सेलिब्रिटी
सेलिब्रिटी


अभिनेता समारंभासाठी ज्या भागात आला तिथे त्याला बघायला चाहत्यांची तुडुंब गर्दी झाली. प्रत्येकाला त्या अभिनेत्याचा हेवा वाटायचा. त्याला 'स्टारडम' मिळाले होते. समारंभ संपल्यावर सगळेजण त्याच्याभोवती सेल्फीसाठी गलका करू लागले. "सर प्लीज, आमच्यासोबत एक सेल्फी ","थँक्स सर ","मला खूप आनंद झाला प्रत्यक्षात तुम्हाला भेटून", त्याचे फॅन्स त्याच्याशी बोलत होते,त्याचे आभार मानत होते. शेवटी तिथून काढता पाय घेण्यासाठी त्याच्या अंगरक्षकांना मध्यस्थी करावी लागली आणि तो त्याच्या फॅन्सना 'बाय बाय' करत निघाला, त्याला दुपारी शूटिंगच्या सेटवर पोहचायचे होते.
तो सेटवर गेल्यावर "आरव सर आले” असं म्हणून तिथली मंडळी त्याचे शॉट उरकून घेण्यासाठी सेटवर आवश्यक ते बदल करू लागले. सेटवर त्याच्यासाठी खास स्वतंत्र खोली होती. "कॉफी विदाऊट शुगर" त्याच्या तोंडातून हे शब्द बाहेर पडताच लगेच "एस सर" असं म्हणून त्याच्यासाठी एक माणूस त्याला कॉफी घेऊनही आला. त्याचे शॉट लागल्यावर त्याने ते सगळे त्याच्याबाजूने बिनचूक दिले. दिग्दर्शकाने त्याच्या कौश्यल्यावर खुश होऊन नेहमीप्रमाणे त्याचे कौतुक केले. "आरव सर इज ग्रेट" इतर लोकांचे कौतुकाचे शब्दही त्याला ऐकू आले. 'परफ़ेक्ट' ,'कमाल','बढिया' हे शब्द त्याच्यासाठी रोजचेच झाले होते.
काही नाईट सीन्स असल्यामुळे शूटिंग संपवून रात्री उशिरा तो घरी आला... दिवभराचा कल्लोळ आता शांत झाला होता.
"नव्हती झोप लागली अजून. तू आलास, आता लागेल झोप."आतल्या खोलीत गेल्यावर बेडवरची आजारी आई त्याला म्हणाली. रामू आणि बाकी दोन नोकर तिला जेवण आणि औषधं देऊन त्यांच्या खोलीत गेले असल्याचे त्याच्या आईने त्याला सांगितले. 'आरवला इतका उशीर झाला म्हणजे तो सेटवरच जेवण करून आला असणार' हे तिला माहित होतं.
तो आवरून स्वतःच्या खोलीत गेला. भलं मोठं घर नेहमीप्रमाणे आपल्याला खायला उठलं आहे, असा त्याला भास झाला. तो बेडवर पडून राहिला,आज इतकं थकूनही त्याला झोप येत नव्हती. रात्रीची शांतता त्याला शत्रू वाटू लागली. त्याला त्याचा संघर्षाचा काळ आठवला. 'अपेक्षा कशा बदलत जातात... अभिनयात संधी मिळू दे,चांगलं करियर घडू दे यात... या अपेक्षा पूर्ण झाल्यावर, मान-सन्मान, पुरस्कार मिळू दे,ग्लॅमर मिळू दे इथपर्यंत अपेक्षा वाढल्या. .. आणि नंतर, माझं म्हणता येईल असं माणूस मला लाभू दे एवढीच अपेक्षा आहे आता. अंथरुणाला धरून बसलेली आई गेल्यानंतर आपलं म्हणता येईल असं कोण असेल या जगात? मग मान-सन्मान, पैसा, संपत्ती याचं कोडकौतुक कुणाला सांगू?' त्याचं विचारचक्र सुरु होतं.
तो उठून त्याच्या दुसऱ्या खोलीत आला. तिथली लाईट लावली आणि शोकेसमधील पुरस्कारांकडे तो पाहू लागला. एक एक पुरस्कार भरल्या डोळ्यांनी,शांततेत पाहताना त्याला तो मिळतानाचा क्षण,तेव्हा झालेला आनंद सर्वकाही आठवू लागलं. 'याच पुरस्कारांनी आपल्याला सर्वस्व मिळाल्याचा आनंद दिला होता. सगळंच हवं ते कसं मिळेल?... पण भावनिक भूक महत्वाची असते.. तीच आपल्याला नाही मिळाली, मग काय आहे आपल्याकडे? मोनिका बरोबर लग्न होऊन वर्ष होतं ना होतं तोच घटस्फोट झाला. आता त्याला पंधरा वर्ष झाली…. काही झाले तरी आपणच असं निराश होऊन कसं चालेल?मला इतकेजण आदर्श मानतात, त्यांचा तो आदर्श खचून कसा चालेल. माझे फॅन्स आणि त्यांचं प्रेम हेच माझ्या जगण्याचं बळ आहे.' शेवटी हाच सकारात्मक विचार घेऊन तो झोपी गेला.. पण झोप लागेपर्यंत 'आपल्याकडे काहीच नाही की सर्वकाही आहे' हा विचार त्याला छळतच होता.
लाखो हृदयांची धडकन आणि लाखो करोडोंचा आदर्श,आयुष्याचा मध्य उलटूनही अजून 'एकटाच' होता.