संजु इन रेड लाईट एरिया
संजु इन रेड लाईट एरिया
कथेचा विषयही तसा गंभीर 'रेड लाईट एरिया.' सुखापेक्षा दुःखाची कथा. असहनीय व्यथा. अजून बरंच काही. बुद्धीला झिणझिण्या आणणारे अनुभव. बरेचसे ऐकीव.
संजू रात्रीचा कुठलासा हिंदी डब साऊथ इंडियन मुव्ही बघून नुकताच थिएटरबाहेर पडलेला. जवळच सबवेजवळ एका जुनाट हाॅटेल कम् बारमध्ये एक ढोसावी, असं मनात येत होतं. पण तो विचार त्याने रद्द केला. अचानक त्याचं लक्ष काही आकर्षक हावभाव करणार्या बायकांकडे गेलं. त्याला माहीत होतं. त्या का खुणावत आहेत. आधीच B ग्रेड मुव्ही बघून त्याच्या कानाच्या पाळ्या गरम झाल्या होत्या. शेवटी त्याने ती चुकीची गल्ली पकडली. नवखे चेहरे अनुभवाने हाताळणार्या नारायणीने त्याला हळुच विचारले.
तसा तो आधी नाही
म्हणाला. पण मनात ती जन्नत पाहायची होती. आधी घाबरला, मग तिच्या मागोमाग गेला. पहिलाच अनुभव. थोडं विचित्र पण वेगळं वाटलं. पण पुढे काय होणार हे त्याला माहित नव्हतं.
बाहेर काहीतरी गडबड झाली. आपले कपडे आवरत असताना एक कानाखाली पडली. शाळेत पी.टी.च्या सरांनी वाजवलेली एक आणि आता ही दुसरी.
रात्री साडेबारा वाजता पोलिसांसोबत पंधरा जणांची वरात अंधेरी पोलिस स्टेशनला पोहोचली.
पहिल्यांदा संजू पो. स्टेशनात. आरडाओरड, ओकार्या, गयावया, पोलिसांची उलटतपासणीत रडतरडत 50 रुपये टेकवून, घरी काही सांगू नका, अशी विनवणी करुन रात्री दीड वाजता तो घरी पोहोचला. काहीच झालं नाही, असं भासवून झोपी गेला. एक विचित्र अनुभव घेऊन.