फिरकी
फिरकी


75 वर्षाचे नाना कामत आणि 70 वर्षाची नानी एक आनंदी जोडपं मुंबईच्या चार खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहत होते. नानी गोरीपान, आनंदी, वजनाने भरभक्कम, काही छंद काही कला जोपासणारी. नाना जरा रुक्ष व्यक्तिमत्त्वाचे, फक्त बातमी आणि बातम्या, पेपर आणि पेपर, राजकीय चर्चा,. रोज सकाळी रामदेव बाबांचा चैनल लावून त्याच्यापुढे बसून तीन तास श्वास टाकत राहायचे. मध्ये मध्ये बीबीसी, डिस्कवरी, तोंडी लावायला मराठी चॅनल बातम्या चालू. जमल्यास पुटपुटत काही स्तोत्र, आणि पंचवीस वर्ष झाली तरी पाठ न झालेला हनुमान चालीसा. साधी राहणी, तेच कपडे, तेच सर्व. नानी मात्र आनंदी, रोज नवीन कपडे दिले तरी तिला आवडायचे, स्वयंपाकात सुगरण, अत्यंत चविष्ट पदार्थ बनवण्यात नानीचा हातखंडा. ठसठशीत हिर्याच्या कुड्या, हातात बांगड्या, केसांचा बुचडा, आणि सोयीसाठी म्हणून सलवार-कुर्ता.
नाना आणि नानी आदर्श कुटुंब, परदेशवारी केलेले अमेरिका लंडन युरोप, तसेच सिंगापूर, मलेशिया, थायलंड इत्यादी देश बघून अगदी कृतकृत्य झालेले. परदेशातली मुलगी अंजू रोज फोन करून म्हातारी आई आणि वडिलांची चौकशी करत असे. दोन नातवंडं पण गोड आवाजात नानी नानी, नाना नाना करत. अंजू दरवेळेला अमेरिकेहून येताना काहीना काहीतरी घेऊन येत असे, यावेळेला तिने ब्लडप्रेशर मोजण्याचं इलेक्ट्रॉनिक यंत्र घेऊन आली होती. बस नानांना एक छंदच लागला, सकाळी.. घे बीपी, दुपारी जेवण झाल्यावर घे बीपी... रात्री झोपायच्या आधी घे बीपी... फॅमिली डॉक्टरकडे जाण्याचं आजकाल नाना टाळायला लागले, घरीच बीपी मोजायचे.
व्यायाम आणि रोजच्या चालण्यामुळे नाना एकदम परफेक्टली फिट, याच्या उलट नानी मात्र गोल् गोबऱ्या. बीपी मशीनची स्लीव, नानांच्या हातावर फिट बसायचे, नानांचे बीपी पण नेहमीच वरचे नंबर दाखवायचे. त्याच्या उलट नानीच्या हातावर मशीनची स्लीव बसायचेच नाही, थोडासा प्रेशर दाखवल्यानंतर ती खाडकन उडून जायची. नानींना काही कधी आपलं प्रेशर बघताच आलं नाही. अंजू नेहमी म्हणायचे म्हणायची,"आई तू नेहमी आनंदी राहा, तुझं ब्लडप्रेशर कधीच वाढणार नाही."
आज रविवार, नानी डोक्यावरून आंघोळ करणार होत्या. तेलाची आंघोळ म्हणून कानातल्या हिऱ्याच्या कुड्या त्यांनी काढून ठेवल्या होत्या.
नेहमीप्रमाणे नानांनी सकाळचं बीपी घेतलं, आणि ताजा पेपर घेऊन आरामखुर्चीत बसले. नानीने नाश्त्यामध्ये मस्त इडली चटणीचा बेत केला होता. त्यामुळे आता फक्त आरामच होता. आता अर्धा-पाऊण तास नानीची अंघोळ, मग तासभर तिचा स्वयंपाक, पूजा, जेवायला नक्कीच दीड वाजणार होता.
आंघोळ करताना नानीच्या उजव्या हातामध्ये मुंग्या आल्यासारखे वाटायला लागले, घाईघाईने आंघोळ करून बाहेर आल्या आणि नानांना त्यांनी मुंग्या येत आहेत हे सांगितलं. झालं! नानांचं ब्लड प्रेशर खटाखट वर चढायला लागलं. त्यांनी नानींना जोरात श्वास घ्यायला सांगितला, आणि अंथरुणावरती आडवं पडायला सांगितलं. ह्या वेळेला मात्र नानांनी नानीच्या हातावरती मशीनचा पट्टा व्यवस्थित लावला. देवाचं नाव घेऊन मशीन चालू केलं. नानीचं ब्लडप्रेशर 120 /80. काळजीचे काहीच कारण नाही. नानांनी नेहमीप्रमाणेच नानीला व्यायाम न करण्याबद्दल झाडले. नानी गप्प बसली, नेहमीप्रमाणे स्वयंपाक आटोपला, आज नानापण थोडेसे मनातून हलले, आणि त्यांनी उठून देवाची पूजा केली. मुकाट्याने जेवणे झाली. नानीच्या हाताला मुंग्या येतच होत्या.
सगळी कामं आवरल्यावर शांतपणे नानी सोफ्यावर येऊन बसली, कानामध्ये घालण्यासाठी हिऱ्याच्या कुड्या त्यांनी जवळ घेतल्या, आणि उजव्या कानात कुंडल घालून फिरकी फिरवायचा प्रयत्न करत राहिल्या. हाताच्या मुंग्यांमुळे तिच्या हाताने फिरकी काही फिरेना. एकदम हातातून फिरकी निसटली, फिरकी गळ्यापाशी येऊन कुठे गेली देवास ठाऊक. झालं, झाला ना डोक्याला ताप, फिरकी नाही म्हणजे कानातले कसे बसणार? एवढीशी फिरकी, डोळ्याला दिसणारपण नाही. नुसतंच नुकसान. हळुवारपणे नानींनी सोफ्यावर हात फिरवला, कुठेही फिरकी लागली नाही. मग खाली वाकून फरशीवरती डोळे फिरवले, काहीही समजलं नाही, चमकलं नाही. म्हणजे फिरकी नक्की कुर्त्याच्या आत गेली.
तेवढ्यात नानांची हाक आली, ते नेहमीप्रमाणे ब्लडप्रेशर घेत होते, ब्लडप्रेशर वाचण्यासाठी नानी पाहिजे होती म्हणून तिला हाक मारत होते.
कधी नव्हे ते नानी संतापली, तिने जोरात ओरडून सांगितले,"तुम्ही इकडे या." कधी नव्हते दोघांची शाब्दिक चकमक झाली. छातीपाशी हात घट्ट धरून नानी बेडरूममध्ये गेली. मोकळे केस, चेहऱ्यावर काळजी, छातीपाशी धरलेले हात, नाना एकदम घाबरून गेले. नानीचा हात धरायला गेले, तर नानीने त्यांना ढकलून दिले. आता मात्र नाना संतापले, नानीच्या वागण्याचे कारण काही त्यांना कळले नाही.
नानी हळूच पलंगावर वाकली, छातीपाशी धरलेल्या हाताने ती वाकलेल्या अवस्थेत उभी राहिली, दुसऱ्या हाताने तिने हळूहळू कुर्ता वर करायला सुरुवात केली, थोडासा कुर्ता झटकला, मग तिने पलंगावरती नजर फिरवली. काहीच दिसले नाही, तसे तिने हळूच आपले अंतर्वस्त्र मोकळे केले.
नाना ओरडले, "काय करतेस? काही काळवेळ आहे का? आणि कपडे काय वर करतेस?"
छातीत दुखतंय का तुझ्या? कपडे काय काढतेस डॉक्टरला बोलावू का?
डोळे मोठे करून नानीने त्यांना गप्प बसण्यास सांगितले.
अंतर्वस्त्र जसं मोकळं झालं, तसं त्यामधून टपकन फिरकी बाहेर पडली. फिरकी बाहेर पडल्याबरोबर, नानीच्या तोंडातून आनंदाचे चित्कार बाहेर पडला.
"सापडली! केवढं टेन्शन आलं होतं मला." नानी म्हणाली.
सगळा प्रकार नानांच्या लक्षात आला. प्रेमाने नानीच्या डोक्यावरून हात फिरवून नाना म्हणाले,"तुला ना आता जरा मोठेच कानातले कुंडल आणि मोठ्या फिरक्या घेतल्या पाहिजेत." एवढ्या बारकुडं फिरक्या जर तुला एवढा त्रास देत असल्या तर त्यांचा काय उपयोग?. आता नवरात्रीत जाऊन तुला पाहिजे ते घेऊन ये हो.” “आणि हो उद्याच्या उद्या आपण तुझा पूर्ण चेकअप करून घेऊ. "
अतिशय प्रेमाने नाना परत म्हणाले, "अगं समोरचं कर्णकुंडल चमकायचं असेल तर मागची फिरकी पक्की घट्ट पाहिजे? संसार म्हणजे शेवटी कुंडलासारखाच नाही का?" आपण दोघं अगदी फिट असलं पाहिजे बरं."
नानी मंद हसली, म्हणाली,"शेवटी तुम्हीपण सासूबाईंचा मुलगा, स्वतःला हिरा समजणारे आणि आम्ही काय जन्मभर फिरकी म्हणूनच राहणार का?"
"माझे बाई, माझ्या आयुष्यातला प्रकाश, आणि माझा चमकणारा हिरा तूच तर आहेस." नाना हसून म्हणाले.