चविष्ट
चविष्ट


लॅपटाॅपची स्क्रीन डोळ्यांना त्रास देत होती. डोळ्यांना थंडावा मिळणं आवश्यक होतं. नेटवर्क डिस्टर्बन्सच्या कटकटीमुळे त्याचं कामात मन लागत नव्हतं. बाॅसचं प्रेशर डोक्याचं भजं करत होतं. तिच्या गोड स्माईलमुळे निदान तो दिवसाचे ८-१0 तास आरामात काढत होता. काम असेल तेव्हा दुपारचं जेवण उशीरा व्हायचं. या सगळ्या गोष्टीची नकळत वेळ ठरली होती. तशी तिचीही वेळ ठरली होती. तिचंही वय आणि त्याचंही वय प्रेम करण्याचं नव्हतं. पण असं म्हणतात प्रेम कोणाशीही कोणत्याही वयात होऊ शकतं. आकर्षण म्हटलं तर ती एक पायरी खाली उतरल्यासारखं होईल. चाळीशीपार गेल्यावर एक चाळवलेली भावनादेखील म्हणता येणार नाही. पण तिला पाहण्यात सुखद अनुभव मात्र तो रोज घेत होता. प्रापंचिक जीवनामध्ये असं वाटणं कितपत योग्य आहे?
मागील काही दिवसापासून ती साधं बोलायचंपण टाळत होती. कुठेतरी तिला ते अयोग्य वाटलं असावं. ज्या वयात तिची मुलगी प्रेमात पडू शकते, त्या वयात हे वाटणं म्हणजे प्रेम असं मुळीच नाही. त्याला या गोष्टीचं एवढं अप्रूप वाटलं नाही. याला कुटुंब आहे की नाही असा प्रश्न सुज्ञ वाचकास पडला असणारच. दोन लहान जाणती मुलं आणि आपल्या विश्वात रमणारी सहचारिणी. सोशल मिडीयाचं भारी वेड. जर नवरा-बायकोत सुसंवाद नसेल तर सांसारिक नाव गंटागळ्या खातच राहणार. त्यामुळे निर्माण होणारी पोकळी अशा गोष्टी शोधत राहणारच.