STORYMIRROR

shubham patil

Romance

3  

shubham patil

Romance

श्रवणधारा - भाग २

श्रवणधारा - भाग २

3 mins
231

     नोकरीच्या काळात आपण पैशांच्या मागे धावलो आणि आता मोकळा वेळ आहे तर बोलायला कुणी नाही. याची खंत त्यांना लागून असायची. महाजन काकूंची तब्येत अचानक बिघडली आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. आधीच एकटे असलेले महाजन काका अजून एकटे पडले. पंधरा दिवसांनी एक फोन आला होता विनयचा. कामात व्यस्त असल्याने येऊ शकलो नाही असं म्हणाला तेव्हा इकडे महाजन काकांच्या डोळ्यातून अश्रु सुरू झाले होते. दिवसभर महाजन काका पुस्तकं वाचत बसत. करण्यासारखं असं काही उरलंच नव्हतं आता आयुष्यात. ऐन वेळी जिची साथ हवी होती ती अचानक सोडून गेल्याने ते मायामोहाच्या गिल्मिशांपासून हळू हळू दूर जात होते. पण जसं जन्म घेणं आपल्या हातात नसतं तसंच मरणसुद्धा त्या विधात्याच्याच हातात असतं हे त्यांना कळून चुकलं होतं. जगण्याला पर्याय नव्हता. एकट्याने पाच वर्ष कसेबसे काढल्यावर त्यांना एकदमच कसेतरी होऊ लागले. मग त्यांनी झालेलं सर्व विसरून जाऊन एका नवीन आयुष्याची सुरुवात करायची ठरवली. सेकंड इनिंग सुरू होत असतानाच पार्टनर कायमचा रिटायर्ड हार्ट झाला होता. त्यामुळे त्यांनी वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला होता.


        बर्वे काकांची गोष्टसुद्धा काही निराळी नव्हती. त्यांचा मुलगा मुंबईत नावाजलेला सर्जन होता. मुंबईला खूप प्रदूषित वातावरण आहे, इथं तुम्हाला त्रास होईल. त्यामुळे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहायला हवं. हे मोकळं आणि सुटसुटीत कारण देऊन त्याने त्याच्या जन्मदात्यांना वृद्धाश्रमात हाकललं होतं. जे घर घेण्यासाठी गावातलं चांगलं घर विकलं होतं त्याच घरातून आता त्यांना बाहेर काढलं होतं. एका आलीशान गाडीतून त्यांचा मुलगा, सुनबाई आणि नातू त्यांना सोडायला आले होते. बर्वे काकू नेहमी म्हणत, “मी तुम्हाला संगत होते. गावी घर असलेलं कधीही चांगलं. पण तुम्ही ऐकलं नाही.” इथं बर्वेकाका निरुत्तर व्हायचे.  


        महाजन काका, बर्वे दाम्पत्य आणि तिथं असलेल्या सर्वांच्या जवळपास सारख्याच कहाण्या होत्या. आयुष्याची सेकंड ईनिंग अशा प्रकारे व्यतीत करावी लागेल असा कधी त्यांच्यापैकी कुणीच विचार केला नसेल. 


        प्रार्थना झाली आणि सर्वजण परत पटांगणात जाऊ लागले. आज वांग्याच्या भरताचा बेत असल्याने जोशीकाकांच्या आनंदाला उधाण आले होते. मूळ जळगावचे असलेले जोशीकाका नोकरीसाठी म्हणून नाशिकला स्थायिक झाले आणि मग एकुलत्या एक मुलीने तिच्या घरात राहायला स्पष्टपणे नकार दिला मग सपत्नीक आले ते ‘निवार्‍या’त. पटांगणाच्या एका बाजूला वांगी भाजण्याचे काम सुरू होते. तिथे सर्व मंडळी बसली. थंडीचे दिवस असल्याने सात वाजताच काळोख पडायला सुरुवात झाली होती. आयुष्याच्या सायंकाळी काळोख अनुभवणारी मंडळी वांगी भाजता-भाजता गप्पा मारत बसली होती.

        “काय रे जोशी? आज तर मजा आहे राव तुझी. तू तर काय भरीत असल्यावर एकदम शेफ होऊन जातोस.” महाजन काका जोशींना चिडवत म्हणाले.

        “हो तर, अरे भाई मी भरीत स्पेशलिस्ट आहे तुला माहीती नाही का ?” जोशीकाका भाजलेलं वांगं विस्तवाच्या बाहेर काढत म्हणाले.

        “तो तर आहेस रे तू, मला सांग घरी असताना कोण बनवायचं रे भरीत? म्हणजे तू, की वाहिनी?” बर्वेकाका चेष्टेच्या सुरात म्हणाले.

        “हीच बनवायची रे. मृणालिनी सासरी गेली आणि तिने असं केल्यापासून हिने हाय खाल्ली आणि तेव्हापासून किचन मध्ये मी इंटरेस्ट घेतला. काहीतरी विरुंगळा लागतो रे आयुष्यात, नाहीतर मग कधी कल्पना न केलेली संकटं आली तर आमच्या हिच्यासारखं होतं. वाटलं नव्हतं रे जिला इतकं जपलं लहानपणापासून ती आम्हाला असं करेल.” जोशीकाका बोलताना फार गंभीर झाले.


        “जाऊ देत. आता विसरायचंय ना सगळं? तू ते वांगे बघ बरं झाले का? जाम भूक लागलीये रे आज. त्यात भरीत म्हणजे कळस.” महाजन काकांनी विषय बदलण्याच्या उद्देशाने गप्पांची गाडी दुसरीकडे वळवली.


        रात्री मस्तपैकी भरीत पुरी खाऊन आडवे झाले. तसं बघायला गेलं तर सर्वजण एक मुक्त जीवन जगत होते. पण त्या जगण्याला कुठेतरी चिंतेची कीड लागली होती. सर्वांच्या काळजात कुठेतरी भग्न अशा स्वप्नांची तुटलेली तार होती. तीच त्यांना हळूहळू पोखरत होती. वरकरणी सर्वजण आनंदी आहोत असं भासवत असले तरी सर्वजण एकाच दुःखात होते. अवघड जागेवरच्या दुखण्यासारखे, सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance