shubham patil

Romance

3  

shubham patil

Romance

श्रवणधारा - भाग 3

श्रवणधारा - भाग 3

3 mins
205


        सकाळची वेळ होती. साधारणतः नऊ वाजले होते. हवेत अजूनही बर्‍यापैकी गारवा जाणवत होता. इतक्यात पटांगणात एक इनोव्हा येऊन उभी राहिली. सगळ्यांचे लक्ष तिकडे वेधलं गेलं. अर्थातच त्या गाडीतून त्यांच्यामध्ये सामील व्हायला कुणीतरी आलं होतं. पुणे पासींगची गाडी होती. सामनसुद्धा भरपूर होता. महाजन, बर्वे वगैरे काका मंडळी दुरूनच गंमत बघत होती. गाडीचं मधलं दार उघडलं गेलं. त्यातून एक साधारणतः पासष्ट वगैरे वयाची महिला उतरली. पांढरे केस, कपाळावर गोंदलेल्याचा छोटासा हिरवा ठिपका भ्रुकुटीमध्यच्या अगदी थोडासा वर, हातात एक चांदीची अंगठी सोडली तर काहीही आभूषणं नव्हती. खोल गेलेले डोळे, पाठीला किंचितसा बाक कदाचित संसारगाडा ओढताना आलेला असावा असं चेहर्‍यावरून दिसत होतं. त्या गाडीतून ऊतरल्या आणि तिथंच उभ्या राहिल्या. ड्रायव्हर सीटने एक तरुण मुलगा उतरला. तोंडावळ्याने तो त्यांचाच मुलगा होता कुणीही सांगू शकत होतं. ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर एक स्त्री बसली होती. सगळ्यांत शेवटी ती उतरली.


        त्यांना पाहून निवार्‍याचे मॅनेजर ऑफिसमधून बाहेर आले. त्या तरूणाशी हस्तांदोलन केले आणि मुलांना हाक मारून गाडीवरून समान उतरवायला लावले. मघाशी ड्रायव्हर सिटच्या बाजूला बसलेली स्त्री त्या तरुणाची बायको होती. कोणत्या बॅग उतरवायच्या हे ती त्या मुलांना सांगत होती. मॅनेजर त्या तरुणाला काही फॉरमॅलिटी पूर्ण करायला घेऊन गेले. 

        “जोशीबुवा, हे एवढं एका जणाचं समान असेल?” गंमत पहात असताना बर्वे काकांनी जोशींना विचारलं.

        “काय माहिती बुवा, सांगणं कठीण आहे. पण हे एका जणाचं तर मुळीच वाटत नाही. तीन जणांचं नक्की असेल बहुतेक.” जोशींनी अंदाज लावला.

        “बहुतेक काय म्हणताय जोशी, अहो हे एवढं समान एका वृद्धाश्रमात राहायला येणार्‍या व्यक्तिचं नाही हे कुणी शेंबडा मुलगासुद्धा सांगेल. अहो, ते दोघं म्हातारीला सोडून कुठेतरी शिफ्ट होणार आहेत. मला तरी असंचं वाटतंय. तुला काय वाटतं महाजन?” बर्वे काकांनी त्यांचं मत मांडलं.   

        पण महाजन काकांचे लक्ष नव्हतेच यांच्या बोलणायकडे. ते केव्हापासून त्या महिलेकडे बघत होते. जणू काही त्यांची ओळख असावी असं.

        “प्राध्यापक महाशय, अहो तुमच्याशी बोलतोय आम्ही. कुठे हरवलात?” जोशी काकांच्या हाकेने महाजन काका भानावर आले.

        “अं? मला म्हणताय का? काय झालं?” महाजन काकांना गोंधळल्यागत झालं.

        “काही नाही, काय विचारात हरवलास रे? काही प्रॉब्लेम आहे का?” जोशीकाकांनी विचारलं.

        “नाही रे. मी ते आपलं थोडं विचारात पडलो होतो. त्या बाईला कुठंतरी पहिल्यासारखं वाटतंय रे. सुधा असेल का ती? पण कॉलेजनंतर कधी बघितलं नहो रे. पदवी प्रदान समारंभाला सुद्धा आली नव्हती ती. कुठे गेली काय माहीत? आता असेल की नाही हेसुद्धा माहिती नाही. छे!!! दुसरी कुणीतरी असेल ती. सुधा तर नक्की नसेल.” महाजन काका त्यांच्याच तंद्रीत बोलत होते.


        “ए बाबा, काय झालंय तुला? ताप वगैरे तर आला नाही ना. काय बडबड करतोयस केव्हाची? आणि ही सुधा कोण? आमच्या बोलण्याकडे काही लक्ष आहे की नाही तुझं?” बर्वेकाका महाजन काकांचे खांदे गदगदा हलवत म्हणाले.  


        “काही नाही रे बर्वे. सांगतो तुला नंतर”, असं म्हणून महाजन काकांनी विषयाला तात्पुरती तिलांजली दिली. मग परत समोर घडणारे दृश्य बघू लागले. समान जवळपास उतरवून झालं होतं. बर्वेकाकांचा अंदाज बरोबर होता. कारण फक्त तीन बॅग खाली उतरवल्या गेल्या होत्या. बाकीचा समान अजून वरंच होता आणि काही गाडीत होता अजून. मुलं समान घेऊन जायला लागली.


        “आई, चल. ऑफिसमध्ये बोलावलंय तुला. काही ठिकाणी सह्या लागताहेत तुझ्या. तू पण चल गं.” असं म्हणून तो त्या दोघांना ऑफिसमध्ये घेऊन गेला. दोघांच्या मागून म्हातारी चालू लागली. बाकावर तिघं म्हातारे बसले होते. आसपास कुणीही नव्हते. पण तरीही ते तिघं शांतच बसून होते. अजून एका आईला तिच्या मुलाने नि“वार्‍यावर” सोडले होते. या गोष्टीची खंत त्यांना लागून राहिली होती. हॉस्पिटल आणि वृद्धाश्रम ही दोनंच ठिकाणं अशी आहेत जिथली संख्या कमी व्हावी असं प्रत्येकाला वाटतं. अगदी जो तिथले भोग भोगतोय त्यांनासुद्धा असंच वाटतं, हे दुःख आपल्या शत्रूला सुद्धा नको.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance