पत्र
पत्र


त्याला त्याच्या घड्याळ आणि पैसे ठेवण्याच्या पाकिटा जवळ काहीतरी वहीच्या पानात गुंडाळून ठेवलेलं आढळलं, त्याने लगेच ती गुंडाळी ऊचलली आणि उघडून पाहिली.....! त्यात त्याच्या बायकोचा ,तिने तिच्या केसांत हौसेने माळलेला कालचा गजरा होता......आणि त्या कागदावर काहीतरी मजकूर लिहिलेला होता....!
त्या गजऱ्यात ओवलेली मोगऱ्याची फुले थोडी जरी कोमेजलेली होती, तरी अजूनही त्यांचा मंद ......मंद ......सुवास येतच होता . त्याने तो वहीचा कागद वाचायला घेतला.....हे तर ॠतुजाचं अक्षर आहे.....! सौरभ मनात म्हणाला......त्याची बायको त्यासाठी पत्र लिहून ठेवून गेली होती.
प्रिय सौरभ(अहो....!)
तुमचं नाव कधी घेतलंच नाही ना मी म्हणुन......तुम्ही जेव्हा हे पत्र वाचत असाल ,तेव्हा मी ह्या जगात नसेन कदाचित !......पण आपल्या अंश च लग्न, मी डोळे आणि मन भरून पाहिलं....डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर ६ महिने घेतले बघा मी कॅन्सरने मरण कवटाळायला सुध्दा ...! खुप जगले मी ह्या ६ महिन्यात जेवढी मी मागिल ५० वर्षांत नाही जगले,मरणं ऊभ होतं ना समोर मग त्याच स्वागत करायला नको होतं का अहो ? खूप हसले...खूप मन लावून जगले असं वाटलं ६०० वर्ष आनंदाने जगले मी........! पण.........?
मी गेले आहेचं....मी सुखी आणी आनंदात आहे.....मला तुमच्या विषयी थोडं बोलायचं होतं........तुम्ही खूप केलं माझ्या साठी,माझ्या ह्या दिर्घ आजारपणात साथ दिलीत,हवे तसे आणि लागतील तसे स्वः कष्टाने कमावलेले पैसे ही मागे पुढे न पाहता........का ? कशाला ? कशासाठी ? असं न बोलता वाट्टेल तसे खर्च केले तुम्ही...! सगळी नवरा म्हणूनची कर्तव्य कोठेही तसूभर कमी न ठेवता पार पाडली तुम्ही........पण मला जो माझ्या मनाशी एकरुप जीवन साथी हवा होता,तोच नव्हता तुमच्या मध्ये....मी खूप प्रयत्न केले....पण व्यर्थ........!
मला माहित झालं होतं....तुमचं माझ्या बरोबरच लग्न घाई घाईत आणि आई वडिलांच्या दबावाखाली झालं होतं....दुनियेस दाखवता येईल म्हणून मुलंही झाली.....पण तुम्ही माझ्या वर मनापासुनचं प्रेम कधिही नाही केलंत.....! निभवली ती लोकं काय म्हणतील ही भिती ?.....आणि जबाबदारीचीच ओझी वाहत राहिलात ..! तुम्ही मुक्त झाला आहात ह्या सगळ्या जबरदस्तीच्या ओझ्यातून........आता तरी स्वतः साठी जगा हीच विनंती आहे तुम्हाला.....मला तर माझ्या नवऱ्याच प्रेम नाही मिळाल पण .......तुम्हाला तुमचं प्रेम नक्कीच मिळेल......तुम्ही तुमच्या पुढील आयुष्यात पुढे जात रहा......प्रेमाला वय नसतं.......तुम्ही खंबीर रहा फक्त....दुनिया काहीही म्हणेल तुम्ही फरक नका पाडूून घेऊ......!
मी कित्येक वेळी, वेळोवेळी घटस्फ़ोटा विषयीही बोलले....पण......तुम्ही एवढे त्या जबाबदारीच्या गुळगुळीत शब्दाला मानत आणि झेलत होतात, की त्या ओझ्याखाली मी सुद्धा चिरडली, भरडली जाते आहे...? हे ही तुमच्या लक्षात नाही आलं कधिही.....!
पण तुम्हाला जीवनाने आणि आयुष्याने परत एक संधी दिली आहे, कृपया त्या संधीचा पुरेपूर फायदा घेत उर्वरित आयुष्य ताण विरहित जगा ! आनंदाने उपभोगा स्वतःसाठीही हीच माझी मागणी आहे तुमच्या कडे.........!
तुमची ............तुम्हाला ओझं वाटतं असलेली ,आता ह्या जगात नसणारी तुमची ............ बायको (ऋतुजा).......!
हे पत्र वाचून सौरभच्या हातातून तो गजरा निसटून खाली पडला होता...... आणि त्याच्या हाती राहिला तो फक्त तिने आयुष्यात माळलेल्या आठवण रूपी मोगराचा सुगंध....!