पाऊस .....
पाऊस .....
पाऊस मला आवडतो. तिला आवडतो. माझ्यापेक्ष्या तिला जास्त आवडतो. ती पाऊस एंजॉय करते. मी मात्र भिजून साजरा करतो. मी पाऊस झेलतो. ती पाऊस पिते. मी पागोळ्या पाहत असतो. ती सरीवर नाचत असते. तिला पाऊस आवडतो. खूप आवडतो. मी तिला कधी छत्री किंवा रेनकोट घातलेला पाहिले नाही. सोसाट्याचा वारा आला म्हणून आडोशाला उभे राहिलेले पाहिले नाही. भिजलेल्या रस्त्यावर ओलाचिंब होताना मी पाहिलंय. येणारे जाणारे तिला वेडी म्हणतील. मी तिला निसर्गवेडी म्हणतो. सौंदर्यवेडी.
"तुला पाऊस एवढा आवडतो ?" मी विचारलं
"हो" ती म्हणाली.
मग तिने दोन्ही हात पसरले. आकाशाकडे वर नेले. थेंब झेलले. डोळे मिश्किल केले. ओठांचा चंबू केला आणि पाऊस प्यायली.
"तू, चातक आहेस का" मी विचारले.
ती हसली. पुन्हा पाऊस झेलू लागली. नाचू लागली. थुई थुई नाचू लागली. वाऱ्याबरोबर फेर धरू लागली.
एकदा मी तिला नदीकाठी बसलेली पाहिले.
"काय झालं, गप्प का ?"
"असंच "
बोलण्यात कुठेही गोंधळ नाही. वागण्यात वेंधळेपण नाही. सरळ स्पष्ट वागणे. काचेसारखे आरपार. कुठेही अवगुणांचा ओरखडा नाही.
पण आज काय झाले होते तिला. ती गप्प होती. जमिनीवर बोटाने काहीतरी रेखाटत होती.
ती विचारात पडली, की असं वाटत निसर्ग बोलायचं थांबलाय. झरा वाहायचा थांबायला. वारा वाहायचा थांबलाय.
तू गप्प नको बसूस. बघ चिवचिवाट कसा थांबलाय.
कुठे गेली वाऱ्याची शीळ. तो ससुल्या पण आज शांत आहे. हरीण घाबरून टकमक बघतेय.
अरे, वानरमहाराज तुम्ही उद्या मारणं का थांबवलात.
मीही विचारात पडलो. काय बोलू तिच्याशी. ही वेडी कुठे हरवली.
मी शांत राहिलो. सूर्य मावळला. मी परतीच्या वाटेला लागलो.
ती तिथे किती वेळ होती मला माहीत नाही.
परवा ती अचानक भेटली
"त्या दिवशी मला सोडून निघून गेलास, ना "
काहीश्या घुश्यातच ती बोलली
मी ओशाळलो. आता हिला काय उत्तर देऊ
मी मौन राहणंच पसंत केलं
ती पुन्हा जमिनीकडे बघू लागली. बोटाने रेघोट्या मारू लागली
मीही बाजूला बसलो. तिच्या मानवर करण्याची वाट बघू लागलो
काय झालं. का बसलास. मी पुन्हा गप्प. हिची अपेक्षा तरी काय
गेलो तर नाराज आणि थांबलो तर प्रश्न.
तू मगाशी म्हणालीस ना, मागे सोडून गेलास. तू स्वतःत गुंतली होतीस. आताही तसंच झालं, म्हणून थांबलो. मग ती थोडंसं हसली. तिचे डोळे हसले. मन हसलं. तिच्या देहबोलीवरून जाणवलं.
ती उठली. मीही उठलो.
कुठे चालीस. निघतेस.
हो
का
असंच
तिचं उत्तर अपेक्षित नव्हतं. असंच म्हणजे काय
पण मी विचारलं नाही. मनातच ठेवलं.