डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational

4.5  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational

# प्रत्येकात च असते काहीतरी...

# प्रत्येकात च असते काहीतरी...

3 mins
341


   मी माझ्या मनात एके काळची ही गोष्ट. एक गाव होते. अगदी छोटेसे ,टुमदार अन् समृद्ध! गावची लोकं एकमेकांशी गुण्यागोविंदानं राहायची. गावात विविध प्रकारची झाडं शोभेसाठी आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी लावलेली होती. गावाच्या अगदीच सुरवातीला असलेले गुलमोहोर अन् पळसाचे झाडही तिथे त्या गावाची शोभा वाढवत दिमाखात उभे होते.


तिथे जवळपासच घर असलेल्या व्यक्तीने ही दोन्ही झाडं लावली होती. आणि तोच नित्यनेमाने पाणी वैगरे घालून त्यांची निगा राखत असे. सोबतच लावलेली ही दोन्ही झाडं जणू हातात हात घालून दिसामाजी भावंडांसारखी मोठी होत होती. बघता बघता ती दोन्ही झाडं बरीच मोठी झाली.


गुलमोहोर अगदी ऐटबाज, रुबाबदार! त्याचा डौल काही औरच असायचा. पळस सुद्धा आपल्यापरीने छानच होता पण बिचारा अगदी साधा सरळ धोपट. गुलमोहोराच्या त्या डेरेदार रूपाचा पळसाला नेहमी हेवा वाटायचा अन् त्या तश्या सौंदर्यासाठी स्वतः ला कमी लेखत तो नेहमीच देवाकडे आपले गाराणे सांगत बसायचा.


पाहता ,पाहता दोन्ही झाडं बरीच मोठी झाली. किशोरवय संपून यौवनात आली.जसे जसे वय वाढत गेले तसा गुलमोहोराचा पानांचा घेरा अजून वाढून तो अजून डेरेदार दिसायला लागला. त्याच्या त्या कंच हिरव्या फांद्या ,हवेबरोबर होणारी त्या पानांची सळसळ सगळं इतकं मोहक असायचं की बस! आणि त्या झाडाची पाडणारी मोठी सावली .गावातल्या सगळ्या मुलांच्या खेळण्याचे अन् विसव्याचे ठिकाण ते झाड मग नकळतच बनत गेले. पलाश मात्र बाजूला उभे राहून हे सारे खेदाने बघत बसे. नाही म्हणायला अधा मधात लोकं पळसाची पानं अधून मधून ओरबाडून तेवढी न्यायची तेवढाच त्याचा उपयोग...!


हिवाळा संपून जसजशी उन्हाळ्याची चाहूल लागायला लागली तसे त्यावर्षी दोन्ही झाडांचे रंग रूप पालटू लागले. फाल्गुन मास येताच पळस छोट्या छोट्या कळ्यांनी बहरून गेला .काही दिवसांतच त्या कळ्यांचे सुंदर केशरी फुलांमध्ये परिवर्तन झाले.फुलांनी लगडलेल्या त्या झाडावर मग पक्ष्यांचे कुजन सुरू झाले. त्याचे ते अमाप साैंदर्य पाहून सारे त्याच्या राजबिंड्या रुपाची तारीफ करु लागले.


काही दिवसांतच ते पूर्ण झाडच फक्त फुलांनी बहरून गेलं. फुलांच्या रंगाने रंगणारे हात बघून मग मुलांनी होळीसाठी त्या रंगाचा वापर केला अन् पलाश पहिल्यांदा खुदकन हासला.पण त्याचं ते हसू काही काळच टिकले.काही दिवसांनी च दिमाखदार गुलमोहोर लालसुंदर,पिवळी छटा असलेल्या तूर्रेबाज फुलांनी बहरून आला.


साहजिकच काही पक्षी आणि मुलांचा रोख मग पुन्हा गुलमोहोर कडे वळला.पक्ष्यांची किलबिल त्याही झाडावर सुरू झाली.खाली पडलेल्या फुलांच्या तूर्र्यांच्या मुलं झुंज लावण्याचा खेळ खेळू लागले.हे सगळं पाहून पलाश पुन्हा हिरमुसला.


एके दिवशी उन्हाळ्यात भर उन्हात एक कुटुंब त्या रस्त्याने मार्गक्रमण करत होते.तिथली डेरेदार झाडाची सावली बघून ते विश्रांतीसाठी तिथे थांबले. त्यांनी जवळचा शिदोरीचा डबा उघडला. अरे पण खाणार कशात? त्या माणसाने मग पळसाची काही पाने तोडून बारीक काड्यांच्या साहाय्याने सुंदर पत्रावळी तयार केल्या आणि ते मनसोक्त जेवले. जेवल्यानंतर वामकुक्षी घेतांना ते गृहस्थ मुलांना त्या दोन्ही झाडांची ओळख करून देऊ लागले.


"  हा बघा गुलमोहर भर उन्हातही कसा फुलून आलाय.., आपल्या सावलीने ,रंग रूपाने एवढ्या भर उन्हात , ग्रीष्माच्या झळांमधूनही आनंद ,सौजन्य वाटतं फिरतोय. आपल्या मोहराने पक्षी अन् वाटसरुंना उल्हसित करत असतो हा पांगारा..! असेच आनंद वाटत राहवे माणसाने सुख दुःखातही.


गुलमोहोर तर सुंदर डेरेदार आहेच.पण पळसाचे मात्र भरपूर फायदे आहेत. फुलांचा उपयोग रंग बनवण्यासाठी.परत फुलं टाकून घेतलेलं पाणी प्यालाने उन्हं लागत नाही.पानांचा उपयोग पत्रावळींसाठी.अन् पळसाच्या शेंगांमधल्या बियांपासून तेल मिळते ते वेगळेच..!साबण ,साैंदर्य प्रसाधनांनसाठी सुद्धा या तेलाचा उपयोग केला जातो. " ते गृहस्थ मुलांना दोघांचेही गुणवैशिष्ट्ये सांगत होते.


स्वतः चे एवढे उपयोग अन् कोडकौतुक ऐकून आता मात्र पळस खुलला होता.अन् त्याचा न्यूनगंड कुठच्या कुठे पळाला होता.


मित्रांनो सांगायचे तात्पर्य एकच की प्रत्येकात च काही ना काही वैशिष्टय असते.प्रत्येक च जण हा वेगळा असतो अन् प्रत्येकाची जगण्यामागची भूमिका वेगळी असते. कुणाशी कुणाची तुलना होऊच शकत नाही.आपापल्या परी प्रत्येकच वेगळा असतो.कुणी छान नाचतो,कुणी गातो,कुणी नकला करतो तर कुणी त्या लिहून काढतो. कुणाचं अक्षर सुंदर तर कुणाची चित्रकला सुंदर तर कुणाला समोरच्याला गप्पांमध्ये रिझवण्या ची कला अवगत. कुठे कुणाच्या उंचीचा फायदा तर कुठे कुणाच्या ठेंगणेपणाचा.प्रत्येकाकडे च काहींना काही असतेच. फक्त स्वतः मधले ते नेमकेपण ओळखून त्याचा योग्य उपयोग करण्याचे कसब येणे मात्र महत्वाचे...!

जसे लठ्ठ लोकं त्यांच्या लठ्ठ पणाचा उपयोग हास्य निर्मिती साठी करून घेतात.



स्वत:चे गुण जसे आपण मिरवतो ना स्वतः ची व्यंग सुद्धा मिरवता आली पाहिजेत. आपली बलस्थानं आपल्याला ओळखता आली पाहिजेत अन् त्यांचा सुयोग्य उपयोग सुद्धा करून घेता आला पाहिजे कारण

" प्रत्येकात च असते काहीतरी!



लेखन शेअर करायचे झाल्यास कृपया नावासहितच शेअर करा. कारण साहित्य चोरी हा कायदेशीर अपराध आहे.

धन्यवाद!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational