Prasad Kulkarni

Inspirational

3.4  

Prasad Kulkarni

Inspirational

प्र प्रेरणेचा. 'गोष्ट नंदिताची

प्र प्रेरणेचा. 'गोष्ट नंदिताची

8 mins
765


नंदिता मॅडमनी विद्याविकास शाळेच्या भव्य प्रवेश द्वारातून आत प्रवेश केला आणि त्याचवेळी त्यांची कर्मभूमी असलेल्या या शैक्षणीक वास्तुकडे एक आदरयुक्त कटाक्ष टाकतानाच त्यांची मान किंचित लवली. हे नित्याचच होतं. जवळ जवळ गेली तेवीस वर्ष या वास्तुशी त्यांचे ऋणानुबंध जुळले होते. आजही त्यांनी प्रवेश द्वारात पाय ठेवला आणि अचानक त्या आपल्या भूतकाळात गेल्या. शालेय जीवनापासूनच अत्यंत हुशार असलेल्या नंदिताला आपलं करिअर एखाद्या काॅर्पोरेट क्षेत्रात करण्याची मनापासून इच्छा होती. त्यातूनही माहिती तंत्रज्ञान क्षेत्राकडे त्यांचा ओढा अधिक होता. एखाद्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये आपल्या गुणवत्तेच्या बळावर उच्चपदी जाण्याची त्यांची इच्छा आणि तयारी होती. परंतू आपली इच्छाशक्ती आणि निश्चय यामध्ये नियती नावाची एक अदृश्य शक्ती वास करत असते. ती दिसत नाही पण तिची करणी दिसते. अत्यंत निष्ठुरपणे आपण आखलेल्या डावाला ती धोबीपछाड देते. नंदिताच्या करिअर करण्याच्या बाबतीत असंच काहीसं झालं. दहावीच्या शालांत परीक्षेच्या दोन महिने आधी तिच्या डोळ्याला जबरदस्त दुखापत झाली. शाळेत मैत्रिणींबरोबर खेळत असताना वर्गातल्या बाकाचं बाहेर आलेलं कुस तिच्या डोळ्यात गेलं आणि जवळजवळ महिनाभर तिला अभ्यासापासून दूर राहावं लागलं. तिला खूप रडू यायचं पण रडल्यावर डोळा दुखायला लागायचा. महिन्याभरानंतर तिला अभ्यासाची परवानगी मिळाली आणि ती अक्षरशः पुस्तकांवर तुटून पडली. शेवटच्या एका महिन्यात मागे राहिलेला सगळा अभ्यास तिने दिवस रात्र एक करून पूर्ण केला. अती ताणामुळे डोळा दुखायचा पण त्याकडे दुर्लक्ष करून तिने परीक्षेची तयारी केली. शालांत परीक्षेत ८० टक्के गुणांनी ती उत्तीर्ण झाली. बारावीच्या परीक्षेतही तिला पहिला वर्ग मिळाला आणि नंदिताने वसई मधल्याच महाविद्यालयात शास्त्र शाखेत प्रवेश घेतला. आपल्या लक्ष्याला समोर ठेऊन ती आपल्या अभ्यासात गढून गेली. लहानपणापासूनच नंदितला गुरुजनांबद्दल नेहमीच आदर, आपुलकी आणि प्रेम वाटतं आलं होतं. तिचा तोच भाव महाविद्यालयातही कायम होता. महाविद्यालयातील वर्ष वारयासारखी उडून गेली आणि भौतिकशास्त्र विषयात शास्त्र शाखेची पदवी परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण होऊन ती बाहेर पडली. वडिलांशी चर्चा करून तिने कॉम्प्युटर सायन्स अँड एप्लिकेशन्स या पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. आपल्या या हुशार आणि समंजस मुलीचा तिच्या आई वडिलांना खूप अभिमान वाटायचा. फक्त या साऱ्या अभ्यासाच्या धबडग्यात तिची प्रकृती तिला साथ देत नव्हती. तिच्या प्रकृतीच्या काही ना काही तक्रारी सुरू असायच्या. परंतु त्या सुद्धा सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावरच तिच्या तोंडून बाहेर यायच्या. या साऱ्याचा तिच्या अभ्यासावर परिणाम होत असे अणि याच तिला फार वाईट वाटायचं. अर्थात अभ्यासक्रम मात्र तिने चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केलाच. काही दिवसातच तिला एका आय. टी. फर्म मध्ये नोकरीही मिळाली. नंदिताच्या मनातलं लक्ष्य तर टार्गेट झालं होतं. आता तिला स्वतःला फक्त सिद्ध करायचं होतं या क्षेत्रात. पण ..... ती नियती , तिला नाही आवडत आपल्या संमतीशिवाय काहीही घडलेलं. मग ते चांगलं असो किंवा वाईट.


नंदिताच्या या अभ्यासू करिअर मध्ये एक उणीव होती , ती म्हणजे प्रत्येक गोष्टीचा नको इतका ताण घेण्याचा स्वभाव आणि निराश वृत्ती. या गोष्टी तिच्यामध्ये सारख्या चालणाऱ्या प्रकृतीच्या कुरबुरिमुळे आल्या होत्या. परंतु कॉर्पोरेट क्षेत्रात मिळणाऱ्या गडगंज पागराबरोबर टार्गेटस‌् , कामाचा प्रचंड बोजा आणि वेळेचं नसलेलं बंधन या गोष्टी अपरिहार्य होत्या. या साऱ्याला तिचं शरीर साथ देत नव्हतं. काही वेळा तिला खूप राग येत असे. माझ्याच बाबतीत असं का ? मी कधीच कुणाचं वाईट केलं नाही , चींतलं नाही. अर्थात याचं उत्तर कुणीच देऊ शकत नाही. तिच्या रजा वाढू लागल्या. अखेर तिला ही

नोकरी सोडावीच लागली. खूप रडली ती त्या दिवशी वडिलांच्या कुशीत शिरून.

या ताणातूनच तिचा ओढा अध्यात्माकडे वाढू लागला. तिच्यामध्ये आणखी एक गुण होता तो म्हणजे लहान मुलांना ती प्रेमाने आपलसं करून घेत असे. शिस्त आणि माया हातात हात घालून तिच्यात सामावलेल्या होत्या. आपल्या मुलीची योग्यता असूनही तिला कॉर्पोरेट क्षेत्र मानवणारं नाही हे मंदिराच्या वडिलांच्या लक्षात आलं आणि तिला शैक्षणिक क्षेत्रात आणण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आणि वसाईच्याच एका शाळेत नंदिताचा या क्षेत्रात प्रवेश झाला.

काही व्यक्ती ठरवून एखाद्या क्षेत्रात येतात, काही वहात येतात तर काही मारून मुटकून येतात. पण काही व्यक्ती एखाद्या क्षेत्रात येणं ही नियतीची योजना असते. आपल्या प्रामाणिक योगदानाने या व्यक्ती एखादं क्षेत्र भारून टाकतात. त्यांची कामाची पद्धतही महाभारतात श्रीकृष्णाने सांगितलेली फळाची अपेक्षा न धरणारी असते. योगेश्वर श्रीकृष्णाला आपल्या घराचा प्रमुख मानणाऱ्या आणि त्यानेच सांगितलेला कर्मयोग प्रत्यक्षपणे अमलात आणणारा नंदिता मॅडम ची जातकुळी अशीच होती.

नंदिताच्या आयुष्यात घडणाऱ्या या घडामोडीतच तिचं सुहासशी लग्न झालं आणि ती वसई सोडून दाहिसरला आली. इथेच तिच्या आयुष्यातील एका सुंदर नाट्याला सुरवात झाली. दहिसर मधल्या विद्यालंकार मंडळाच्या विद्याभूषण या शाळेतील इंग्रजी माध्यमात प्राथमिक विभागात तिला शिक्षिकेची नोकरी मिळाली. आणि या सुवर्ण संधीचा नांदिताने मनापासून फायदा घेतला. अर्थात हा फायदा निस्वार्थ भावनेने घेतलेला होता. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांचा पाया घडवण्याची जबाबदारी आपलीच आहे हे मनाशी निश्चित करून ती कामाला लागली. या कच्च्या मडक्यांना सुशिक्षीत करतानाच सुसंस्कारीतही करून त्यांच्या आयुष्याची सुरेख सुरुवात करुन द्यायची हे तिने आपल्या आयुष्याचं ध्येय ठरवलं. नंदिताला शिकवायला मनापासून आवडायचं. शास्त्र आणि गणित हे रुक्ष विषय ती सहजपणे विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये उतरवायची. तिच्या प्रकृतीची गाऱ्हाणी मध्ये मध्ये डोकं वर काढत होतीच परंतू विद्यार्थ्याच्या सान्नीध्यात त्याकडे ती दुर्लक्ष करत होती.

या सगळ्यामध्ये जमेची बाजू म्हणजे तिला मिळालेला आयुष्याचा जोडीदार. समंजस आणि मनापासून तिला साथ देणारा , समजून घेणारा जोडीदार नंदिताला मिळाला होता.

कोणत्याही जबाबदारीला नाही म्हणायचं नाही हे तिचं तत्व होतं. आणि एकदा जबाबदारी स्वीकारली की ती यशस्वी करून दाखवण्यासाठी तन मनाने ती त्याला भिडायची. नंदिताचं व्यक्तिमत्व विविधांगी होतं. परंतू त्यामध्ये दिखाऊपणाचा लवलेशही नसायचा. सकाळच्या प्रार्थनेपासून शाळा सुटताना होणाऱ्या राष्ट्रगीतापय‌र्यंत अनेक कामात ती गढून गेलेली असायची. अर्थात या सगळ्याचा ताण तिला जाणवायचा. पण त्याला ती चेहऱ्यावर दिसू देत नसे. नंदिताच्या व्यक्तिमत्वात विद्यार्थ्यावरचं प्रेम , बालकाची निरागसता , आदरयुक्त दरारा , या सारयाबरोबरच कधीमधी डोकावणारा बारीकसा सलही होता.जो क्षणभरात नाहीसा होत असे. कदाचित आपल्या प्रकृतीमुळे आपण थोडेसे कमी पडतो याचाही तो असण्याची शक्यता होती. तिच्यामध्ये एक जातिवंत शिक्षक दडलेला होता. आपण जे शिकवतो ते विद्यार्थ्यांना व्यवस्थित आकलन झालं नाही तर तो आपला पराभव आहे ही तिची विचारसरणी होती. मुलांच्या बुद्धीला खतपाणी घालून अभ्यासाची गोडी लावणे , त्यांची मानसिक ताकद वाढवणे आणि त्यांना सुसंस्कारित करून पुढे पाठवणे या गोष्टींचं भान तिने कायम जोपासलं होतं. माझा वर्ग , माझा विषय , माझी वेळ असा म चा पाढा तिला अजिबात आवडत नसे. एकदा मधल्या सुट्टीत डबा खायला बसण्यापूर्वी ती हात धुवायला जात होती. जाता जाता सहज एका वर्गात एक विद्यार्थी डबा न खाता बसून इतरांकडे पहात बसलेला तिला दिसला. हा वर्ग तिचा नव्हता पण तरीही तिने वर्गात शिरून त्या मुलाला जवळ बोलावलं. चौकशी केल्यावर तिला कळलं की त्याची आई आजारी असते त्यामुळे बऱ्याच वेळा त्याला डब्याशिवायच शाळेत यावं लागतं. घरची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्याने कॅन्टीन मधलंही नेहमी खाऊ शकत नाही. नंदिताचा जीव कळवळला. अगदी सहजपणे तिने आपल्या हातातला स्वतःचा डबा त्याला दिला. आणि त्यानंतर हे रोजचंच झालं. मधल्या सुट्टीत आपला डबा खाण्यापूर्वी सगळ्या वर्गात एक चक्कर टाकून यायचं कुणी विद्यार्थी डब्याशिवाय आलाय का. कुणी असेल तर त्याला कॅन्टीन मध्ये त्या दिवशी जे बनवलं असेल ते आणून द्यायचं आणि मग आपला डबा खायला घ्यायचा. सहकारी शिक्षिकांना हा वेडेपणा वाटायचा. पण तिने त्याकडे दुर्लक्ष करून आपलं कर्तव्य सुरू ठेवलं. एक दिवस असाच एक विद्यार्थी शाळेच्या आवारात रडत बसला होता. आजूबाजूने जाणारे हळहळत होते पण त्याच्यासाठी थांबायला कुणालाच वेळ नव्हता. नंदिता त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. आणि स्पष्ट शब्दात त्याला रडण्याचं कारण विचारलं. रडत रडतच तो म्हणाला की "काल दिलेला गृहपाठ पूर्ण केला नाही त्यामुळे टीचर आज ओरडणार". हे ऐकून नंदिताने त्याला चांगलंच फैलावर घेतलं. " तू चुकलायस हे तुला पटतंय का " तिने त्याला विचारलं. तो मानेनेच हो म्हणाला. "हे तुला खरोखर पटलं असेल तर आज मधल्या सुट्टीत तू गृहपाठ पूर्ण करून तुझ्या टीचर ना दाखवशील " ? नंदिताने विचारलं. तसं असेल तर मी तुझ्या टीचर ना तुला रागावू नका म्हणून सांगेन. इथे मात्र तो विद्यार्थी बोलला "मॅडम मी आज मधल्या सुट्टीत नक्की गृहपाठ पूर्ण करीन ". नंदिताने त्याच्या पाठीवर थोपटलं आणि त्याला वर्गात जायला सांगितलं. मधल्या सुट्टीत डबा खाऊन ती थोडी विश्रांती घेत होती. तिचे डोळे बंद होते. तिच्या कानावर हाक आली , " टीचर " तिने डोळे उघडून पहिलं तर सकाळचा तोच विद्यार्थी समोर उभा होता. न बोलताच त्याने वही उघडून तिच्या समोर धरली. त्याने गृहपाठ पूर्ण केला यापेक्षा दिलेला शब्द पाळला याचं तिला कौतुक वाटलं. " डबा खाल्लास का " तिने विचारलं. " नाही म्याडम तुम्हाला गृहपाठ दाखवला आता माझ्या टीचर ना दाखवतो आणि मग खातो ". तिने कौतुकाने त्याच्या गालावर थोपटलं . " Thank you टीचर " म्हणत तो पळाला. असेच एकदा पावसाळ्याचे दिवस होते. शाळा सुटण्याची वेळ झाली होती. आणि शाळेच्या बाथरूम मधून एका विद्यार्थ्याचा जोरात रडण्याचा आवाज येऊ लागला. सगळेच आवाजाच्या दिशेने धावत सुटले. बाथरूम मधलं दृश्य पाहून सगळेच घाबरले. एक विद्यार्थी पाय घसरून पडला होता आणि पडताना त्याच्या डोक्याला नळाची तोटी लागली होती . रक्त वहात होतं. ते सगळं पाहून एक क्षण कोणाला काय करावं कळेना. नंदिताने क्षणभरात निर्णय घेतला आणि आपल्या नवऱ्याला फोन करून शाळेत बोलावून घेतलं. तिने दिलेल्या मदतीच्या हाकेला होकार देत सुहास दहा मिनिटात शाळेत पोहोचले. तोपर्यंत प्रथमोपचार करून नंदितांने त्या विद्यार्थ्याला जरा शांत केलं होतं. त्याला बरं वाटलेलं पाहून बरेच शिक्षक एव्हाना निघून गेले होते. नंदिता मात्र त्या विद्यार्थ्याच्या बाजूला बसून होती. तिने फोन करून त्याच्या पालकांनाही सगळी कल्पना दिली. सुहास गाडी घेऊन आल्याबरोबर तिने त्या विद्यार्थ्याला सांभाळून गाडीत बसवलं आणि लगेच डॉक्टरांकडे नेलं. एव्हाना त्या मुलाचे पालकही शाळेत पोहोचले होते. डॉक्टरांचे सोपस्कार आटोपून त्याला शाळेत आणेपर्यंत दुपारचे दोन वाजले होते. त्याला त्याच्या पालकांकडे सोपवताना मिळालेलं समाधान या धावपळीतून आलेल्या थकव्यापेक्षा तिला खूप मोठं वाटतं होतं. आपल्या विद्यार्थ्यांवर तिची खूप माया होती. त्यांची बाजू योग्य असेल तर त्यांच्या पालकांना खडसावयलही ती मागे पुढे पहात नसे. परब्रम्ह उपकार पाप ते परपिडा या तुकोबांच्या उक्ती नुसार कुणालाही दुखवायचं नाही आणि आपल्या कक्षेत राहून काम करत राहायचं, आपल्या कामाचा डांगोरा न पिटता निरिच्छपणे श्रेय दुसऱ्यांना देऊन मोकळं व्हायचं ही मानसिकता तिने जपली होती. विद्यार्थ्यांसमोर आपल्या कृतीने आदर्श शिकवण ठेवून पुढे जात राहायचं ही निती तिने अवलंबली होती.

शास्त्र आणि गणीतासारख्या विषयाची शिक्षिका असलेली नंदिता मनाने खूपच हळवी होती. कदाचित त्यामुळेच हे विषय ती सहजपणे विद्यार्थ्यांच्या हृदयात उतरवू शकत होती. प्रत्येक संवेदनशील मनुष्यात असलेल्या दुखः , राग , लोभ , समाधान ,आनंद , या सगळ्या भाव भावना तीच्यातही होत्या. या भावनांवर एखादी व्यक्ती जेव्हा विजय मिळवते तेव्हा ती संतपदाला पोहोचते. परंतु नंदिताने या सगळ्या भाव भावनांचा परिणाम कुणालाही न दाखवता फक्त अपल्यापुरताच ठेवला होता.


शिक्षण क्षेत्रात काम करताना नंदिताने प्रत्येक क्षणाला मुल्यांना नुसतं जपलेलं नव्हतं तर त्यांची अप्रतिष्ठा कधीही खपवून घेतली नव्हती. या भावी पिढीतूनच उद्याचे आदर्श नागरिक घडणार आहेत आणि ती जबाबदारी सर्वस्विपणे आपली आहे हे मनाशी निश्चित करूनच तिची वाटचाल सुरू होती. विद्यार्थ्यांकडून घडणाऱ्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीला त्यांना दोषी न मानता आपला आदर्श ते गिरवतात हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे ही तिची विचारसरणी होती. विद्याविकास शाळेचा पहिला तास परिपाठाचा असायचा. श्लोकांमधून विद्यार्थ्यांसोबत विधात्याला तल्लीन होऊन आळवताना नंदिता ईश्वराकडे जणू काही त्यांच्यासाठी आशीर्वाद मागत आहे असच वाटतं असे.


सामन्यातील असामान्यत्व जोपासतानाच विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या विद्यादानाच्या पवित्र क्षेत्रापासून दूर जाणाऱ्या आजच्या पिढीला आपल्या कामाने या क्षेत्राकडे वळण्याची प्रेरणा देणाऱ्या नंदिता मॅडम ' प्र प्रेरणेचा ' या उक्तीमधे अक्षरशः चपखल बसतात.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational