पाहुणचार
पाहुणचार


आज दुपारी मतदान करण्यासाठी अाज्जीला घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर आली. मस्त बुलेट काढली आणि डगडग करत आमची स्वारी करांज्यामधील श्रीपादराव हायस्कूल कडे निघाली. दुपारची वेळ होती जास्त गर्दी नव्हती म्हणून पटकन मतदान झालं. शाळा शाळेचे दिवस वगरे आठवणी निघाल्या. ओळखीचे लोक भेटले. त्यांच्याशी हस्तंदोलन झालं. आणि आम्ही शाळेतून बाहेर पडलो.
इतक्यात अज्जीच्या सुरात बदल झाला. मला लगेच लक्षात आलं काहीतरी हवंय हिला. मी बोललो बोला काय करायचंय. आज्जी लगेच म्हणली माझी एक मैत्रीण इथेच राहते तिला जाता जाता भेटून जाऊ. मी कामामुळे पुण्यात असतो त्यामुळे अज्जीसोबत फिरण्याचा जास्त प्रसंग येत नाही. इकडे असलो की सोडणे आणि परत आणणे होते कधी कधी. पण मी तिला नेहमी ती घेऊन चल म्हणली की लगेच घेऊन जातो हे तीला माहितीये. तिच्या भावाच्या मुलाच्या लग्नासाठी फलटण ला गेलेलो तिथे आम्ही दोघे लग्नाच्या मध्ये छोट्या रस्त्यावर चारचाकी मधून तिच्या एका जुन्या मैत्रिणीचे घर शोधत २ तास फिरत होतो.
शाळेतून बाहेर पडलो आज्जी रस्ता सांगत होती आणि आम्ही चाललो होतो
त्यांच्या घरी पोचल्या पोचल्याच अज्जीने जोरात हाक मारली आमच्या घरतल्यांना जे ओळखतात त्यांना सर्वांना माहितीये की आमच्यात सगळेच जरा वरच्या स्वरात बोलतात. त्यांना अतून आवाजावरूनच कळलं की अाज्जी आली आहे. ते दोघे नवरा बायको लगेच बाहेर आले. तुम्ही आमच्या घरी येत नाही म्हणून आम्हीच आलो वैगरे आज्जीने नेहमीप्रमाणे चालू केले. आजोबा ८० वर्षाचे असतील आणि अज्जी जवळपासच पण काय उत्साह होता दोघांच्यात. आजोबांना काय करू आणि काय नको असे झाले होते. जेवण करा असाच डायरेक्ट आग्रह चालू झाला. आम्ही माळकरी आहोत त्यामुळे शाकाहारीच मिळेल हेही त्यांनी हळूच सांगितले. जेवण नको म्हणाल्यावर पोहे तरी घ्या मग शेवटी चहा करू असे सर्वानुमते ठरले. पाण्या चा तांब्या आला. आणि गप्पा गोष्टी चालू झाल्या.
हे दुखते आहे त्यावर हा उपाय. औषधांची नावे, डॉक्टर, वय, ज्येष्ठ नागरिक पास, वगरे गंभीर विषयांवर अतिशय मन लाऊन चर्चा झाली. हे नवीन ते नवीन अस झालं तस झालं हिच्या घरी हे तिच्या घरी ते वरती माना डोलवल्या.
माझी चौकशी झाली. चहा आला इतक्यात आजोबा "थांबा मी बिस्कीट घेऊन येतो" असे म्हणाले.मला तो उत्साह पाहून इतका समाधान वाटलं कदाचित त्या मुळेच हा लेख लिहित आहे. या वयात आपल्या लोकांबद्दल इतका प्रेम व जिव्हाळा पाहिला की खरंच खूप समाधानी वाटलं.
शेवटी बाहेर पडताना चर्चेमधीलएक वाक्य मनात राहील.
"हल्ली लोकांच्यात प्रेम कमी झालंय. प्रत्येकाला आपापल्या खोल्या हव्यात एकत्र बसणे, गप्पा मारणे, गोधड्या टाकून झोपणे ह्यामुळे जे प्रेम निर्माण व्यायच ते आता कसे राहील. "
खूप प्रसन्न वातावरणात छान गप्पा मारून घरातून बाहेर पडलो. पुन्हा या असे आजोबांनी आवरजून सांगितले. खूप हसणारे व हसवणारे बडबड करणारे आजोबा आणि प्रेमाने पाहुणचार करणाऱ्या आज्जी ह्यांना भेटून आम्ही डगडग आवाज करत वेगळ्याच मूड मध्ये घराकडे निघालो.