STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational

2  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational

पतीसोबत वनवासी - आधुनिक सीता

पतीसोबत वनवासी - आधुनिक सीता

4 mins
212

           सध्याच्या काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा नकळतच माझ्या डोळ्यासमोर येतात त्या आदरणीय डॉ.राणी बंग. अत्यंत उत्तुंग अशा या व्यक्तिमत्वाबद्दल आज थोडं लिहिण्याचा प्रयत्न करतेय.


        माझे बाबा सामाजिक क्षेत्रात कार्य करायचे .अशाच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते ' शोधग्राम ' ला जाऊन आले. ते ज्या संघटनेशी निगडित होते त्यातीलच ठाकुर दासजी बंग हे एक मोठे व्यक्तिमत्व होते आणि त्यांचाच मुलगा डॉ. अभय बंग आणि सून डॉ.राणी बंग यांनी निर्मिलेल्या शोध ग्राम येथे तो कार्यक्रम होता. ते तिथून आले ते त्यांच्या कार्याने भारावूनच! सोबत माझ्यासाठी डॉ. गोविंद कासट यांनी लिहिलेले " ध्येयवेडे दाम्पत्य ' हे पुस्तक घेऊन आले. पुस्तक वाचल्या नंतर आजच्या काळातही एवढी त्यागी आणि सेवाभावी लोकं बघून मी पण भारावून गेले. मनात आपसूकच त्यांच्याविषयी आदरभाव अन् बघण्याची ओढ निर्माण झाली.


        काय योगायोग बघा,माझ्या आईच्या स्मृतीनिमित्त होणाऱ्या व्याख्यान मालेसाठी माझ्या बाबांनी डॉ. राणी बंग यांना पाचारण केले अन् त्यांना अगदी जवळून बघण्याचा अन् अनुभवण्याचा योग मला लाभला. अगदी पाहता क्षणी स्तिमित व्हावं अशा सात्विक सौंदर्याच्या धनी असलेल्या डॉ. राणी बंग. पाहताक्षणीच त्यांच्या व्यक्तिमत्वाने भारले जातो आपण. अतिशय विनम्र स्वभाव, कुठलाही बडेजाव नाही, ना कुठले आभूषण ना चेहऱ्यावर कसलीही लेपणं. तरीही चेहऱ्यावर विलसणारे बुद्धिमत्ता अन् कर्तृत्वाचे अलौकिक तेज.अत्यंत साधेपणा मधे झळकणारे सात्विक सौंदर्य!त्यांना पाहिल्यावर वनवासी सीतेचे अलौकिक रूप डोळ्यांसमोर तरळले.

              

               डॉ. राणी अभय बंग,पूर्वाश्रमीच्या डॉ. राणी चारी. चंद्रपूर येथील प्रतिथयश डॉक्टर असलेल्या डॉ.चारी यांच्या कन्या. घरी अफाट श्रीमंती. आमच्या इथले डॉ .काका त्यांचे बॅचमेट ते सांगतात की त्या काळी सुद्धा त्या स्वतः च्या गाडीने कॉलेज मधे यायच्या. दक्षिणेतील अय्यंगार ब्राम्हण कुटुंबातील असलेल्या. स्वतः ला अतिशय उच्च समजणारी ही जमात.अशा कुटुंबातील डॉ .राणी! अन् डॉ. अभय हे मारवाडी कुटुंबातील. मात्र त्यांचे कुटुंब विनोबाजिंच्या विचारांनी भारलेले. खादि धारी,सेवेचा त्यागाचा वारसा सांगणारे. दोन्हीं कडच्या परिस्थिती मध्ये इतकी तफावत! त्यातही राणींचे वडील हे कुळाचा वृथा अभिमान बाळगणारे.परिणाम व्हायचा तोच झाला राणींच्या वडिलांचा या लग्नाला प्रचंड विरोध! पण राणीही तेवढ्याच हट्टी !"मी लग्न करीन तर याच मुलाशी नाही तर नाही." ही त्यांचीही जिद्द. त्यामुळे काही मोठ्या मंडळीनी शिष्टाई करून हा विवाह घडवून आणला. जोअत्यंत साधेपणाने आणि नेमक्या वीस ,पंचवीस लोकांच्या उपस्थितीत पार पडला.


            लग्न झाले अन् अगदी नावाप्रमाणेच वाढलेल्या राणी ह्या अत्यंत सेवाभावी कुटुंबात सून म्हणून आल्या. डॉ अभय हे MD medicine अन् डॉ. राणी स्त्री - प्रसूती रोग तज्ञ.दोघांनीही आपली सेवा सुरू केली. त्यांचे सुरवातीचे सामाजिक कार्य पाहून जॉन हाफकिन विद्यापीठ , बाल्टिमोर,अमेरिका येथून त्यांना फेलोशिप करण्यासाठी पाचारण करण्यात आले. तेव्हा त्यांचा मुलगा लहान असल्याने त्यांच्या मुलासहित त्यांच्या राहण्याचा व शिक्षणाचा सर्व खर्च विद्यापीठातर्फे देऊ केला गेला. 1985 मधे फेलोशीप पूर्ण झाली. त्यांच्यासाठी सगळी क्षितिजे खुली असतांनाही हे दाम्पत्य मात्र भारतात परत आले अन् अती दुर्गम ,नक्षलग्रस्त ,आदिवासी बहुल अशा गडचिरोली जिल्ह्यात त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली.


          सीतेने जसा पतीच्या मागोमाग वनवास पत्करला तसाच या आधुनिक सीतेने पतीच्या साथीने स्वेच्छेने वनवास पत्करला.दोघांनीही आपले कार्य सुरू केले. मूळ प्रवाहापासून फटकून राहणाऱ्या आदिवासींची मने जिंकली.त्यांचा विश्वास संपादन केला. ज्यांच्यासाठी कार्य करायचे त्यांना काही प्रोब्लेम नव्हताच. पण मग गांधी विचारांनी प्रेरित या दांपत्याने दारूबंदी विरोधात मोहीम राबवली कारण ह्या गोष्टीचा या लोकांच्या आरोग्यावर पडणारा परिणाम त्यांना कळला होता. अन् इथेच गडचिरोली मधील एक विशिष्ट लॉबी त्यांच्या विरोधात उभी ठाकली.त्यांच्या विषयी अपप्रचार,त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या, आदिवासींना त्यांच्या विरुद्ध भडकवणे असे प्रकार त्यांनी सुरू केले.


            एके दिवशी मात्र यांच्यापैकी एकाच्या घरी एक गरोदर स्त्री नडली अन् त्याला डॉ. राणीकडे जण्यावाचून पर्याय उरला नाही. नेमके तेव्हा डॉ. अभय घरी नाही, लहानगा मुलगा घरी टाकून केवळ कर्तव्य पूर्ती म्हणून राणी रात्रीच्या अवेळी त्यांच्या मदतीला गेल्या अन् त्या क्षणापासून त्यांचे हृदय परिवर्तन होऊन त्यांचीही मोलाची साथ त्यांना लाभत गेली. अशाप्रकारे ' शोध ग्राम ' चे कार्य दुप्पट जोमाने पुढे जाऊ लागले.राणी तिथल्या आदिवासी स्त्रियांमध्ये एवढ्या समरस झाल्या की त्या देखील त्यांना आपली सखी समजून त्यांची सांसारिक गुपिते, तेथील औषधी वनस्पती त्यांचे गुणधर्म त्यांचे उपयोग याबद्दल बिनधास्त माहिती सांगू लागल्या.


             डॉ राणी यांनी या साऱ्या स्त्रियांच्या आरोग्याचा अभ्यास करुन ग्रामीण भागातील स्त्रियांच्या आरोग्य समस्या,त्यांचे निदान उपचार आदींवर शोध प्रबंध सादर केला. डॉ.अभय यांनी बालमृत्यू वर संशोधन करून बालमृत्यू दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपययोजना शोधून काढल्या. तेथीलच सामान्य कर्मचारी वापरू शकतील अशा साध्या सोप्या पद्धतीने त्यांनी त्यावर उपाययोजना केली. त्यांची ही पद्धत भारतासह अन्य देशांमध्येही प्रभावीपणे वापरली जाते.


           या दोघांच्याही अमूल्य अशा योगदानाकरिता अनेक पुरस्कारांसह ' महाराष्ट्र भूषण ' या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. आदिवासी स्त्रियांकडून प्राप्त झालेल्या महितीमधून अन् स्वतः चे अनुभव यातून डॉ . राणी यांनी 'गोईण' आणि ' कानोसा ' ही दोन पुस्तके निर्मिली. यातील गोईण या पुस्तकात आदिवासी स्त्रियांकडून कळलेली औषधी वनस्पती त्यांचा उपयोग ,जंगलातील झाडे,खाद्यपदार्थ ,वनस्पतींचे इतर उपयोग याबद्दल संकलित माहिती आहे .पुस्तकाचे नावही अगदी समर्पक गोईण म्हणजे मैत्रीण. तर दुसरे पुस्तक कानोसा यात त्यांची संस्कृती,स्त्री पुरुष संबंध,जीवन प्रजनन याबद्दल त्या स्त्रियांनी मोकळेपणाने सांगितलेली माहिती आहे.


           डॉ. राणी या केवळ एक डॉक्टरच नाही तर एक उत्तम वक्त्या आहेत.. सर्व च विषयांचा त्यांचा व्यासंग उत्तम आहे. संवाद साधत त्यात आरोग्यविषयक उद्बोधन करण्याची त्यांची शैली अद्भुत आहे. स्त्री सुलभ दागिने या प्रकाराचा या स्त्री ला अजिबात मोह नाही. नवीन दागिना बनवणे तर दूरच पण त्यांनी त्यांना स्त्रीधन म्हणून मिळालेले दागिने सुद्धा समाजकार्यासाठी दान केले. सीतेला तरी कांचनमृगाचा मोह झाला होता पण ही आधुनिक सीता मात्र अगदी निरिच्छ आहे......!


       अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला टिळक महारा्ट्र विद्यापीठातर्फे डी लिट पदवी देऊन गौरविण्यात आले. 2003 मधे महाराष्ट्र भूषण अन् 2018 मधे पद्मश्री देऊन गौरविण्यात आले.हा जसा त्यांचा सन्मान आहे तसाच हा सन्मान त्या पुरस्कारांचा सुद्धा आहे असे मला वाटते.


          अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला ,आधुनिक डोळस सीतेला माझ्या लेखणी तर्फे मानाचा मुजरा!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational