श्रवणधारा - भाग 4
श्रवणधारा - भाग 4
फॉरमॅलिटी वगैरे पूर्ण करून झाल्या. तिघं आणि त्यांच्यासोबत मॅनेजर असे चौघं ऑफिसच्या बाहेर आले. मॅनेजर त्या तरुण दांपत्याला आत्मविश्वासाने म्हणाले, “तुम्ही काही काळजी करू नका. काकू इथं आनंदात आणि सुरक्षित राहतील. आम्ही सर्वजण चोवीस तास इथेच असतो.”
तरुणाने त्याच्या आईच्या पाया पडल्या आणि म्हटला, “काळजी घे आणि काही लागलं तर लगेच फोन कर. मी लवकरात लवकर व्यवस्था करेल.”
“हो, सांगेन मी.” तिच्या डोळ्यातले अश्रु कसेतरी लपवत ती माऊली म्हणाली. तसं बघायला गेलं तर त्या आईला तिच्या मुलाची आणि सुनेची गरज होती. तिला ते दोघं हवे होते. पण तिचा मुलगा आणि सून भौतिक सुखाच्या मागे लागून मानसिक सुख न दिसण्याइतके आंधळे झाले होते.
नवर्याने पाया पडले म्हणून नाईलाजाने सुनाबाईला सुद्धा पाया पडावे लागले. मग तिसुद्धा बळेच वाकली.
“चल आई, येतो आम्ही. लवकर निघालो तर लवकर पोहोचू. काळजी घे.” असं म्हणून तो निघलासुद्धा. त्याच्या मागे सुनाबाईसुद्धा पतीधर्माचे पालन करत निघाली. दोघं गाडीजवळ आले. दर उघडण्याच्या आधी एकदा त्यांच्या आईकडे पहिलं, तिच्याकडे बघून हात हलवला आणि गाडीत बसले. पाठमोर्या जाणार्या गाडीकडे त्यांची आई बघतच राहिली. जसजशी गाडी पुढे जात होती तसं तिला डोळ्यातल्या खार्या पाण्यामुळे धूसर दिसू लागलं. धुराळा उडवत जाणार्या गाडीकडे बघत असताना गंगा यमुना वाहायला केव्हा सुरुवात झाली, हे तिचं तिलाच कळलं नाही.
“त्याने अभिनेता बनायला हवं. उत्तम नट होईल तो.” जोशीकाका महाजन काकांकडे बघत म्हणाले.
“कुणाची गोष्ट करतोयस तू?” महाजन काकांनी विचारलं.
“कुणाची काय, आता त्याच्या आईचे पाया पडून गेला ना, तो मुलगा. भारी अॅक्टिंग केली मुलाने. वृद्धाश्रमात सोडायला आलेल्या आईचे पाया पडून सांगत होता, काळजी घे म्हणे आणि सुनाबाई तर काय, नवर्यापेक्षा सरस नटी हो.” जोशीकाका चढया आवाजात बोलत होते.
त्यांचं बोलणं ऐकून महाजन काकांना थोडं अस्वस्थ झाल्यासारखं वाटलं. ते ऑफिसच्या समोर उभं असलेल्या महिलेला न्याहाळत म्हणाले, “जोशी, कधीची कंटाळली असेल ती या दोघांना. त्यामुळे खर्या अर्थाने आज तिची सुटका झाली असं म्हटलं तर त्यात काही विशेष नाही. नीट बघ तिच्या डोळ्यांत. खूप त्रास दिलेला वाटतोय म्हातारीला दोघांनी. डोळ्यांत आधीसारखं तेज राहिलं नाही रे आता.”
जोशी आणि बर्वेकाका महाजन काकांच बोलणं ऐकून खूप आश्चर्यचकित झाले. आ वासून महाजन काकांकडे दोघं पाहू लागले.
“महाजन, अरे बोलतोयस तरी काय? तुला काही भान आहे का? अरे, फक्त पंधरा मिनिटं झाले फक्त या कुटुंबाला बघून आणि तू काय सांगतोस सुटका झाली वगैरे? तुला काय माहिती त्यांच्या घरात काय झालं? की तू आधीपासून ओळखतोस या कुटुंबाला? महाजन बोल काहीतरी. मघाशीसुद्धा काहीतरी सुधा वगैरे म्हणत होतास. तू ओळखतो का यांना?” जोशीकाका कोंडी फोडत म्हणाले.
“अरे बाबांनो, ही बाई माझ्या ओळखीची वाटतेय. म्हणजे कॉलेजला असताना माझ्या वर्गात एक मुलगी होती सुधा नावाची. ही बाई सुधा तर नाही ना अशी शंका माझ्या मनात येतेय केव्हाची. आम्ही एकाच वर्गात होतो. नंतर ती अचानक गायब झाली ती कधीही न दिसण्यासाठी. मग आज या महिलेला बघून सुधाची आठवण झाली आणि तिच्या कुटुंबाबद्दल म्हणशील तर लोकांच्या डोळ्यात दिसतं रे सगळं. त्या मुलाचे आणि त्याच्या बायकोचे डोळे बघितले होतेस का? काहीही भाव नव्हता त्यांच्यात. अगदी निर्विकार आणि शुष्क होते ते आणि त्यांच्या आईचे डोळे, त्यात तर अजून भावनेचा ओलावा आहे.” महाजन काका एकदमच त्यांच्या मनातलं बोलून गेले. मग तिघं एकमेकांकडे बघत शांत बसले. त्यांच्या नाश्त्याची वेळ होत आली होती, मग निघाले ते हळूहळू.

