डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational

4.1  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational

स्मार्ट आई

स्मार्ट आई

6 mins
200


            वसुंधरा, आज सत्कार होता तीचा एका महिला संघटनेतर्फे*स्मार्ट आई* या संकल्पने च्या अंतर्गत.कारण यंदा तिची मुलगी दहावीला मुलींमधून पहिली मेरिट आलेली आणि मुलाचा सुद्धा नामांकित आयआयटी कॉलेज मध्ये  प्रवेश झालेला. सोबतच घर आणि कोचिंग क्लासेस चा व्याप सांभाळून सुद्धा मुलांकडे नीट लक्ष दिल्याने मुलांनी त्यांच्या यशाचं श्रेय आईला दिलेलं.हे सगळं औचित्य साधून च आयोजकांनी आजच्या या कार्यक्रमाला वसुला बोलवलेलं.


              स्वागत समारंभ ,प्रास्ताविक वगैरे जुजबी सारे आटोपले अन् मग वसु बोलायला उभी राहिली." मैत्रिणींनो आज तुम्ही जीचा *स्मार्ट आई* म्हणून सत्कार केलात न ती ही वसु सुद्धा 4-5 वर्षाआधी एक सामान्य स्त्री म्हणून च गणली गेली होती. घर ,संसार ,मुलं अन् कामं यात भरडली गेलेली सामान्य स्त्री! पण एका क्षुल्लक घटनेने तिच्यात अमुलाग्र परिवर्तन घडवून आणले .आज त्या वसुचीच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे.


            मी वसुंधरा आनंद जाधव, पूर्वाश्रमीची वसुंधरा अरविंद शिंदे! अरविंद शिंदे आणि मालती शिंदे यांना असलेल्या तिन्ही मुलींमधली मी थोरली लेक. मी वसुंधरा, माझ्या पाठची प्रवरा अन् सर्वात धाकटी अवनी. माझ्यात आणि प्रवरा मधे अगदी दोन वर्षांचे अंतर .आधी आम्ही दोघीच ,पण आईच्या मुलाच्या हौसेने उचल खाल्ली अन् तब्बल बारा वर्षांनी अवनी चा जन्म झाला. आईला कधी कधी मुलगा नसल्याची खंत वाटायची पण बाबांच्या वागण्यातून तसे कधीच जाणवले नाही. बाबांनी आम्हाला अगदी लहानपणापासून च मुलांप्रमाणे निर्भिड पणें वागवले. आम्ही जात्याच हुशार असल्याने मी MSC maths, BEd झाली. तर प्रवरा सुद्धा BSC नंतर MBA करून नोकरीला लागली. अवनी तेव्हा बरीच लहान होती. शिक्षण आटोपले अन् आनंद जाधव यांचे स्थळ चालून आले. इंजिनिअर मुलगा, आई वडील आणि एक विवाहीत बहीण . सासरे रिटायर्ड हेडमास्तर. घरी सगळी सुबत्ता. दोन्ही कडून सगळे ऑल वेल असल्याने लवकरच योग्य मुहूर्त पाहून आमचे लग्न झाले अन् मी सौ वसुंधरा आनंद जाधव झाले.

            

            लग्नानंतर नव्याचे नवलाईचे दिवस सरले अन् मग एक दिवस मी नवऱ्याजवळ नोकरीचा विषय काढला,त्याने घरात जेवतांना सासू सासरे यांना या विषयाची कल्पना दिली. घरी नोकरीला तसा कुणाचाच विरोध नव्हता पण अगदीच जास्त ताण पडणारी नोकरी नको असा एकंदरीत सासू बाईंचा सूर होता. त्यादृष्टीने मग प्रयत्न सुरू झाले. पण तितक्यात च घरी नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागली अन् आता माझ्या नोकरीच्या शोध मोहिमेला नऊ महिन्यांची सक्तीची विश्रांती भेटली. नऊ महिन्यांनी धवल चा जन्म झाला अन् त्याच्या संगोपनात दिवस अपुरा पडू लागला. मग सासूबाईंची अग अजून एक उरकू दे मग तू तुझ्या कामाला मोकळी असा प्रेमळ सल्ला. मला पण तो पटला अन् पाठोपाठ दोन वर्षात स्वरा चा जन्म. तिच्या जन्मानंतर खूप खुश होते सगळे कारण एक मुलगा,एक मुलगी कुटुंबाला पूर्णत्व आले होते.


             धवल बालपणापासूनच समजदार होता. त्यामुळे त्याच्या संगोपनाचा मला कधी त्रास वाटला नाही पण स्वरा मात्र अतिशय हट्टी अन् किरकिरी! छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्रागा करणारी. मी तर तिला सदैव डोळ्यापुढे च लागायची. दिसली नाही की हिचे भोकाड पसरणे सुरू! तिच्या अश्या स्वभावापायी तिला कोणीच सांभाळायला तयार होत नसत. त्यातच मधात सासुबाईंचे आजारपण जरा जास्तच वाढले अन् मग त्यांची घरातली मदत तर कमीच झाली उलट त्यांचीही काळजी मलाच घ्यावी लागायची. या सगळ्या व्यस्ततेत मला कधी नोकरी करायची इच्छा होती हेच पार मी विसरून गेली. माहेरी गेली की बाबा मात्र नेहमी म्हणायचे, "वसु एवढी शिकलीस ग पण काही उपयोग नाही बघ तुझ्या शिक्षणाचा." पाठची प्रवरा नोकरी करायची स्वाभिमानाने सगळ्यांसाठी काही ना काही आणायची तेव्हा मन थोडे खट्टू व्हायचे पण चला आपल्या शिक्षणाचा आपल्या मुलांना उपयोग होतोय ना हा विचार करून मी स्वतः चे समाधान मानून घ्यायचे. 


              दोघंही मुलं अतिशय हुशार होती. मी सुद्धा त्या दोघांवर च आपलं पूर्ण शिक्षण उधळून दिलं होतं. त्यांचा गृहपाठ घेणं, अभ्यास घेणं आधीच त्यांची त्या त्या विषयांची पूर्व तयारी करून घेणं. सरावासाठी पेपर्स काढणे अगदी मनापासून करायचे. मुलंसुद्धा माझ्या मेहनतीला उत्तम प्रतिसाद द्यायचे .मला तेच भरून पावल्या सारखं वाटायचं. पण कालांतराने मुलं मोठी होत गेली. परेंट मीट ला येणाऱ्या स्टायलिश आया, त्यांचे महागडे मोबाईल्स यासमोर साधी साडी नेसणारी,साधी राहणारी ,साधा मोबाईल वापरणारी आई त्यांना अजागळ वाटू लागली. स्वरा च्या बोलण्यातून वारंवार या गोष्टीचे वैषम्य जाणवायचे. तिनेच बाबांच्या मागे लागून माझ्या साठी स्मार्ट फोन घेऊन मागितला. पण तो सुद्धा माझ्याजवळ कमी आणि मुलांजवळच जास्त दिसू लागला.नवरा सुद्धा होणारी आर्थिक ओढाताण,कामाचा व्याप यावरून चिडचिड करायचा. "तू घरीच असतेस तुला काय कळेल यातले हा वरून दिलेला शेरा!"


               लहान बहीण अवनीसुद्धा आता इंजिनिअर झाली होती. एका चांगल्या फर्म मधे नोकरी करत होती. एक दिवस अचानक ती घरी आली तेव्हा स्वराचे मला घालून पाडून बोलणे सुरूच होते." किती ग गावंढळ तू, काय माहित कधी जमेल तुला स्मार्ट मम्मी बनणे?" तिला माझी  ही अवहेलना बघवली नाही. तिनी प्रथम स्वराला थांबवले. मुलांना आणि नवऱ्याला आठ दिवसांचा अवधी मागितला अन् मला बळेच माहेरी घेऊन गेली.


            सर्वप्रथम तिनी माझा आत्मविश्वास जागवला. मला घेऊन काही कोचिंग क्लासेस पालथे घातले. एका व्यवस्थित कोचिंग क्लास मधे माझी tutor म्हणून बोलणी करून घेतली. पार्लर मधे जाऊन माझ्या अतिशय लांब केसांना पद्धतशीर कातरी लावली. काळानुरूप आवश्यक असे स्टायलिश कपडे खरेदी करून दिले. स्मार्ट फोन ,त्यातील ज्ञानाचे भांडार,ते हाताळण्याचे तंत्र तिनी मला अवघ्या 2-3 दिवसात समजावून दिले. स्वतः ची स्पेस जपायची असते, स्वतः च्या आवडीनिवडी जपायच्या असतात. आपण घरासाठी कितीही झिजलो तरी घरी त्याची काडीचीही किंमत नसते हा नवा पाठ माझ्या बहिणीने मला दिला. अन् स्वतः च्या स्वाभिमानापुरते अर्थाजन गरजेचे आहे हे मलाही पटले. अन् त्या क्षणाने माझा make over केला.


           मी आतमधून जी होते, तीच होते. माझे ज्ञान तेच होते.फक्त या सगळ्याला आज पुन्हा एकदा घासून पुसून लख्ख केले गेले होते. स्वतः कडे बघण्याच्या नव्या दृष्टिकोनाचा चष्मा त्यावर चढवला गेला होता. बदलले होते माझे फक्त बाह्यरूप तेही काळानुरूप. ज्याने माझ्या मुळच्याच दिसण्याला चारचांद लागले होते. अन् एक नवा आत्मविश्वास मला देऊन गेले होते.    मी आठ दिवसांनी बहिणीसोबत घरी गेले तेव्हा घरचे मला ओळखू शकले नव्हते. स्टायलिश कुर्ती,जीन्स अन् गॉगल घातलेली मी त्यांना मावशीची च कुणी मैत्रीण वाटले होते. नवरा सुद्धा माझे हे रूप पाहून चाट पडला होता अन् लेकीची सुद्धा बोलती बंद झाली होती.


           घरी गेल्यावर मी प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कामाची वाटणी करून दिली. उद्यापासून मी फक्त स्वयंपाक करणार ,प्रत्येकाने आपापले डबे आणि सामान स्वतः घ्यायचं हे जाहीर करून टाकले. मी जाणार असलेल्या कोचिंग क्लास ची माहिती दिली. काही दिवसातच माझ्या शिकवण्याच्या पद्धतीने मी विद्यार्थ्यांना आवडू लागले. नावाजलेल्या क्लासेस मधून मग मला बोलावणे येऊ लागले. मजल दरमजल मी यशाच्या पायऱ्या चढत गेले. काही दिवसातच maths आणि फिजिक्स च्या शिकवणी साठी माझे नाव कर्णोपकर्णी झाले.अन् मग त्यातूनच प्रेरणा घेऊन माझ्या एका बायोलॉजी अन् केमिस्ट्री चांगल्या मैत्रिणीला सोबत घेऊन स्वतः चे कोचिंग क्लासेस सुरू केले. शिकवण्याची उत्तम पद्धती, मुलांवर घेतलेली प्रांजळ मेहनत,जे जे उत्तम देता येईल ते देण्याची तयारी या साऱ्या गोष्टींनी काही दिवसांतच कोचिंग क्लासेस ला उत्तम प्रतिसाद मिळू लागला. अतिशय गरीब अन् हुशार विद्यार्थ्यांना मी विनामूल्य मार्गदर्शन करू लागले अन् या सगळ्याचा सकारात्मक परिणाम मला मिळाला.माझ्या ज्ञानाचा उपयोग आधी ही माझ्या मुलांना व्हायचाच आता तो त्यांच्या सोबतच इतरही मुलांना होऊ लागला. इतर मुलांसोबत माझीही मुलं तिथे घडू लागली अन् जात्याच हुशार असलेल्या माझ्या मुलांनी हे यश संपादन केलं अन् मी खऱ्या अर्थाने *स्मार्ट आई* ठरले खास करून माझ्या मुलांच्या नजरेत.


             खरं तर प्रत्येक मुलाला आम्ही सारखेच शिकवतो पण प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार घेतो. अन् घर मी आधीही बघायचे आता पण बघतेच पण माझ्या काम करण्याने संपूर्ण घरादाराला एक शिस्त लागली. प्रत्येक जण स्वावलंबन शिकले,आटोपशीर काम करायची सवय लागली. स्वतः ला स्पेस द्यायची असते हे कळले अन् आपले छंद जोपासत मनाचा आनंद जपणेही कळले.अन् अशा तऱ्हेने मी म्हणजे ही वसुंधरा एक स्मार्ट आई बनले.


           मैत्रिणींनो आज मी तुम्हाला एकच सल्ला देईन. अर्थार्जन करायचे की नाही ही गोष्ट दुय्यम आहे.घर तुमचेच आहे.प्रत्येकच स्त्री घरासाठी झीजते पण त्यातही स्वतः साठी वेळ काढा,स्वतः ला आनंद वाटेल अशा गोष्टीमध्ये मन रमवा,स्वतः चे छंद जोपासा ,काळाबरोबर अपडेट राहणे शिका, स्वतः मधील ' ती ' ला जिवंत ठेवा तीच मग तुम्हाला अगदी *स्मार्ट* बनवेल." एवढे बोलून वसुंधरा थांबली.अन् मग अतिशय शांत अशा हॉलमधे फक्त टाळ्यांचा कडकडाट तेवढा ऐकू येऊ लागला.  


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational