रमेशची चलाखी
रमेशची चलाखी


रमेश दहावीच्या वर्गात शिकत होता. चाचणी परिक्षेकरता तो रात्री उशीरा पर्यंत जागून अभ्यास करायचा. मुंबई सारख्या शहरात सतत गडबड गोंधळ असल्यामुळे रात्री निवांत अभ्यास चांगला व्हायचा.
एकदा मंगळवारी रात्री, नाईट लॅम्प लाऊन तो अभ्यास करत होता. त्याचा मुड ही चांगला लागला होता. एवढ्यात जोराने "ठक्क,ठक्क" असा आवाज आला. कसला आवाज म्हणून तो बाल्कनीत आला, पाहतो तर पहिल्या माळ्यावरच्या गेले सहा महिने बंद असलेल्या दाराजवळ रात्रीच्या वेळी, म्हणजे जवळ जवळ दोन वाजायला आले होते, अशावेळी बंद दारासमोर एक बुरखा घेतलेला माणूस दाराकडे खुडबुड करत होता. त्याने लगेच ओळखले हा चोरच असावा. आवाज केला तर तो पळून जाईल. घरात ही सगळे ढाराढूर झोपलेले. तो तसाच काळोखात बाल्कनितून चोराकडे पाहू लागला. चोर दार उघडून आत घरात शिरला आणि त्याने दार बंद केले. त्याबरोबर रमेश पटकन आपल्या घराचे दार उघडून पहिल्या माळ्यावर आला आणि त्याने बाहेरून त्याला कडी लावली. नंतर आपल्या घरात येऊन त्याने आईबाबांना उठवले व सगळा प्रकार सांगितला. त्याच्या बाबांनी त्याला पोलिसांचा नंबर लावायला सांगितले व स्वतः त्यांनी सोसायटीच्या कमिटिच्या लोकांना फोन लाऊन उठवले.
लगेच चार पाच बंदूकधारी पोलिस ईमारतीत घुसले. मागच्या पुढच्या गेटवर पोलिस तैनात राहिले आणि दोघे बंद दारा समोर उभे राहून चोराला दार उघडायला सांगू लागले. पण आतून कोणतीच हालचाल झाली नाही. एव्हाना सगळी सोसायटी जागी झाली आणि सगळे कुजबुज करून बोलत होते. चोराची काही हालचाल होत नसल्याने सब इन्स्पेक्टर राऊत ने त्याला धमकावले, "उघड दार नाही तर आत घुसून तुझ्यावर गोळी झाडणार." तरी आत सगळे शांत. सगळ्या पोलिसांना आप आपल्या बंदुका लोड करून ठेवायला सांगितले आणि नंतर मग पोलिसांनी जबरदस्तीने दार उघडले व ते बंदुक घेऊन आत घुसले. सिनेमातल्या सीन सारखे एक एक दबत दबत पाऊले टाकत पुढे सरसावले. आत दोन कपाटे व एक मोठी कॉट होती. घरात सगळीकडे शोधले पण चोराचा पत्ताच नव्हता. सब इन्स्पेक्टर राऊतना शंका आली. आजकालच्या पोरांचा काही विश्वास नाही. उगीच आम्हाला शेंडी लावली वाटते म्हणून त्यांनी रमेशला त्या खोलीत बोलावले आणि परत सगळे त्याला प्रश्नावर प्रश्न विचारू लागले.
"आमची फसवणूक केलीस ना रे तू?"
"नाही सर तो चोरच होता"
"मग कोठे आहे तो?"
"सगळं घर धुंडाळले त्याचा पत्ताच नाही. आता तुलाच घेऊन जातो चौकीवर"
तेवढ्यात रमेश बोलला,"सर तुम्ही तिथे पाहिले का? त्या कॉटमधून आवाज येतोय."
"कुठे कॉटमध्ये?" असे म्हणून ते त्याच्यावर खेकसले. (त्या कॉटमध्ये सामान ठेवण्याची जागा होती.) आणि हवालदारला त्यांनी कॉटमध्ये बघायला सांगितले. बघतो तर काय! एका कोपऱ्यात अंगाची मुटकुळी करून चोर पहुडला होता. फरफटत त्याला ओढून बाहेर काढले आणि सब इन्स्पेक्टरने दोन दांडके त्याच्या पाठीवर मारले व हातात बेड्या ठोकल्या आणि ओढत त्याला गाडीत घालून घेऊन गेले.
रमेशच्या चालाखीमुळे चोर पकडला गेला. सोसायटीने २६ जानेवारीला रमेशचा सत्कार केला आणि पोलिसांनी ही त्याच्या हुशारीचे कौतुक करत त्याला प्रमाण पत्र व पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला.