Sujata Kale

Abstract Tragedy

4.5  

Sujata Kale

Abstract Tragedy

पावसातला तो एक दिवस.....

पावसातला तो एक दिवस.....

3 mins
337


आमच्या इथे पावसाळ्यात भरपूर पाऊस असतो. इतका की पावसास वेड लागले की काय असेच वाटते. पाऊस थोडीही विश्रांती घेत नाही....संतत धार.... चारीही दिशा धुक्याने वेढलेल्या....सगळीकडे धुकेच धुके.... धुकेच धुके...... मला आसपास कापसाचे गोळेच गोळे उडताना दिसतात.... जणु आपण ढगांतून चाललो आहोत असे वाटते. हिरवेगार भले मोठे डोंगर धुक्याची शाल पांघरून बसलेले दिसतात...!! हे धुक्याने आच्छादलेले शुभ्र डोंगर पाहून वाटते की जणू चंदेरी पंख पसरवून एखादा पक्षी आकाशात झेपावतो आहे.....!! अशा या पावसात घाटामध्ये जाताना किंवा रस्त्यावर चालताना समोरचे काहीही दिसत नाही. अश्याच एका पावसातला तो दिवस होता...

आमच्या इथे दर बुधवारी आठवडी बाजार असतो. या बाजारात आसपासच्या खेडोपाड्यातून बरेचसे शेतकरी आपला भाजीपाला, धान्य, कपडालत्ता, भांडीकुडी वगेरे बरेच काही साहित्य विकण्यास येतात. भाजीपाला एकदम ताजा, सरळ शेतातून आलेला व स्वस्त पण असतो. बाजार घेण्यासाठी लोकही लांब लांबून येतात. म्हणून दर बुधवारी आमच्या इथे खूप गर्दी असते.

ऑगस्ट 2008 सालचा अशाच एका बुधवारचा तो पावसातला दिवस मी कधीही विसरू शकणार नाही. त्या दिवशी पण बाजार भरला होता पण त्या दिवशी खूप पाऊस पडत होता. दिवसभर वीजेचा कडकडाट सुरू होता. पावसाबरोबर भयंकर वारा सुटला होता. सकाळ पासून छोटी- मोठी बरीच झाडे पडली होती. त्यात

ब-यापैकी झाडे ही सिल्वर ओकची होती. काही झाडे वीजेच्या खांबावर पडली होती. त्यामुळे संपूर्ण भागात लाईट नव्हती.

दुपारी दोन अडीचच्या सुमारास बाजारात सिल्वर ओकचे एक झाड पडले. दुर्दैवाने बरोबर त्याच झाडाखाली एक शेतकरी भाजी विकायला बसला होता. सिल्वर ओकचे ते झाड त्याच्यावरच पडले आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. हकनाक एका गरीबाला त्याचा प्राण गमवावा लागला. जेमतेम त्याचे वय 35-38 वर्षे होते. ही बातमी हां.....हां म्हणता संपूर्ण शहरभर पसरली. लोकं गरीब शेतक-याच्या मृत्यूसाठी हळहळली. मला ही बातमी ऐकून खूप वाईट वाटले. संध्याकाळी पाऊस थांबला तरीही बाजारात भाजी घेण्यासाठी जाणं अवघड वाटू लागले. पण तरीही नाईलाजास्तव मी गेले. रस्त्यात चालताना सतत मृत्युमुखी पडलेल्या शेतक-याचे विचार येत होते. मला वाटले सगळे भाजीवाले निघून गेले असतील. जड अंतःकरणाने मी बाजारात गेले. तो भाजीवाला जिथे बसला होता, त्या रस्त्यावर गेले पण पाहते तर काय! तिथे सगळे यथावत सुरू होते. माझ्या मनात विचार आला की आपण चुकीची बातमी तर ऐकली नाही ना? इथे सगळे व्यापारी, भाजीवाले, शेतकरी वगैरे विक्रीसाठी जसेच्या तसे बसलेले होते. लोकांची गर्दी जशीच्या तशी होती. गजबज पाहून वाटत ही नव्हते की इथे कोणाचा मृत्यु झाला आहे. फक्त जो भाजीवाला मेला ती जागा मोकळी होती. बाकी सगळे नेहमीप्रमाणे दिसत होते. असे म्हणतात की वेळ दुःख विसरायला शिकवते पण इतक्या लवकर विसरायला लावते हे पचने अवघड होते. चार तासात शेतक-याचा मृत्यु सगळे विसरून पुन्हा त्याच्या कामात मग्न होते.

झाड कोसळ्यावर त्याने समोरील कंपाउंड पण तोडले होते.

रस्त्यावर सिल्वर ओकचे आडवे पडले होते. पालिकेचे कर्मचा-यांचे झाड कापणे सुरू होते. एवढ्या अवाढव्य झाड्याच्या छोट्या छोट्या फांद्या कापून काढल्या होत्या. त्याच्या भल्या मोठ्या बुंध्याचे तुकडे केले होते. एवढेच नव्हे तर जोरात पडल्यामुळे त्याच्या ढपल्याही आपटून रस्त्यावर विखुरल्या होत्या. आसपासच्या वसतीमधे राहणारी लोकं त्याच्या छोट्या छोट्या कापलेल्या फांद्यांच्या मोळ्या करून घरी घेऊन जात होते. तितक्यात मी पाहिलं की एक आजीबाई आपल्या चार-पाच वर्षांच्या नातीच्या फ्राॅकच्या ओटीत झाडाच्या ढपल्या भरून देत होती. त्या चिमुकलीला 'चुलीमधे जळणासाठी ढपल्या सुकायला ठेव' म्हणून सांगत होती. हे दृष्य पाहून मला गलबलून आले. त्या चिमुकलीच्या ओटीतील ढपल्यांमधे मला शेतक-याचा जीव दिसत होता.

मला गलबलून आले. मी पाहिले की ज्या झाडामुळे एका माणसास त्याचा जीव गमवावा लागला, लोकं त्याच झाडाची लाकडे घरी नेत होती. एका लहानग्या चिमुरडीने मृत्युच्या कारणाला स्वतःच्या ओटीत गोळा करून नेले होते. त्यांच्या घरची चुल त्याच ढपल्यांनी पेटणार होती. चार माणसांच्या पोटात दोन घास अन्न जाणार होते.

मला वाटले की कधी -कधी मरण सुध्दा इतरांना जीवन देऊन जातं...!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract