Neelima Deshpande

Romance Inspirational

3.9  

Neelima Deshpande

Romance Inspirational

प्रथा आणि परंपरा तुला - मला सारख्याच

प्रथा आणि परंपरा तुला - मला सारख्याच

4 mins
518


'मांडव परतणीसाठी' माहेरी गेलेल्या श्रद्धाला सासरी परत घेवून येण्यासाठी तिचा नवरा, 'आकाश' आज त्याच्या सासरी म्हणजे श्रद्धाच्या घरी त्यांच्या लग्नानंतर पहिल्यांदा जाणार होता. निघण्यापूर्वी त्याने श्रद्धाला तसे कळवावे म्हणून फोन केला तो नेमका तिच्या लहान बहिणीने म्हणजे आभाने उचलला. फोनवर त्याची मस्करी करत आभाने त्याला विचारले, 

"काय ताईशिवाय करमत नाही वाटतं! आज येणारच आहात ना न्यायला? तरी खास फोन करताय निघण्याआधी!"  


आकाशही तसा मस्करीच्या मूडमध्ये होता, त्यानेही मग मस्करी करत आभाला म्हटले, "नाही गं, मी तुझ्या ताईसाठी फोन नाही केला. मला खरंतर तुझ्याशी बोलायचं होतं. नाही म्हणजे माझी सख्खी मेव्हणी म्हणून तुझी जबाबदारी आज तू कशी पार पाडतेस? हे जाणून घ्यायचं होतं. म्हटलं तू विसरली असशील तरी मी आठवण करून देतो, की मी आज तुमच्या घरी म्हणजे, माझ्या सासरी पहिल्यांदाच येतोय लग्नानंतर. मग माझ्या स्वागतासाठी काय तयारी केली तुम्ही?"  


आता मात्र आभा विचारात पडली... यांना काय म्हणायचं असेल? पण दुसऱ्याच क्षणी चाणाक्ष आभाच्या लक्षात आलं आणि ती म्हणाली, "भाऊजी तुम्ही घरी तर या! सगळी तयारी झाली आहे तुमच्या स्वागताची! आत्ताच कशाला सांगू मी? तुम्ही पहालंच ना आल्यावर. वाट बघतोय आम्ही. या लवकर." 


आभा आणि तिच्या घरातल्यांनी जावई प्रथमच घरी येणार म्हणून स्वागताची तयारी तर केलेली असणार, आणि म्हणूनच आभा एवढी निश्चिंत होऊन आपल्याला बोलावते आहे असे आकाशला वाटले. तो त्या आनंदातच श्रद्धाला परत आणण्यासाठी तिच्या माहेरी निघाला. दाराजवळ गाडी थांबताच श्रद्धाच्या सगळ्या मैत्रिणी, चुलत मावस बहिणी दारात येऊन थबकल्या आणि त्यांनी आकाशची वाट अडवली.  


"आभा कुठे दिसत नाही!", असे म्हणत तो घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना आभा हातात त्याला ओवाळण्याचे ताट घेऊन समोर आली. तिच्यासोबत श्रद्धाही होती आणि पाठोपाठ श्रद्धाचे आई वडील आणि घरातील इतर सारी मंडळी. श्रद्धा खूप सुंदर दिसत होती. दोन दिवस माहेरी राहिल्याचे समाधान असेल. त्या निमित्ताने घरी अजूनही थांबलेल्या काही जवळच्या नातेवाईकांसोबत, जिवाभावाच्या मैत्रिणी आणि बहिणींच्यासोबत तिला लग्नानंतर वेळ घालवता आला म्हणून ती खूश असावी असा विचार करत तो दारात उभा असताना त्याला आश्चर्याचा धक्का बसला.


श्रद्धाला नव्या घरात, तिच्या सासरी प्रवेश करताना ज्या गोष्टी त्याच्या घरच्यांनी केल्या होत्या त्या सगळ्यांची तयारी श्रद्धाच्या घरच्यांनीही त्याच्यासाठी केली होती. या अशा पद्धतीच्या स्वागताची त्याने अजिबातच कल्पना केली नव्हती.


आभा त्याला म्हणाली, "कसं वाटलं आमच स्वागत? समानतेचा हक्क स्त्रियांसोबत पुरुषांचाही आहे आणि म्हणूनच ताईचं तुम्ही जसं स्वागत केलं तसंच आम्हालाही तुमचं करायचं होतं."


"तुमचा लग्नानंतरचा, आमच्या घरातला पहिला प्रवेश तुमच्याही लक्षात रहावा यासाठी. तुम्हाला काही आनंदी क्षण देता यावे असा आमचा विचार झाला होता. लग्नात आम्ही बरीच थट्टा-मस्करी केली ती, तुम्ही आणि तुमच्या घरच्यांनी खेळीमेळीने आणि आनंदाच्या वातावरणात आमच्यासोबत मजा घेत अनुभवली हे आम्हाला आवडलं होतं." हे ऐकल्यानंतर आकाश मनातून सुखावला होता. त्याच्या गालावर हसू उमटताच, त्याची दुसरी एक मेव्हणी त्याला उखाणा घेण्यासाठी आग्रह करत होती.


माप ओलांडण्यापासून ते उखाणा घेण्यापर्यंत आणि ओवाळणीपासून ते स्वतःची नवी ओळख, आवडीनिवडी घरात जमलेल्या सगळ्यांना सांगण्यापर्यंत! सगळ्या गोष्टींचा सुखद अनुभव त्याला देण्यात आला. स्त्री-पुरुष समानतेचे बरेच किस्से त्याने ऐकले होते पण त्याच्या स्वतःच्या बाबतीतला हा अनुभव त्याने कधी त्याला मिळेल असा स्वप्नातही विचार केला नव्हता. हे त्याने मग तिच्या घरच्यांचे आभार मानत कबूल केले. 


तिच्या आई-वडिलांनी त्याला आशीर्वाद देत आणि त्याचे कौतुक करत त्याला सांगितले,"आमच्यासाठी समानता म्हणजे दोघांना मग ती स्त्री अथवा पुरुष कोणीही असो त्यांना आपल्या रूढी परंपरा आणि मान्यता यानुसार समान कौतुक आणि सारखेच आनंदाचे क्षण मिळावेत असं आहे. कारण साऱ्या रूढी-परंपरा आपण एकमेकांना आनंद देण्यासाठी बनवलेल्या आहेत आणि आजवर पाळतो आहोत. त्यात कोणा एकाला अधिक कौतुक, अधिक मानसन्मान किंवा प्रेम मिळत गेलं, तर दुसरा दुखावण्याची शक्यता असते. या पद्धतीचा अन्याय नव्या पिढीवर होऊ नये ही आमची, म्हणजे घरातल्या मोठ्या जुन्या पिढीच्या माणसांची जबाबदारी आहे. तेव्हाच तर तुम्हाला दोघांनाही यापुढचे आयुष्य एकमेकांना सांभाळून घेत, जिथे योग्य आहे तिथे कोणा एकाने एखादं पाऊल मागे घेत... आणि दुसऱ्याला आधार देत आनंदाने जगायचे आहे हे कळेल. आम्हाला तस ते आमच्या कृतीतून शिकवता येईल." 


"रूढी परंपरा पाळताना स्त्री-पुरुष न बघता आनंद, मानसन्मान आणि बंधन ही दोघांसाठीही असावीत!" ही समानतेची व्याख्या आज आकाशला त्याच्या सासरी शिकायला मिळाली.


"आम्ही आता परत घरी जायला निघू का ?" असे त्याने विचारताच तिच्या मैत्रिणींनी मागणी केली.


"एवढ्यात नाही जाऊ देणार आम्ही तुम्हाला! आम्ही केेेलल स्वागत आणि कौतुका सोबतच, तुम्हाला आता एक तुमचे कर्तव्य करायचे आहे. ते केल्याशिवाय आम्ही मैत्रिणी तरी तुम्हाला जाऊ देणार नाही." असे त्यांनी म्हटल्यावर आकाश त्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी उठला. "कोणते कर्तव्य?" असा प्रश्न पडलाय का तुम्हाला? "घरी आलेला जावई मांडव परतणीनंतर मुलीला घेऊन जाताना, मुलीची ओटी भरून पाठवू... तसेच आपण जावयालाही हातात काहीतरी गिफ्ट देऊ."


या चर्चेला तिच्या मैत्रिणींनी एक छोटेसे गमतीदार रुप देण्याचा आग्रह केला. ते म्हणजे आकाशने एकट्याने किचनमध्ये जाऊन सर्वांसाठी चहा बनवावा! आणि मग जावयाच्या हातून सासरी केलेल्या या पहिल्या पदार्थाला दाद देत त्याला ती भेटवस्तू द्यावी... अशा गोड पद्धतीने संसाराची सुरुवात होणार असेल तर आणखी काय हवं...


संसारिक आयुष्यात, गरज पडेल तिथे दोघेही तडजोडी करा... समानता राखा... आणि प्रेमाने रहा! हे सांगण्याची गरजच भासत नाही. आकाशने बनवलेला चहा पिऊन सगळे खूश झाले आणि गोड, सुखाचे अनुभव घेत दोघे परत घरी निघाले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance