Neelima Deshpande

Drama

1.6  

Neelima Deshpande

Drama

पोर्ट्रेट

पोर्ट्रेट

12 mins
496


गुलाबी शहर जयपुरमध्ये थंडीची नुकतीच चाहूल लागायला सुरुवात झाली होती. राजस्थानमध्ये भयंकर उकड्यानंतर आलेले हे थंडीचे दिवस सगळ्यांनाच सुखावून सोडतात. रंगीबेरंगी स्वेटर्स आणि मफलरीत नटलेलं शहर बघायला मिळणं ही एक आनंदाची पर्वणीच जणू! तरुणाईला तर सारेच ऋतू छान वाटतात. पण खास जिव्हाळ्याचा असतो तो म्हणजे सुखद हिवाळा.


असा हा हिवाळा तिचाही खूप खूप आवडता ऋतू होता. यावर्षी तर थंडी पडण्याची ती अगदी चातकासारखी वाट पाहात होती. त्यामुळे थंडीची चाहूल आज लागल्याने सकाळपासून ती खूप खूष होती. आणि का होऊ नये? थंडी सुरु झाली की तिचा आनंद वाढवणारं आणखी एक मोठं कारण असायचं..... ते म्हणजे तिचं बहरलेलं फुलांचं दुकान आणि वाढ़लेली कमाई!


एकीकडे तिचं दुकान रंगीत फुलांनी सजायचं तर दुसरीकडे तिच्या 'नीवई' या छोट्या खेडे गावाजवळच असलेलं गुलाबी शहर जयपूर! या काळात ते पर्यटकांनी गजबजलेलं असायचं. फुलांची मागणी वाढायची तशी चार पैसे दर दिवसाकाठी अधिक जमायचे आणि ती त्यांना पुन्हा पुन्हा मोजण्यात हरखून जायची. 


आई-वडीलांच्या शेतीला त्यांच्या माघारी तिने खूप कष्ट घेऊन हिरवी करुन परत उदरनिर्वाह करण्याचे साधन बनवले होते. तिने त्या दोघांना दिलेली ती एक प्रकारे श्रद्धांजली होती. 


शाळेत असतानाच तिच्या आई-वडीलांनी दुष्काळात पिकांचे झालेले नुकसान बघून 'आता कर्जाची परतफेड अशी करायची?' या काळजीने आत्महत्या केली होती. 


खेडे गावात आजही माणुसकी जिवंत आहे. शेतकरी आत्महत्या करतो पण त्याला समजून घ्यायला आणि मदत करायला आपण पुढे येऊ शकलो नाही याची सल तिथल्याच गरीबांना पण मनाने श्रीमंत असंणाऱ्या गावकरी मंडळींनाच येते. अशाच माणुसकी जिवंत असलेल्या आजुबाजुच्या घरांची दारे खुली झाली मग तिच्यासाठी, ती मोठी होऊन कमवायला लागेपर्यंत! तिची शेती त्यांनीच जमेल तशी सांभाळली होती. जी आता तिने फुलांनी सजवली होती.


सुरुवातीला बरीच वर्षं तिने उन्हा तान्हात रस्त्यावर हिंडून फुलं विकली. हिवाळा काय तो सुकर असायचा फूल विकायला. तिच्याकडे निवडक ताजी फुले असल्याने लवकर विकली जात आणि संपत असत. नंतर आलेल्या गिऱ्हाईकांची मन दुखवू नये असं वाटायचं तिला. ती मग कमाईतून मिळालेल्या थोड्या पैशांची परत एकदा फुलं आणायची गावातल्या इतर शेतकरी संघटनांच्या बांधवांकडून... जेणेकरुन त्यांनाही चार अधिक पैसे मिळोत. 

गावाकडची शुद्ध हवा जणू त्या सर्वांचे हृदय अगदी साफ ठेऊन होती आजच्या काळातही!


फुलं न मिळाल्याने नाराज होऊन परतलेल्या तिच्या नेहमीच्या आणि पत्ता दिला तर नव्याही लोकांच्या घरी ती दुसऱ्या खेपेत आणलेली फुलं नेऊन द्यायची.


अशीच होती ती. काहीशी हळवी. जितकी कष्टाळू तितकीच मनाने कनवाळू. स्वभावाने खूप लाघवी आणि उदार! दिसायला एकदम साधी पण नाकी डोळी अगदी सुबक अन देखणी. खरं तर सतत आनंदी असल्याने बहुदा सौंदर्यापेक्षाही प्रसन्नता जास्त वाटायची तिच्याकडे पाहून आणि त्यानेच ती अधिक सुंदर आणि लोभस वाटायची! तिच्या दुकानात असलेल्या फुलांशी ती खूप एकरुप झाली होती म्हणूनच प्रसन्न आणि ताजीतवानी असायची. कितीही काम केलं तरी न थकता.


एकदा एक नेहमी फूल घ्यायला येणारं वयस्कर जोडपं आलं नाही म्हणून ती त्यांना शोधत त्यांच्या घरी गेली फूल द्यायला. त्यांच्याकडून तिला समजलं की दरवर्षी डिसेंबर महिन्यात जयपूर येथील 'अल्बर्ट महाल' येथे बरेच कार्यक्रम होतात. आलेल्या विदेशी पर्यटकांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. शहरातील सर्वांना इथे यायला मग कारण मिळते आणि लोकांची गर्दी होते. त्यावेळी तिची फुलांची विक्री खूप होऊ शकते.


त्या वयस्कर जोडप्याच्या ओळखीच्या बळावर आणि त्यांच्या मदतीने मग तिने स्वतःच्या कष्टाने कमवलेल्या मिळकतीतून आणि थोडीशी शेत जमीन विकून अल्बर्ट हॉलच्या समोरच्या रांगेत एक छोटं झोपडीवजा जागेतलं दुकान विकत घेतलं. इतरांसाठी असलेली फुलांची छोटी टपरी तिच्यासाठी मात्र एखाद्या महालासारखी होती आणि तिने ती तशीच सजवली कायम. रोज नव्या तऱ्हेने फुलांची मांडणी करत आणि त्यांच्या तिने रंगवलेल्या आणि विकताना सांगितलेल्या अनेक गोष्टी आजपर्यंत लोकांनी एेकल्या होत्या. फूल विकण्याची ही अजब पद्धत होती म्हणा हवं तर तिची. तिने जगलेलं आणि त्यातून शिकलेले तिच्या आयुष्याचे तत्वज्ञान ती कथा रुपाने वेगवेगळ्या फुलांशी जोडून सांगत होती आणि तिच्या विचारांचा आणि दिलदार वृत्तीचा सुगंध फुलांसोबत दूरवर पसरवत होती.


खूपदा तर आलेले पर्यटक तिचे सजलेले छान दुकान पाहून त्या समोर खूप फोटो काढून घेत. त्या सुंदर फुलांसोबत स्वत:च्या आठवणी कैद करून घेण्यासाठी काही जण तिच्याकडूनच दुकानात वेगवेगळ्या जागी उभे राहून फोटो काढून घेत आणि कधी तर तिची विक्रीला ठेवलेली फुलं थोड्या वेळासाठी उधार मागत आणि छान प्रपोज फोटोही काढून घेत. 


ती पण कधी कुणाला मदत करायला किंवा उसनी फुलं घेऊन फोटो काढून द्यायला नाही म्हणायची नाही. या सगळ्यात काही जण तिचाही फोटो बॅकग्राउंडमध्ये आला की तिला दाखवत. पण ते फोटो बॅकग्राउंडमध्येच असायचे आणि ज्याने काढला त्यांच्यासोबत कॅमेरामध्ये कैद होऊन जायचे. तिचं लोभस रुप आणि नितळ मन एकतर लोकांच्या मनात नाहीतर त्यांच्या कॅमेरात बंद राहायचं. ते कधी मनाच्या पटलावरुन कधी छापलं गेलं नव्हतं फोटोच्या रुपात की कधी पोर्ट्रेट बनून कॅनव्हासवरही उतरलं नव्हतं!


असंच एकदा उगाच तिला वाटून गेलं... की आपलाही कधीतरी असा एकटीचाच...या आपल्या हसऱ्या फुलांसोबत एक तरी फोटो कुणी काढावा... आपण तो आपल्या या छोट्या दुकानात सजवावा... बरेच दिवस तो विचार तिच्या मनात घर करुन होता. खूप खोलवर.... इतका की तिच्या हळव्या आणि कोवळ्या मनाला अधिकच नाजूक आणि कमकुवत करुन गेला मग तो!


मध्ये बरेच दिवस गेले, पण तिचं दुकान बंदच होतं. आज ना उद्या दुकान उघडेल या आशेने रोजची ठरलेली गिऱ्हाईकं चकरा मारायची आणि मग बंद दुकान पाहून हिरमुसली होऊन माघारी परत जायची. बघता बघता आठवडा झाला पण तरी कुणालाही अंदाज येत नव्हता की....'कुठे बरं गेली असेल ती अशी अचानक?'

जसा इतरांना तिचा अंदाज नव्हता, तसा तिलाही नव्हता... तिच्या माघारी तिच्या दुकानात आणि त्याच्या आसपासच्या परिसरात काय काय होऊन गेलं याचा. 


नेहमीपेक्षाही तिने लवकर उठून खूप सारी ताजी, विविधतेने नटलेली सुंदर फुले गोळा केली आणि ती सुगंधी फुले घेऊन ती तिच्या दुकानावर हजर झाली.


बऱ्याच दिवसात दुकान न उघडू शकल्याने आधी तिने आठवडाभरात काय झाले याबद्दल जाणून घेण्यासाठी सगळ्यांची भेट घेतली. तिच्याबद्दल सगळे विचारत होते तेव्हा ती हसून टाळत राहिली सगळ्यांना आणि तिने असे दाखवले की सगळं काही ठीक आहे, सुरळीत सुरु आहे.


शेजारच्या दुकानदार काकांना तिला पाहून कळत होतं की हिला बरं वाटत नाहीए. त्यांनी त्यांच्या मुलीला दोन तीन दिवस तुझ्याकडे मदतीला पाठवत जाईल म्हणत लगेच पाठवले सुद्धा. 'अल्बर्ट हॉल'मध्ये येणाऱ्या आठवड्यात होणाऱ्या सगळ्या विशेष कार्यक्रमाची तिला माहितीही दिली. त्यानुसार दोघींनी मिळून दुकान सजवले आणि फुलांची छान मांडणी केली.


डिसेंबर महिन्यांतल्या त्या थंडीने गोठवून टाकणाऱ्या सकाळी... हिरव्यागार गर्द झाडीमधून आता एकीकडे हळूच सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचण्याची धडपड करत होती तर दुसरीकडे पर्यटकांची आणि रहदारीची सुरुवात झाल्याने थंडीने गोठवून टाकणारं सभोवतालचं दाट धुकं आता विरळ होऊ लागलं होतं. हॉलकडे येणाऱ्या गाड्या अन दुकानातून फूल विकत घेणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत गेली. खूप लोक लगबगीने येत होते आणि तितक्याच घाईने फूल विकत घेतली की अल्बर्ट हॉलकडे वळत होते. 


बऱ्याच दिवसांनी तिने दुकान उघडल्याने जुनी ओळख असलेले विचारपुस करत होते तिची, काळजीने काय झालं म्हणून चौकशी करत होते...पण ती मात्र चेहऱ्यावर हास्य आणून पुन्हा मनातल्या मनात कसला तरी हिशोब करत होती. एका हातात फुलांच्या चार कांड्या पकडत दुसऱ्या हाताने ती कागदावर कसलीतरी आकडेमोड़ करण्यात इतकी गुंगली होती की हवेने उडणाऱ्या मोकळ्या कुरळ्या केसांच्या बटा तिच्या चेहऱ्यावर आल्याचंही तिला भान नव्हतं की थंड़ झालेल्या चहाच्या कपाचंही!


तिचं स्वत:कडे भान नसलं तरी, तिच्याकडे बराच वेळापासून एक तरुण मात्र त्याचं भान हरपून पाहत होता. म्हटलं तर तिथे असलेल्या सगळ्या आनंदी लोकांच्या गर्दीत ते दोघेही खऱ्या अर्थाने एकटेच होते.....आपआपल्या मनात असणाऱ्या काळजीत आणि त्यावर उपाय शोधीत!.....तिचं लक्ष गेलं आणि एकदम त्याने नजर दुसरीकडे फिरवली. काहीशा संकोचाने मग तो थोड़ा मागे हटला आणि त्याने झुडूपाच्या मागे ठेवलेल्या कॅनव्हासकडे निरखून पाहून मनात काही विचार केला. 


सूर्याची सोनेरी किरण आता जवळपास दुकानापर्यंत पोहचली होती आणि फुलांवरच्या दवबिंदूसोबत तिच्या चेहऱ्यावरही पडत होती. 


अल्बर्ट हॉलच्या बॅकग्राउंड मध्ये...असंख्य कबूतरांच्या थव्याला अनेकदा उडवत आणि पुन्हा दाणे टाकून जमिनीवर बोलवत काही जण उभे.... आणि त्यांच्या मधोमध भव्य 

अल्बर्ट हॉल आणि हॉलच्या पार्श्वभूमीला तिच्या दुकानातल्या विविधरंगी फुलांच्या ताटव्याभोवती  ती अगदी निरागसपणे उभी होती; हातात विकण्यासाठी फूल धरुन!....अगदी परफ़ेक्ट फोटोजेनिक पोज मध्ये!

खूप वेळ मनाशी हिंमत गोळा करणारा तो अचानक भानावर आला; कुणाची तरी रिंगटोन कानवर पडल्याने....


"अज्ज दिन चढेया... तेरे रंग वरगा... फूलसा खिला हैं आज दिन..... रब्बा मेरे दिन ये ना ढले... वो जो मुझे ख्वाब में मिले..."


तिचंसुद्धा त्याच्याकडे एक दोनदा लक्ष गेलं पण तिने परत फूल आणि दुकानात वाढ़लेल्या गिऱ्हाईकांकडे लक्ष वळवले आणि त्याचा नाईलाज झाला. आता मात्र तिला विचारण्याशिवाय आणि तिची मदत घेण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उरला नव्हता. उसनं बळ आणि बरीचशी हिम्मत मनात गोळा करत त्याने त्याचा कॅनव्हास, ब्रश, रंग उचलले आणि तो थेट तिच्यासमोर येऊन थांबला. 


आधी तिला वाटलं, फूल विकत घ्यायला आला असावा म्हणून तिने एक दोन प्रकारची फूल आणि काही प्रकारचे बुके त्याला दाखवले. पण तो काही बोलला नाही. त्याच्या चेहरऱ्यावर जणू काही त्याचा बराच गोंधळ उडाला आहे हे स्पष्ट दिसत होतं.... त्यामुळे मग तिनेच त्याला सांभाळून घेत म्हटलं, "फूल असू द्या तुम्हाला. पैसे नंतर दिले तरी चालेल आणि नसतील तरी चालतील. आज अल्बर्ट हॉल मध्ये येणारे सगळेच लोक पटापट फूल विकत घेऊन जात आहेत, त्यामुळे मी खुष आहे. तुम्हाला पण जायचं असेल ना आत?”


तिने "तुम्हाला पण हॉलमध्ये आत कार्यक्रमाला जायचे आहे का?" असं विचारलं तेव्हा त्याचा चेहरा एकदम खुलला... जणू काही तिनेच हव्या त्या विषयाला सुरुवात केली होती. इतक्या वेळ मनातल्या मनात ठरवलं होतं, ते त्याने सांगायला सुरुवात केली.


"गेला आठवडाभर इथे विविध कार्यक्रम सुरु आहेत. काल एका पोर्ट्रेट बनवण्याच्या स्पर्धेची घोषणा झाली होती. ती स्पर्धा आज इथे होणार आहे. सर्व कलाकारांना त्यांच्यासोबत ते ज्यांचं पोर्ट्रेट बनवणार आहेत त्या मॉडेलला घेऊन यायला सांगितले आहे. सकाळपासून ज्यांनी सोबत मॉडेल आणली ते नाव नोंदणी करायला आत गेले आहेत. मी मात्र अजूनही बाहेरच आहे कारण माझ्याकडे सध्या दोन्हीही गोष्टी नाहीत... मी ज्याचे पोर्ट्रेट बनवेल ते मॉडेल आणि एण्ट्री फीस!!"


सांगता सांगता तो अगदी रडवेला झाला होता. आयुष्यात एकदा संधी मिळाली तर त्याची कला जगासमोर येऊ शकणार होती. मोठी प्रसिद्धी मिळणार होती. कला क्षेत्रात ओळख वाढली असती. त्यानंतर त्याला आयुष्यात संधी मिळवण्यासाठी कुणाची ओळख शोधत धडपड करावी लागणार नाही याची त्याला खात्री होती. पण आज त्यासाठी अपुऱ्या पडलेल्या दोनपैकी एका गोष्टीत, "तू मला मदत करते का, माझी पोर्ट्रेट बनवण्यासाठी लागणारी मॉडेल बनून?" असं त्याने विचारलं तेव्हा तिचा विश्वासच बसला नाही.

आधी तर तिला हसू आलं. सकाळपासून तो तिच्याकडे का पाहत होता हे पण समजलं होतं. खरं सांगायचं तर कधी तरी, कुणी तरी तिचा एकटीचा फोटो काढावा अशी तिचीसुद्धा मनातून इच्छा होती. आणि इथे तर तिला मॉडेल बनून कुणाला तरी मदत पण करता येणार होती.


आणि तिचा एकटीचा फोटो नव्हे तर छानसं पोर्ट्रेट बनवून मिळणार होतं. तिने लगेच त्याला मॉडेल बनून पोर्ट्रेट बनवण्याच्या कामात मदत करायला तयार आहे हे सांगितले. "तिच्या सुद्धा मनात घर करून राहिलेली फोटो काढून घेण्याची इच्छा आज त्याच्या मुळे पूर्ण होणार" हे देखील तिने त्याला बोलून दाखवत त्याचे आभार मानले. 


तिला घेऊन त्याने स्पर्धेसाठी लगेचच फॉर्म भरून मॉडेल म्हणून तिचे आणि कलाकार म्हणून त्याचे नाव नोंदणी करून ते इतर कलाकारांप्रमाणे पोर्ट्रेट मनासारखे बनवता येईल अशा जागी सज्ज झाले. दुकानातील गिऱ्हाईक, शेजारच्या काकांच्या मुलीच्या मदतीने सांभाळत ती आज त्याच्यासाठी मॉडेलचे काम करत होती अगदी खूशीत!


रंगात बुडालेले कुंचले कॅनव्हासवर उतरले आणि हळूहळू ती असताना तिचे आणि ती मध्येच दुकान क्षणभर बघत असेपर्यंत बॅकग्राउंड असे करत तो पोर्ट्रेट बनवत होता.


एखाद्या भव्य महालासारखा असलेला जयपुरचा सुंदर आणि मोठा अल्बर्ट हॉल... आजुबाजूला असणारी गर्द झाडी... आसमंतात उडालेला कबूतरांचा थवा... आसपास हॉलमध्ये पोहोचण्यासाठी वाट पहात उभी राहिलेली माणसांची रांग... सारं काही विलक्षण बारकाईने टिपत... आणि लाईट कलरच्या शेड्सने रंगवत समोरच्या मोकळ्या भागात हातात फूल घेतलेली ती... मंद स्मित हास्य चेहऱ्यावर असणारी, अवती भवती सगळीकडे ताजी टवतवीत फुले आणि वाऱ्याने उडणारे केस... चेहऱ्यावर आलेली एक कुरळ्या केसांची बट!...


बघता बघता दुपारच्या जेवणाची वेळ झाली तोवर ती अशा रुपात त्याच्या कुंचल्यातून कॅनव्हासवर अवतरली होती.


तिच्या दुकानातली सगळी फूल आज अर्ध्या दिवसातच विकली गेली होती. त्याने तिचे मनापासून आभार मानले आणि बनवलेले पोर्ट्रेट जे अजून ओले होते, ते तिथेच तिच्या दुकानात वाळण्यासाठी ठेऊन दिलं आणि, "एण्ट्री फीसचे पैसे काही तरी व्यवस्था करुन घेऊन येतो तोवर हे पोर्ट्रेट इथे राहू दे. पैसे आणू शकलो तर हे आत स्पर्धेसाठी प्रवेश करताना घेऊन जाईल. नाहीतर हे तुला राहू दे, तुझी स्वतःचा फोटो काढून घेण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि मला मोठ्या मनाने मदत केलीस म्हणून!” असे म्हणत त्याने तिचा निरोप घेतला.


बराच वेळ झाला तरी त्याचा पत्ता नव्हता. "स्पर्धेच्या निर्णयासाठी सगळ्यांनी त्यांची बनवलेली कलाकृती जमा करण्याची वेळ संपत आली आहे," अशी घोषणा झाली तेव्हा मात्र ती बेचैन झाली. तिची खूप मोठी इच्छा आज त्याने पोर्ट्रेट बनवून पूर्ण केली होती.... पण त्याच्या स्वप्नांना मात्र अजूनही वाट मिळाली नव्हती ते पूर्ण होण्याच्या दिशेने... "या स्पर्धेच्या निकालात जो कोणी जिकेल त्याला रोख एक लाख रुपये बक्षिस मिळणार होते. विजेत्या कलाकाराला या क्षेत्रातल्या पुढील मोफत शिक्षणासाठी सर्व मदत होणार एका संस्थेतून आणि आयोजक कलाकाराने बनवलेले पोर्ट्रेट विकून देण्यात सगळी मदत करणार आहेत!" हे सर्व इतर स्पर्धकांनाकडून तिला समजले. तिने मग क्षणाचाही विलंब न करता त्याने बनवलेले तिचे पोर्ट्रेट आणि त्या दिवसाची कमाई झालेले सारे पैसे सोबत घेतले आणि ती एन्ट्री गेटवर आली. तिथे असलेल्या आयोजकांच्या मदतीने तिने पोर्ट्रेट मागे लिहिलेले नाव आणि सकाळी भरलेला फॉर्म देऊन प्रवेशासाठी लागणारी फीस जमा केली आणि ते पोर्ट्रेट हॉलमध्ये निकाल लागण्याच्या पुढच्या टप्प्यावर जाऊन पोहचवले.

तिथून बाहेर पडल्यावर त्याने खूप ठिकाणी प्रयत्न केला, अनेकांना विचारलं पण फारसा फायदा झाला नाही. तो थकला होता. 

त्याने मग मनाशीच ठरवलं की, "त्याला मदत करणाऱ्या तिलाच ते तिचे बनवलेले पोर्ट्रेट भेट देऊन आनंदी करावे.!"


'पोट्रेट बघून जर ती खुश झाली आणि तिला वेळ आणि आवड असेल तर निदान आज इतर स्पर्धकांनी बनवलेल्या कलाकृती बघू आणि कोणत्या कलाकाराचे नशीब आज उजळून निघते ते पाहू...” असा विचार करत तो तिथे आला, तिच्या दुकानासमोर; पण ते बंद होते. 


स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या गेल्या आणि बक्षिस वितरण समारंभास हजर होण्याची घोषणा झाली तेव्हा तो हॉलमध्ये गेला. सकाळी तिने फूल विकत घेण्यासाठी आला आहे असं समजून त्याला दिलेली फुले त्यांच्याकडे अजूनही होती, आणि आता ती कामालाही येणार होती.


हॉलमध्ये सगळयांच्या बनवलेल्या कलाकृती छान दिसतील अशा प्रकारे मांडून ठेवल्या होत्या आणि त्यांच्या समोरच ती कलाकृती आवडली आहे हे सांगण्या साठी ते जी फूल ठेवतील त्यासाठी व्यवस्था केली होती. समारंभाला आत येत असलेल्या प्रत्येकाला त्यांना आवडलेल्या पोर्ट्रेटसमोर कलाकारास शुभेच्छा देण्यासाठी सोबत आणलेल एक फूल ठेवण्याची विनंती केली होती. 


"आज माझ्या पोर्ट्रेटलासुद्धा इथे जागा आणि सर्वांचे लक्ष वेधून घेण्याची संधी मिळाली असती तर??......" मनातल्या मनात स्वत:शीच बोलत तो हॉलमध्ये असलेल्या एका पोर्ट्रेट समोर हातात असलेली फूल ठेऊन पुढे जात होता त्यावेळी त्या कलाकाराने धन्यवाद मानत त्याला, हॉलमध्ये उजव्या कोपऱ्यात ठेवलेले पोर्ट्रेट जरुर बघायला सुचवले आणि सांगितले की, त्या समोर सर्वाधिक फूल ठेवून दर्शकांकडून त्यांची पसंती दिली गेलेली आहे आणि एक प्रकारे आजचा निकाल जाहीर केला गेला आहे.


दुपारी तो गेल्या नंतर दुसऱ्या खेपेला आणलेली सगळी फूल विकत घेऊन लोकांनी ज्या पोर्ट्रेट समोर ठेवली होती आणि आत्ताच ज्याचे कौतुक त्याने ऐकले ती कलाकृती बघायला तो बेचैन होता पण तिथे जाण्याआधीचं "स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यासाठी सर्वांनी स्टेजच्या जवळपास यावे!" अशी घोषणा झाली आणि तो तसाच ते बहुचर्चित पोर्ट्रेट न बघताच स्टेजजवळ धावत आला.


त्याने बनवलेले तिचे पोर्ट्रेट तो परत येण्याआधीच तिने प्रदर्शनात पाठवले होते आणि तो आला तेव्हा तिचे दुकान बंद होते त्यामुळे त्याला काहीच कल्पना नव्हती त्याच्या माघारी तिने केलेल्या धडपड़ीची आणि पोर्ट्रेट इथे पोहचले आणि स्पर्धेत सहभागी झाले याची!...

अर्थातच ज्यावेळी विजयी कलाकार म्हणून जेव्हा त्याचे नाव पुकारण्यात आले तेव्हा त्यामुळे त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. स्टेजवर सर्वांना दाखवण्यासाठी आणले गेलेले आणि खरेदीसाठी संपर्क करावयाच्या व्यक्तीचे नाव पुकारण्यात आलेले पाहून त्याच्या डोळ्यांतून आंनदाश्रू वाहू लागले.

स्टेजवर सर्वांसमक्ष बक्षिस घेताना त्याने तिचे आणि ईश्वराचे मनापासून आभार मानले. 


'ती इथे असती तर!....हे पोर्ट्रेट तिला इथेच देता आले असते धन्यवाद देऊन सर्वांसमोर जाहीर करत...' असा विचार करत त्याने आयोजकांना ते पोर्ट्रेट न विकण्याची विनंती केली. 

त्याला हवी होती ती संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचं सोनं केलं. आजवर कधी न मिळालेली अमाप प्रसिद्धी, पैसा, कलाकारांच्या ओळखी आणि पुढच्या या क्षेत्रातल्या शिक्षणाची मोफत व्यवस्था हे सार त्याला आज मिळाल होत तिच्यामुळे!....


त्यामुळे तिला कधी एकदा भेटतो असे त्याला झाले होते.

तिचा शोध घेत असताना त्याला समजले की मागील आठवड्यात तिची तब्येत ठीक नव्हती म्हणून ती आली नव्हती, दुकानही बंद होते. आजच तिने दुकान उघडले होते आणि पहाटेपासून आत्तापर्यंत झालेली दगदग तिला सहन न झाल्याने परत एकदा तिला सन्ध्याकाळीच हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे.


तो तडकच तिथे पोहोचला. तिला पाहून आणि तिच्या हार्ट ब्लॉकबद्दल एकून त्याला धक्काच बसला होता. ऑपरेशनसाठी लागणारे पैसे कमी पडले कारण जमा केलेले थोडे पैसे आज तिने त्याच्यासाठी वापरले होते.


"इतकं मोठं मन असंणाऱ्या मुलीचं हृदय एव्हढे कमकुवत कसे असेल?" तो पुटपुटला. त्याला कळत नव्हतं पण आता ते समजून घेण्याची वेळ नव्हती तर होती तिला मानसिक आणि आर्थिक मदत करण्याची! आणि तिला जगवण्याची!! तिला धीर देत आणि आजच्या पोर्ट्रेट स्पर्धेत त्याने त्यांचे पोर्ट्रेट जिंकल्याचे तिला सांगितले. तिच्या चेहऱ्यावर हातात हे सांगताना दिलेले पोर्ट्रेट आणि तिला झालेला आनंद कितीही मोठा असला तरी तो मनात साठवत त्याने तिच्याकडे बघत निर्णय घेतला; पोर्ट्रेट विकण्याचा...

आयोजकांच्या मदतीने!

 

ती सोबत असेल तर असे कित्येक पोर्ट्रेट आयुष्यभर त्याला बनवता येणार होते...त्यामुळे मिळालेल्या बक्षिसांची आणि पोर्ट्रेट विकून आलेली रक्कम त्याने ऑपरेशन करुन घेऊन तिची तब्येत नीट करण्यासाठी वापरली आणि तिला तो परत तिच्या आवडत्या फुलांच्या प्रसन्नतेनं भरलेल्या दुनियेत घेऊन आला.


'दोन मोठी मन आणि परसस्परांसाठी झटणारी भक्कम हृदय एकत्र आल्यावर तिचं हृदय फार काळ कमकुवत थोडेच राहणार होते?'


थोड्या दिवसांनी आराम करुन ती पुर्ण पणे बरी झाली. तिच्या पहिल्या सारख्या हसतमुख चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्याने गाणं गायला सुरुवात केली, "फुलों सा चेहरा तेरा, कलियोंसी मुस्कान हैं....रंग तेरा देखके.... रुप तेरा देखके कूदरत भी हैरान हैं....”

याच नादात त्याने  कुंचला रंगात बूडवला आणि सुरुवात केली तिचे तसेच आणखी एक सुंदर पोट्रेट बनवायला!


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama