फुग्यांची गाडी
फुग्यांची गाडी


रात्री जेवण झाल्यानंतर कोल्ड कॉफी पीत असताना रंगेबेरंगी फुग्यांनी नटलेली बाबागाडी दिसली. आणि दिवसभराचे सगळे विचार बाजूला करत मनाने तिकडे ओढ घेतली. अर्थात फुगा दिसला की बहुतांश सर्वांना आपापलं बालपण आठवतच. मनात म्हणालो केवढं नशीबवान बाळ आहे एवढे फुगे!
आणि इतक्यता ती आई बाबागाडी सोबत घेऊन एका मुलांच्या घोळक्यासमोर फुगा विकू लागली.
नीट निरखून पाहिल्यावर समजलं की सगळीकडे तुटलेली बाबागाडी तारेने घट्ट बांधून पुन्हा चालण्यालायक केली होती गाडीच्या बाजूला कोपऱ्यावर एक काठी बांधली होती आणि त्याला बाळाला दिसतील अशा अंतरावर फुगे बांधले होते. ती आई आपल्या चिमुखल्याला खेळवत खेळवत फुगे विकत होती. फुगे विकत विकत दोघे माझ्या जवळपास आले.
मी जरा व्यवस्थित पाहिलं बाळाचा गोंडस आणि निरागस चेहरा पाहिल्यावर मला राहवलच नाही. हातामध्ये राजगिऱ्याचा लाडू होता आणि चेहऱ्यावर राजगीऱ्यांच्या दाण्यासोबत हसू अशा थाटात स्वारी निम्मा वेळ फुग्यांकडे आणि उरलेल्या वेळात आईकडे टकमक पाहत होती.
मी पण एक फुगा घेतला त्यांना विचारून दोन तीन फोटो काढले.माझ्यासाठी जरी फुगा रबर आणि दोऱ्याचा हवेचा गोळा असला तरी त्यांच्यासाठी मात्र भाकरीचा तुकडा मिळवून देणारा सोन्याचा तोळा होता.
रस्त्यावरती उभं राहून कडेवर बाळ घेऊन भीक मागताना अनेक माता दिसतात आणि केवळ बाळाकडे पाहून अनेक लोक त्यांना पैसेही देतात. तेव्हा याच समाजात फुग्यांचा व्यवसाय करून पैसे कामावणारी ही आई आणि असेच छोटे व्यवसाय करणाऱ्या अनेक माऊल्या मला नेहमीच आदरणीय वाटतात. अशा सर्वांच्या हिमतीला दाद देण्यासाठी त्यांचं कौतुक करण्यासाठी हा लेख.