Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Sujata Kale

Tragedy


4.9  

Sujata Kale

Tragedy


अडगळ

अडगळ

3 mins 1.2K 3 mins 1.2K

काल रात्री आव्वाचा फोन आला. 'ताई' म्हणून ओक्साबोक्शी रडायला लागली. मला वाटलं की आप्पांबरोबर भांडण झालं की काय? तिचं रडणं ऐकून मलाही धक्का बसला. परवा तिचा एकुलता एक मुलगा सार्थक त्याच्या बायको-मुलाबरोबर त्याच्या नवीन घरी राहायला गेला होता. तिचे घर सुनेसुने झाले होते. रिकामे झाले होते. तिच्या घरट्यातील पाखरे उडून गेली होती आणि तिचे घर रिकामे झाले होते. म्हातारपणात उतारवय झालेल्या आई बापाला सोडून तो गेला होता. ज्या सार्थकला तिने जीवाचे रान करून, रात्रीचा दिवस करून, हालअपेष्टा सोसून वाढवलं होत तोच तिचा एकुलता एक लेक या उतारवयात तिला सोडून वेगळं राहायला गेला होता. 


नोकरीनिमित्त मुलं परगावी - परदेशी राहणं वेगळं आणि एकाच शहरात बारा-तेरा वर्षांनंतर आई-बाप सोडून राहणं वेगळं, मग कारण काहीही असो..! त्यात पोरकेपण, परकेपणा आणि एकटेपणाची भावना असते ती मन पोखरायला लागते. तिचं दुःख मला समजत होत... मला समजत होतं की तिला काय सांगायचं आहे..! 


अशीही तिनं गेली पाच-सहा वर्षे घरात मौनच धारण केलं होतं. 'मौनं सर्वार्थ साधनम्..!' सार्थकच्या शिक्षित बायकोबरोबर जुनी मॅट्रिक झालेल्या आव्वाचे लहानसहान वाद होत असत. संसार म्हटलं की भांड्याला भांड लागायचंच. फक्त कामापुरताच बोलणं चालू होतं. पण आण्णांच्या स्वभावाला औषध नव्हतं. त्यांच्या वयाने अठ्ठ्याहत्तरी पार केली होती तरीही त्यांच्या तापट स्वभावात किंचितही फरक झाला नव्हता. त्यांची सतत काही ना काही कुरबुर चालू असे. रेशनिंगच्या अन्नावर जगलेल्या आव्वाला सुस्थितीतील दिवसातील ढीगभर अन्न वाया गेलेले आवडत नव्हते. त्यामुळे घरात अधूनमधून काही ना काही तकतक असे. आव्वाच्या अबोलाचे एक कारण असे की तिच्या स्वाभिमानी पण तापट मनाला तिच्या मुलाने सुनेसमोर केलेला अपमान सहन होत नव्हता. गेल्या दहा-बारा वर्षांत ती हजारदा मला म्हणत असे की, ताई तो मला असा बोलला... तो मला तसा बोलला... त्याच्या शब्दांनी माझ्या काळजात भोकं पडली आहेत आणि तिचं काळीज रडताना बघून माझा थरकाप होत असे. तिला मी खूप वेळा सांगितले की अशी तळतळ करू नकोस. मलाही तिचं दुःख कळत होतं. एक आईच दुसऱ्या आईचं हृदय समजू शकत होती.

   

मी तिला बऱ्याचदा समजावले की लाखोंचा हिरा तुझ्यापासून दूर होण्यापेक्षा हजारांचे अन्न वाया जाऊ दे. असे असूनही सार्थक नवीन घर घेईपर्यंत गेली दहा-बारा वर्षे एकत्र राहिला. त्यानेही गेली कित्येक वर्षे त्रास काढलाच. त्यामागे अनेक कारणे होती, असो.


घरातील चारीही माणसे हटवादी व तापट होती. त्यामुळे घराला तडा गेला होता. कधीकधी असं वाटतं की डिग्री घेऊन ज्ञान मिळतंच असे नाही. मनाचा मोठेपणा व समजूतदारपणाही हवा. तो कोणतीही डिग्री देत नाही. 


आव्वाला हे माहित होतंच की नवे घर घेतलं म्हणजे मुलगा व सून घराबाहेर पडणार. ती मला फोनवर सांगत होती की तिच्या सोन्यासारख्या नाती तिच्यापासून दूर केल्या. माझ्या मनाची तगमग माझ्या लेकाला कधीच कळली नाही. तो गेला तेव्हा मी घरात नव्हते पण शेजारची आक्का सांगत होती की तिने त्याला खूप समजावले की जाऊ नको. मुलींसाठी तरी रहा. दादापण खूप रडत होते... पण त्याने ऐकले नाही. ती सांगत होती... रडत होती... मी पण गळ्यात दाटून आलेला हुंदका गिळला. डोळ्यातून अश्रू ओघळत होते.


मी एक-दोनदा सार्थकला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मते आव्वाचंच चुकत होतं. तीस वर्षे ज्याने आईचं ऐकलं त्याला आज आव्वा चुकीची वाटत होती. ज्या आव्वाची त्याने देवासारखी पूजा केली होती ती आव्वा आज त्याला चुकीची वाटत होती. तो काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्यानंतर मी त्याला समजावणे, सांगणे सोडून दिले होते. खरंतर तो आमच्या सर्वांपासून मनाने खूप दूर गेला होता. नात्यामध्ये एक पोकळी निर्माण झाली होती. आता मलाच पोरकं आणि परकंपरकं वाटत होतं. 


मी कल्पना करू शकत होते की भविष्यात माझा मुलगा मला सोडून गेला तर... नकोच... किती भयंकर कल्पना..!! ही कल्पना पण सहन होत नव्हती. माझ्या अंगावर शहारे उभे राहिले मी विचारात गर्क झाले होते. माझा हुंकार न मिळाल्यामुळे आव्वा 'ताई, ताई...' म्हणून हाक देत राहिली. मी विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत म्हटलं, आव्वा मी ऐकत आहे. तू बोल. सगळं सामान घेऊन गेला का?, तर ती म्हणाली, 'नाही, अजून सगळं सामान घेऊन गेला नाही. गरजेचं नेलं आहे. जुनंजुनं सगळं इथंच आहे. नवीन घरात जुन्या वस्तू कशाला? असाही फ्रिज जुना झालाय, टी. व्ही. जुना झालाय, वॉशिंग मशीन, मिक्सर जुना झालाय... सगळं जुनं झालंय... आम्ही पण जुने झालोय. अडगळीच्या वस्तू आणि आमची 'अडगळ' इथंच ठेवून गेलाय... मला तिच्या 'अडगळ' म्हणण्याचा मथितार्थ कळाला. 


आव्वा बोलत होती... रडत होती... मी ऐकत होते... रडत होते... किती अचूक शब्दप्रयोग केला तिनं... म्हातारपण म्हणजे खरंच 'अडगळ' असते का??


Rate this content
Log in

More marathi story from Sujata Kale

Similar marathi story from Tragedy