shubham patil

Romance

3  

shubham patil

Romance

श्रवणधारा - 2

श्रवणधारा - 2

3 mins
273


“चला, जायचं का?” महाजन काका म्हणाले.

        “लगेच काय आहे तिकडे? जाऊ थोड्या वेळाने. बायका करतील रे स्वैपाक.” जोशीकाका म्हणाले.

        “जोशी तुला गरजच काय होती तुला भरीत आणि बाकीचं बनवता येतं असं सांगण्याची? तुझ्यामुळे प्रॉब्लेम झालाय सगळा. माणसांना बायकांची कामं करायला लागतात तुझ्यामुळे.” बर्वेकाका चिडून बोलले.

        “अरे बाबा, आपल्या मुलांच्या हाताचं खायचं ही आपली लायकी नाही किंबहुना आपल्या नशिबात नाही. स्वतःच्या हाताने करून खाल्लं तर काय फरक पडतो. या वयात सर्वांसोबत काहीतरी करायला मिळतं. त्यामुळे टाईमपास तरी होतो. एरवी आपल्या मनात काय चाललेलं असतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मग थोडं केलं तर काय फरक पडतो.” महाजन काका गंभीर होत बोलले.

        “अरे एवढं सीरियस का होतोय महाजन? मी बोलायचं म्हणून बोललो रे.” बर्वेकाका महाजन काकांकडे थोड्या अपारधिपणाने पाहत म्हणाले.

        “हं, मला का बोलावलं ते सांग आता?” महाजन काकांनी मुळ मुद्द्याला हात घातला.

        “हत्तीच्या, ज्याच्यासाठी बोलावलं तेच सांगायचं राहून गेलं. अरे, प्रार्थना झाल्यावर तो मॅनेजर काय म्हणत होता ऐकलं का?” जोशिकाकांनी विचारलं.

        “हो, चांगलं बोलला मुलगा. थोड्या वेळासाठी पॉसिटीव्ह वाटलं रे त्याचं बोलणं. का? काही चुकीचं बोलला का?” महाजन काका दोघांकडे आळीपाळीने प्रश्नार्थक मुद्रेने बघत बोलले.

        “महाजन, त्या आधी काय बोलला ते आठव. जाऊ दे. तू तुझ्या वेगळ्याच तंद्रीत असतोस. मीच सांगतो, त्या नवीन बाईचं नाव काय म्हणला तो, सुधा कदम म्हणे. सकाळी तू म्हणत होतास तीच तर नाही ही बाई?” हे सांगताना जोशींचा उत्साह ओसंडून वाहत होता आणि बर्वेकाका त्याला दुजोरा देत होते.

        “हां, बोलला खरं तो. पण ती तीच सुधा असेल का याबद्दल मला शंका आहे आणि असलीही तरी आता काय फरक पडतो. म्हणजे मला म्हणायचं होतं की आपल्याला काय करायचं आहे?” महाजन काका आकाशाकडे बघत म्हणाले. ते दोघांपासून नजर चुकवत होते.

        चाणाक्ष बर्वे काकांच्या लक्षात आलं. ते म्हणाले, “आता काय फरक पडतो म्हणजे काय? तू काहीतरी लपवतोयस का आमच्यापासून?”

        “मी? छे रे. मी कशाला काही लपवू?” महाजन काका सारवासारव करत म्हणाले. अजूनही ते इकडे तिकडेचं पाहत होते.

        “बरं, आता चालायचं का?” जोशीकाका किचनकडे बोट दाखवत म्हणले.


        महाजन काकांनी होकारर्थक मन हलवत बर्वे काकांकडे बघितलं. त्यांनी मानेने होकार देताच तिघं उठले आणि ती तीन डब्यांची पासेंजर गाडी किचनच्या दिशेनं चालू लागली. किचनच्या दारावरच जोशीकाकू उभ्या होत्या. त्यांच्यासोबत नवीन सदस्या होत्या. जोशीकाकू त्यांना काहीतरी समजावत होत्या बहुतेक. आज वृद्धाश्रमात पहिलाच दिवस असल्याने थोड्या गोंधळलेल्या वाटत होत्या. माणूस एक दिवस कुठं परक्या गावी जातो तेव्हा गोंधळून जातो आणि आता तर त्यांना त्यांचं उरलेलं आयुष्य या जागेत काढायचं होतं, कितीही मानसिक तयारी झालेली असली तरीही नेमकी परिस्थिती मात्र वेगळी असते. बावरलेल्या नजरेने सर्वदूर बघत होत्या. त्यांची स्थिती त्या भित्र्या आणि घाबरलेल्या सशासारखी झाली होती, ज्याला वाटलं होतं की आपल्या अंगावर आभाळ पडलं आहे. महाजन काकांनी सुधा कदमांकडे पहिलं आणि ते परत विचारात पडले. इतक्यात बर्वेकाकू आल्या आणि त्यांना एक परात भरून बटाटे आणून दिले. आज तिघांना बटाट्याची साल काढण्याचं काम दिलेलं होतं. आजचं काम तसं कठीण नव्हतं फक्त थोडसं वेळखाऊ होतं. कारण हे तिघं सोबत असले की यांच्या विविध विषयांवरील गप्पा काही आटोपण्याचं नाव घेत नसत.  


        बटाट्यांची साल काढण्याचं काम सुरू होतं. पण महाजन काकांचं लक्ष मात्र तिकडे सुधा कदमांकडेच होतं. “पहिल्या दिवशीसुद्धा अशीच गोंधळली होती ती, वर्ग सापडत नव्हता तिला.” असं काहीसं ते पुटपुटले आणि कुणी ऐकलं की काय अशी शंका येऊन काहीच न बोलल्याचा आव आणून उगाचच काहीतरी गुणगुणू लागले आणि चोरट्या नजरेने दोघांकडे बघू लागले. दोघं काकांनी त्यांचं हे वर्तन हेरलं पण जाणूनबुजून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance