STORYMIRROR

Kakade Tejas

Horror Tragedy Thriller

4  

Kakade Tejas

Horror Tragedy Thriller

पिंपळ

पिंपळ

16 mins
213

सुंदरबन म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाण. अस ठिकाण की जे संपूर्ण जगात कुठं नसेल. तिथं चोवीस तास अंधार असतो. इतकं घनदाट ते जंगल जिथं सूर्यप्रकाश देखील पोहचू शकत नव्हता आणि माणूस तर अजिबात च नाही. गेले सव्वीस वर्ष सुंदरबन कोर्टाच्या आदेशामुळे पर्यटकांना कायमचं बंद झाल होतं. पण सुंदरबन खरंच खूप जास्त सुंदर होतं. घनदाट हिरवीगार झाडी आणि दोन डोंगरामधून खळखळ वाहणारी नदी त्याच नदीच पाणी साचून खाली तयार झालेला छोटासा बंधारा. पावसाळ्यात हे ठिकाण आणखी च सुंदर दिसते. इथे जंगली प्राणी पण भरपूर असायचे. लोक पण भरपूर पर्यटनासाठी इथे यायचे आणि जंगलाच्या प्रेमात पडायचे. होत च ते नावाप्रमाणे सुंदर. पण या जंगलाला नजर लागली आणि ही सव्वीस वर्षांपूर्वी हे जंगल न्यायालयाने Restricted Area म्हणून जाहीर केले. तिथे कोणाला जायला परवानगी नव्हती आणि मुळात तिथे कोणी जाऊ च शकत नव्हता कोणाच्यात एवढी हिम्मत नव्हती की कोण तिथं जाऊन परत येऊ शकेल म्हणून.....1994 साली या जंगलात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.....

दिवस आजचा....

नमस्कार मी सौरभ घाडगे स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण आलो आहोत सुंदरबन जंगलाच्या सफरीवर नुकतेच हे जंगल सरकारने पर्यटकांसाठी खुले केले आहे आणि आता आपण इथे पोचलेलो आहोत,सौरभ मोबाईलवर च्या selfie camera मध्ये त्याचा नवीन vlog चा व्हिडिओ बनवत होता. सौरभ कोठारे engineering च्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थी अभ्यासात पण तसा जेमतेम च होता त्याला फारसे मित्र नव्हते च आणि जे होते ते कामापूरते होते याचा वापर करून झाला की याला सोडून जाणारे. तो आयुष्यात खूप एकटा होता पण खुश होता कारण त्याला फिरायची भयानक आवड होती. महाराजांचे गडकिल्ले फिरणे,आणखी कुठली मंदिरे फिरणं त्याचा माहितीपर व्हिडिओ बनवून social media वर टाकणं हे त्याच सुरू असायचं. तरीपण त्याला कोण खास असा जवळचा मित्र नव्हता. नवलच म्हणावं लागेल ते!!!

तर मंडळी इथं खूप धुकं आहे आणि आणि आपल्याला पन्नास फुटावर च पण नीट दिसत नाहीये. तसा त्या जंगलात जायला लोक तिथल्या गावातला सुंदरवाडी मधला एक गाईड घ्यायचे तसे पण लोक इथं यायला धास्तावायचे, पण ह्या हिरो ला गाईड नको होता. तो एकटाच आला होता आणि त्याला एकट्यालाच फिरायचं होत. तो निघाला मोबाइलला फुल चार्जिंग केलं होतं त्याने फोटो काढत,व्हिडिओ बनवत तो निघाला पुढे जाऊ लागला. त्याच्या चारही बाजूने फक्त धुकं होत आणि हा आला होता गुरुवारी. आठवडी वाराला चुकून पण कोण इकडे फिरकत नसे कशाला कोण येतंय कामधंदा सोडून फिरायला. हा आपला आला निघाला निघाला आणि आता मुख्य जंगल सुरू झालं. त्याने गर्द जंगलात पाऊल ठेवलं पावसाची रिपरिप सुरूच होती. आजूबाजूला धुकं आणि डोंगरावर दिसणारे धबधबे सार काही विलोभनीय दृश्य होत तो ह्या सगळ्या आठवणी आपल्या कॅमेरा मध्ये कैद करत पुढे एकटाच चालला होता सोबती फक्त त्याच्या पाऊस आणि धुकं होतं. आणि मुख्य जंगलात सौरभ आल्यापासून त्याचा पाठलाग करणारा तो...... आरं बबन्या ये हिकडं ई लौकर लौकर,तसा बबन्या पावसात पळत रामाप्पा च्या दिशेने आला. ही पग हित गाडी हाय मजी कोणीतरी एकलच जंगलात गेल्याल असणार, रामाप्पा म्हणाला. लका हुडकाय पायजे त्याला नाहीतर आणखी एक बळी घ्यायचा तो मुंजा, घाबरत घाबरत बबन्या उत्तरला. आर पर मुंजा तर मारला की कवाचा त्या कुठल्या मांत्रिकान म्हणून तर कोर्टाने आदेश दिला ना की जंगल उघडा म्हणून, रामाप्पा तस म्हणताच बबन्या गप्प बसला...इकडे सौरभ ची मज्जा चालली होती तो मस्त सेल्फी घेत वातावरणात समरसून गेला होता त्याला कल्पना पण नव्हती की त्याचा पाठलाग सुरू आहे. हा पण जस जसे तो जास्त घनदाट जंगलात जायला लागला तशी त्याला थंडी वाजायला लागली. थंडी पण साधी नव्हती हाड गोठवणारी थंडी होती ती,अचानक च वातावरणात बदल झाला होता. त्याला आता भीती वाटायला लागली होती आणि त्याला सारख वाटत होतं की आपल्यावर कोणीतरी लक्ष्य ठेऊन आहे. मदतीला आजूबाजूला कोणी दिसत नव्हतं फक्त आजूबाजूला होत ते धुकं,पाऊस आणि घनदाट जंगल. मोबाईल मध्ये नेटवर्क नाही कोणाला बोलवावं त्याला काहीच कळत नव्हतं. माघारी फिरावं तर जायचं कुठून आणि कसं धुक्यात काहीच थांगपत्ता लागत नव्हता. थोड्याच वेळात अंधार पडणार होता आता त्याला भीती वाटू लागली होती आणि सूक्ष्म जाणीव पण होत होती की कोणीतरी आहे जो आपला पाठलाग करत आहे,कोणीतरी आहे इथं जे आपल्यावर लक्ष्य ठेऊन आहे.....इकडे रामाप्पा आणि बबन्या ने सरपंचाला सांगितले कोणीतरी जंगलात गेलंय ते...आरं माझ्या कर्मा आता कुंची ब्याद जंगलात मरायला गेली एवढ्या पावसाची, सरपंच चिंताग्रस्त होत म्हणाले.आरं एखादा गावातला माणूस न्यायला काय हुत लोकांना आता तिथं पिपळाला निवदं कोण दावायचं??? आज बी हकनाक एक बळी जाणार आणि जंगल परत येकदा बंद पडणार......पावसाची रिपरिप सुरूच होती. सौरभ पुढे चालत होती. तो पूर्ण भिजला आणि त्यात हाड गोठवणारी थंडी त्याला सहन होत नव्हती. अचानक त्याला समोर एक दृश्य दिसलं. झाडांच्या दुतर्फा एक रस्ता गेलाय आणि त्या रस्त्याच्या अगदी शेवटच्या टोकाला एक पिंपळाच झाड होत आणि ते झाड अश्या ठिकाणी होत ज्याच्या आजूबाजूला एकपण झाड नव्हतं. तो त्या झाडाच्या दिशेने चालू लागला तो जसजसा जवळ जाऊ लागला तस त्याला ते झाड स्पष्ट दिसू लागलं आणि त्या झाडाखाली बसलेली व्यक्ती सुध्दा.......त्याला तिथे कोणा माणसाला पाहून बर वाटल. तो झपाझप पावले टाकत झाडाच्या दिशेने निघाला आणि त्याला तिथे एक स्त्री दिसली. ती बाई मांडीत डोकं खुपसून रडत होती. तीच ते रडणं भेसूर होत खूप जास्त भेसूर तरी हा हिम्मत करून तिथे गेला आणि त्याने आवाज दिला ताई....अहो ताई....ताई. ती बाई एक नाय दोन नाय ती फक्त रडत होती. मग तो भीतभित हळूच त्या बाई जवळ गेला आणि त्याने हलकेच तिच्या खांद्याला हात लावला ताई...ऐका ना ताई मदत हविये तुमची....ती अचानक रडायची थांबली आणि तिने मान वरती केली. त्या बाईच तोंड बघून सौरभ ची भीतीने बोबडी वळाली. त्या बाई ला डोळे नव्हतेच डोळ्याच्या जागी काळ्या मिट्ट खोबण्या होत्या,कपाळावरून रक्त पडत होत,केस पिंजारलेले या सगळ्यात एक च गोष्ट चांगली होती ती म्हणजे त्या बाईंची साडी. लाल रंगाची ती साडी होती. का आलास इथं??? काय पाहिजे तुला???? तिच्या तोंडून त्याच भेसूर आवाजात तिचे हे शब्द ऐकताच तो तिथून वाट दिसेल तिकडे धावत सुटला आणि मागे ही बाई पिंपळाखालून हसत ओरडत होती...एवढ्या सहजासहजी नाही सोडनार तुला......२६ वर्षे वाट पाहतेय मी, किती २६ वर्षे, ती जोरात ओरडली....


काय घडलं सव्वीस वर्षांपूर्वी:

साधारणतः सव्वीस वर्षापूर्वी साल 1994 साली सुंदरबन गावात राहणारी पाटलांची लेक राधा सूर्यभान पाटील हिचा विवाह पुण्यातील एका बड्या प्रस्थासोबत आयोजित केला गेला होता. विवाहस्थळ गावात च होते. राधा खूप सुंदर होती संपूर्ण गावात तिच्याइतक सुंदर कोणीच नव्हतं. तिचे काळेभोर डोळे, गोरा वर्ण आणि तिचा रेखीव बांधा जो तिला बघेल तो तिच्या प्रेमात आकंठ बुडत असे. राधा ने पुण्यात शिक्षण घेतलं होतं तिने computer इंजिनिअरिंग ची पदवी मिळवली होती 1994 सालची इंजिनिअर पोरगी होती ती. लग्नाचा दिवस ठरला मुहूर्त जवळ येत होता, आणि अचानक लगीणघरात गलका सुरू झाला एकच धावपळ उडाली, राधा बेपत्ता झाली होती. शोध सुरू झाला. ती कुठेच सापडत नव्हती काय करावं काहीच कळत नव्हतं. पाटील डोक्यावरचा फेटा काढून डोक्याला हात लावून हताशपणे बसले होते. नवऱ्यामुलाकडच्या लोकांनी त्यांचा नको एवढा जो पाणउतारा केला होता ना त्याच हे नैराश्य. लग्न तर मोडलंच ते वेगळं सांगायची गरज नाही. इकडे राधा चा शोध सुरू युद्धपातळीवर सुरू होता. सूर्यभान पाटलांच्या डोळ्यात रागाने अंगार फुलला होता. पोरगी जर समोर आली तर तिचा जीव च ते घेतील एवढा त्यांना राग आला होता. आणि तेवढ्यात एक जण वर्दी घेऊन पाटलांकडे आला, मालक मालक, राधाताई जंगलाकडे गेल्या आहेत. त्या सुब्याने ताईला जंगलात पळत जाताना बघितलंय. पाटील ताडकन खुर्चीवरून उठत म्हणाले, चला हत्यारं घ्या आज तिची चिता च रचतो जंगलात. मायला,तोंडात शेण घातलं आज आमच्या हिनं, आज काय जित्ती ठेवत नसतो तिला. सूर्यभान पाटील आणि गावातली माणसं जंगलाकडे चालत निघाली. इकडे राधा दुपारी घराच्या मागच्या दरवाजाने बाहेर पडली होती आहे ते ती तडक पळत जंगलाच्या दिशेने गेली होती जंगलात दोन रस्त्यांच्या मध्ये एक पिंपळाच झाड होतं त्या झाडाखाली कोणीतरी तिची वाट पाहत होतं. ती दुपारी घरातून निघून गेली होती, ती अनवाणी पळत होती,काटे पायात रुतत होते,दगडाच्या ठेचा लागत होत्या पाय रक्तबंबाळ झाले होते आणि ती तशीच धापा टाकत पळत होती. तिला वाटत होतं एकदा आपण पिंपळाच्या झाडापाशी पोचलो की सगळं नीट होणार. आपल्या मागे कोणी येत नाहीये ना याची ती सतत मागे वळून पाहत होती पण तिला कोणाचीच चाहूल लागत नव्हती,त्यामुळे तिला जरा हायस वाटलं. आणि ती त्या पिंपळाखाली पोहोचली पण तिथं गर्द झाडी दुतर्फा गेलेला मातीचा रस्ता आणि मध्ये असलेला पिंपळ एवढंच होतं. तो कुठेच दिसत नव्हता, सगळं शांत भासत होतं,सुंदरबन च जंगल म्हणजे दाट,घनदाट जिथं सूर्यप्रकाश देखील क्वचितच यायचा अश्या ठिकाणी ती जंगलाच्या मधोमध उभी होती. ती घाबरली होती, ती त्याला आवाज देत होती. आशिष, कुठं आहेस मी आलीये रे तुझी राधा आलीये कुठं आहेस???? आशिष म्हणजे तिचा प्रियकर ,दोघे कॉलेज ला एकत्र होते आधी मैत्री झाली मग प्रेम झालं. पण आशिष दुसऱ्या जातीचा होता पाटलांनी कधी हे मान्य केलं असत त्यामुळे ह्यांनी पळून जायचा प्लॅन आखला होता. इथून पळून जायचं आणि मुंबईला जाऊन लग्न करायच बस्स इतकंच. कोणाचा च आवाज येत नव्हता तिथं फक्त तिचा आवाज होता, तिला वाटलं आशीष ला उशीर झाला असेल म्हणून ती तिने तिथेच झाडाखाली वाट पाहत बसायचं पक्के केलं. २ तास उलटून गेले होते ती रडत होती,पायांच्या जखमा ठणकत होत्या. आणि तिला कोणाचीतरी चाहूल लागली,कोणीतरी आपल्या दिशेने येतंय अस तिला वाटलं पण जे कोणी येत होतं ते एकट नव्हतं सोबत आणखी कोणीतरी होतं असं तिला वाटत होतं. आवाज जवळ येत होता आणि पाहते तर काय, समोर गावातली लोक सोबत पाटील सगळेजण तिच्याकडेच येत होते, तिच्या अंगात त्राण नव्हते ती उठायचा प्रयत्न करत असताना च तिने जे समोर पाहिलं त्याने ती जागेवर च थबकली. समोर येणाऱ्या लोकांमधे 2 लोकांच्या खांद्यावर हात टाकलेल्या अर्धमेल्या अवस्थेत एक माणूस होता, आणि तिने त्याला नीट पाहिल्यानंतर तिला समजल की हा तर आशिष. पाटील तिच्या जवळ आले आणि खाडकन एक मुस्काटात ठेऊन दिली. पाटलांनी तिला शिव्याशाप द्यायला सुरुवात केली, मारहाण करायला सुरुवात केली आणि मारहाण करता करता एक राधाच्या डोक्यावर एक वर्मी घाव बसला आणि ती जागेवर गतप्राण झाली. पाटील भानावर आले त्यांना समजलं की त्यांच्या हातून केवढा मोठा गुन्हा झालाय. कशी जरी वागली असली तरी पोटची पोर होती ती, पोटच्या पोरीचा जीव घेतला म्हणून पाटील उर बडवून घेऊन रडू लागला. आजूबाजूचे लोक त्यांना शांत करत म्हणाले, पाटील ह्यो पोरगा याच्यामुळे सगळं झालंय याला जित्ता ठेऊ नका. ते ऐकताच पाटलाची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी अर्धमेल्या आशिष वर झडप घातली. पाटलांनी आशिष चा देखील जीव घेतला आणि त्याच्या मृतदेहाला मागच्या दरीत टाकून दिले. राधाच्या मृत्यूने जखमी झालेल्या पाटलांच्या मनावर आशिषचा जीव घेऊन खपली पडल्या सारखे झाले होते. त्यांनी तिथेच निर्णय घेतला की राधाच्या देहाला याच पिंपळाच्या झाडाखाली अग्नी द्यायचा. सोबत आलेल्या लोकांनी पाटलांना सांगितले पाटील पिंपळाखाली अग्नी देऊ नका पण पाटलांनी कोणाचेच न ऐकता अंत्यसंस्कार पार पाडले. या घटनेला होऊन एक वर्ष होत आले. त्या दिवशी सूर्यभान पाटील आपल्या खोलीत झोपले होते तेवढ्यात कसल्याश्या आवाजाने त्यांना जाग आली.ते खडबडून जागे झाले त्यांनी खोलीतील दिवे लावले पण दिवे लही लागेनात. गड्यांना आवाज दिले तिकडून पण काहीच उत्तर आले नाही. तेवढ्यात पाटलांच्या नाकात एक कुबट वास शिरला, तो वास इतका विचित्र होता की त्यांचा जीव असा गुदमरत होता. आणि त्याच्या कानी एक आवाज पडला, आबा...आबा...मी आलेय आबा तुमची राधा मी आलेय......आणि तिच्या सोबत तो सुद्धा आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी एक बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली सूर्यभान पाटलांचा निर्घृण खून. खून निर्घृण च होता कारण मृतदेहाची अवस्था एवढी वाईट आणि भयानक होती की त्याकडे कोणाला पाहू वाटत नव्हते. डोळ्यांच्या जागी डोळे नव्हते होत्या त्या फक्त काळ्या खोबण्या, संपूर्ण चेहरा रक्ताने माखलेला होता, डोक्यावर एक जखम होती, हात धडापासून वेगळा केला होता. पोलिस घटनास्थळी आले होते. तेवढ्यात त्यांच्या घरातला एक गडी म्हटला, साहेब आज राधा ताईंच वर्षश्राद्ध होतं त्याचीच तयारी करायला मी गेलो होतो आणि येऊन बघितलं सकाळी तर हे असं... सबइन्स्पेक्टर मोहिते त्या ठिकाणी आले होते, त्यांना गावात येऊन चार महिने झाले होते. त्यांनी विचारले की ही राधा कोण ? तेव्हा त्या गड्याने पोलिसांना राधा, आशिष आणि घडलेली सर्व घटना सांगितली. मोहिते हे सर्व ऐकून चक्रावून गेले. त्यांनी तिथेच हवालदारांना आदेश सोडले, गेल्यावर्षी सूर्यभान पाटील आणि त्यांच्यासोबत त्या दिवशी जंगलात गेलेल्या सर्व लोकांना शोधून त्यांवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करा. पोलिसांनी हे काम अत्यंत शिताफीने केले. गावामधे त्या दिवशी पाटलांसोबत गेलेले जवळपास १५ जन सापडले. त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आता गावात सगळं काही नीट आणि सुरळीत सुरू होतं, आणि एक दिवस अण्णा कुंभार गावातून बेपत्ता झाला. त्याची बायको रडत भेकत पोलीस स्टेशन ला आली. रीतसर पोलिसांनी तक्रार लिहून घेतली आणि शोध सुरू झाला. अण्णाच्या बायकोने सांगितल्या प्रमाणे तो जंगलाच्या वाटेने पलीकडच्या गावाला जायला निघाला होता पण तो काय पलीकडे गावात पोहोचला नव्हता. पोलिसांनी जंगलात शोध सुरू केला आणि शोध पोहोचला त्या पिंपळाच्या झाडापाशी इथे पोलिसांना अण्णा चा छिन्नविच्छिन्न अवस्थेत सडू लागलेला मृतदेह मिळाला. सूर्यभान पाटील चा मृतदेह आणि अण्णाचा मृतदेह यात काहीच फरक नव्हता. तेच डोळ्यांच्या जागी खोबण्या, चेहरा रक्ताने माखलेला आणि डोक्यावर जड वस्तूने मारलेली खूण एवढंच आणि डावा हात धडापासून वेगळा झालेला...मोहीतेनी अंदाज बांधला चोरीच्या उद्देशाने खून झाला असावा, पण दोन खून एकाच प्रकारे म्हणजे हे काम एकाच व्यक्ती च आहे असा त्यांनी कयास बांधला. इकडे पंधरा दिवसात दुसरा बळी गेल्याने गावकरी चिंतेत होते. त्यांना ज्याची भीती वाटत होती कदाचित ती परत आली होती. ती म्हणजे राधा आणि तिच्या सोबत असलेला तो. पाटलांना एवढ्या त्यावेळी विनवण्या केल्या होत्या तरी त्यांनी गावकऱ्यांचे काहीच ऐकले नव्हते. त्यांच्या कर्माची फळे आता गावकऱ्यांना भोगावी लागणार. कारण त्यावेळी तिला पिंपळाच्या झाडाखाली अग्नी दिला होता. गावचा सरपंच होता दिलीपराव जाधव सरकार त्यांना सगळे सरकार म्हणायचे, त्याने ग्रामसभा बोलावली आणि ग्रामसभेमधे सांगितलं की, आपल्याला जी शंका वाटत आहे ती आपण मोहिते साहेबांच्या कानावर घालायची. हे जंगल म्हणजे आपलं धन आहे. वर्षातले चार महिने थोडे थोडके का होईना लोकं इथ येतात जंगल पाहतात त्यावर काही घरांची रोजी रोटी चालते. दोन खून, दोन बळी घेतलेत त्या सटवी ने अजून किती घेईल माहिती नाही. त्या आधी आपण पोलिसांच्या मदतीने ते पिंपळाचे झाड जाळून टाकू. गावकऱ्यांनी देखील याला समर्थता दर्शवली. सरपंच आणि काही मोजके मंडळी पोलीस स्टेशन ला गेले आणि मोहिते साहेबांना भेटून सारा प्रकार सांगितला. मोहीते हा सुशिक्षीत माणूस, त्यांना ह्या सगळ्या अंधश्रध्देवर काही विश्वास बसला नाही. पण त्या नंतर मोहिते जे काही बोलले त्याने सरपंच काय सगळेच हादरले. मोहिते म्हणाले, जर सूर्यभान पाटलाला आणि त्या अण्णाला तुम्ही म्हणताय तसे राधाच्या भुताने मारले असेल तर हे अतिशय चांगलं केलंय. माझा बदला तिने घेतला, सूर्यभान माझ्या हातून मरायचा होता तो तिच्या हातून मेला आणि मोहिते जोरजोरात हसू लागले. पण साहेब तुमचा या सगळ्यांसोबत काय संबंध? तुम्ही कोण? , सरपंच म्हणाले. मी सबइन्स्पेक्टर आदेश मोहिते, आशिष मोहिते ज्याला तुमच्या गावकऱ्यांनी आणि त्या पाटलाने मारला ना त्याचा मोठा भाऊ....आणि तो हसू लागला. इकडे गावकऱ्यांनी एक मोठा निर्णय घेतला. सरपंचाच्या नेतृत्वाखाली ते झाड गावच्या लोकांनीच जाळायचं ठरवलं. सरपंचासहित पंधरा लोकांनी ही जबाबदारी घेतली. दिवस ठरला, वेळ सुद्धा ठरली. वेळ होती मध्यरात्रीची आणि दिवस होता दर्श भावुका अमावस्या. कोणा मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे अमावस्येच्या मध्यरात्री हे काम करायचे होते. आणि हे निघाले. कोण हा उलट्या डोक्याचा मांत्रिक होता त्याने सांगितले होते की अमावस्येला आत्मा जास्त प्रबळ असतो. त्यावेळी त्याला नष्ट केलं की ती परत येत नाहीत. जवळजवळ अठ्ठेचाळीस तास झाले होते या लोकांना जाऊन तरी कोणीच माघारी आले नव्हते. शेवटी एकाने जाऊन पोलिसात सांगितले. मोहिते हे सारं ऐकून फार म्हणजे फार चिडले होते. त्यांनी पोलिस टीम घेऊन लगेच जंगलाकडे धाव घेतली. आणि त्यांना झाडाचे दुरून दर्शन झाले. त्यांना ते झाड अगदी हिरवगार दिसलं. वैशाखात सुद्धा पिंपळ टवटवीत हिरवागार दिसत होता. पण जवळ जाताच त्यांनी जे पाहिलं ते फार हृदयद्रावक होतं. गावातून आलेल्या पंधरा लोकांचे जळालेल्या अवस्थेतील मृतदेह तिथे पडले होते. सरपंच जाधव सुद्धा संपला होता. मोहितेना हे असं कसं अचानक झालं, काहीच समजत नव्हतं. मृतदेहांची अवस्था एवढी वाईट होती आणि त्यात मृतदेह कुजलेला वास श्वास गुदमरून टाकत होता. तर झालं अस, त्या दिवशी हे सगळे गावातून निघाले. त्यांच्यासोबत तो मांत्रिक देखील होताच ज्याने हा उपाय सांगितला होता. गावातून जाधव सरपंच आणि इतर मंडळी पिंपळाच्या दिशेने निघाले होते. एक तासभर चालून झाल्यावर त्यांना पिंपळाचे झाड दृष्टीस पडले. मांत्रिकाची पिंपळावर नजर जाताच एका बाईची जोरात किंकाळी संपूर्ण जंगलभर घुमली. आणि एक घोघरा आवाज आला. म्होरं येऊ नका, जित्त जायाचं असेल तर म्होरं येऊ नका. हा असला आवाज ऐकून मांत्रिकासोबत इतर मंडळीना दरारून घाम फुटला. पुढे जायला कोणी धजावेना, सगळे गावकरी जागेवर स्तब्ध उभे होते. मांत्रिकाने स्वतःला सावरत गावकऱ्यांना खडसावले, आज या दोन आत्म्यांना संपवले नाही तर हे आपल्याला संपवतील. घरदार जिवंत ठेवायचं असेल तर आजच्या आज यांचा निकाल लावलाच पाहिजे. ज्यांना आपल्या आईबापाला, बायकापोराना जिवंत पाहायच असेल त्यांनी माझ्या सोबत पुढे चला. मांत्रिकाने अस बोलताच सगळे लोक पुन्हा उठले आणि पिंपळाच्या झाडाकडे जाऊ लागले. जसं जसं झाड जवळ येऊ लागलं तसा वातावरणात बदल होऊ लागला. अचानक खूप गरम हवा सुटली, धुळीचे लोट उठू लागले. आणि इकडे गणोजी ज्याच्या हातात रॉकेल आणि माचिस होतं त्यानं स्वतःला पेटवून घेतलं होतं. गणोजी चा हा प्रकार इतका वेगात झाला की कोणाला काहीच समजले नाही. इतक्यात सरपंच जाधव झाडापाशी गेले त्यांच्या हातात रॉकेल आणि माचिस होतंच. झाडाकडे त्यांनी पाहिलं आणि जोरात ओरडले.....माफ कर आम्हाला राधे....माफ कर आणि त्यांनी अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. आता एक एक माणूस पुढे झाडापाशी जाऊन माफ कर ओरडत स्वतःला पेटवत होता. सगळे पाहणारे स्तब्ध कोणीच कोणाला काही बोलत नव्हतं . किंवा कोणीच कोणाला वाचवायला जात नव्हतं. काय झालं होत गावकऱ्यांना ते काहीच कळत नव्हतं. मांत्रिक हे सगळं पाहून चक्रावला. त्याने त्याचे मंत्रोपचार सुरू केले. पण काहीच फरक पडत नव्हता. अमावस्येला त्या अतृप्त आत्म्याच्या वाढलेल्या शक्तीपुढे मांत्रिकाचा सुद्धा निभाव लागतं नव्हता. या आधी तर मी अमावस्येला च या आत्म्यांना मुक्ती देत आलोय आज अचानक असं काय झालं?, तो स्वतः सोबत च पुटपुटत होता. पण त्याच कारण होत, दर्श भावुका अमावस्या, गेल्या वर्षी याच दिवशी या दोघांचा जीव गेला होता. मांत्रिकाच्या डोळ्यापुढे सगळे गावकरी जळत होते आणि तो फक्त पाहू शकत होता. इतक्यात त्याला त्याच्या मागे कसलीशी चाहूल जाणवली. त्याने मागे वळून पाहिले आणि दोन पावले मागे सरकला. समोर ते दोघे उभे होते राधा आणि आशिष . राधा लाल साडी मधे अधिक भयानक दिसत होती डोळ्यांच्या जागी खोबण्या, चेहऱ्यावर रक्त, डोक्यावर व्रण आणि आशिष चा डावा हात च नव्हता तिथून रक्त पडत होतं आणि चेहऱ्यावर अनेक जखमा. मांत्रिक शांतपणे मागे वळला, त्याने रॉकेल आणि माचिस घेतले आणि स्वत:च्या देहाला अग्नी दिला. ही घटना एवढी मोठी झाली की सरकारदरबारी याची दखल घेतली गेली. शासनाने या जंगलात सर्वसामान्य माणसांना जायला बंदी केली. या घटनेचे गंभीर पडसाद उमटले होते. मोहितेची तातडीने बदली करण्यात आली. मृत्यूचे सुरू झालेले तांडव शांत झाले. तरी सुद्धा सुंदरबन भीती आणि मृत्यूच्या छायेखाली राहणारच होते. कारण अजून ते दोघे त्या जंगलात च होते. 

आणि शेवट....

कोरोना आला lockdown आले. हातावर पोट असणाऱ्या लोकांचे बरेच हाल झाले. त्यांना खायला काही नव्हते, हाताला काही काम नव्हते. अश्यावेळी लॉकडाऊन शिथिल झाल्यावर गावकऱ्यांनी पाठपुरावा करून सुंदरबन चे जंगल पर्यटनासाठी उघडुन देण्याची मागणी केली. अनेक पाठपुरावे करून पैसे वैगेरे चारून शेyवटी जंगल खुले झाले. पण सरकारने एक अट ठेवली परगावचा व्यक्ती जंगलात एकटा जाणार नाही याची गावकऱ्यांनी काळजी घ्यावी. गावकऱ्यांनी एका मांत्रिका कडून तिथे यज्ञ करवून घेतला. मांत्रिकाने सांगितले हे जंगल आता भुताखेतापासून मुक्त आहे. पण कदाचित नियतीच्या मनात काहीतरी वेगळे च होते.

दिवस आजचा....

सौरभ वाट फुटेल तिकडे पळत होता. त्याचा कॅमेरा केव्हाच मागे कुठेतरी पडला होता. आणि पळून पळून जेव्हा त्याला धाप लागली. तो एका झाडाला टेकून उभा राहिला. सहज त्याची नजर वर गेली तर तेच पिंपळाचे झाड, त्याच झाडाखाली तो उभा होता. आणि त्याच्या कानी पुन्हा आवाज पडला, का आलास इथ?? काय हवंय तुला?? आणि सौरभ ला ते दोघे दिसले, सव्वीस वर्ष झाली होती त्यांना जाऊन पण ते अजूनही तिथेच त्याच पिंपळावर होते. दोघे ही फारच भयानक दिसत होते. आशिष चा डावा हात नव्हता त्याच्या खांद्यातुन रक्त पडत होते. सौरभ जागेवर च थिजला होता, त्याला जागचं हलता येत नव्हतं इतक्यात आशिष सौरभ कडे झेपावला आणि त्याच वेगाने मागे येऊन पडला. हे सारं इतक्या वेगात झालं की सौरभ सुद्धा दोन पावले मागे सरकला. माझा आणि आशिष चा आत्मा आणि सौरभ या दोघांच्या मधे काहीतरी दैवी शक्ती आहे हे राधाच्या लक्ष्यात आलं तिचं लक्ष त्याच्या पायाकडे गेले त्याच्या पायात होता एक काळा दोरा जो त्याच्या आजीने त्याच्या पायात खूप वर्षाआधी बांधला होता. त्या काळ्या दोऱ्यामुळे या दोघांना सौरभ ला काहीच करता येईना. सौरभच्या देखील लक्ष्यात ही गोष्ट आली आणि त्याने सुटकेचा निःश्वास सोडला. त्याला वाटलं जोवर हा दोरा माझ्या पायात आहे तोवर हे दोघे मला काहीच करू शकणार नाहीत. एव्हाना संध्याकाळ होत आली होती. सौरभ ने त्या दोघांची नजर चुकवून गावच्या दिशेने धूम ठोकली. तो पळून जाताच एक किंकाळी त्या जंगलात बराच वेळ घुमत होती. तो आवाज राधाचा होता. इकडे सौरभ पळत होता त्याला धाप लागत होती पण तो पळत होता. आणि पळता पळता ओलसर जागेवरून घसरून एका काट्यांच्या झाडीत पडला. त्याच्या अंगाला काटे टोचले होते, हातात, पायात काटे घुसले होते. तो ते उपसून काढत होता आणि त्याच वेळी रक्ताच्या चिळकांड्या बाहेर उडत होत्या. तो रक्तबंबाळ झाला होता. त्याला काहीच सुधरत नव्हते. तो उठला त्या झाडीतून बाहेर आला. आणि चालू लागला. रक्त काही थांबायचं नाव घेत नव्हतं. चालून चालून तो थकून एका ठिकाणी जरा स्थिरावला त्याला पाणी हवं होतं, तो पाण्याच्या शोधात एकडेतिकडे पाहत असतानाच त्याच्या लक्षात आलं की ही जागा आपल्या परिचयाची आहे. इथे या आधी आपण येऊन गेलोय. आणि तेवढ्यात आवाज आला समोरून एक आवाज आला, आलास परत....का आलास परत???...त्याने समोर पाहिले समोर राधा आणि आशिष उभे होते, त्याने वर पाहिलं तर तो त्याच पिंपळाच्या झाडाखाली होता. त्याने पायाकडे पाहिले पाय काटे लागल्यामुळे रक्ताने माखला होता आणि त्याच्या पायात काळा दोरा नव्हता. नियतीने म्हणा किंवा नशिबाने त्याची केव्हाच साथ सोडली होती. राधा आणि आशिष त्याच्याकडे पाहून केविलवाणे हसू लागले. सौरभला काही सुचेना त्याने त्या दोघांपुढे हात जोडले आणि म्हणाला, मी तुमचं काहीच वाईट केलं नाहीये मला जाऊद्या....मला मारू नका....गावातून रामाप्पा, बबन्या आणि सरपंच सौरभला शोधन्यासाठी जंगलात आले. आणि ते सरळ पिंपळाच्या दिशेने चालू लागले. दुरूनच त्यांना पिंपळ दिसला अगदी दिमाखात उभा होता तो. पिंपळाच्या जवळ जाताच त्यांना दिसलं रक्त, फाटलेल्या कपड्याचा तुकडा आणि एक बुट....तिघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि सरपंच म्हणाले, आरं गड्यांनो ती गेलीच नाय हिथच हाय. अन् ती आता कोणालाच जित्ती सोडणार नाय. ती जागी झालीये. समद्याना सावध कराया हवं....सरपंच, रामाप्पा आणि बबन्या ला बेपत्ता होऊन आज तीन दिवस झालेत. आणि या तिघांना शोधायला गावातले काही लोक जंगलात निघाले आहेत आणि ते सुद्धा कदाचित कधीच परत न येण्यासाठी.......

समाप्त.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror