Renu Kubade

Classics Others

4.7  

Renu Kubade

Classics Others

पाऊस आला मोठा

पाऊस आला मोठा

5 mins
531


वाफाळत्या चहा चा कप घेऊन ती खिडकीपाशी आली आणि रिमझिम बरसत असलेला पाऊस न्याहाळण्यात हरखून गेली. अगदी अलगद तिचं मन तिच्याही नकळत तीच्या बालपणात डोकावलं अन् "तिचा" स्वतःशीच संवाद सुरू झाला.

"छोटेसे बहीण भाऊ

उद्याला मोठाले होऊ"

असे म्हणत खरंच किती पटकन मोठे झाले रे मी. ते दिवस कसे भुर्रर्र... कन उडून गेले. गेले ते गेलेच!

बालपणा, पुन्हा कधीच का नाही रे आलास? का नाही डोकावलं माझ्या तारुण्यात, प्रौढावस्थेत? माझे ही तुझ्याकडे दुर्लक्षच झाले म्हणा. जबाबदाऱ्या सांभाळत मी सतत पुढे जात राहिले. यश मिळत गेले, हुरळून गेले. प्रगल्भ असण्याचा, दिसण्याचा सतत ध्यास घेत राहिले. मागे बघायचे राहूनच गेले.

लहानपणापासून समजूतदारपणा मिरवला. आता ही सगळे खुश असतात माझ्यावर. माझ्या कडून सगळी नाती छान जपल्या गेली. कर्तव्ये देखील चोख पार पडतायेत. प्रत्येकाला कुठलीशी अपेक्षा असते माझ्या कडून. त्या पूर्ण करताना थकते मी हल्ली. राग येतो, चिडचिड होते. तेव्हा वाटतं, तू बरोबर असतास तर किती छान झाले असते! मनावरचे ओझे कमी करता आले असते. बालपणी कसे कुणी रागे भरत नाही, चुकलो तर समजून घेतात. "मुद्दाम केलं असेल" असे कुणीही म्हणत नाही. उलट आपणच हट्ट करावा. पण मी तर कधी हट्ट ही नाही केला. खरंच. राहूनच गेलं रे.

"कशासाठी मज आले शहाणपण

घेऊनि गेले जे रम्य बालपण"

तुझ्या सारखं मनमौजी, आनंदी जगायचंय मला. ती निरागसता अनुभवायचीय पुन्हा. जमेल ना मला? बालमना, बालपणा येशील पुन्हा?

ये ना रे.......

  

    सीमा फार हुशार, समंजस होती. तिचा एकुलता एक भाऊ आर्मीत, आई गृहिणी आणि बाबा बँकेतून सेवा निवृत्त झाले होते. तिने स्वबळावर पुण्यात मल्टिनॅशनल कंपनीत नौकरी मिळवली. तिच्या याच कर्तृत्वावर समीर भाळला. त्याला कामाची प्रचंड आवड. स्वस्थ बसणे त्याला माहितीच नव्हते. आणि हीच अपेक्षा त्याला सीमा कडूनही होती. सहा वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. संसार सुखाचा होता पण एकमेकांसाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता. समीर नको म्हणाला म्हणून सुरुवातीचे दोन वर्षे तिने मुलांचा विचार केला नव्हता. पण आपल्याला मुल हवे असे हल्ली तिला फार वाटायचे. तसे ती समीर ला बोलूनही दाखवायची. पण तो नेहमी दुर्लक्ष करायचा. त्याच्यासाठी करिअर जास्त महत्वाचे होते. मुलांची जबादारी एवढ्यात नको होती त्याला. वाढत्या वयाची सिमाला मात्र काळजी वाटायची.

    पंधरा दिवसांपूर्वीच समीर यूएस ला गेला होता. कंपनीच्या प्रोजेक्ट साठी सहा महिने तिथे राहणार होता. तिला खरेतर समीर बरोबर जायचे होते पण इतकी रजा किंवा पूर्ण ऑनलाईन काम तिला शक्य नव्हते. नंणदेच्या बाळंतपणासाठी सासू सासरे देखील कॅनडाला गेले होते. ते सुद्धा चार महिन्यांनी येणार होते. लग्नानंतर एकटीने राहण्याची ही तिची पहिलीच वेळ. त्यामुळे तिला अजिबात करमत नव्हते. त्यात आज तब्बेत पण जरा नरम होती. बरं वाटत नव्हते म्हणून ऑफिस मधून लवकर आली आज. थोडा आराम केला पण एकटेपणा नको वाटला. सततची दगदग, धावपळ तिला नकोशी झाली होती. कामाचा कंटाळा आला होता. खरंतर मनाने ती खूप थकली होती, विचार करून दमली होती, कशाचा म्हणून हुरूप नव्हता.

   

ती सहज खाली पार्किंग मध्ये आली.

    

"ये रे ये रे पावसा

तुला देतो पैसा

पैसा झाला खोटा

पाऊस आला मोठा"

"ये.....पाऊस आला...... पाऊस आला"

अपार्टमेंच्या पार्किंग मध्ये छोटी मुले खेळण्यात दंग झाली होती. हसत खिदळत खेळणाऱ्या मुलांकडे बघून सीमाला खूप गंमत वाटली. तीही आनंदाने आणि उत्साहाने म्हणाली, "अरे पुढचे ही म्हणा ना"

"ये गं ये गं सरी

माझे मडके भरी

सर आली धाऊन

मडके गेले वाहून"

मुलांबरोबर गोल रिंगण करून ती सुद्धा हे बालगीत म्हणू लागली. कितीतरी दिवसांनी आज ती दिलखुलास हसली. आजूबाजूची हिरवळ जणू पहिल्यांदाच पाहत होती. लॉन च्या शेजारी असणारे फुलझाडे आजच तिच्या नजरेत पडली. एरवी काम काम आणि फक्त काम ! या मुलांना बघून तिला निखळ आनंद मिळाला. जरावेळ का असेना मन रमले.

    दुसरा दिवस उजाडला तरी तिला काही फ्रेश वाटत नव्हते. खूप थकल्या सारखे जाणवत होते. कशाचा म्हणून उत्साह नव्हता. डॉक्टर कडे जाण्याचे तिने ठरवले. दोन दिवस ऑफिसला येणार नसल्याचे तिने बॉस ला मेसेज करून कळवले. तिच्या शिवाय घरात कुणीही नव्हते. ऑफिसला ही जायचे नव्हते. त्यामुळे कसलीही घाई गडबड नव्हती. पण अश्या निवांतपणाची तिला अजिबात सवय नव्हती. ती गॅलरीत येऊन बसली. खरंतर तिला कॉफी हवी होती. पण करायचा कंटाळा आला होता. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. समोर राधा ताईंना बघून तिला एकदम हायसे वाटले. राधाताई त्यांच्याकडे अनेक वर्षांपासून स्वयंपाकाला होत्या.

 "बरं झालं तुम्ही आल्या , आधी जरा कॉफी करता का"? "तुम्ही पण घ्या"

 

"हो हो करते ना"

"आज काय निवांत दिसताय वहिनी"

"अहो हो ना, मला जरा बरं वाटत नाहीये. दोन दिवस रजा टाकलीय मी".

"अगदी बरोबर केलंत. तुम्हाला आरामाची गरज आहेच. सतत धावपळ असते. त्याचाच शीण असेल".

"हम..."

"घ्या, गरमागरम कॉफी".

"थ्यांक्यु ताई".

एक छानशी स्माईल देऊन त्या स्वयंपाकाला लागतात. सगळं आवरून त्या जेवण डायनिंग टेबलवर आणून ठेवतात.

"वहिनी, गरम गरम जेवून घ्या ह. भात मुद्दाम मऊ केलाय. आणि आठवणीने डॉक्टर कडे जा. मी संध्याकाळी लवकर येते".

"हो, मी जाऊनच येते डॉक्टरांकडे. उगाच दुर्लक्ष नको. घरी देखील कुणी नाही एकतर".

राधताई जातात. सीमा दार लावून घेते. गाणी ऐकता ऐकता तयारी करते. जेवायला बसते पण फार काही जेवायची इच्छा होत नाही. आवडीची भेंडी असून सुद्धा खावीशी वाटत नाही. पण तरीही थोडे जेवण करते. सवयीप्रणाने पाण्याची बॉटल पर्स मधे टाकते आणि पायात चप्पल सरकवते. दार लॉक करून लिफ्ट कॉल करते.

"बरं वाटत नाहीये समीरला सांगायचे होते का मी"? तिच्या मनात सहज विचार येतो.

"जाऊदे, डॉक्टर कडून आल्यावरच सांगते. त्याला उगाच टेन्शन कशाला"? तिची तीच समजूत काढते.

एरवी सुसाट चालणारी कार आज जरा सावकाश पुढे सरकत होती. डॉक्टरांकडे जाताच तिथली गर्दी बघून तिच्या जीवावर येते. रिसेप्शन वर नंबर लावून ती मोबाईल बघत बसते. तासाभराने तिचा नंबर लागतो.

"सीमा देशमुख"! म्हणताच ती डॉक्टरांच्या कॅबिन मधे शिरते.

"बोला, काय होतंय"

"मॅडम, मला ना खूप थकल्यासारखे झालेय. अशक्तपणा जाणवतोय आणि दुपारी जरा चक्कर पण आली".

डॉक्टरांनी विचारलेल्या अनपेक्षित प्रश्नांनी ती गोंधळली. त्यांनी तिला व्यवस्थित तपासून खात्रीसाठी एक टेस्ट केली जी पॉसिटीव्ह होती.

"घाबरण्याचे काहीही कारण नाही, तुम्ही आई होणार आहात".

अ..... ?

"अहो, अभिनंदन! तुम्ही प्रेग्नन्ट आहात".

"मी काही औषधें लिहून देते. ती नियमित घ्या. पुढच्या महिन्यात सोनोग्राफी करू". ठीक आहे?

चेऱ्यावरचे गोड हसू सांभाळत "ओके" म्हणत ती डॉक्टरांनी तयार केलेली फाईल धरते.

सीमाला काय आणि कसे बोलावे काहीही कळत नव्हते. उत्कट इच्छा असलेली गोष्ट तिला अशी अचानक मिळाली होती. हा आनंद कसा व्यक्त करावा हे सुद्धा समजत नव्हते. कुणाला आधी कॉल करू? काय सांगू? कसे सांगू? या द्विधा मनस्थितीतच ती घरी परत येते. स्वतःला आरश्यात कितीतरी वेळ न्याहाळते. स्वतःशीच गालातल्या गालात हसते. ही अत्यानंदाची बातमी आधी स्वतः साजरी करायची आणि मग सगळ्यांना सांगायची असे ती ठरवते.

मस्त गोडाचा शिरा करते. खिडकीतून बाहेर बघत, हसत, लाजत, हळवं होत शिरा संपवते.

परमोच्च आनंदाच्या या क्षणी तिच्या सोबत फक्त पाऊस होता........पाऊस!

आनंद घन बरसवणारा.........



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics