प्रियांश...१
प्रियांश...१
लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील नवा जन्मच असतो! जन्मापासून जे काही आयुष्य जगलेलं असतं, ते सारं विसरून नव्या घरी पुन्हा नवी सुरुवात असते, हे कोणत्याही मुलाला कधीच उमगू शकत नाही, सकाळी उठल्यापासून ते जेवणाच्या फोडणीपर्यंत सारंच बदलत, हक्काने मिरवणारी मुलगी दुसऱ्या घरी जाऊन परकीच राहते हे मात्र नक्की! अगदी कोणाला काय नावाने बोलवायचं हा हक्क सुद्धा तिला नसतो, दीर असो वा नणंद एक हक्काचं मैत्रीच नातही मग फुलण्याआधीच परंपरांच्या नावाखाली कोमेजून जात!
नव्या घरात हक्काचा माणूस हा नवराच असतो, त्यानं सार समजून घेऊन वेळीच नात्यांना भरकटू नाही दिलं तर घराच नंदनवन होत म्हणूनच बोलत असावेत ज्या घरी सुनांच्या हसण्याचा खिदळण्याचा आवाज येतो त्या घरात लक्ष्मी टिकून राहते. कसं आहे ना, हे सारं सायकॉलॉजीकल आहे, शेवटी घरातील स्त्री खुश तर, घरी शांतता, प्रेम टिकून राहतं. आता हे प्रत्येक पुरुषाच्या हातात आहे, त्याला घरात सून आणायची आहे की आयुष्याची सोबती! जी घरातील प्रत्येकासोबत हसमुख, फ्रेंडली राहील.
शेवटी काय, फक्त मुलगी ऍडजस्ट करते असं नसतं, सारं घर सुद्धा ऍडजस्ट होत असतं, फक्त सर्वांनी काळानुसार चालावं म्हणजे दोन पिढ्यांमध्ये मतभेद होणार नाहीत. जुने बदलणार नाहीत पण त्यांनी नव्या पिढीच स्वतंत्र आयुष्य प्रश्नार्थक भावात घेऊ नये, उलटा मोठया मनाने जगण्याची मुभा द्यावी, कारण, नको इतकी रोकटोक ना त्यांना आवडेल ना नव्या पिढीला.
सुवर्णमध्य साधा, जगा आणि जगू द्या तेही खळखळून हसून!
