दिवाळी का दिवाळं सण
दिवाळी का दिवाळं सण
हो तुम्ही वाचलं तेच बरोबर बर का! दिवाळी आणि दिवाळं यामध्ये अगदी एका वेलांटीचा फरक. पण अर्थ किती वेगळा होतो पहा ना!
दिवाळी म्हटले की दिव्यांचा झगमगाट, विद्युत रोषणाई, दिवाळी पदार्थांचा घमघमाट, घरासमोरील उत्कृष्ट रांगोळी, घरातल्या लोकांची खरेदीसाठी चाललेली घाई, नवे कपडे, नवीन उपकरणे, नव्या गाड्या हे सर्व डोळ्यासमोर येते. कारण आता हे सर्व आपण अनुभवत आहोत. खरोखरच पारंपारिक दिवाळीचे विस्मरण होत चालले आहे. आता सध्याची दिवाळी याच क्षणांमध्ये दिमाखात वावरते आहे.हो! हो! दिमाखातच दिवाळी येते आणि दिवाळं काढून जाते. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याचे महत्त्वाचे कारण असे आहे की, जे आर्थिकदृष्ट्या खूप सधन आहेत ते भरपूर रोषणाई करतात. दिव्यांची उत्तम आरास करतात, कपडा लत्ता यावर हजारो रुपये खर्च करतात. जागा खरेदी करतात. नवीन गाड्या घेतल्या जातात.फराळ तर रोजच असतो यांच्या घरी असे म्हटले तरी चालेल. तर अशी ही श्रीमंती थाटातील झगमगटातील दिवाळी आपण नेहमीच पाहतो. पैशाची अजिबात चिंता नसणारी ही लोकं...
आता जरा आपण मध्यमवर्गीयांचे बघूया... मध्यमवर्ग आपल्या वर्तमान काळात जगतातच पण भविष्य काळाची चिंता थोडीफार करायलाच लागते. भविष्यकाळातील येणाऱ्या अडीअडचणींसाठी थोडा पैसा हे राखून ठेवतात. मग यांची दिवाळी कशी बरं! यांची ही दिवाळी सुध्दा या दीप सणांचा लखलखाट असतो बर का.. घरात परंपरेनुसार होणारे खाद्यपदार्थ बऱ्यापैकी घरीचं बनवले जातात. अगदीच एखाद्या ठिकाणी किंवा तिथे नोकरदार वर्ग दोघेही नवरा बायको नोकरी करतात अशा ठिकाणी मात्र फराळाचे जिन्नस बाहेरून आणले जातात. पण ज्या घरामध्ये आजी आजोबा किंवा आई-वडील आहेत म्हणजेच संपूर्ण कुटुंब एकत्र राहत आहे त्या कुटुंबामध्ये थोडे तरी पदार्थ घरगुती केलेच जातात कारण तिथे मोठ्या माणसांचा आदर आणि त्यांच्या शब्दांना किंमत म्हणून सुद्धा काही घरगुती पदार्थ बनवले जातात. कमी प्रमाणात का होईना फक्त लाडू, करंजी का होईना पण ते बनवले जातात. काही ठिकाणी मोठ्या गाड्या घेण्याची स्वप्न असतात. घरात इलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्याची स्वप्न असतात. मग लक्ष्मीपूजन हे साडेतीन मुहूर्तांपैकी एक उत्तम मुहूर्त म्हणून त्या दिवशी त्या मुहूर्तावर हे खरेदी केले जाते. मग त्यासाठी थोडाफार कर्जाचा बोजा उचलावा लागतो. सगळंच काही ऑन कॅश घेता येत नाही. अशावेळी हल्ली बाजारामध्ये अनेक बँका अशा आहेत की ते आपल्याला कर्ज देत आहेत. व अशा बँकांकडून कर्ज घेतले जाते आणि दिवाळी उत्तम साजरी केली जाते. अशावेळी चेहरा आनंदाने प्रफुल्लित होतो. पण याचे पुढचे हप्ते आपण ठरवून घेतले असतील आणि एखादा जरी बाउन्स झाला तरीसुद्धा आपल्याला त्या हप्त्यामागे आणखी काही रक्कम द्यावी लागते. त्यावेळी मात्र आपला दिवाळं निघतं असंच वाटतं. बऱ्याचदा असं होतं की पैसे आपल्याकडे असून सुद्धा वेळेअभावी किंवा काही कारणास्तव त्या बँकेमध्ये आपण रक्कम शिल्लक ठेवू शकलो नाही त्या वेळेला मात्र हा भुर्दंड सोसावा लागतो.
आता जरा आपण फूटपाथ वरील किंवा झोपडीत राहणाऱ्या दीनदुबळ्यांची दिवाळी पाहूया..
एक तर राहायला घर नीट नसते.
घर आहे तर रोजच नीट खायला मिळत नाही. कपडा लत्ता पण धड मिळत नाही. मुलं शाळेत शिकू शकत नाहीत. अशा अनेक अडचणी यांच्यासमोर असतात. पण दिवाळी सण किंवा कोणताही भारतीय सण घेतला तर तो साजरा करतातच. प्रत्येकाच्या खिशाला परवडेल असा सण साजरा केला जातो. काही लोक आपल्या झोपडीमध्ये एक तरी दिवा लावून आपली झोपडी उजळवतील. कपड्यासाठी पैसा साठवला असेल तर कपडा लत्त्ता खरेदी करतील खूप भारी नाही पण कपडा खरेदी करतील. लक्ष्मीपूजन करतील. अगदीच कोणाकडे काही नसेल तर पैसे उसनेही घेतले जातात आणि ह्या उसने आणलेल्या पैशातून घरात दिवाळी साजरी केली जाते अगदी कमी पैशातली दिवाळी असते पण त्यात त्यांना तो आनंद, समाधान मिळत असतो. रस्त्यावरील आतिषबाजी बघून यांची मुलं समाधानी दिसतात.टिकल्या, लवंगी वाजवतात. आणि म्हणून मी आजच्या या लेखाला शीर्षक दिले आहे "दिवाळी की दिवाळं" दिवाळी येते वर्षातून एकदाच परंतु आपल्या नाहक खर्चामुळे आपण तिथे हवालदिल होतो. मुलांचे लाड पुरवण्यासाठी कर्ज काढतो. प्रत्येक जण कुटुंबातील व्यक्तीसाठी काही न काही करतो. पण करतो हे नक्की.
आता पूर्वीसारखी पारंपरिक दिवाळी अगदी मोजक्या घरामध्ये राहिलेली आहे. देवा सणाचे वैशिष्ट्य काय आहे.. तर दिवा सणाला जे पदार्थ केले जातात ते पदार्थ आपल्या शरीराला स्निग्धता प्राप्त करून देतात. दिवाळी ही अँड थंडीमध्ये येते त्यामुळे थंडीने आपली त्वचा रुक्ष होते. अशावेळी त्वचेला मॉलिश ची गरज असते म्हणून आपण उटण लावतो आणि तेलाने मॉलिश करतो.
आपल्या भारतीय सणाला प्रत्येक सणाची परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार, ऋतुमानासारखे प्रत्येक घरांमध्ये जेवणाचे पदार्थ बनवले जातात.
ज्या घरात एकत्र कुटुंब पद्धती आहे त्या घरात अजूनही दिवाळी सण हा परंपरेनुसार साजरा केला जातो. आजकाल हे मुलं तंत्रज्ञान क्षेत्रात वावरत आहेत. त्यांना झोपायला उशीर होतो त्यामुळे उठायला उशीर होतो. मग दिवाळी काय आणि इतर दिवस काय सारखेच असतात.
अनाथांच्या घरी मात्र हल्ली मदतीचा ओघ वाढलेला आहे. आणि त्यांचीही दिवाळी अतिशय सुरेख अशी होते. अशा अनाथालयाला मी भेटी दिलेल्या आहेत त्याचेच हे केलेले निरीक्षण सांगत आहे.
जे अनुभवते जे पाहते तेच मी लिहिते.
पूर्वीसारखे परंपरेचे वारे वाहू द्या
रे
घराघरात दिवाळी सण साजरा करा रे
आनंदाचे घरात वातावरण राहू द्या रे
दीपोत्सव सण एकत्र मिळून साजरा करा रे....
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा -पुणे*
*मो. नं. 9823582116*
