Rahul Shinde

Inspirational

3.1  

Rahul Shinde

Inspirational

फिटे अंधाराचे जाळे

फिटे अंधाराचे जाळे

9 mins
24.6K


              मीराच्या सामाजिक कार्याची दखल राज्यसरकारने घेतली आणि तिला 'समाजरत्न पुरस्कार' जाहीर झाला. मीराचे अनेकजणांनी विविध माध्यमांतून अभिनंदन केले. ती सुखावली… पुरस्कार जाहीर झाल्याच्या रात्री एका निवांत क्षणी तिला इथंपर्यंत पोहचण्याआधीचा केलेला काटेरी प्रवास आठवला ......

          मीरा आणि समीरचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. ते दोघं दररोज भेटायची, मनमुराद बोलायची, हसायची, खिदळायची पण कधीकधी मीरा मधूनच शांत,गंभीर व्हायची. क्षणात तिच्या चेहऱ्यावरचं तेज उतरायचं.तिला अपराधी असल्यासारखं वाटायचं. समीरच्या ते कधीच लक्षात यायचं नाही. त्याच्या सोसायटीमध्ये, त्याच्या घराच्या समोर एकट्या राहणाऱ्या जोशी आजींच्या घरीच मीरा कामवाली म्हणून राहत होती.जोशी आजींबरोबर मायेचं नातं निर्माण झाल्यामुळे समीरची सारखी त्यांच्या घरी ये जा असायची. मीरा आणि समीरची एकमेकांशी ओळख होऊन नंतर त्याचं प्रेमात रूपांतर झालं होतं. तो तिच्या प्रेमात एवढा बुडाला की ती कुठली,तिचं पूर्वायुष्य कसं होतं हे प्रश्न समीरला कधी पडलेच नाहीत. तसं एकदा त्याने तिला तिच्या आईवडिलांबद्दल विचारले असता आपले आई-वडील अपघातात या जगातून निघून गेले, दुसरं आपलं कोणी नाही असं सांगितलं होतं. ती भूतकाळातल्या दुःखात जाऊ नये म्हणून समीरनेही तिला खोलात विचारले नव्हते.

                    एक दिवस समीर मीराला म्हणाला "आई-बाबांना मी आपल्याबद्दल सांगितलंय. त्यांनी तुला पाहिलंच आहे,पण भेटून सविस्तर बोलायचं आहे. मला आवडणाऱ्या मुलीशी लग्न लावतील, असं ते यापूर्वीच मला म्हणाले होते. तू काही काळजी करू नकोस. "

                  हे ऐकून मीरा क्षणभर आनंदली,पण दुसऱ्या क्षणी तिचा चेहरा गंभीर झाला. जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करतेय, त्याच्यापासून आपण एक कटू सत्य लपवून त्याचा विश्वासघात करतोय,असं तिला वाटू लागलं. प्रकरण जास्त पुढे जाण्याआधीच समीरला सगळं सांगितलं पाहिजे, असा तिने निर्धार केला.

                 "समीर,प्रेम हे खरेपणावर चालायला हवं. माझं... पूर्वायुष्याचं सत्य तुला सांगायचं मी टाळत आले, कारण ते तू ऐकल्यावर मला स्वीकारशील का नाही याची मला भीती वाटायची. पण आता मात्र मला राहवत नाही. मी जर तुला ते सांगितलं नाही तर आयुष्यभर मला अपराध्यासारखं वाटेल. तुला मी फसवलं, तुझा विश्वासघात केला, तुझ्याशी खोटेपणा केला ही गोष्ट बोचत राहील मला." हे बोलत असताना मीरा नेहमीपेक्षा खूप वेगळी वाटत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव गंभीर झाले होते. समीरला काय बोलावे कळेना.

"मीरा... जे काय असेल ते मला सांग." तो एवढंच म्हणाला.

 " माझे आई-वडील अपघातात गेले नाहीत…मी झोपडपट्टीत राहायचे, वडील आजारपणामुळे गेले. चौथीनंतर माझ्यासाठी शाळा संपली, पण मला भाषेची आवड असल्यामुळे नंतर जिथे घरकाम करायचे, तिथे पेपरमध्ये कविता,लेख आवडीने वाचायचे,म्हणून मी शुद्ध बोलू शकते. मी घरकाम करूनही माझ्या घरचा सगळा खर्च भागत नव्हता.

          मी पंधरा-सोळा वर्षाची असेन,तेव्हा माझी आई एकदा कुठल्यातरी बाईला घेऊन घरी आली. आई मला म्हणाली, "मीरे, तू आता या मावशीकडे राहायला जायचं. तिकडं तुला पैसा, कपडे सगळं चांगलं मिळेल." आईला सोडून त्या अनोळखी बाईबरोबर जाण्यात मला अजिबात रस नव्हता. पण ती बाई मला जबरदस्तीने घेऊन गेली.

            ती मला घेऊन गेली, एका भयानक वस्तीत. गजबजलेली वस्ती. तिथं माझ्यासारख्याच, पण वयाने मोठ्या असणाऱ्या मुली होत्या. ती बाई चंदू नावाच्या एका माणसाला म्हणाली, "हे नवीन पाखरू." तो चंदू माझ्याकडे वाईट नजरेने बघत हसत होता. मी त्या बाईला विचारलं "तुम्ही मला कुठे घेऊन आलात? मला माझ्या आईकडे जायचंय." तशी ती बाई हसून मला म्हणाली "आता हेच तुझं घर हाय, याला वेश्यावस्ती म्हणत्यात."

             ज्या वयात मला वेश्या या शब्दाचा अर्थही माहित नव्हता, त्या वयात मला वेश्या बनवले गेले. तेच माझं जीवन होऊन बसलं .पोटासाठी रोज बलात्कार सोसले मी. बाहेर पडण्याचा मार्गही माहित नव्हता. एकवीस-बावीस वर्षाची असताना जाणीव झाली, काहीही करून यातून निसटायलाच हवे. रोज रोज असलं जीवन जगायचं नाही आपल्याला. मग एका रात्री काही पैसे घेऊन तशीच पळाले तिथून, त्या अडगळीपासून खूप दूर. पुन्हा माझ्या घराकडे आले, पण माझी आई पुन्हा मला तिकडेच पाठवायला निघाली होती, म्हणून तिथूनही निघून आले. नशिबानं इथे एकट्या राहणाऱ्या जोशी आजींच्या घरी मोलकरणीचं काम मिळालंच,शिवाय निवाराही मिळाला. वेश्यावस्तीत राहूनही मी त्यांची तसली भाषा शिकले नाही. माझी भाषा, माझी आवड माझ्या रक्तातच आहे. " मीरानं सगळं सांगून टाकलं.

              समीरला पुढे बोलवेना. त्याला स्वप्नातही कोणीतरी इतकं भयानक सांगितलं नसतं,असं प्रत्यक्षात तिनं स्वताच्या तोंडून सांगितलं होतं. काही क्षण तो तसाच स्तब्धपणे उभा राहिला, भानावर येताच मात्र त्याच्या चेहऱ्यावर मत्सर होता. त्याच्यात एक अहंकार जागा झाला होता, एक मानवी हिंसकता जागी झाली होती. 

     "तू का फसवलंस मला? का मला स्वतःच्या प्रेमात पाडलंस. हे सगळं मला आधीच का नाही सांगितलंस?" समीर ओघाच्या भरात संतापून म्हणाला. 

    "समीर ,ऐकून घे माझं. या सगळ्यात माझी काय चूक आहे? मी तेव्हा अजाण, दुबळी होते. मला ते सगळं नाईलाजास्तव करावं लागलं होतं. शक्य झालं तेव्हा मी ते जीवन टाकून आले. समीर, माझं तुझ्यावर मनापासून प्रेम..... " मीराचं वाक्य संपण्याआधीच समीर बोलू लागला. 

  "ए, 'प्रेम' हा शब्द तू उच्चारू नकोस. जिनं आपलं शरीर विकलं, तिला प्रेमाचा अर्थ काय कळणार?" 

  "इतक्या जणांना शरीर देऊन मला कधीच प्रेमाचा अर्थ समजला नव्हता, तो तुझ्या फक्त हळव्या स्पर्शात समजायला लागला." मीरा भाऊकपणे म्हणाली. 

 "मला तुझं काही ऐकायचं नाही.... परत माझ्या आजूबाजूला फिरकण्याचा प्रयत्न करू नकोस. नाहीतर तुला आयुष्यभरासाठी अद्दल घडवेन ." समीरला राग अनावर झाला होता. एवढं बोलून तो निघून गेला.

   मीरा सुन्न झाली. ज्यानं आपल्यावर जीवापाड प्रेम केलं, तो क्षणात असा कठोर होईल याची कल्पनाही तिने केली नव्हती. डोळ्यातील आसवांनी संपूर्ण चेहऱ्याचा ताबा घेतला, नजर मात्र समीर गेलेल्या वाटेवर खिळली होती, तिला आयुष्यभराचं एकटेपण दिसायला लागलं. कसंबसं तिने स्वतःला सावरले. 

    समीरने मीरा ज्यांच्याकडे राहत होती, त्या जोशी आजींनाही मीराच्या पूर्वायुष्याबद्दल सांगितले आणि 'समाज काय म्हणेल' या भीतीने त्यांनीही मीराला राहण्याची सोय दुसरीकडे बघायला सांगितली.

      आता रात्रीचं भयाण एकटेपण मीराला पोखरायला लागले. वेदनेने कहर केला. अश्रूंचा बांध फ़ुटायचा, दुःख ओसंडून वाहू लागलं. मध्यरात्रीच तिला जाग यायची आणि तिचा चेहरा घामेघूम झालेला असायचा... पण प्रत्येक दुःखावर काळ हेच औषध असते. जाणारा प्रत्येक दिवस तिचं दुःख हळूहळू गिळंकृत करायला लागला आणि ती सावरायला लागली. तिला जाणीव झाली, आपल्यासारख्या अशा अनेक स्त्रिया आहेत, ज्यांना या मार्गावर जावे लागते. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य रडत जगायचं?समाजव्यवस्थेच्या हिंसक बेडीत अडकून रहायचं ? त्यांचीही स्वप्नं असतात, त्यांनाही सन्मानाचं आयुष्य हवं असतं.. आपल्याला काहीतरी करायला हवं, असं तिला तळमळीने वाटू लागले. 

  आपल्या अंतरात्म्यानं दिलेल्या या हाकेनं तिला ऊर्जा मिळाली आणि तिनं वेश्यांच्या पुनर्वसनाचा ध्यास घेतला. भावनेच्या भरात घेतलेला कुठलाही निर्णय सत्यात आणणं तितकं सोपं नसतं, हे तिला चांगलंच कळत होतं.तिने तिचा लढा चालू केला. हरण्यासारखं आता काहीच शिल्लक नव्हतं, म्हणून ती निडर होती. तिने स्वताच्या कामाचा व्याप वाढवला. ती आर्थिक दृष्ट्या खंबीर व्हायला लागली. सोपं नव्हतं हे सगळं, पण तिच्यातली जिद्द तिला प्रत्येक संकटाशी लढण्यास बळ देत होती. प्रबळ इच्छेपुढे मार्गही सापडू लागले. आभाळ हरवलेल्या आणि बेवारस वेश्यांना ती शोधून भेटू लागली. तिच्यासारख्या समदुःखी असणाऱ्यांचे दुःख ती सहज समजू शकत होती. त्यांच्या असंख्य प्रश्नांनी तिचे काळीज पिळवटून निघायचे. तिने त्यांच्याच मदतीने एक छोटीशी संस्था स्थापन केली. स्वतः निराधार असूनही ती अनेक निराधार जीवांची आधार बनत चालली होती.शेवटी निराधार असलेल्यांना कशाची जास्त गरज असते? मायेची. प्रेमाची. आपुलकीची. ते सगळं निराधार जीवांना तिथे मिळू लागलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना तिथे जगण्याचं बळ मिळू लागलं.त्या स्वावलंबी बनू लागल्या. स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. 

    हळूहळू तिच्या संस्थेची माहिती इतरत्र पोहचू लागली. तिच्या जिद्दीचा विजय झाला. तिच्या या कार्याची दखल राज्यसरकारने घेतली आणि तिला सामाजिक कार्यासाठी मिळणारा 'समाजरत्न पुरस्कार' जाहीर झाला ..... 

             …….मीराला हा सगळा प्रवास आठवून तिच्या डोळ्यात शांतता दाटली, चेहऱ्यावर कर्तृत्वाचा आनंद आला.

           

       पुरस्काराचा दिवस उजाडला. मंचावर अनेक मान्यवर उपस्थित होते. समोर मीरानं ज्यांना आधार दिला, अशा तिच्या मैत्रिणी बसल्या होत्या. त्यांचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. मीराला पुरस्कार देण्यात आला आणि मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली गेली. तिच्या चेहऱ्यावर तेज होते,शांतता होती. समाधान होते. ती बोलू लागली, "आजचा दिवस माझ्यासाठी सन्मानाचा आहे, मला भरभरून बोलावंसं वाटतंय. स्वतःच्याच संपलेल्या जीवनाला वळण दिलं मी. सारं काही संपल्यानंतरचं जीवन भयानक होतं, पण कधीकधी सर्वकाही संपल्यासारखं वाटतं तेव्हाच जगण्याला खरी सुरवात होते. माझं तसंच झालं. खोल दुःखात बुडाल्यावर वाटलं आयुष्य संपवून टाकावं. कुणासाठी आणि का जगायचं? हा प्रश्न पडला. .पण मग... कुणासाठी मरायचं? असाही प्रश्न पडला. मी मेल्यावर कोणाला फरक पडणार होता? हा प्रश्नही तितकाच विचार करायला लावणारा होता. मरणंच हवं असेल तर त्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो... मग ठरवलं, जगूया. का जगायचं याची उत्तरंही हळूहळू सापडायला लागली. मी जे पूर्वायुष्यात जगले, तो माझा नाईलाज होता, पण म्हणून मी त्यासाठी उरलेलं आयुष्यही मरत जगायचं? एक माणूस म्हणून माझी ओळख का लाथाडली जावी?आमच्यासारख्यांचं काळीज दगडाचं नाही,त्यालाही भावना आहेत, वेदना आहेत,भीती आहे.. इतरांसारखीच.. पण हे सगळं समाज विसरत आहे, म्हणूनच माझ्यासारख्या असंख्य जीवांसाठी, त्यांच्या सन्मानासाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी लढण्याची जिद्द माझ्यात निर्माण झाली. जगण्याच्या बेडीत ज्यांचं मरण अडकून पडलंय, त्यांना मला सन्मान, प्रतिष्ठा मिळवून द्यायची होती म्हणून धडपडले. शेवटी सत्याला मरण नसते. तुम्ही आज माझा सन्मान केलात, माझ्या कार्याला शाबासकीची थाप मिळाली... हा सन्मान अजून खऱ्या अर्थाने तेव्हा फळाला येईल,जेव्हा माणूस माणूसकीची पूजा करेल. शेवटी आम्हीही माणसंच आहोत..." 

      तिचं भाषण संपलं आणि तिच्या बोलण्यात रममाण झालेले श्रोते उभे राहून टाळ्या वाजवू लागले. तिच्या मैत्रिणींच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले होते. त्यांच्यासाठी मीरा एक वटवृक्ष होती. कार्यक्रम संपल्यानंतर सगळेजण मीराला भेटू लागले, तिचे अभिनंदन करू लागले. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला... .

    हळूहळू सभागृह रिकामे झाले.सभागृहाच्या बाहेर पडताना मीराला कोणीतरी "मीरा" अशी हाक मारली. तिला आवाज ओळखीचा वाटला,तिची पावले थबकली. छाती धडधडू लागली. तिने मागे वळून पाहिले. ज्याने तिला हाक मारली,तो समीरच होता. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. जेमतेम दोन वर्षानंतर मीरा समीरला पाहत होती. त्याच्यासोबत त्याची आईही होती. ते दोघेही मिराजवळ आले.

   "मीरा, तुझ्याशी थोडं बोलायचंय .."समीरची आई म्हणाली. समीर आणि त्याच्या आईच्या अनपेक्षित भेटीनं थोडासा धक्का बसलेल्या मीरानं नकळत मानेनेच होकार दिला.   

    समीरची आई बोलू लागली, "तू समीरच्या आयुष्यातून निघून गेलीस तेव्हाच समीरकडून सगळं काही समजलं मला. तेव्हा समीर जे वागतोय ते चूक की बरोबर हे कळत नव्हतं... पण नंतर विचार केला. समीरने मला सांगितलं तसं तू खरंच त्याला फसवलंस? तुझ्याबद्दल तू आयुष्यभर लपवून ठेऊ शकली असतीस, पण तू तसं केलं नाहीस, कारण तुझ्यात प्रामाणिकपणा होता.. हे कळत असूनही मी सामाजिक बंधनांत, नियमांत अडकले होते. आम्ही जरी तुझा स्वीकार केला तर समाज आमच्याशी कसा वागेल? आजूबाजूचे लोक हे मान्य करतील?...शेवटी निर्धार केला,चांगल्या गोष्टींची सुरुवात स्वतःपासूनच करायला हवी…सभ्य म्हणवणारे लोकही सभ्यतेच्या बुरख्याखाली अनेक पापं लपवतात. तुझ्यात मात्र सच्चेपणा आहे. आपण आज आधुनिक तंत्रज्ञान वापरतो, पण आपल्याकडे आधुनिक विचारांचा अभाव आहे. समीरला खूप सुनावलं मी.. त्याचा क्रूरपणा दाखवून दिला. त्यालाही त्याची चूक कळाली, पण तोपर्यंत उशीर झाला होता. तू निघून गेली होतीस. तुझा शोध कसा घ्यायचा हाच प्रश्न होता,पण तुला पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी वाचली. म्हटलं,इथेच भेट होईल तुझी." 

      एवढा वेळ अपराध्याच्या भावनेनं शांत असलेला समीर आता बोलू लागला," मीरा... मला तुझी गरज आहे.. मी चुकीचं वागलो तुझ्याशी, मला माफ करशील?"

        "माफ करायचं का नाही हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे मीरा. मीही तूला विनंती नाही करणार. तू जे काय करून दाखवलंस त्याचा खूप अभिमान आहे मला.समीरची योग्यता असेल, तरच तू त्याला माफ कर. त्याची आई असूनही मी हेच सांगेन.. तू मला सून म्हणून मिळालीस,तर तो मी माझा सन्मान समजेन. " समीरची आई मीराचा हात हातात घेत ठामपणे म्हणाली.

        हे ऐकून मात्र मीराच्या डोळ्यात पाणी आले. तिनं समीरच्या आईला मिठी मारली.

         "समीर, तू चुकीचं वागलास. एक माणूस म्हणूनही माणुसकीला सोडून वागलास... पण तुझ्या डोळ्यातले पश्चातापाचे अश्रू दिसतायत मला… शेवटी तुझ्या वागण्यामुळेच माझ्या हातून हे कार्य घडू शकले. मला जगण्याची नवी दिशा मिळाली. कित्येकांच्या दुःखांवर फुंकर घालण्याची संधी मिळाली. मी खंबीर बनले. माझी फक्त एकच विनंती आहे, लग्नानंतरही मला हे कार्य चालू ठेवण्याची परवानगी हवी आहे." मीरा म्हणाली.

        "लग्नानंतरही तुझ्या या कार्यात कुठलाच अडथळा येणार नाही, याची शाश्वती मी देते...... आता निघायला हवं. उद्या तू समीरसोबत घरी येशील? मग निवांत बोलू. " समीरची आई.

"हो, नक्की." मीरा.

     इतक्यात मीराची मुलखात घेण्यासाठी पत्रकार आलेत, असं कुणीतरी तिला येऊन सांगितलं आणि मीरा तिथून निघाली. मीरा जात असताना तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अभिमानाने पाहत भान हरपलेल्या समीरला त्याच्या आईने भानावर आणले आणि ते दोघंही तिथून निघाली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational