# परिवर्तन
# परिवर्तन
आयुष्यात छोट्या गोष्टीमध्ये आनंद लपलेला असतो हे सांगणारी ही गोष्ट. पैसे म्हणजे सर्वस्व नाही. हा लेख वाचून नक्की सांगा कसा वाटला. कंमेंट करायला विसरू नका.
शिल्पा एक वर्किंग वुमन होती . तिचा नवरा गर्भश्रीमंत त्यामुळे पैशाची अजिबात चणचण नव्हती. रोजच्या पार्ट्या,ड्रिंक, हॉटेलिंग हे तर त्यांची जीवनशैली बनून गेली होती. पण एकुलत्या एक मुलाकडे मात्र दोघांचे लक्ष नव्हते.
मुलगा आदित्य नेहमी आईवडिलांच्या प्रेमासाठी तळमळत असे. त्याला सांभाळण्यासाठी एक आया होती. तिचं नाव पारू. ती आदित्यवर खूप जीव ओवाळून टाकत. त्यामुळे आईची जागा आयाने घेतली होती. त्याला वेगवेगळे आवडीचे पदार्थ खायला करून घालत. शिल्पाला ऑफिशिअल काम त्याबरोबर पार्ट्या, शॉपिंग, सिनेमा, हॉटेल हा तिचा ठरलेला दिनक्रम या पलिकडेही जग असते हे ती विसरून गेली होती.
कोरोनामुळे लॉकडाउन झाले. सगळीकडे बंदी, त्यामुळे वर्क फ्रॉम होम. आता आया घरी येणे शक्य नव्हते म्हणून शिल्पाला स्वयंपाक करावा लागत. शिल्पाला काही करायला जमत नसे, पण आता काही ऑप्शनही नव्हता. तिने केलेला स्वयंपाक पाहुन तिचा नवरा आणि मुलगा जेवत ही नसे. अत्यंत बेचव असा स्वयंपाक करत. तिचा मुलगा सतत म्हणत आई पारू आईला बोलाव ना.... त्या तुझ्यापेक्षा खूप छान स्वयंपाक बनवतात. आदित्यच्या तोंडातून आलेला पारुसाठी 'आई' शब्द शिल्पा पहिल्यांदाच ऐकत होती. पारुनेही आईसारखा त्याला जीव लावलेला होता. आदित्य जेवण करत नव्हता. त्यामुळे नाइलाजाने पारूला बोलवावे लागले. तिची घरी राहण्याची सोय शिल्पाने केलेली होती.
दुसऱ्या दिवशी पारू सकाळी तिच्या मुलाला म्हणजे गणेशला घेऊन शिल्पाच्या घरी राहण्यासाठी आली. त्यादिवशी पारुने सकाळी केलेले मेथीचे पराठे बघून आदित्यच्या तोंडाला पाणी सुटले. तो लगेच ताट घेऊन गणेशला बरोबर घेऊन पराठे खायला बसला. पारुने पराठ्यावर गरम साजूक तुपाची धार सोडली होती. दोघेही गरम पराठ्यावर ताव मारताना शिल्पा पाहत होती. शिल्पाच्या तेव्हा लक्षात आले मुलांचे आईच्या हातून भरलेले पोट यातही किती सुख आहे.....!! याकडे आपण कधीच लक्ष दिले नाही. त्यानंतर गणेश आदित्य दोघेही खेळायला गेले. दुपारी काम झाल्यावर पारू गणेशचा अभ्यास घेत होती . आदित्यही त्यांच्याबरोबर बसलेला होता. गणेशचे रामरक्षा, अथर्वशीष, मारुती स्तोत्र अजून बरंच काही तोंडपाठ बघून शिल्पा त्याच्याकडे अवाक् होऊनच पाहत होती. कपडे साधे घातलेल्या गणेशची बुद्धी पाहून पारू सर्वसामान्य घरोघरी जाऊन काम करणारी स्त्री पण मुलाला किती प्रेमाने वाढवले आणि त्याबरोबर हुशारही किती तो....? पाहून शिल्पाला तिची तिलाच लाजल्यासारखं झालेलं होतं.
रात्रीही जेवताना किती छान जेवण बनवले आहे ना पारुने....! असे नकळत शिल्पाचा नवरा बोट चाटत बोलत होता. हे ऐकून शिल्पालाही तिचं स्त्रीत्व आज कोठेतरी कमी पडलंय असं वाटू लागलं.
ती मनातच आज विचार करत बोलत होती, "आदित्यला आज सर्वकाही त्याला हवं नको ते दिले,पण आईच प्रेम कोठेतरी कमी पडल्याची जाणीव तिला झाली. रात्री झोपताना पारू गणेशला गोष्ट सांगत होती. तो ती आवडीने ऐकत होता. आदित्यने आईला विचारलं आई मी जाऊ का पारू आईकडे....? ती ही हो म्हणाली.. पारुने दोघांना गोष्टी सांगून अंगाई गीत गाऊन शांत झोपवले.
शिल्पाला तिच्या रात्रीची आठवणं झाली. रोज रात्री पार्ट्या करून स्वतःच्या तालात येणाऱ्या शिल्पाला स्वतःची खूप लाज वाटली. या बालमनाशी आपण किती चुकीचे वागत होतो... यावर शिल्पाला खूप पश्चाताप होतं होता. तिने यावर प्रायश्चित्त करायचं ठरवलं. शॉर्ट ड्रेसवर वावरणारी शिल्पाने आज सकाळी छान पायजमा कुढता चढवला. सुंदर नाजूक टिकली लावून दिवसाची सुरुवात केली. पारूबरोबर आज तिनेही स्वयंपाक केला. पारुकडून तिने न लाजता स्वयंपाक कसा करायचा शिकून घेतला. नवऱ्यानेही शिल्पाचा नवा लुक पाहून छान दिसतेस अशी दाद दिली.
शिल्पा आई झाली होती,पण तिचं कमी पडलेलं मातृत्व ती आज भरून काढत होती. आदित्यला आज तिने स्वतःच्या हाताने भरवले तिलाही त्यात आनंद वाटला आणि आज तिला पैशातून मुलाला दिलेल्या सुखापेक्षा तिचं दिलेले प्रेम मोलाचं वाटलं खऱ्या अर्थाने तिने आयुष्यातला मातृत्वाचा आनंद पारुमुळे अनुभवला.
