यांना"?
मग मी समजून सांगितले "बाळा, मनात एकमेकांबद्दल आदर हवा, संवेदना हवी, एकमेकांचे दुःख समजून घेण्यासाठी तसे कोमल मनही हवे माणसाजवळ.. तसे तुझे आहे का ,विचार कर या गोष्टीवर." एवढे चालू असतानाच त्याची आई आली आणि सोहमचा तास संपला.
दुसर्या दिवशी सोहम आला तो खूप आनंदी अन प्रसन्न दिसत होता.
त्याच्या आईने मला बाहेर बोलावले व सांगितले "बाई, एका दिवसात का जादूची कांडी फिरवलीत सोहमवर ,तो त्याच्या आजी,आजोबांबरोबर खूप छान बोलत होता. आम्हांला खूप छान वाटले".
मी खूश झाले. घरात जावून कालचेच प्रश्न मी परत सोहमला विचारले असता त्याने खालील उत्तरे दिली. १)मी मांजराला हातात घेईन व रस्त्यापलीकडे ठेवीन. २)आंधळ्या आजोबांच्या हाताला धरून त्यांना रस्ता ओलांडायला मदत करीन.
सोहमकडून ही उत्तरे ऐकून मी धन्य धन्य झाले आणि सोहममधे संवेदनशिलता जागृत करण्यास यशस्वी ठरले.
आज हा मुलगा PSI आहे. मला अभिमान आहे सोहमचा.....
अशीच मुले माझ्याकडून घडावीत ही सदिच्छा आहे.