Seema Kulkarni

Inspirational

3  

Seema Kulkarni

Inspirational

पत्रास पत्र

पत्रास पत्र

4 mins
382


               ||श्री ||


प्रिय पत्रमित्रा, स. न. वि. वि.


       खूप खूप गोड आठवण. असं वाटतंय किती वर्षांनी भेटतोय आपण. तुलाही तसंच वाटत असेल ना!!

आता तू माणसाच्या आयुष्यातून हद्दपारच झाला आहे. पण तुझं माणसांच्या भावविश्वातलं योगदान मात्र अविस्मरणीय असच आहे. दिवसेंदिवस आधुनिकीकरणामुळे जग बदलत आहे. तसाच बदल याही गोष्टीत झाला. तुझी जागा ईमेल ,व्हाट्सअप मेसेज यांनी घेतली. स्पर्धेचे युग , कोणाकडेच वेळ नाही. त्यामुळे त्रास करून न घेता, निरोप मिळवणे, पाठवणे सोयीस्कर वाटू लागले. इकडून प्रश्न विचारला की तिकडून उत्तर तयार.पण तुझी कमतरता मात्र प्रकर्षाने जाणवते. सध्याची पन्नाशीच्या पिढीने तर दोन्ही बदल अनुभवले. इमेल आणि तुलाही. पण या इंटरनेटच्या जमान्यात तुझ्या सारखं भावनेत चिंब भिजता मात्र आलं नाही. तो भावनेतला ओलावा कोंरडा पडला.


         तुझा तो आयताकृती, उभट आकार, बदामी कलर, पाठीमागच्या बाजूला हिरव्या कलरच्या 3_4 लाईन, अगदी स्पष्ट आठवतात बघ. आणि तुझा तो मोठा भाऊ म्हणजे अंतर्देशीय पत्र रे. फिक्कट निळा कलर, मजकूर लिहायला भरपूर जागा आणि हो विशेष म्हणजे तसं काही खाजगी असेल तर कोणाला दिसू नये म्हणून बंद करण्याची सोय. आणि याउलट तुमचं म्हणजे, "कुणीही यावे टिकली मारून जावे" अशी अवस्था. अगदी सहजपणे कळावं मजकूर काय आहे तो. पण त्याचंही काही वाटत नव्हतं. कारण संदेशाची देवाणघेवाण करण्याचे तेच माध्यम होतं. आणि किंमत तरी किती हो ? फक्त पंधरा पैसे आणि पंचवीस पैसे. पण या कमी पैशात सुद्धा, लाखमोलाचं भावविश्व उलगडलं जायचं. निरोप ,अडचणी अगदी भरभरून पोहोचायच्या. कधीकधी त्या भावानेतला ओलावा ही तू हलकेच टिपून घ्यायचास. जरी प्रत्यक्ष भेट नसली तरी तू मात्र मधला दुवा बनायचास.


          पत्र लिहिताना मधोमध वरच्या साईडला "श्री" असे लिहूनच सुरुवात व्हायची. उजव्या बाजुला गावाचे नाव, तारीख लिहिले जायचे. जेणेकरून कळावे पत्र कुठून आणि कधी पाठवले आहे. त्याच्याखाली 

स.न.वि.वि. ( सप्रेम नमस्कार विनंती विशेष)

श्री. रा. रा. ( श्रीमान राजमान्य राजश्री ) असे लिहून सुरुवात व्हायची. ( इतरांना लिहायच असेल तेव्हा )आई बाबांना पत्र लिहायचे असल्यास, तीर्थरूप आई बाबा , शि. सा.न. (शिरसाष्टांग नमस्कार )असा उल्लेख व्हायचा. त्यानंतर विनंती विशेष पत्रास कारण की, असे म्हणून मजकूर लिहिण्यास सुरुवात होत असे. शेवटी मानाप्रमाणे, सर्वांना नमस्कार व आशीर्वाद असायचे. अगदी छोट्या ना गोड गोड पापा असायचा.आणि शेवट करताना, तुमची/ तुमचा प्रेमळ , आज्ञाधारक असे लिहिले जायचे. इकडे सर्व काही क्षेम आहे, आपल्याकडे लही सर्व क्षेम इच्छितो. असा आवर्जून उल्लेख असायचा.पत्र लिहून झाल्यावर एखादी गोष्ट आठवली तर खाली ता.क. ( ताजा कलम ) असे म्हणून लिहिली जायची.किती ओथंबलेले शब्द असायचे ते. वाचताना अंतकरण सद्गदित होऊन जायचं. जवळच असेल तर पत्र दोन दिवसात पोहोचून जायचे. पण लांबचे असेल तर आठ ते दहा दिवस सहज लागायचे.


          शुभ कार्याचे पत्र पाठवायचे झाल्यास, "कळविण्यास अतिशय आनंद होतो की" या शब्दाने सुरुवात व्हायची. आणि आवर्जून त्याच्यावर दोन थेंब कुंकवाचे शिंपडले जायचे. अधीरतेने दोन दोन वेळेस ते पत्र वाचले जायचे.याउलट दुःखद बातमी कळवायची झाल्यास, दोन ते तीन ओळीत मजकूर असायचा. पाठीमागच्या बाजूला काहीच लिहिलेले नसायचे.


         चांगलंच आठवते ,लग्न जमवतानाची पत्रं सुद्धा बऱ्याच वेळा आम्हीच लिहिली होती. कारण मजकूर सेम असायचा. फक्त नाव वेगळे असायचे. माझ्या भावाला मुलगी झाली होती. लगेच भेटायला जाणे काही जमले नव्हते. तेव्हा तुझ्या मदतीने, त्या छोट्या बाळाला मी किती छान पत्र लिहिलं होतं. किती सुंदर भावना व्यक्त केल्या होत्या. " पिल्लू तू कशी आहेस आईला जास्त त्रास देऊ नको. रात्री शांतपणे झोपत जा."वगैरे वगैरे.सर्वांना एवढं आवडलं होतं म्हणून सांगू. तेव्हा काही आतासारखे स्मार्टफोन नव्हते, अगदी दिवस राहिल्या पासून ते डिलिव्हरी पर्यंत, लाइव्ह प्रक्षेपण. अविस्मरणीय अशी आठवण म्हणजे लग्न जमतानाच्या वेळेची. पाहुण्यांचा होकार आलेला. पण आम्हाला मुलगा पसंत नव्हता. पण मुलाच्या वडिलांचा खूप आग्रह होता. शेवटी वाट पाहून पाहून मुलाच्या वडिलांचे पत्र आले. त्या पत्रातील मजकूर असा होता, " उल्का समजूतदार आहे. तिला योग्य निर्णय घ्यायला सांगा. हे संबंध जुळून आले तर यासारखा योग नाही." आजही ते पत्र डोळ्यासमोरून तरळून जाते. लग्न ठरल्यानंतर नवरोबाला लिहिलेले पत्र. एकदाच तीन फुलस्केप पत्र लिहिले होते. आजही ती आठवण मी जपून ठेवली आहे. अशा कितीतरी आठवणी आहेत, मनाच्या कप्प्यात जपण्यासारख्या. आजही जुनी आठवण समोर आली की मन हळवं होतं.


          लहानपणी खेळ खेळायचो. " मामाचं पत्र हरवलं ,ते मला सापडलं ". पण आता खरंच या इंटरनेटच्या जमान्यात पत्र हरवून गेलं आहे. आणि सापडण्याची सूतराम सुद्धा शक्यता नाही. आता हे पत्रातील शब्द, पेनाला झाकण लावून बंद करावे, असे कायमस्वरूपी बंद झाले आहेत. त्यावेळेस च्या त्या शाई पेनचा ओलावा कदाचित त्या शब्दांमध्ये येत असावा. नंतर नंतर बॉल पेन मुळे तो ओलावा कमी झाला. आणि सध्याच्या युगात तर, ओलाव्याची गरजच उरली नाही. कृत्रिमपणे यंत्रावर बोटे चालतात. आणि संदेशाची देवाणघेवाण होते. आजच्या 'डियर 'मध्ये प्रिय या शब्दाची मजा नाही, yours faithfully मध्ये आज्ञाधारक या शब्दाची किंमतच नाही.Flying kiss ने लहान मुलांना "गोड पापा" यातली मजाच निघून गेली.video call मुळे सर्व अपडेट्स वेळच्या वेळी मिळत राहतात. त्यामुळे उत्सुकता ,नावीन्य सर्वकाही संपून गेले आहे. "कसं काय सगळ ठीक आहे ना" असे विचारून नात्यांची राहिलेली बाकी ,बोलली जाते.


        हल्ली लग्न पत्रिका , आमंत्रण पत्रिका यावरच हे शब्द वाचावयास मिळतात. आधी हे शब्द लिहिले जात होते याचा सुद्धा हल्ली विसर पडत चालला आहे. असे शब्द आता वाचण्यात ही येत नाही आणि लिहिण्यात ही. मोबाईल सारख्या सहज संभाषण करणाऱ्या वस्तू उपलब्ध झाल्यामुळे, नवीन शोधांमुळे काही गोष्टी सोप्या झाल्या असल्या तरी, पत्र लेखन, पत्रातील शब्द , त्या शब्दांची जादू सर्वच काळाच्या ओघात कुठेतरी लुप्त झाल्यासारखे वाटते.


          पत्र आले की खूप आनंद व्हायचा. जपून ठेवण्यासारख्या आठवणी असायच्या. पण आता ते सगळं हरवून गेलं आहे. खरंच मित्रा, येतील का परत ते सोनेरी क्षण? वाचता वाचता, ओलावा टिपून घेणारे?

होईल का अंतकरण सद्गदित, त्या भावनांच्या ओलाव्याने.


कळावे...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational