ऋण
ऋण
रितेश आज मायदेशी परतला होता . त्याच्याकडे फक्त एक महिना होता . याच एक महिन्यात त्याला खुप गोष्टी करायच्या होत्या . राहते घर किरायाने देणे, आई बाबांचा पासपोर्ट , त्यांच्या सामानाची पॅकिंग नातलगांच्या आणि मित्रांच्या भेटी अशी कितीतरी कामं त्याला पूर्ण करून विदेशात जायचं होतं. तिथं त्याला मोठ्या पॅकेजचा जॉब मिळाला होता पण अट अशी होती की रितेशला विदेशातच स्थायिक व्हावे लागणार होते. आपल्या शिक्षणाचा आता चांगला उपयोग होणार म्हणून रितेश जाम खुशीत होता. आईबाबांची तर परदेशात जायची अजिबात इच्छा नव्हती. आईबाबाना त्याने कसेबसे राजी केले आणि सर्वांनी विदेशात जायचा निर्णय पक्का झाला . पण हो म्हणायच्या आधी आईबाबांनी रितेशकडून एक वचन घेतले की तो आपल्या धनाचा आपल्या लोकांसाठी निश्चित उपयोग करेल.
पाहता पाहता पंधरा दिवस कसे निघून गेले ते कळलेही नाही. या कालावधीत रितेशचे बरेच पेपरवर्क पूर्ण झाले होते. राहिल्या होत्या केवळ भेटीगाठी. आज त्याने ठरवले होते की जुन्या शिक्षकांना आणि शाळेंना भेटी द्यायच्या. सकाळीच पोटभर जेवण करून, आईला सांगून तो दामलेगुरुजींना भेटायला गेला. दामलेगुरुजी त्याला पाचवीपासून दहावीपर्यंत शिकवायला होते. त्याने आधीच एका मित्राकडून पत्ता विचारुन घेतला होता. तिथे पोहचल्यावर त्याने दारावरची बेल वाजवली. दार उघडायला वेळ झाला म्हणून रितेशने परत दारावर नॉक केले. आतून 'आलो , आलो' असा वृद्ध आवाज आला आणि दार उघडले.
समोर एका रुबाबदार तरुणाला पाहून गुरुजींनी विचारले,_
" कोण हवंय तुम्हाला ?"
" मला दामलेगुरुजींना भेटायचं. इथेच राहतात का ते ?"
रितेशने गुरुजींना ओळखले होते पण मुद्दाम त्याने गम्मत करायचे ठरवले होते.
"हो, मीच आहे दामले. बोला,काय काम आहे माझ्याकडे ?"
गुरुजींनी आपल्याला ओळखले नाही म्हणून रितेशला गंमत वाटली पण त्यांची जास्त फिरकी न घेता त्याने लगेच गुरुजींच्या पायाला स्पर्श केला आणि स्वतःची ओळख सांगितली. विदेशातील नोकरीबाबतही रितेशने माहिती दिली.
आपल्या हाताखाली शिकलेला विद्यार्थी आज परदेशात मानाची, गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवतो याचे त्यांना खुप कौतुक वाटले. त्यांनी लगेचच सौभाग्यवतीला आतून मिठाई घेऊन येण्यास सांगितले.
मिठाई , नाश्ता, चहापाणी झाल्यावर भरल्या मनाने रितेशने दामले दाम्पत्याचा निरोप घेतला.
रितेशचे जुने घर चाळीत होते. अभ्यासाला पुरेशी जागा आणि वातावरण नसल्यामुळे बाबांनी त्याला 'ज्ञानमार्ग' होस्टेलमध्ये ठेवले होते. रितेशने त्या हॉस्टेलला भेट द्यायचे ठरवले. श्री शशिकांत पवार यांनी होतकरु आणि अभ्यासू मुलांसाठी हे वसतिगृह सुरु केले होते.अतिशय माफक वाजवी दरात , देणगी मिळवून पवार हे वसतिगृह चालवत होते. त्यांनाच भेटायला रितेश जाणार होता.
प्रकाश नावाच्या एका मित्राला फोन करून रितेशने त्याला बोलावून घेतले. दोघे मिळून पवारांच्या घरी गेले. अंगणातच पवारमॅडम दिसल्या. त्यांनी लगेचच दोघाही मित्रांना ओळखले. पोटच्या मुलाप्रमाणे त्यांनी हॉस्टेलच्या सगळ्या मुलांना जीव लावला होता. एक आई आपल्या मुलांना मग कशी विसरेन!!!!!
इकडच्या-तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर रितेशची नजर पवारसरांना शोधू लागली. त्याने काही विचारायच्या आधीच मॅडमने पवारसरांच्या अकस्मात निधनाची बातमी सांगितली.
"रितेश, तुला तर माहितच आहे की आपले वसतिगृह देणगीवर चालायचे .हळूहळू देणगीदार परदेशात स्थायिक झाले आणि खर्च झेपेना झाला. नीट व्यवस्था लागेना म्हणून मुले वसतिगृह सोडून गेली. हा धक्का पवारांना सहन झाला नाही. ते खुप खचले आणि एके दिवशी हार्ट अटॅकने जग सोडून गेले. त्यानंतर दोन-तीन वर्ष मी कसेबसे हॉस्टेल चालवले पण एकटी बाईमाणूस कसे करणार सगळे ? आताशा वसतिगृह बंदच आहे"
एवढे बोलून बाईंनी पदराने डोळ्यातील पाणी टिपले. रितेशला ऐकून खुप वाईट वाटले. हॉस्टेलवर राहणाऱ्या सर्व मुलांना श्री व सौ पवारांनी आईवडिलांची कधी आठवण येऊ दिली नव्हती. त्यांना मुलबाळही नव्हते. विषयांतर करायचे म्हणून रितेश 'वसतिगृह पाहायला जाऊ, माझ्या आठवणी आहेत तिथे', असे बोलून पवारमॅडमला आणि मित्राला घेऊन हॉस्टेलकडे जायला निघाला.
रस्त्यावर गाडी पुढेपुढे जात होती आणि रितेश आठवणींसोबत मागेमागे जात होता. याच आठवणींच्या रहदारीत वसतिगृह कधी आले ते समजलेच नाही. नावाचा बोर्ड पाहून रितेशने कचकन ब्रेक लावला . पवारबाईंनी हातातल्या किल्लीने गेट उघडले आणि तिघे आत पोहचली.
जिथे मुलांची घाई गोंधळ असायचा, आज तिथे फक्त वाऱ्याची गिरकी आणि झाडांच्या पानांची सळसळ ऐकायला येत होती. रितेश घाईने त्या खोलीकडे वळला जिथे तो राहायचा. आत खोलीत पोहचल्याबरोबर त्याचे लक्ष भिंतीकडे गेले. त्या रंग उडालेल्या भिंतींवर अजूनही त्याची अक्षरे स्वतःला जपत तशीच बसून होती. खिडक्याही कुणीतरी खाली डोकावून पाहण्याची वाट बघत होत्या , खोलीतले पलंग' या , बसा,' म्हणत होते. खोलीभर कागद पसरले होते, काहींवर गणिताचे अंक चुपचाप बसले होते तर काही पानांवर मराठी प्रेमकविता प्रेमाचे रंग उधळत होत्या. काही पानांवर इंग्रजी रांगत होती तर कुठे इतिहासाची लढाई होती. एका क्षणात सारा भूतकाळ रितेशच्या डोळ्यांसमोरून गेला.
तेवढ्यात पवार बाईच बोलल्या," पोरांनो ,आता परत जाऊया. संध्याकाळ होत आलीय. दिवेलागण करायचीय."
तिघेजण परत निघाले . पवारबाईंना आणि मित्राला त्यांच्या त्यांच्या घरी सोडून रितेशही घरी पोहचला. आई बाबा जेवण्यासाठी त्याची वाट बघत होते. आईने आज खीरपुरी बनवली होती सर्वांनी जेवण केले आणि झोपायला गेले. रितेशला काही झोप लागत नव्हती . तो सारखा या कुशीवरुन त्या कुशीवर वळत होता . त्याच्या डोळ्यांसमोरून काही केल्या हॉस्टेल जात नव्हते. शेवटी कसलासा विचार करून रितेशने झोपण्यासाठी डोळे बंद केले.
दुसऱ्या दिवशी रितेशने सामानाची बांधाबांध केली , आईबाबांच्या बॅग भरल्या , काही मित्रांना फोन केले.आज रात्री तो परदेशात जाण्यासाठी विमानात बसणार होता. संध्याकाळ झाली तसे रितेशने नाटकर काकांना बोलावून घेतले, सर्व सुचना दिल्या नि घराला कुलूप लावून ,काकांना चाबी देऊन आईबाबाला गाडीत बसवले आणि विमानतळाकडे निघाला.
काही दिवसांनी पवारबाईंच्या नावे एक पत्र आले.' मला मेलीला कुणी पत्र पाठवले' असे स्वतःशीच पुटपुटत त्यांनी ते पत्र फोडून वाचायला सुरुवात केली.
' आदरणीय पवारमॅडम,
साष्टांग नमस्कार.
पत्रास कारण की , मी आपले 'ज्ञानमार्ग' वसतिगृह दत्तक घेतोय. आता वसतिगृह पूर्वीसारखेच चालेल. मला थोड़ा वेळ दया. योग्य ती कार्यवाही पूर्ण करून मी लवकरात लवकर भारतात येणार आहे. सर्व सुरळीत होईल. काळजी नसावी.'
आपलाच विद्दयार्थी
रितेश
पत्र वाचून बाईंच्या वृद्ध डोळ्यांतून आनंदाचे अश्रू ओघळायला लागले.