Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Sujata Kale

Tragedy Drama


4.9  

Sujata Kale

Tragedy Drama


वेळ

वेळ

4 mins 1.0K 4 mins 1.0K

त्या दिवशी पहाटेच माईंना धाप लागली. त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. एवढया पहाटे दवाखाने बंद...  काय करावे? मॉर्निंग वॉकला निघालेल्या स्नेही डॉक्टरांनी तपासले. दवाखाना उघाडल्यावर ताबडतोब अ‍ॅडमिट करावयास सांगितले. माईंच्या सुनेने, रेवतीने कसंबसं बळजबरीने त्यांना चहा बिस्किटे खायला घातली. ते शेवटचे होते असं त्यावेळी तिच्या कल्पनेतही नसणार...


सकाळी दवाखाना उघडल्याबरोबर माईंना दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी त्यांना अ‍ॅडमिट करून घेतलं. लगबगीनं तपासलं. सगळया तपासण्या झाल्या आणि डॉक्टरांनी माईंची शेवटची स्टेज आहे असं घोषित केलं. रेवतीने डॉक्टरांशीच वाद घातला. काहीही बडबडू नका म्हणाली... नाडी तपासली तर ठोके खूप कमी. बीपी कमी... 80–52. ...तो नंतर कमी कमीच होत गेला... आधीच त्यांना लो बीपीचा त्रास. डॉक्टर म्हणाले की किडनी फेल आहे. रक्त चढवावं लागेल. प्लाज्मापण दयावा लागेल. धावाधाव सुरू झाली होती...

नाईलाज... त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून वेंटिलेटर लावले. कोण जाणे त्यावेळी रेवतीला वेंटिलेटर जणू देवच भासला. तिच्या मते वेंटिलेटरवर ठेवलं म्हणजे माई नक्कीच वाचणार. आशा सोडली नव्हती...


गेल्या दोन – तीन वर्षांत माईंच्या पोटात पाणी होत होते. त्यांच्या मुलीने व डॉक्टर जावयाने मोठया दवाखान्यात नेवून खूप वेळा उपचार केले. पण वय साथ देत नव्हते. त्यात आप्पा गेल्यापासून त्या शरीराबरोवर मनानेही खचल्या होत्या. गेली बारा-पंधरा वर्षे त्यांनी सोरायसिससारखं असाध्य दुखणं सोसलं होतं. त्यात संधीवाताचा त्रास. हालता-चालता नीट येत नव्हते. आयुष्यभराच्या काबाडकष्टाचा आवाज आता चलताचालता हाडांतून येत होता. तितक्यात डॉक्टरांनी “नातेवाईकांना बोलावून घ्या” असे सांगितले. माईंच्या धाकट्या लेकानं ‘हाय’ खाल्ली. त्याला रडू आवरेना. काय करावं सुचेना... पण कळवावं तर लागणार होतं. माईंच्या मुलीला कळवलं. तर मुलगी व जावई लगेचच निघाले. खरचं मुलीची माया जगवेगळी असते. दोन-अडीच तासात दोघेही हजर. माई नेहमी म्हणायच्या की डॉक्टर भुंग्यासारखी गाडी चालवतात...

डॉक्टरांनी येऊन रिपोर्ट पाहिले. त्यांना कळून चुकले की आता माई काही वाचणार नाहीत.


पण माईंचा जीव कुठेतरी दुसरीकडेच अडकला होता. त्यांच्या दादामधे. ‘दादा’ त्यांचा मोठा मुलगा. तो वयाच्या तेराव्या वर्षी शिक्षणासाठी घराबाहेर गावाबाहेर पडला. तो पुन्हा कधीच घरचा झालाच नाही. खरंतर शिक्षणासाठी गेलेली मुले क्वचितच खेडयात माघारी येतात किंवा बहुधा पाहुणा म्हणूनच घरी येतात. माईंचा मुलगाही गेला तो परगावचाच झाला. त्याचे शिक्षण, नोकरी, लग्न, मुले सगळं काही शहरातच झालं. माई पूर्वी कधीकधी वर्षा-दोन वर्षांतून त्याच्याकडे जायच्या. नंतरनंतर तेही बंद झालं. शहरी संस्कृतीबरोबर गावच्या संस्कृतीचं पटत नाही हे त्यांना कळून चुकले होते. माईंचे यजमान आप्पा त्यांच्या भावा-बहिणीच्या जबाबदारीचे ओझे पेलता पेलताच गेले. त्यामुळे स्वतःच्या संसाराकडे व मुलांकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आणि माईंच्या मनात कायमचा खेद राहिला की त्यांच्या मुलगा त्यांच्यापासून कायमचा दूर गेला. त्या नहेमी त्यांच्या मैत्रिणींबरोबर बोलत असत की एकदा माझ्या तावडीत येऊ दे गं... मला त्याच्याशी मन भरून गप्पा मारायच्या आहेत. जो गेला तो गेलाच. एकदा माझ्या तावडीत सापडू दे. नेहमी आला की लगेच निघून जातो. राहातंच नाही. असे म्हणत म्हणत चाळीस वर्षे निघून गेली. आणि माईंना त्यांच्या मनातले काही बोलता आलेच नाही. त्या आयुष्यभर झुरतच राहिल्या. नंतर नंतर त्रागा करू लागल्या की “आता मला त्यांचे तोंडदेखील पाहायचे नाही. माझ्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही. त्याला म्हणावं की मी मेल्यानंतरही येऊ नकोस. मला अग्नी पण देऊ नकोस.


एक-दोनदा तर दादांना फोनवर बोलतानाही अश्याच रागावल्या. माणसाचं काय असतं... हे कधीकधी कळतचं नाही. जे हाती नसतचं त्याचा हव्यास असतो. बरे असो...

अश्या माईंच्या साहेब झालेल्या मोठया मुलाला रेवतीने फोन केला व म्हणाली, “दादा माईंची तब्येत खूप गंभीर आहे. त्यांना दवाखान्यात अ‍ॅडमिट केलं आहे. डॉक्टरांनी नातेवाईकांना बोलवून घ्यायला सांगितले आहे. पण... दादांनी नेहमीसारखी यावेळीही येण्यासाठी अनिच्छा दाखवली. “मला वेळ नाही. खूप अर्जंट कामे करायची बाकी आहेत. उद्या आले तर नाही का चालणार? रेवती म्हणाली की दादा डॉक्टरांनी लास्ट स्टेज सांगितली आहे. मी माझे सांगायचे काम केले. तुम्ही काय ते ठरवा, असे म्हणत रेवतीने फोन ठेवला. मी विचार केला की सोशल मीडियाने माणसांना जोडलं आहे की तोडलं आहे. पूर्वी लग्नपत्रिका महिना-महिना आधी लोकं पाठवत असत. नातेवाईक कार्यक्रमास हजर होत. पण मृत्यू पावलेल्यांच्या बातमीचे पत्र सर्व विधी उरकले तरीही मिळत नसे. पण आता तर तस नाही...


तर काय... माईंच्या दादांना कळवण्याचे कर्तव्य रेवतीने केले. आता ‘वेळ’ दादांची होती कर्तव्य पार पाडण्याची. त्या दिवशी संध्याकाळ होत आली तरी माईंची तब्येत काही स्थिर होत नव्हती. रेवती व विभाताई दिवसभर माईंजवळचं होत्या. दिवसभरात माईनी अनेकवेळा दादाबद्दल विचारलं. सकाळी बोलत होत्या तोपर्यंत बोलल्या, नंतर इशाऱ्याने विचारू लागल्या. त्या दोघी काय बोलणार. त्यांच्याकडे त्यांच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. त्यांना या क्षणीही त्यांच्या दादाशी बोलायचे होते. मनातलं साठवलेलं सगळं बोलायचं होत. राग, प्रेम व झुरणारा झरा वाहू द्यायचा होता. पण हळूहळू त्यांची स्थिती खालावून गेली. शरीरातील एक एक अंग काम करेनासे झाले. संध्याकाळी ब्लड प्रेशर अगदी लो झाले. आता त्यांना खाणाखुणा पण करता येत नव्हत्या. वाचेने साथ सोडली होती... त्राण नहते... तोंडावर लावलेले वेंटिलेटर काढ म्हणून त्यांनी रेवतीला वारंवार सांगितले. पण तिच्या हातात काही नव्हते. त्यांना रक्ताच्या बाटल्या व प्लाज्मा देऊन काही उपयोग झाला नव्हता. देवाची प्रार्थना करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.


आणि... संध्याकाळी माईंचा दादा आला. आल्या आल्या माईंची चौकशी केली व आयसीयूमध्ये भेटायला गेला. माईंना हाक मारली. आम्ही सगळे खूश होतो की माईंना आनंद होईल. पण... हे काय माईंनी चक्क मानच फिरवली. दादांचा चेहराही पाहिला नाही. आम्हा सगळयांना आश्चर्य वाटले की हीच ती माई आहे का? जी आयुष्यभर दादाशी पोटभर बोलायचं म्हणत होती. आज काय झालंय? दादांनी तीन-चार वेळा हाक मारली. पण माईंनी फिरवलेली मान पुन्हा वळवली नाही. आज काय झालयं माईला? 


कारण वेगळचं होतं... त्यावेळी माईंकडे वेळ होता पण दादाकडे नव्हता. आज माई मरणाच्या दारात आहे आणि दादा दवाखान्याच्या दारात... आज दादाकडे वेळ आहे पण माईंकडे नाही. मी समजू शकले की माईंना वाटले असेल की अंतिम क्षणी भेटायला आला आहे जेव्हा बोलणंच अशक्य होतं. आता त्या बोलण्याच्या स्थितीत नव्हत्या. 

पहाटे पहाटे माई गेल्या... त्यांचे अंत्यसंस्कार झाले. अग्नी देताना वर्षाेंवर्षींचा दादाचा उमाळा दाटून आला... दादाने हबंरडा फोडला... माई... माई तू माझ्याकडे एक वेळ पाहिलं नाहीस... एक वेळ...फक्त एक वेळ... पण त्यांना कुठे माहित होतं की माईंची ती ‘वेळ’ आता टळून गेली होती!!!


Rate this content
Log in

More marathi story from Sujata Kale

Similar marathi story from Tragedy