Renu Kubade

Romance Others inspirational fantasy

3.9  

Renu Kubade

Romance Others inspirational fantasy

पाडस प्रीत

पाडस प्रीत

50 mins
481


पाडस प्रीत

भुरभुरणारा पाऊस, अंगावर शहारे आणणारा गारवा, मिट्ट काळोखा पूर्वीची ती सावळी सांजवेळ होती. घाईने सुरू होणारी सकाळ कामाच्या व्यापात दुपार घेऊन पटकन पुढे सरकलेली पण ही वेळ जाराश्या निश्चिंत्ततेची! मनासारखा एकांत मिळाला होता. वाफाळत्या चहाचा मी मस्त आस्वाद घेतला. टेबलवर ठेवलेल्या मोबाईल वर माझी नजर गेली. मी हसून मोबाईल हातात घेतला. चहा पिताना आणि मोबाईल बघतांना आपल्याला कुठलाही व्यत्यय येऊ नये, कुणी मधे बोलू नये या सारखे दुसरे सुख नाही! ते सुख मी अनुभवत होती.
फेसबुक उघडताच मला "त्याची" फ्रेंड रिक्वेस्ट दिसली. हो त्याचीच! चेहऱ्यावर आपसूक हसू आले पण मन किंचित धास्तावले. अरेच्या! "आपण दोन तीन दिवसाआधी याचे प्रोफाइल चेक केले ते याला कळले की काय?" मला प्रश्न पडला. मला माझे उत्तर मिळे पर्यंत मी ती रिक्वेस्ट स्वीकारली देखील होती. का? कश्यासाठी? खरंतर आमची ओळख फार जुनी पण आमच्यातील सवांद केव्हाच हरवला होता.
आज असा अचानक इतक्या वर्षांनी सवांद होऊ पाहत होता त्यामुळे प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. तो संवाद नाकारण्याचेही काहीच कारण नव्हते. अनुभव आणि प्रगल्भता देऊन आयुष्य खूप पुढे निघून गेले होते. ओळखीच्या व्यक्तीशी बोलण्यात हरकत काय? माझा स्वतःलाच सवाल! एव्हाना त्याचे एक दोन जुजबी  मेसेज बघून मी ही रिप्लाय केला, "नाईस टू कनेक्ट विथ यु" आणि ओठांवर आपसूक शब्द रेंगाळले...
"आठवणींचे मोरपीस
चेहऱ्यावर अलगद फिरे
ही वाऱ्याची शीतलता
मज आज वेड लावे.."
----------------------------------

"हाय मीरा"
"हॅलो राघव"
"कशी आहेस"?
"अगदी मजेत, आणि तू"?
"मी सुद्धा मजेत आहे".
माझी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्या बद्दल मनापासून आभार. किती वर्षाने बोलतोय आपण! खूप छान वाटतंय. थँक्स टू फेसबुक!"
"अरे, आभार काय त्यात. जुनी ओळख आहे आपली".
"हो ते आहेच गं पण इतक्या वर्षात काही सवांद नव्हता आपल्यात. म्हणून वाटलं......"
"काय वाटलं? मी विसरले तुला?" शक्य आहे ते? ए पण खरंच छान वाटतंय."
"मीरा, मला खूप बोलायचे आहे, बरंच काही सांगायच आहे".
"सांग की मग, अडवलय कुणी"?
फेसबुक वर दोन दिवस चॅटिंग झाल्यावर राघवने त्याचा मोबाईल नंबर  मला शेअर केला. आमच्यात एक अनामिक ओढ आणि उत्सुकता होती. कदाचित बऱ्याच वर्षांच्या मौना मुळे असेल पण अत्यंत अधीरतेने मी तो नंबर सेव्ह केला आणि संधी मिळताच नव्हे संधी मिळवून त्याला कॉल केला सुद्धा. इतकं सहज बोलणं झालं जणू आम्ही कधी दुरावले नव्हतोच. अगदी नेहमी बोलत असल्यासारखे दोघे बोललो. एकमेकांच्या आयुष्याचा आढावा घेतला. दोघांचेही व्यस्त दिनक्रम बघता, राघवला जे काही सांगायचे आहे ते तो इमेल करेल असे दोघांचे ठरले आणि बऱ्याच अव्यक्त गोष्टी व्यक्त करणाऱ्या इ मेल दोघांच्यात सुरू झाल्या............

मीरा,
आपलं ठरल्या प्रमाणे तुला मेल करतोय. खूप बोलायचे आहे मीरा. आज सुरवात करतोय...मला माहिती आहे हे सर्व सांगून तुझ्या किंवा माझ्या आयुष्यात काहीही फरक पडणार नाही पण माझं मन नक्की मोकळं होईल...
मी तुला पाहिल्यांदा केव्हा बघितले माहितेय? मी सातवीत आणि तू सहावीत होतीस तेव्हा! सिटी बस मध्ये. बस मधल्या गर्दीत, मित्रांच्या घोळक्यात असताना एकदा सहज लक्ष तुझ्याकडे गेलं. तुझ्या काळ्या टपोऱ्या डोळ्यांकडे मी बघतच राहिलो. ते डोळे आणि त्या हसऱ्या चेहऱ्याचे त्या वयात आकर्षण वाटले. पुढे मी रोज तुला बघू लागलो. माझ्याही नकळत मी तुझ्या कडे एकटक बघायचो. एके दिवशी बाजूच्या रिकाम्या सीटवर बसण्याची तू मला खूण केली. वाह! ओळख करून घेता येईल म्हणून मला खूप आनंद झाला. तू माझ्या पेक्षा एका वर्षाने लहान होती आणि बोलण्यातून कळले की आपली भावंडे याच बसने सकाळी प्रवास करतात. (त्यांची शाळा सकाळची होती)
तुझे साधे राहणे आणि बोलके डोळे मला कायम आठवत राहायचे. हळू हळू बस मध्ये तू असण्याची मला सवय होऊ लागली. अगदी एका सीटवर नसलो तरी एकमेकांच्या आसपास असण्याची जाणीव होऊ लागली. कधी कधी काही कारणास्तव ऑटोरिक्षा ने जायची वेळ यायची अश्यावेळी तू सुद्धा त्याच ऑटोत असेल तर बोलण्याची नामी संधी मिळायची. बस मधल्या गोंधळापेक्षा जरा बरं वाटायचे. बस मध्ये तू येण्याची मी वाट बघत रहायचो. एकदा का तू दिसलीस की जीवाला चैन पडायची. हे असे काय व का होतेय? काही समजायचे नाही पण तुझे आजूबाजूला असणे मन प्रफुल्लित करायचे. तुझे डोळे आणि तुझेही माझ्या कडे बघणे याची मला सवय होत होती. इयत्ता सातवी संपेपर्यंत केवळ बस मधेच नाही तर इतर वेळीही तुझेच विचार माझ्या मनात घोळत राहायचे. कधी कधी तर तू स्वप्नात देखील यायची...! खरंच काही कळायचे नाही.....

सातवीचे वर्ष मजा मस्तीत गेले. नेहमी प्रमाणे माझे अभ्यासाकडे खूप लक्ष नसले तरी 85 टक्क्यांच्या वर मार्क मिळवण्यात मी यशस्वी झालो होतो. खूप मेहनत न करणाऱ्या माझ्या सारख्या आळशी मुलावर देवाची कृपाच म्हणायची. आठवी इयत्ता सुरूहोण्या आधीच मला माझ्या मामांची सायकल मिळाली. सायकलने आपल्या मर्जी नुसार जायला मिळणार असल्याने भारी वाटत होते. पण....पण काहीतरी हरवल्या सारखे, चुकल्या सारखेही होत होते. तू एकदा तरी दिसावी असं सारखं वाटायचे. तुझे डोळे आणि ते स्मित हास्य सतत मला आठवत राहायचे. तुला बघता येईल या आशेने मी कधी कधी घरी खोटं बोलायचो की, "मी फार दमलोय, त्यामुळे आज बस ने जातो". आपल्या भावंडांमध्ये छान मैत्री होती आणि ते एकत्रच बस ने शाळेत जायचे त्यामुळे तुझ्या बद्दल जाणून घेण्याची जराशी संधी माझ्या कडे होती. आपल्याला मात्र एकमेकांच्या घरी येण्याचा योग कधीच आला नाही. याबाबतीत मला माझ्या लहान भावाचा हेवा वाटायचा कारण त्याचे तुझ्याकडे दोनदा येणे झाले होते.
दिवसेंदिवस तुला बघण्याची इच्छा अधिक तीव्र होत होती कारण शाळेत तू दिसायचीच नाही. एकतर आपण वेगवेगळ्या वर्गात होतो, त्यात तुझ्या वर्गात येऊन तुला 'हाय्' वगरे म्हणायची त्यावेळी तरी काहीच सोय नव्हती. एव्हाना केबल टीव्ही प्रत्येकाच्या बैठकीत दिसू लागले होते आणि प्रेम भावना जरा जरा कळू लागल्या होत्या. माझा जवळचा मित्र दिनेश, त्याला रोमँटिक गाणी फार आवडायची. मला त्यात कधीच रस वाटला नाही. माझ्यासाठी प्रेम म्हणजे निरतिशय सुंदर भावना ज्यात तुम्ही एखाद्याच्या विचारात हरवून जाता. ज्याचा विचार करताना चेहऱ्यावर हास्य फुलतं ते 'प्रेम'.
वार्षिक परीक्षा संपली आणि शाळा स्थलांतरित होणार असल्याचे कळले. अरे देवा! हे तर फारच अनपेक्षित आणि नकोसे होते. अगदी पहिल्या वर्गापासून या शाळेत असल्याने खूप जवळीक निर्माण झाली होती. बस पासून सायकल पर्यंतचा प्रवास या शाळेने घडवला होता. आता दोनच पर्याय होते. एकतर स्थलांतरित शाळेत प्रवेश घेणे अन्यथा नवीन शाळेत रुजने! माझ्या समोर काय वाढून ठेवलंय हे देवच जाणत होता. तुला पुन्हा बघता येईल? ते काळे टपोरे डोळे पुन्हा माझ्या कडे बघतील? या विचारांनी मी पुरता गोंधळलो होतो.
……...........…..........….........................
राघव,
तुझी मेल बघितली. मागे वळून पाहताना आठवणी मनात रुंजी घालतायत.... केवळ सुखद, अलवार क्षण ते!
पण खरं सांगू? खूप हसले मी. तुझ्या या भावना आत्ता कळतायत मला. पूर्वी हे सगळं बोलण्याचा कधीही योग आला नाही. इतक्या वर्षांनंतर किती मोकळेपणाने बोलतोय आपण! तुझ्या मनात इतक्या आधीपासून असे काही असेल याची जराही कल्पना नव्हती. तू फारच ऍडव्हान्स निघाला. मला आपले बोलणे, भेटणे आठवते ते नवीन शाळेत गेल्यानंतरचे. नर्सरी पासून ज्या शाळेत होती त्याची मलाही स्वाभाविकच ओढ होती. आजही "ती" शाळा मनात आहे. नाईलाजाने दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला होता. मी नवीन शाळेत रमायला लागली होती. बोलक्या स्वभावाने माझी सगळ्यांशी पटकन मैत्री झाली. किशोर वयीन मैत्री रंगायला लागली होती. सायकलने शाळेत जाणे येणे म्हणजे गप्पांना उधाण! विषय तरी काय? नुसती मस्ती! एके दिवशी शाळा सुटली आणि मैत्रिणींचा थवा नेहमी प्रणाने सुसाट बाहेर पडला. गप्पा रंगात आल्या असतानाच एक ओळखीची नजर दिसली. त्याच्या कडे बघून मी सहज हसली. मैत्रिणीने विचारलेही "कोण तो?"
"आमच्या शाळेत होता". माझे बाळबोध उत्तर. तो तू होतास! तुझे नाव मला कसे काय लक्ष्यात होते हे मात्र अजिबात आठवत नाहीये. कारण आधीच्या शाळेत मी तुझ्याशी बोललेले माझ्या तरी स्मरणात नाही. फार लहान होतो रे आपण. तुझे नाव मात्र परिचयाचे होते.
यावर अधिक चर्चा झाली नाही.
जाता येता तू मात्र  रोज दिसू लागला. कधी मी बघायची कधी न बघितल्या सारखे करायची.
–-----------------------------
मीरा,
खरंय आपण कधीच इतके मोकळे बोललो नाही. पण आता ठरवलंय ना सगळं सांगायचं. हं, तर मी सेंट झेविअरला प्रवेश घेतला होता. नवीन शाळेचा नवीन वर्ग! तू कोणत्या शाळेत प्रवेश घेतला असशील याची उत्सुकता होतीच. तू माझ्या शाळेत नाही हे नक्की झाले होते. कारण आठवडा झाला तरी तसे काही आढळले नव्हते. दुसऱ्या आठवड्यात शाळेतून घरी जायला जरासा उशीर झाला आणि अहो आश्चर्यम! पांढरी कुर्ती, मरून सलवार आणि ओढणी अशा गणवेशात चक्क तू मला दिसली. "शी..." " पूर्ण नागपूर शहरात तुला हीच शाळा दिसली होती का गं"? मुलींची शाळा???? अगं एकवेळ मी पुन्हा शाळा बदलायचा विचार केला असता पण मुलींची शाळा? माझा फारच भ्रमनिरास झाला! पण इतक्या दिवसाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर तू दिसल्याचा आनंदही झाला.
विशेष म्हणजे तू मला ओळख दिलीस आणि हसलीही. आणि त्यातल्या त्यात आपल्या शाळा एकाच एरिया होत्या. त्यामुळे जरासा सुखावलो. "तू पण माझा युनिफॉर्म बघितला होतास ना?" मी कोणत्या शाळेत आहे हे तुझ्या नक्कीच लक्षात आले होते. ही भेट वारंवार घडावी म्हणून मी प्लॅनिंग करू लागलो. तुझी शाळा 5.15 ला आणि माझी बरोबर 5 वाजता सुटायची. 15 मिनिटांचा घोळ होता शिवाय माझ्या सोबत माझे चार मित्रही असायचे. त्यामुळे तू शाळे बाहेर पडे पर्यंत कसे थांबावे मोठाच प्रश्न होता. पण मी काही कमी नव्हतो. तुला बघण्यासाठी काही पण! मी कारण शोधत होतो ज्यामुळे आम्हा सगळ्यांना 15 मिनिटे वेळ होईल आणि रस्त्याने तू मला दिसशील. या सगळ्यांना शाळा सुटल्यावर घरी जायची फारच घाई असायची पण माझ्या डोक्यात वेगळंच असायचं. आणि एकदिवस सायकल चालवताना मला एक पाणीपुरीवाला दिसला. वाह झकास!! मी एकदम खुश झालो. त्या सगळ्यांना मी म्हणालो,"अरे, इथली पाणी पुरी एकदम भारी असते हं. एकदा खाऊन बघाच. मी खूप ऐकले आहे यांच्याबद्दल" कुणाला माहिती कशी असते? मला तर फक्त वेळ घालवायचा होता. त्या रुद्र पाणीपुरीवाल्या जवळ माझ्या आग्रहाखातर सगळे थांबले आणि नशीब त्याने खरोखर मस्त पाणीपूरी बनवली. सगळ्यांनाच आवडली. माझं लक्ष मात्र दुसरी कडेच होतं. तू दिसण्याची मी वाट पाहत होतो. "तू दुसऱ्या रस्त्याने तर जाणार नाहीस?" क्षणभर मनात विचारही आला पण नाही नाही याच रस्त्याने जाशील माझी मीच समजूत घातली. 1 रुपयात 5 पाणीपुरी खाऊन झाल्या. मसाला पुरीही तयार होती पण तू.....? तू अजूनही दिसली नव्हती.
आम्ही एक एक रुपया जमा करून त्याचे पेमेंट केले. आता निघणारच तेवढ्यात तू दिसली. मस्त स्टाईल मधे. मी तुझ्या कडे एक छान कटाक्ष टाकला पण तुझे माझ्या कडे लक्षच नव्हते. पण त्याने काही फरक पडणार नव्हता. माझा उद्देश तुला बघणे होता आणि तो साध्य झाला होता. मी खूप खुश झालो. पण हा आनंद मित्रांना सांगता येत नव्हता. हे माझं गुपित होतं. परंतु किती दिवस मी हे लपवणार होतो?
आपण आपल्या जवळच्या मित्रांपासून काहीही लपवू शकत नाही हा नवीनच शोध मला लागला होता. जाता येता सोबत असणारे हे मित्र फार स्मार्ट होते. त्यांना लगेच कळाले पाणीपुरी वगैरे तर बहाणा आहे खरं कारण काहितरी वेगळ आहे. माझी शाळा इंग्लिश कॉन्व्हेंट असल्याने मुला मुलींनी एकमेकांसोबत बोलण्यात काही गैर वाटत नव्हते. आधीच्या आपल्या शाळेत असे नव्हते. इथेतर कित्येक मुलांनी त्यांचे एकतर्फी प्रेम स्वतःच जाहीर केले होते. काही मुलं मुली बिनधास्त एकमेकांना चिडवायचे. माझा 'सभ्य मित्र' दिनेशला रोमँटिक गाणी फार आवडायला लागली होती आणि त्या गाण्यांचा संबंध तो तुझ्याशी लावायचा. त्या कुमार वयात 'दिल वाले दुलहनिया ले जयेंगे' या सिनेमाचा मनावर आणि हृदयावर चांगलाच प्रभाव पडला होता. मला जाणवायला लागले होते की मी तुझ्या खूप प्रेमात आहे. प्रत्येक रोमँटिक गाणं तेव्हा अर्थपूर्ण वाटायचे. तू इतक्या कमी वेळ दिसायचीस तरी तुझे दिसणे, चेहऱ्यावरचा प्रत्येक भाव मी जपून ठेवायचो माझ्या मनात, हृदयात. माझ्यासाठी ते मौल्यवान क्षण होते मीरा. त्या वयात मित्र आपल्या मित्राच्या प्रेमासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. माझे मित्रही त्यातलेच होते. तुझे घर शोधून काढायला त्यांना अजिबात वेळ लागला नाही. मग काय? माझ्या घरापासून तुझ्या घराच्या एरियात सायकलने येरझाऱ्या सुरू झाल्या. तुला बघायला मिळेल फक्त याच आशेवर!
एव्हाना दोघांच्याही शाळेच्या वेळा व्यवस्थित जुळल्या होत्या. क्षणभर का असेना पण आपण एकमेकांना रस्त्यात दिसू लागलो. आपण दोघेही थेट एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघायचो. हे असे बघणे फार विशेष वाटायचे मला. तुझे ते थेट माझ्याकडे बघणे मला घायाळ करायचे. बरं माझ्या बघण्याने तुला काही गैर वाटायचे नाही. जणू काही तुलाही ते हवंच असायचे. आकर्षणा मुळे मला असे वाटायचे की खरेच तसे होते कोण जाणे. तुलाही माझ्यासाठी काही खास भावना आहेत का? हा प्रश्न माझ्यासाठी फार फार महत्वाचा होता. तुलाही माझ्याविषयी 'तेच' वाटते की केवळ ओळखीचा म्हणून तू माझ्या कडे बघते हे कळत नव्हते. आपण पूर्वी कधी एकमेकांशी इतकेही बोललो नव्हतो की आपल्यात फार चांगली मैत्री व्हावी. आधीच्या शाळेतील एक ओळखीचा चेहरा म्हणून तू बघत होतीस का? सगळे अनुत्तरित प्रश्न. तुझे डोळे आणि ते निष्पाप गोड हास्य मला तरी हेच सुचवायचे की तुलाही माझ्या प्रति आकर्षण आहे.
…......................................................

राघव,
तुझ्या युनिफॉर्म वरून तुझी शाळा लक्षात आली होती माझ्या. मी कोणत्या शाळेत जायचे हे अर्थात माझ्या आई बाबांनीच ठरवले होते. मी आधी पासूनच कोणत्याही गोष्टीत फार आग्रही नव्हती. त्यांनी सांगितले मी ऐकले. आणि काहीही काय खरंच बदलली असतीस का तू शाळा?
नवीन शाळेत गेल्या नंतर तू पहिल्यांदा दिसलास तेव्हा ओळखीचा म्हणूनच तुझ्याकडे बघून हसले. अगदी स्वाभाविक होतं ते. तुझ्या डोक्यात काय शिजतंय हे कुठे ठाऊक होतं मला. रोमॅंटिसिझम फार लवकर कळला तुला. मला बघता यावे म्हणून कसले भाबडे प्रयत्न करायचास! वेळ घालवण्यासाठी पाणीपुरीची आयडिया भारीच होती तुमची! तू आणि तुझे मित्र फारच सिनेमॅटिक होतात हं. अर्थात तो वयाचा दोष. मला तू कधीच पाणी पुरीच्या गाडीवर दिसला नाही. कदाचित माझे लक्ष नसायचे. मित्रांच्या गराड्यातही असलेला तू मला आठवत नाही. आठवतो तो माझ्याकडे बघणारा तुझा चेहरा. आणि त्यात मला काही गैर वाटायचे नाही. कारण माझ्यासाठी तू सगळ्यांसारखाच होता.
सुरवातीला तू दिसायचास तेव्हा केवळ ओळखीचा म्हणून बघायचे, हसायचे. नंतर ती सवय होऊ लागली आणि ती क्षणिक भेट दिवसागणिक आवडायला लागली.
–-----------------------------
मीरा,
दहावीचे वर्ष होते. माझ्या कडून प्रत्येकाला खूप अपेक्षा होत्या. मी नक्की मेरिट लिस्ट मध्ये झळकेल असे सर्वांना वाटत होते. मी आणि सुमित आधीच्या आपल्या शाळेत नेहमी टॉप करायचो त्यामुळे या नवीन शाळेत देखील अशीच अपेक्षा होती. मी एकपाठी होतो. एकदा कुठलीही गोष्ट मन लावून वाचली की माझ्या लगेच लक्षात राहायची. त्या साठी मला खूप मेहनत घ्यावी लागत नसे. शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण होण्याआधीच माझं सगळं वाचून झालं होतं. मी प्रश्न पत्रिका देखील सोडवायला सुरवात केली होती. हा सगळा खटाटोप एवढ्याच साठी की तुला बघायला वेळ मिळावा.
तुझ्या प्रेमात मी आकंठ बुडलोय हे मी स्वीकारलं होतं. 'प्रेम म्हणजे मीरा' असे माझे समीकरण होते. तुझा विचार करणे जणू नित्यक्रम होता. इतकं तुझं आकर्षण होतं. अर्थात या सगळया माझ्या एकतर्फी भावना होत्या. या सगळ्याची तुला अजून कल्पनाही नव्हती. पण माझ्यासाठी या भावना इतक्या नवीन होत्या, वेगळ्या आणि उत्साही होत्या की तुझ्या नुसत्या विचारानेही माझ्या हृदयाचे ठोके वाढायचे. रस्त्यात तू दिसली की विचारायलाच नको, मी स्तब्ध व्हायचो.
सुमित मात्र अजिबात रोमँटिक किंवा भावुक मुलगा नव्हता त्यामुळे माझ्या प्रेमात त्याला काडीचाही रस नव्हता. पण दिनेशचे तसे नव्हते. तो मझ्या भावना समजू शकत होता पण नेमका तो माझ्या जवळ नव्हता. एनसीसी मध्ये शूटिंग साठी त्याची निवड झाल्यामुळे सबंध दहावीचे वर्ष तो दिल्ली आणि इतर ठिकाणी ट्रेनिंग घेत होता आणि स्पर्धेत सहभागी होत होता. हे दोघेच असे होते ज्यांच्याकडे मी मन मोकळे करू शकत होतो. या दोघांनाही तसा प्रेमाचा अनुभव नव्हता पण तुझ्या बद्दल असलेल्या माझ्या भावना मी तुला सांगाव्यात असे दोघांचेही मत होते. तुझ्याप्रति असलेल्या भावना इतक्या तीव्र, अनावर होत होत्या की माझं कशातच लक्ष लागेना. मी केवळ माझी परीक्षा संपण्याची वाट बघत होतो. त्या नंतर मी तुला मनातलं सगळं सांगणार होतो.....
मला कळले होते माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी जास्तीत जास्त तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होतो. मला मित्रांनी सांगितले होते " आधी तिच्याशी छान मैत्री कर मग तिला तुझ्या मनातलं सांग" माझ्या तत्वात काही ते बसत नव्हते. जर मला माहित होते की माझं तुझ्यावर प्रेम आहे तर उगाच चांगला मित्र बनण्याचे नाटक कशाला? तो तर मैत्रीचाही अपमान झाला असता. खोटं बोलून कुठल्याही नात्याची सुरवात नव्हती करायची मला. मी निश्चय केला तुला सगळं सांगायचं. तू फक्त माझी मैत्रीण नाही तर त्यापलीकडे काहीतरी विशेष आहे. तुला असे स्पष्टपणे सांगणे जरा अवघड होते. निदान त्या आधी आपले जुजबी बोलणे तरी व्हावे असे वाटत होते. पण कसे? ते सुचत नव्हते. दसऱ्याला सोनं देण्याच्या निमित्ताने तुझ्या घरी यावं असा भारी विचार माझा सुपीक डोक्यात आला. त्या दिवशी सगळेच एकमेकांकडे जातात. त्यात गैर वाटण्याचा काहीच प्रश्न नव्हता. माझे ठरले दसऱ्याला तुझ्या घरी जायचे!
मी मोठ्या उत्साहात तयारीला लागलो. दिवाळी ऐवजी दसऱ्याला माझ्या पसंतीनुसार नवीन ड्रेस घेण्याचा बाबांकडे हट्ट केला. त्यांना नवल वाटले कारण आज पर्यंत दिवाळीचे कपडे म्हणजे बाबांनी कापड आणणे आणि ओळखीतल्या काकांकडून शिवून घेणे. आमच्या शिंपी घराण्याची ही वर्षानुवर्षांची परंपरा होती. आणि मी असे अचानक त्याला भेद देऊ पाहत होतो. तितक्यात आई इथे आली आणि बाबांना म्हणाली, "घेऊ द्या हो त्याला, हल्लीच्या मुलांना नाही आवडत शिवलेले कपडे. त्यात आपण राघव आणि सुजय दोघांनाही सारखेच शिवतो. नसेल पटत त्यांना. मुलं मोठी होतायत, जरा त्यांच्या कलेनही घ्यावे लागेल" वाह! आईचे आभार कसे मानावे कळत नव्हते कारण बाबा तयार झाले आणि लगेच पाचशे रुपये देण्याचे कबूल देखील केले. माझा पहिला जीन्स आणि टी शर्ट घ्यायचा होता मला. आजवर मित्रांचे बघितले होते आता मी स्वतःसाठी घेणार होतो आणि मुख्य म्हणजे हे नवीन कपडे घालून मी तुझ्याकडे येणार होतो.
मी दिनेशला नागपूर मधील सर्वात चांगले दुकान शोधायला सांगीतले. जिथे मला माझ्या बजेट मध्ये मनासारखे कपडे घेता येईल. त्याने शहर पालथं घालून सर्वोत्तम दुकान शोधलं. त्यालाही कपडे घेण्यामागचा मुख्य उद्देश माहीत होता त्यामुळे मोठ्या हौसेने त्याने काम फत्ते केले. खरेदीतर झाली. मी दसऱ्याची आतुरतेने वाट पाहू लागलो. केव्हा एकदा तुझ्या घरी जातो असे झाले होते. त्या निमित्ताने आपले बोलणे होईल, भेटीगाठी वाढतील आणि माझ्या भावना मी तुझ्या पर्यंत सहज पोहचवू शकेल असे वाटत होते. एकदाचा दसऱ्याचा दिवस उजाडला. पण जरा विचित्र झाले. मला सकाळ पासून बरे वाटत नव्हते. दरवर्षी उत्साहाने आईला मदत करणाऱ्या मला कशातच रस वाटत नव्हता. संध्याकाळी तुला भेटण्याच्या विचाराने मी जास्तच बेचैन झालो. एकएक क्षण कठीण जात होता. जशी संध्याकाळ व्हायला आली वातावरण कमालीचे बदलले. साधारण ऑक्टोबरच्या शेवटी पाऊस नसतो. म्हणजे मला तरी पावसामुळे दसऱ्याची मज्जा गेलेली आठवत नव्हती. मग याच वर्षी असे व्हावे? नशीब, दुसरे काय?
माझ्या स्वप्नांचा चुराडा व्हावा हे नियतीच्या मनात होते. त्या दिवशी धो धो पासूस पडला. थांबायचे नाव घेत नव्हता. तुझ्या कडे येणे केवळ अशक्य होऊन बसले. पाऊस थांबावा आणि मला तुझ्याकडे येता यावे म्हणून मी मनोमन प्रार्थना करीत होतो.

"ठरली आहे भेट तिची माझी खास
काळजाला हुरहूर, नजरेला आस
मंतरलेल्या क्षणांचा सारखाच भास
आनंदासाठी आणि किती तरसु?
पावसा, आज नको ना बरसू......"

पाऊस आणि देव दोघांनाही माझी दया आली नाही. रात्रभर पाऊस होता. मी अत्यंत निराश झालो. कधी नव्हे ते डोळे पाणावले. या आधी माझी आजी गेली केवळ तेव्हा रडलो होतो. तुला भेटता येणार नसल्याचे वास्तव स्वीकारावेच लागणार होते. इतके सारे नियोजन पाण्यात जाणार होते. पण माझे तुझ्यावर इतके जीवापाड प्रेम होते की ती एक गमावलेली संधी माझ्या ध्येयापासून मला परावृत्त करू शकत नव्हती. मी अधिक निश्चयी झालो. मला खात्री होती माझं प्रेम मी नक्की व्यक्त करू शकेल.
दहावीचे वर्ष असूनही मनात तूच होती. सारखे तुझेच विचार यायचे. रस्त्याने दिसणारी तुझी क्षणिक झलक बघण्याची मी एकही संधी सोडीत नसे. एके दिवशी सकाळी तू मला माझ्या घराजवळ दिसली. आपले घर बरोबर विरुद्ध दिशेला होते. 'मग एवढ्या थंडीची तू तिथे काय करतेय?' मला कळेना. मी त्याच वेळेला, त्याच जागेवर दुसऱ्या दिवशीही आलो आणि तू पुन्हा दिसलीस. मी तुझा पाठलाग केला आणि माझ्या लक्षात आले की तू तिथे इंग्लिश ची शिकवणी लावलीय. तुझ्याशी बोलण्याची ही तर सुवर्णसंधीच होती. पण कसे? त्यासाठी मलाही ती शिकवणी लावणे आवश्यक होते.
मला क्लासची अगदीच गरज नव्हती. त्यातही इंग्लिशची तर नाहीच नाही. पण तुला भेटण्याची ही अत्यंत आकर्षक संधी वाया कशी घालवणार होतो? त्या क्लासला जॉईन होण्याचा मी क्षणात निर्णय घेतला. त्या निमित्ताने तुला बघता येईल, बोलता येईल थोडी जवळीक साधता येईल हा मुख्य हेतू होता. दहावीच्या अधे मध्ये क्लास लावणे ते ही गरज नसताना खूप हास्यासस्पद होते परंतू आपला उद्देश वेगळा होता ना..... मी चौकशी साठी त्या क्लास च्या टीचर ला भेटलो. दुर्देवाने तिथे दहावी साठी कुठलीही बॅच नव्हती. मी निराश होऊन घरी परतलो. पण ही संधी पुन्हा पुन्हा थोडीच येणार होती? मी दुसऱ्या दिवशी परत त्या टिचरला भेटलो आणि म्हणालो, "टीचर प्लिज तुम्ही माझा क्लास घ्याल का? मला अत्यंत गरज आहे शिवाय माझे दहावीचे वर्ष आहे"
त्यावर त्या म्हणाल्या, "ठीक आहे बेटा, पण अजून एखादा विद्यार्थी असेल तरच मी क्लास घेईल. एका मुलासाठी वेळ काढणे जमणार नाही मला"
घ्या! आता अजून एक विद्यार्थी कुठे शोधायचा? मी परत अयशस्वी होऊन परतलो. काय करावे हा विचार मनात घोळत असताना सर्व मित्रांची नावे डोळ्यासमोर आलीत. काहींनी आधीच क्लास लावला होता तर काहींना गरज नव्हती. विचार करत असतानाच मला किरण आठवला. तसा तो एक वर्षाने लहान होता पण माझं एकणाऱ्यातला होता. मी लगेच त्याला गाठले. पूर्ण हकीकत सांगितली आणि त्याला समजून सांगितले की तो नववीत कसा दहावीचा अभ्यास सुरू करू शकतो.. मोठ्ठे आव्हान होते पण मी ते लिलया पेलले. किरण तयार झाला. 'केवळ माझ्या प्रेमा साठी'!
मी लगेच टीचर ला भेटलो आणि सांगितले की आम्ही दोन विध्यार्थी आहोत तेव्हा लगेच क्लास सुरू करूयात. आणि हो, मला आठ वाजताची बॅच हवीय हे ही सांगितलं कारण तुझी बॅच सात ची होती म्हणजे तुझा क्लास झाला की लगेच आमचा. काय सेटिंग लावलं होतं! पण हाय रे देवा संकटांची मालिका संपतच नव्हती. त्या म्हणाल्या," मी फक्त सकाळी सहाला तुमचा क्लास घेऊ शकते, नंतर शक्य नाहीय" बापरे! सकाळी सहा! तेही हिवाळ्यात? मला आधीच सकाळी उठण्याचा कंटाळा. परंतु प्रेमा साठी वाट्टेल ते. मी तर तयार झालोच पण किरण ला ही तयार केलं. आता सगळं व्यवस्थित ठरलं. दिवाळी तोंडावर होती त्यामुळे दिवाळी नंतर क्लास सुरू करण्याचे ठरले. म्हणजे त्यांनीच तसे सुचवले. आम्हीतर लगेच जॉईन व्हायला तयार होतो. आमचा क्लास सुरू झाला. थोड्याच दिवसात टीचारच्या लक्षात आले की मला तर इंग्लिशचं सगळं येतंय. क्लासची अजिबातच गरज नाहीय. तसं त्यांनी बोलून देखील दाखवलं. यावर मी आणि किरण चिडीचूप. बोलण्यासारखं काही नव्हतंच. आमचा मूळ हेतू वेगळाच होता. क्लास सुरू होऊन दोन आठवडे झाले तरी तुझे दर्शन अद्याप झाले नव्हते. "हिने बॅच तर बदलली नाही" मला प्रश्न पडला. काय करावे सुचेना. एक दिवस मोठ्या धाडसाने टीचर ला विचारले, "सकाळची सात ची बॅच सुरू आहे ना?"
"हो व्यवस्थित सुरू आहे, तुला नक्की काय विचारायचे आहे?" त्यांनी थेट विचारले
"माझ्या मित्राची बहीण, 'मीरा' यायची सात च्या बॅचला पण ती अश्यात दिसली नाही म्हणून सहज विचारले" मी कसे तरी सावरले.
अच्छा मीरा, होय ती यायची पण दिवाळी नंतर तिने क्लास सोडला.
हे ऐकताच माझा चेहरा पडला. सगळं मुसळ केरात गेलं. ज्यासाठी एवढा अट्टाहास केला होता ते निष्फळ ठरलं होतं.
देव माझी परीक्षा बघत होता.
माझा पुरता गोंधळ उडाला होता. कुठल्याही मित्राला मात्र याची पूर्ण कल्पना देता येत नव्हती. कसे सांगणार? दहावीत असताना हे उद्योग म्हणजे मला वेड्यात काढले असते. पण मी माझ्या मनाचा गुलाम! मनात केवळ प्रेम होतं. दहावीचा माझ्यावर विशेष ताण नव्हता.  मेरिट मध्ये येण्याची अपेक्षा नसली तरी डिस्टिंगशन नक्की मिळेल याची मला खात्री होती. भावनिक गोंधळ स्वतः पुरता सीमित ठेवणे मला कठीण होत होते. अश्यात मला गाणी ऐकण्याचे वेड लागले. गाण्याचे प्रेत्येक शब्द जणू माझ्या प्रेमाच्या कोमल भावना उलगडत होते. तो कॅसेटचा काळ होता. उस्ताद नुसरत फते अली खान साहेब यांचा 'आफ्रीन' हा गाण्याचा अल्बम नुकताच प्रकाशित झाला होता. त्यातील गाणं "हुस्न ए जाना की तारीफ़ मुमकिन नहीं आफरीन आफरीन" म्हणजे तुझे यथार्थ वर्णन! तुझे सौंदर्य जे मला शब्दात व्यक्त करता आले नसते ते खान साहेबांनी जणू माझ्यासाठी केले होते. तेव्हा पासून मी त्यांचा निस्सीम चाहता आहे.
आणखी एक गाणं जे मला खूप आवडायचं ते म्हणजे "मेरे रश्के क़मर तू ने पहली नज़र
जब नज़र से मिलाई मज़ा आ गया"
आज बॉलीवूड मध्ये ही गाणी रिमिक्स करून  गायली जातात पण मी या गाण्यांचा आनंद दहावीत असताना लुटलाय. आजही रात्री झोपताना खान साहेबांचे गाणे ऐकतो तेव्हा हृदय शांत, आणि मन आल्हाददायक होतं. दिवसभराच्या दगदगी नंतरचे सुखद क्षण असतात ते. लकी अली त्यांच्या जादुई आवाजातील  "श्याम सवेरे तेरी यादे आती है.. .ओ सनम ओ सनम" हे आणखी एक गाणं ज्याने माझ्या मनाचा ताबा नेहमी साठी घेतला. शब्द अन् शब्द हृदयी भिडणारा!
-------------------------------
राघव,
तू हुशार होतासच पण तरीही दहावी बद्दलचा तुझा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता. अभ्यास सांभाळून प्रेमळ भावना फार छान जपल्यास. कुठल्याही नात्याची सुरवात खोटं बोलून करू नये हा तुझा दृष्टीकोन अगदी योग्य. तू तसा समजूतदार होतास. पण आपल्यात मैत्री व्हायला हवी होती असे मला मनापासून वाटते. 
प्रत्येक आठवण किती ताजी आहे तुझ्या मनात! इतके ओघवते लिहितोस की प्रसंग जसा च्या तसा डोळ्यापुढे येतो. प्रेम व्यक्त करण्यासाठीची तुझी धडपड आणि त्यासाठी केलेले प्रयास वाचून आता जरी हसायला येतंय तरी तेव्हा तुला किती त्रागा झाला असेल याची नक्कीच कल्पना करू शकते. दसऱ्याच्या दिवशी झालेला तुझा हिरमोड बघून मात्र माझ्याही डोळ्यात पाणी तरळलं. गरज नसताना इंग्लिश च्या शिकवणीचे निष्फळ प्रयत्न मात्र विनोदी होते. त्या टीचरच्या अनुभवी नजरेने तुझा चेहऱ्यावरचे भाव नक्की टिपले असतील. मित्राची बहीण म्हणून 'मिराची' जी काही चौकशी केलीस त्यावरून त्या जे समजायचे ते नक्की समजल्या असतील. काय काय उद्योग केलेस? तुझे तूच जाणो.
त्या वयात सर्वांनाच प्रेमगीतांची भुरळ पडते.
तू त्याला अपवाद कसा असशील? तुला भावलेली सर्व गाणी ही सुंदरच होती अजूनही आहेत. पण कसं असतं ना राघव, आपण ज्या नजरेने जग बघतो आपल्याला ते तसेच भासते. आणि तुझ्या नजरेत प्रेम ओतप्रोत भरलेले होते. त्यामुळे तुला मी इतकी सुंदर वाटायचे. मी तर चारचौघींसारखीच सामान्य होते. तरीही तुझ्या कल्पनेतील मी अनुभवताना सुखद वाटले.
तुझ्या भावनांचा मी नेहनीच आदर करेल.
–----------------------------

मीरा,
परीक्षेचे दिवस जवळ येत होते. प्रत्येक जण जोमाने अभ्यासाला लागला होता. जो तो उजळणी, सराव प्रश्नपत्रिका सोडवणे, यांत दंग झालेला. मला त्याचे काहीच नव्हते. मला काळजी होती ती परिक्षा संपल्यावर मी तुला प्रपोज करणार याची. केव्हा, कठे, कसे याचाच विचार डोक्यात होता. एकदा परिक्षा संपली की मग काय कारण देऊन बाहेर पडायचं? आई बाबांना काय सांगायचं? तुझ्याशी नेमकं काय बोलायचं? आणि मुख्य म्हणचे तू माझ्याशी बोलशील का? या सर्व विचाराने मी हैराण व्हायचो.
उन्हाळा चांगलाच जाणवायला लागला होता. त्यामुळे शाळा सकाळची होती. मी घरी येत होतो. खूप तहान लागल्यामुळे एका पाणपोई वर थांबलो. ती माझी आवडीची नेहमीची जागा होती. पाणी पिण्यासाठी मी नेहमीच तिथे थांबत असे. तिथे एक फार मोठे कडूलिंबाचे झाड होते. शीतल छाये बरोबरच त्याच्या मुळांचा तुरटपणा जणू त्या पाण्यात उतरायचा. त्या पाण्याला वेगळीच छान चव होती. माझं पाणी पिऊन होण्याआधीच बाजूला कुणीतरी पाणी पिण्यासाठी ग्लास शोधत होते. ओह! ती तू आणि तुझी मैत्रीण होतीस! काय भारी वाटलं म्हणून सांगू. पण आश्चर्य वाटले कारण तिथून तुझे घर अगदी जवळ होते. तुलाही त्या तुरट पण चविष्ट पाण्याची ओढ होती की वेगळे काही कारण? समजलेच नाही. असो, तू माझ्याकडे बघून इतकी गोड हसली आणि विचारले "झाला का अभ्यास?" या अनपेक्षित प्रश्नाने मी पुरता गोंधळलो आणि नुसतेच 'हो' म्हणालो... त्यावेळी आपण एकमेकांच्या डोळ्यांत बघत होतो. ते क्षणिक पण टक लावून बघणे मंत्रमुग्ध करणारे होते. उन्हाच्या झळा देखील मला गार हवेच्या झुळूकी प्रमाणे वाटल्या.... तू पाणी प्यायलीस. "परिक्षा झाली की तुझे पेपर मला देशील. ऑल द बेस्ट" असे म्हणून निघून गेली.
ती छोटीशी भेट आणि अल्पसा संवाद मला खूप बळ देऊन गेले. तुला प्रपोज करण्याचं माझं मिशन शंभर टक्के यशस्वी होणार याची मला खात्री पटली.
अखेर परीक्षा सुरू झाली. अगदी शेवटच्या क्षणा पर्यंत काही मुलं उजळणी करीत असायची. मी मात्र माझ्या परिक्षा केंद्रावर जाण्या येण्याच्या आणि तुझ्या शाळेच्या वेळा कशा जुळतील याचा अंदाज घेत असायचो.
माझ्या डोळ्यांना सुखवणारी तुझी एक झलक दिसावी म्हणून सर्व खटाटोप असायचा.
बोर्डाचे पेपर संपले एकदाचे. कुठे कुठे मी फार वेड्यासारखा वागलो यार. त्या चुका मी कधीच विसरणार नाही. तुझ्या शाळेत शिकणाऱ्या माझ्या मित्राच्या बहिणी कडून मी तुझ्या परीक्षेचे वेळा पत्रक जाणून घेतले होते. तुझा शेवटचा पेपर 12.30 ला संपणार होता. म्हणजे तू 1 वाजे पर्यंत घेरी पोहोचणे अपेक्षित होते. टळटळीत उन्हाचे बाहेर पडायला आईला काय सुयोग्य कारण द्यावे कळत नव्हते. मिशन तर फत्ते करायचे होतेच. आईला पटेल असे एक भारी कारण  मी शोधलं. मला आवडणाऱ्या माधुरी दिक्षितचा "कोयला" हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. मी सिनेमा बघायच्या बहाण्याने बाहेर पडण्याचे ठरवले. एवढया दुपारच्या शो ला जातोय म्हणून तिला जरा आश्चर्य वाटले पण मधुरीचं वेड लक्षात घेता तिने परवानगी दिली. वसंत टॉकीज ला दुपारी 3 चा शो बघणार होतो. या आधी कधी एकट्याने सिनेमा बघितला नव्हता. मी आईशी खोटं बोललो. 'माझे शाळेचे मित्र थेट टॉकीज वर येणार आहेत' असे सांगून मी बाहेर पडलो. तुझा पेपर संपण्याची वेळ आणि माझा सिनेमा सुरू होण्याची वेळ यांत पुरेसा वेळ होता. आज तुला भेटून हृदयीचं गुपित सांगायचं होतं.....
मनात विचारांचं काहूर माजलं होतं. एका मनाला वाटत होते मित्रांनी सांगितल्या प्रमाणे आधी छान मैत्री करावी. त्या बद्दल तुझ्याशी बोलावं. पण दुसरं मन म्हणत होते कशाला? जे आहे ते स्पष्ट सांगितले पाहिजे. प्रेम मिळवण्यासाठी मैत्रीचे कारण पुढे करणे आणि त्याचा गैरफायदा घेणे मला पटत नव्हते. माझ्या मनात काय चाललंय या पेक्षा तुला काय वाटतंय हे विचारणं मला अधिक गरजेचं वाटलं. धडधडणाऱ्या असह्य जीवघेण्या भावना केवळ मला छळतायत की तुझे ही तेच हाल आहेत? मला जाणून घ्यायचे होते. तुझं माझ्या डोळ्यात थेट बघण्याचा काही तरी उद्देश नक्की असावा असा मी निष्कर्ष काढला. त्यावर फक्त शिक्का मोर्तब होणे बाकी होते.
वाटेत सायकलने येरझाऱ्या घालीत तुझ्या येण्याची मी वाट बघत होतो. सूर्याचा पारा आणि हृदयाचे ठोके पराकोटीचे वाढले होते. आज सोक्षमोक्ष लावायचाच होता. पांढऱ्या कुर्तीवर मरून ओढणी घेतलेली तू मला दिसली. मी लगेच यु टर्न घेतला. मागून येऊन उजवीकडून ओव्हरटेक करत रस्त्याच्या कडेने तुला थांबवलं. तू थांबलीस आणि तुझ्या मैत्रिणी पुढे गेल्या.
मी म्हणालो,"मला जरा बोलायचे आहे"
दहावीच्या पेपर बद्दल भलतेच काहीतरी तू बोलत होतीस. तुला मधेच थांबवून नजरेला नजर मिळुवून मी म्हणालो,"तुझं माझ्यावर प्रेम आहे का?" भर रस्त्यात अश्या अनपेक्षित थेट प्रश्नाने तू जाम गडबडली आणि भडकली देखील. "तू वेडा आहेस का रे राघव" या एका वाक्यात तू माझा निरोप घेतलास. तुझ्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. जरी हा थेट प्रश्न असला तरी इतक्या नकारार्थी उत्तराची मी अजिबात कल्पना केली नव्हती. मी प्रचंड दुखावल्या गेलो. मला मनापासून वाटत होते जे मला तुझ्या बद्दल वाटतं तेच तुला ही माझ्या बद्दल वाटत असेल. पण असे झाले नव्हते. माझ्या अश्या बेधडक वागण्याने मी तुलाही दुखावले होते. फार वाईट वाटत होतं. मी स्वतःला समजावत होतो. चांगला मित्र असण्याचे खोटे बोलून उगाच सत्य भावना लपवण्यापेक्षा जे झाले ते ठीक झाले. स्वतःची समजूत काढत होतो पण सुन्न झालो होतो, सगळ्या भावना गोठल्या होत्या. काय करू काही समजत नव्हते. ठरल्या प्रमाणे मी सायकल वसंत टॉकीज कडे वळविली. पोहोचताच लक्षात आले सिनेमा हाऊस फुल आहे. मी ब्लॅक ने तिकीट घेतलं आणि थेटर मधल्या गार वातावरणात विसावलो. अजूनही मी झाला प्रकार स्वीकारण्याचा प्रयत्न करीत होतो. आतून उद्धवस्थ झालो होतो...तुटून गेलो होतो. स्वतःला थोडा वेळ मिळावा, सावरता यावं म्हणून सिनेमा बघत होते. म्हणजे घरी जरा नॉर्मल राहता येईल असा माझा समज होता. अन्यथा सिनेमात लक्ष कुणाचे होते? गाणी मात्र माझ्या भावनांच्या उद्रेकाची साक्ष देत होते. पुन्हा एकदा मनाला भिडणारे शब्द! सिनेमा संपला. मी बाहेर आलो. बघतो तर जोरदार पाऊस सुरू होता. कमाल वाटली. एप्रिल मध्ये पाऊस! माझ्या दुःखात जणू सहभागी होण्यासाठी बरसत होता. घरी परतताना मी पूर्ण भिजलो होतो. चेहऱ्यावर ओघळणारे अश्रू पाण्याबरोबर वाहत होते. एरवी मला भिजायला अजिबात आवडत नाही पण त्या दिवशी 'तो' ही मनसोक्त कोसळत होता आणि मी ही भिजत होतो. पाण्याच्या थेंबा बरोबर अनावर झालेला राग मी वाहू देत होतो. नेहमीसाठी.... जे घडलं ते कधीच विसरता येणार नव्हतं.
..................................................
राघव,
अरे खरंच तहान लागली होती म्हणून थांबलो होतो. आम्हीपण नेहमी तिथे थांबायचो. तिथे आल्यावर तू दिसलास. तोंडावर तोंड पडल्यावर ओळखीचं माणूस बोलेलच ना?
मी नेहमी समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलायची. ती माझी सवय होती. मला लाजता वगरे येत नाही.
इतर वेळी आपली रस्त्यात ओझरती भेट व्हायची त्या दिवशी बोलता आले. मला ही छान वाटले. पण माझ्या मनात तुझ्या विषयी कुठल्याच भावना अद्याप नव्हत्या. तू ओळखीचा आहेस, माझ्या आवडीच्या आधीच्या शाळेतला आहेस एवढे पुरेसे होते तुला ओळख द्यायला आणि तुझ्याकडे बघून हसायला.
तू मात्र माझी चांगलीच खबर बात ठेवायचास रे. तुझ्या मित्राची कोण बहीण माझ्या शाळेत होती आणि माझ्या विषयी काय माहिती पुरवायची याचा मला थांग पत्ता नव्हता. न जाणो काय समजली असेल मला.
तुझं माधुरी दीक्षितचं वेड आवडलं. ती उत्तम अभिनेत्री आहेच. मित्रा, मैत्री करायची नसते ती सहज होते आणि सहवासाने फुलत जाते. आपल्यात फार कमी संवाद होता. आणि  कुठलंही नातं निर्माण होण्याआधीच तू मला इतका जीवघेणा प्रश्न विचारला. प्रेम वगरे भावनांचा माझ्या मनाला अजून स्पर्श देखील नव्हता. पण तू निरागस होतास. स्वछपणे व्यक्त झालास. माझ्या प्रतिक्रियेने मात्र फार दुखावलास... नकळत तुला छळलेय मी. त्या दिवशी तू रस्त्यात थांबवले तेव्हा मला ओळखीचे काका दिसले. त्यामुळे मी खूप अस्वस्थ झाले. ते माझ्याकडे बघत होते. म्हणून मी काहीबाही बोलले तर तू मला थांबवत माझ्यावर प्रश्न रुपी बॉम्ब टाकला. मी इतकी घाबरले होते की मला बोलवल्याही जात नव्हते. माझी बोलती बंद! काय बोलावे यापेक्षा मला कुणी बघत तर नाहीये ना? या कडेच माझे अधिक लक्ष होते. हाताला घाम आला होता, धडधड वाढली होती. तिथून निघाल्यावर मैत्रिणीने प्रश्न विचारणे अपेक्षित होतेच. पण काही बाही सांगून वेळ मारून नेली. घरी आल्यावर ही कशात लक्ष्य नव्हते. सारखा तुझा लोभस चेहरा आठवायचा. मधेच हसायला यायचं, भीती ही वाटायची. काहीतरी वेगळं झालं होतं खरं. कोवळं, अल्लड वय ते! कुणाचा काहीच दोष नव्हता. त्या दिवशी न जेवताच झोपली आणि अंगात  थंडी वाजून ताप भरला. आपल्या वागण्यातील बदल आईला कळू नये म्हणून मी मनोमन प्रार्थना करत होते. किती निष्पाप वय ते! मनात सारखे एकच यायचे, "आपण दाखविलेल्या ओळखी मुळे आणि तुझ्याकडे कडे बघून हसल्या मुळेच तुझा गैरसमज झालाय". स्वतःचा राग येत होता. आपण असे कसे वागलो? ही सल मला कायम बोचत राहिली.
-------------------------------
मीरा,
सत्य नेहमी कटू असतं. त्यामुळे ते पचवणे अवघड जात होतं. मित्र म्हणत होते ते  बहुतेक बरोबर होते. आधी मैत्री वाढवायला हवी होती, एकमेकांना जाणून घेण्याची संधी द्यायला हवी होती आणि मग व्यक्त व्हायला हवे होते. "घाई नडली".
कोणतीही मुलगी अश्या कोणत्याही मुलाला सहज हो कशी म्हणेल. माझं चुकलंच होतं.
मला स्वतःचा राग येत होता. पश्चाताप होत होता. माझ्या गोंडस स्वप्नाचे तुकडे तुकडे झाले होते. ते जोडणं शक्य नव्हतं. तुझा  मित्र होण्याची संधीही मी गमावली होती.
काहीच मार्ग नव्हता. जे आहे ते स्वीकारणेच होतं. त्याच आठवड्यात मी मुंबईला मामा कडे गेलो. तिथेही जीवाला शांतता नव्हती. मी दरवर्षी सुट्टीत पुण्याला आणि मुंबईला जात असे. माझ्या भावंडाना माझं 'प्रेम' माहीत होतं. आम्ही वर्षातून एकदा भेटत असल्यामुळे वर्षभराच्या 'ताज्या घडामोडी' जाणून घेण्यास ते उत्सुक होते. पूर्ण सुट्टी तुला विसरण्याचा प्रयत्न केला. माझ्या मामेभावाला माझी दया यायची पण बहीण जाता येता टोमणे मारायची. सारखी म्हणायची "कुणी सांगितला नसता शहाणपणा?" हिरोगीरी भोवली ना आता?
दहावीचा निकाल निराशाजनक लागला. मेरिट मध्ये येण्याची मला अपेक्षा नव्हतीच पण माझे डिस्टिंगशन अवघ्या दोन मार्काने हुकले ते जिव्हारी लागलं. नियतीने जखमेवर मीठ चोळले होते........
या आधी मी कधीच अपयश अनुभवले नव्हते.
'मी कधीच अपयशी होणार नाही' हा गोड गैरसमज दूर झाला होता. तेव्हा पासून मात्र अपयशावर मात करून पुढे जायला मी शिकलो. शेवटी मी "वृश्चिकेचा" हार स्वीकारणे आणि त्यावर मात करणे माझ्या रक्तातच आहे.
–-------------------------------
राघव,
मला प्रेम वगरे समजत नव्हते पण तुझ्याकडे बघून मला छान वाटायचे. तू विचारल्यावर मी घाबरली होते, गोंधळलीही होते पण मला तुझा कधीच राग आला नाही. रस्त्यात असे आपल्याकडे बघून कुणी चुकीचा अर्थ काढेल याचे मनावर दडपण आले होते.  तुझ्या भावना अनावर झाल्यामुळे तू व्यक्त झालास. रस्त्यात बोललास त्याला पार्याय नव्हता. कुठे बोलणार होतास? शाळा, क्लास कुठेही आपले एकत्र जाणे येणे नव्हते. मी ते तेव्हाही समजून घेतले होते. अडचण ही होती की मला काय वाटतंय हेच मला उमगले नव्हते. मला ते कळलं जेव्हा एक दिवस समीरने ने मला सांगितले की त्याला मी आवडते. तो माझा चांगला मित्र होता. आमचे घरोब्याचे संबंध होते. त्या दिवशीची त्याची वागण्याची पद्धत अतिशय चुकीची होती. त्याने माझं ही त्याच्यावर प्रेम असेल हे गृहीत धरलं होत. माझ्या साठी तो मोठा धक्का होता. मी चिडले होते, घाबरले होते, तरीही त्याला समजावू शकले की "आपल्यात फक्त मैत्री होऊ शकते त्यापलीकडे मला कशात रस नाही". तो प्रसंग मला फार अपमानास्पद वाटला. तो समंजस मुलगा होता तरी असा का वागला काय माहीत. त्या वागण्याचा त्यालाही खूप खूप पश्चाताप झाला. नंतर कितीदा तरी त्याने ते कबूल केलं. त्या नंतर त्याला कायम वाटत राहिले आपण चांगली मैत्रीण गमावली आणि ते खरं होतं. मी त्याच्याशी बोलायचे पण आधीसारखं मोकळं नाही.
या सगळ्या प्रकाराचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला. आधी तू आणि मग ह्याने विचारल्या मुळे माझ्या वागण्यात नक्की दोष आहे असे मला ठाम वाटू लागले. आपण फार अघळपघळ वागतो असे वाटायचे. मी फार विचार करत बसायचे. या दोन्ही गोष्टी मी केवळ स्मिताला संगीतल्या होत्या. पूर्वी मी पटकन कोणाकडे मन मोकळं करत नव्हते. ऐकून सर्वांचे घ्यायचे. कुणाकुणाची गुपितं मी सांभाळून ठेवली होती. पण मला फार व्यक्त व्हायला आवडायचं नाही.
समीरच्या अश्या वागण्याने एक गोष्ट झाली, ती म्हणजे मला जाणवले की माझ्या मनात तुझ्या बद्दल काहीतरी खास भावना आहेत. ज्या इतर कुणासाठी नाही. पण ते स्वीकारण्याचं किंवा तुला तसं स्पष्ट सांगण्याचं धाडस माझ्यात नव्हतं. आणि मुख्य म्हणजे मला ती चूक वाटायची. आपण घरात मोठे आहोत, आई बाबांचे लाडके आहोत आणि दोन्ही भावंडे आपला आदर करतात त्यामुळे आपण कधीही त्यांना दुखवू शकत नाही हे माझं मीच ठरवलं होतं.
पण तू स्वतःला किती त्रास करून घेतलास! तुझे अभ्यासाकडे दुर्लक्ष होण्या मागे मी जबाबदार ठरले. तू गुंतत गेलास. याचे फार वाईट वाटले. तुझ्या भावना अगदी निर्मळ होत्या पण त्या वयात तुझं असं व्यक्त होणं मला झेपलं नाही. तू चांगल्या घरातला मुलगा आहे, सेन्सिबल आहेस हे तुझ्याकडे बघून कोणालाही तेव्हाही कळायच. तू मला कधीच असा तसा मुलगा वाटला नाही. फक्त तुझी फार घाई झाली आणि मला फारच वेळ लागला इतकंच.
–------------------------------
मीरा,
नवे कॉलेज, नवे मित्र, नवीन विषयांसह अकरावीचा आरंभ झाला. मला मात्र कशाचीच उत्सुकता नव्हती. तू आणि दहावीचा निकाल अजून डोक्यात होता. मी तुला गमावलेय हे मी मान्य करू शकत नव्हतो. कारण तू कायम माझ्या मनात होतीस.
मी नवीन गोष्टीत मन रमवण्याचा खूप प्रयत्न करत होतो. मन मात्र 'मीरा' या एकाच विषयाभोवती फिरत राहायचे. मला त्यातून बाहेर पडणे जमत नव्हते. तुझे डोळे आणि ते हास्य कायम आठवायचे. या सर्वांतून मी बाहेर पडावं आणि नवीन सुरवात करावी म्हणून दिनेशने खूप प्रयत्न केले. कायम मला समजवयाचा. तो म्हणायचा, "राघवा, चंद्र कितीही आवडला तरी त्याला आपल्या अंगणात आणता येत नाही. दुरून बघून समाधान मानायचे" पण या फिल्मी वाक्यांचा माझ्यावर तिळमात्र फरक पडायचा नाही. माझं मन अडकलं होतं गं तुझ्यात. गुंतलो होतो मी. तुला बघण्यासाठी मी पुन्हा उतावीळ होऊ लागलो. आतातर सगळं बदललं होतं. माझं कॉलेज, ट्युशन सगळ्या वेगळ्या वाटा होत्या. आणि माझ्या वेळा ही बदलल्या होत्या. आधी तू जिथे दिसायचीस तिथे आता माझे जाणे नसायचे. आपली नजर भेट आठवत राहायची आणि मग विलक्षण ओढ लागायची तुला भेटण्याची. सहा महिन्यांत तू एकदाही दिसली नव्हतीस. मागच्या वेळी रस्त्यात थांबवून मी जे काही विचारले होते त्यासाठी माझ्या मनात अपराधीपणाची भावना होती. तुझ्यासारख्या निरागस मुलीला दुखवल्याचं शल्य मनाला बोचत होतं. मी पुन्हा तुला भेटण्याचा निर्धार केला. झाल्या प्रकाराची निदान माफी मागता यावी असे वाटत होते. रस्ते जुनेच होते. काही रस्त्यांवर आठवणी रेंगाळत राहतात. जेव्हा जेव्हा आपण त्या रस्त्याने पुन्हा जातो तेव्हा आठवणी बिलगतात आपल्याला. आपणही हळवे होतो. कारण कधीकाळी हसू रडू एकत्र नांदले असतात त्या रस्त्यांवर. याही वेळेस तुला रस्त्यात थांबण्याशिवाय पर्याय नव्हताच. मी वेळ साधली. मनात प्रचंड भीती होती. तू थांबशील की कानाखाली लगवशील? की लोकांना जमा करशील? बापरे! भीतीपोटी मनात नाही नाही ते आले.
नियतीच्या मनात जे असेल ते होईल या विचाराने मी पुढे सरसावलो. या वेळी तू एकटी होती. निदान तू थांबलीस आणि माझं ऐकून घेतलंस. खूप बरं वाटलं. तुझ्या अश्या सोज्वळ वागण्याने मी अधिकच खजील झालो. तुझी मनापासून माफी मागितली.  "राघव, माझे दहावीचे वर्ष आहे आणि मला अभ्यासात लक्ष द्यायचे आहे" असे म्हणून तू नेहमी सारखा एका वाक्यात माझा निरोप घेतलास.
मला खूप हलकं वाटत होतं. मनावरचं ओझं कमी झालं होतं. मी खुश होतो. मुख्य म्हणजे तू चिडली नाहीस, रागावली नाहीस. माझ्या डोक्यात पून्हा किडे वळवळले. 'तू माझ्यावर रागावली का नाहीस?' तू सगळं विसरली  की मनात अजून काही वेगळं आहे? मी विचारात पडलो. तुझ्या सौम्य वागण्याचे कुतूहल वाटले. तुझ्या बोलण्याने 'अभ्यासाला प्राधान्य' हेच अधोरेखित केले. म्हणजे कदाचित तुला माझ्यात इंटरेस्ट आहे पण सध्या अभ्यास करायचाय. मी सोईस्कर अर्थ काढला. कारण "मला तू आवडत नाहीस", "मला तुझा राग आलाय" असं तू काहीही म्हणाली नाहीस. शिवाय तुझ्या चेहऱ्यावर रागीट किंवा चिडके भाव देखील नव्हते. तुझ्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी मी नक्की आहे असे मला जाणवले. अंधुक का असेना मला आशेचा किरण गवसला होता.
सगळा दिवस कॉलेज, ट्युशन मध्ये व्यस्त असायचा. कधीतरी वाटायचे तुला अभ्यासात मदत करता आली असती तर ! पण मी पराक्रम असा करून ठेवला होता की ते अशक्य होतं. बदललेल्या दिनक्रमामुळे तुझे दिसणे दुर्लभ झाले होते. या विरहाने मी अजूनच तुझ्या प्रेमात पडलो. हृदयात तुझं अढळ स्थान निर्माण झालं. कधीकधी वाटायचे एखादा तास किंवा ट्युशन बुडवून तुला रस्त्यात गाठावे पण तुला त्रास होईल, अभ्यासात व्यत्यय येईल असे काही नव्हते करायचे. मी खूप संयम बाळगला. कितीतरी महिने मी तुला पाहिले नव्हते.
तुझी बोर्डाची परीक्षा जवळ आली होती.
तुझ्या शाळेत असलेल्या माझ्या मित्राच्या बहिणी कडून तुझे परीक्षा केंद्र मी माहिती करून घेतले होते. योगायोगाने ते माझ्या कॉलेजच्या अगदी शेजारी होते. त्यामुळे रोज तुला बघण्याची संधी होती.
परीक्षेच्या पहिल्याच दिवशी अगदी सेंटर पर्यंत तुझा पाठलाग केला. असं वाटलं पटकन पुढे येऊन तुला पेपर साठी शुभेच्छा द्याव्यात. पण ती वेळ योग्य नव्हती. तुला ताण येईल असे काहीही वागायचे नव्हते. एका क्षणाला नेमके तू मागे वळून पाहिलेस. मी दिसता दिसता राहिलो.. सेंटर वर फार गर्दी होती त्यामुळे बचावलो. "उद्या पासून सेन्टर वर अजिबात यायचे नाही" मी ठाम निर्णय घेतला. त्यापेक्षा रस्त्यात कुठेतरी ओझरते दर्शन घ्यायचे, मी ठरवले.
एके दिवशी वेळेचा अचूक अंदाज घेऊन तुझ्या दिसण्याची मी रस्त्यात वाट बघत होतो. हे काय? तू चक्क कुणा मुलाबरोबर डबल सीट येत होती! तोही साधारण आपल्याच वयाचा! माझ्या माहिती प्रमाणे तुला भाऊ नव्हता. मग हा मुलगा कोण? माझी उत्सुकता शिगेला पोहोचली. जीवाची नुसती तगमग झाली...जळफळाट झाला. जळजळ होणे म्हणजे काय ऐकले होते. आज अनुभवत होतो. तुमचा पाठलाग करावासा वाटला. पण मी जाणीवपूर्वक टाळलं. मी परतणार तोच तुझा चेहरा दिसला. दुसऱ्या कुणातरी बरोबर मी तुला पाहिले, हे तुलाही तितकेसे आवडले नव्हते. गोंधळलेला चेहरा स्पष्ट दिसत होता. माझ्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव तू अचूक टिपले होतेस.
आपण नेहमी सारखे एकमेकांकडे रोखून पाहिले आणि आपापल्या वाटेने निघून गेलो.
-------------------------------

राघव,
तुझी प्रत्येक ई-मेल मला गतकाळात घेऊन जाते. आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलवत ठेवते अन्  पुन्हा एकदा मी तो काळ जगते.
तू माफी मागण्याच्या निमित्ताने परत भेटलास तेव्हा माझ्या मनात 'तू' होतास.. माझ्या मनात कोमल प्रेमळ भावना निर्माण करणारा तूच आहेस याची मला जाणीव झाली होती. रस्त्यात जेव्हा तू थांबवलंस तेव्हा तुला बघून मलाही तितकाच आनंद झाला होता. खूप बोलावसं वाटत होतं पण वाहवत जाण्याची भीती होती. म्हणून एका वाक्यात निरोप घेतला. या प्रसंगा पर्यंत आपण केवळ दोन ते तीन वेळा बोललो असू. तरीही मला तुझा आवाज फार आवडला होता. त्यात सौम्यपणा होता. कमालीची ऋजुता होती जी पुरुषी आवाजात सहसा नसते. तो संयमी आवाज मला फारच भावला होता. थोडी अजून तिथे थांबली असती तर त्या आवाजाकडे आणखी आकर्षित झाले असते. म्हणून निघून गेले......
मी न रागावण्याचा तू काढलेला अर्थ बरोबर होता. मनातलं चेहऱ्यावर झळकतच. खरं सांगायचे तर मी प्रत्येक भावना संयत ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करायची. कधीतरी असह्य झाले की सुचायचे नाही. मग मी लिहिण्याचा उपाय शोधला. सुरवातीला असेच कोणत्याही पानावर लिहायचे आणि नंतर ते पान फाडून टाकायचे. पुढे रोजनिशी(डायरी) लिहायची सवय लागली. त्यातलं प्रत्येक पान माझ्यासाठी खास होतं. कारण मझ्या तरल भावनिक शब्दांनी ते भरलेलं असायचं.
परिक्षे दरम्यान मी तुला समीर बरोबर दिसले. कारण त्या दिवशी बाबांना अचानक काम निघाल्याने त्याने मला सोडलं. तू दिसलास तेव्हा मलाही इतका राग आला होता! "यालाही आत्ताच दिसायचे होते का?" कधी नव्हे ते माझ्या मनात आलं. माझ्या बद्दल तू काय विचार करशील याने मी अस्वस्थ झाले. काही सांगूही शकत नव्हते. अवघ्या सेकंदाची भेट ती! त्या दिवशी समीर मात्र खुश होता...
-------------------------------
मीरा,
कंटाळली नाहीस ना?
त्या दिवशी परीक्षेला तुला सोडणाऱ्या त्या मुला विषयी मनात असंख्य प्रश्न होते. मी शक्य असेल तिथे चौकशी करून तो कोण आहे हे शोधून काढलं. मला कळलं तो समीर होता आणि तुझ्यात इंटरेस्टेड होता.
त्याने तुला सोडण्यामागे केवळ मदत हाच उद्देश होता की वेगळे काही मला समजत नव्हते. तू त्याच्या बरोबर गेलीस म्हणजे तो विश्वासातील आहे हे नक्की झालं. पण तुम्हा दोघांत काही सुरू तर नसेल? या विचाराने मी अस्वस्थ झालो. तुला त्याच्या बरोबर बघिल्यापासून काही सुचत नव्हते. डोक्यात विचारांची गर्दी झाली होती. मी डोळे बंद केले आणि तू त्याच्या सोबत असतानाचा तुझा चेहरा आठवला. त्यात तू त्याच्या सोबत भावनिक गुंतलेली असेल असे अजिबात वाटले नाही.... मी पुन्हा तुझा चेहरा आठवून ते भाव जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. आणि तुझं तसं काही नाही हे मला जाणवत होतं. उलट मला तुम्ही एकत्र दिसलात हे तुला बिलकुल आवडले नव्हते. निदान तुझा चेहरा तरी तेच सांगत होता. मला ठाऊक होतं तुझे डोळे माझ्याशी इतके खोटे बोलणार नाहीत. त्यामुळे मग समीर कडे मी दुर्लक्ष्य करण्याचे ठरवले. तुझी परीक्षा झाली होती. निकालाची मीच जास्त वाट बघत होतो. माझ्याकडे तुझा रोल नंबर होताच. निकाल लागला. मी बघितला देखील. पण तरीही तुझ्याशी बोलण्याचे निमित्त म्हणून तुला पुन्हा विचारायचे ठरवले.
तुला अकरावीला प्रवेश मिळाला होता.
एक दिवस तू रस्त्यात दिसलीस. यावेळीही तू एकटीच होतीस. मी तुझ्या मागे आलो. तुला थांबवण्यापेक्षा मी तुझ्या सोबत सायकल चालवत होतो. तुझ्या सोबत सायकल चालवताना बघून तुला फार टेंशन आलं होतं.
तुला असे टेंशन मध्ये आणि घाबरलेले बघून मलाही वाईट वाटलं. आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्यामुळे त्रास झालेला कोणालाही आवडणार नाही. "दहावीला किती मार्क पडलेत" मी विचारले.
"चांगले नाहीत पडले" तुझे तुटक उत्तर.
तुझा बोलण्याचा अजिबात मूड नव्हता. मी तिथेच थांबलो. तू काहीही न बोलता निघून गेलीस. साधं माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही.
तुला रोज रोज बघण्याचं सुख कमी कमी होत गेलं. या विराहामुळे तुला बघण्याची उत्कंठा आणखी वाढायची आणि मी अजून अजून तुझ्या प्रेमात पडायचो...
तू हसशील, मलाही आता हसायला येतंय पण त्या वेळी वेगळीच धुंदी होती गं. तेव्हा स्वाभिमान नावाची सीरिअल लागायची. मला आणि दिनेशला ती फार आवडायची.
आपल्या राहाणीमानापेक्षा आधुनिक जीवनशैलीचे त्यात प्रदर्शन होते. ते बघायला छान वाटायचं. त्यातली रितू मल्होत्रा नावाची अभिनेत्री अगदी तुझ्यासारखी दिसायची.
ती सीरिअल दुपारी 2 ला लागायची पण ट्युशन मुळे बघता यायची नाही. त्यामुळे मी रात्री 11 वाजता पुन्हा प्रसारित होणारा भाग बघायचो. रितूला बघून तुझ्या आठवणी जाग्या व्हायच्या म्हणून सगळा अट्टाहास. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुझ्याशी खूप मिळतेजुळते होते. थोडक्यात मी दुधाची तहान ताकावर भागवायचो. "स्वाभिमान" मुळे तुझ्या आठवणी मनात कायम जागृत राहिल्या. 
माझ्या बारावीला आईची तब्बेत फार बिघडली. अभ्यास, सुजय कडे बघणे, आईला बघणे यात फार ओढाताण झाली.
ती इतकी आजारी झाली की माझे कॉलेज, ट्युशनला जाणे पण होत नव्हते. आई कडे लक्ष देणे गरजेचे होते. मी दिवसभर तिच्या सोबत असायचो. अभ्यासाला वेळ देता येत नव्हता त्यामुळे ड्रॉप घेण्याचे विचार सतत मनात येत होते. जानेवारी 1999, आईची तब्बेत अजूनच खालावली. एका रात्री तिला हॉस्पिटल मध्ये भरती करण्याची वेळ आली.
जवळपास एक आठवडा तिला शुद्ध नव्हती, सगळे धास्तावले होते. देवाची कृपा की ती हळू हळू डॉक्टरांना प्रतिसाद देऊ लागली आणि साधारण दुसऱ्या आठवड्यात तिला शुद्ध आली. परंतू ती मला ओळखू शकत नव्हती. हे दुःख पचवणे मात्र फार अवघड गेले. मोठा मुलगा म्हणून खंबीर राहणे माझे कर्तव्य होते आणि ते निभावण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीत होतो. आईला हॉस्पिटल मधून घरी आणण्यात आले. मी बाबांना म्हणालो,"बाबा, या वर्षी मी ड्रॉप घेतो आणि बारावीची परीक्षा पुढच्या वर्षी देतो".
बाबांना माझी अवस्था कळत होती. त्यांनी मला समजून घेतले पण मी ड्रॉप घेऊ नये असा योग्य सल्लाही दिला. जे काही 5- 6 आठवडे आहेत त्यात जमेल तसा अभ्यास करून परीक्षा देण्यास प्रवृत्त केले. मी द्विधा मनस्थितीत असतानाच माझ्या मनात विचार आला, "मी जर ड्रॉप घेतला तर तू काय विचार करशील?" तुला वाटले असते तुझ्यावरच्या प्रेमापोटी मी हा निर्णय घेतला कारण बाकी परिस्थिती तुला माहितीच नव्हती. तुझ्या नजरेत मी अत्यंत हुशार मुलगा होतो हे मला माहित होते. त्यामुळे तो निर्णय मी बदलला आणि जे काही दिवस हातात होते त्याचा योग्य वापर करून अभ्यास केला. बारावीचे सर्व पेपर उत्तम गेले. आयुष्याला कलाटणी देणारी बारावीची परिक्षा मी नक्की चांगल्या गुणांसह उत्तीर्ण होईल याची मला खात्री होती....
परीक्षा झाली, सुट्या लागल्या आणि नेहमीप्रमाणे मी भावंडाना भेटायला मुंबई पुण्याला गेलो. या वेळी त्यांना संगण्यासारख्या कुठल्याही रोचक, भावनिक गोष्टी माझ्याकडे नव्हत्या. सत्य फार कठोर होतं. आईची खालावलेली तब्बेत डोक्यातून जात नव्हती. या वेळी मुंबईपेक्षा पुण्यात अधिक मुक्काम करण्याचे ठरले होते कारण मी मुंबईत जास्त राहतो अशी पुण्यातील भावंडांची नेहमीची तक्रार होती त्यामुळे दोन आठवड्या करिता आम्ही चौघे भावंडे पुण्याला गेलो. मागील वर्ष जरी अवघड, अनपेक्षित वळण असलेले होते तरी तुझ्या आठवणी मी माझ्या हृदयात अतिशय प्रेमाने
जपून ठेवल्या होत्या मीरा. एका संध्याकाळी आम्ही सगळी भावंडं पुण्याच्या रस्त्यावरून निरुद्देश्य चालत होतो. माझं 'मीरा' पुराण सगळे ऐकत होते. तुझे सुंदर पाणीदार डोळे आणि गोड हसू मला कसे भुरळ घालतात, आठवत राहतात हे सांगत असतानाच मी एकदम थबकलो. तू....तू माझ्या अगदी समोर होतीस. मी स्वप्नात तर नाही! की मला दिवसा ढवळ्या भास होतायत?? हे कळायच्या आधीच तू तिथून नाहीशी झाली सुद्धा. सगळंच अनाकलनीय. मला असा गोंधळलेला बघून भाऊ विचारू लागले,
"काय झालं राघव?"
"अरे आत्ता मला मीरा दिसली" असे सांगितल्या बरोबर सगळे पोट धरून जोरात हसायला लागले.
"तू ठार वेडा झालास राघव. तुला आता दिवसाही स्वप्न पडायला लागलीत. अरे, मीरा आत्ता इथे कशी असेल? नागपूरहून येथे पुण्यात येण्याचे तिचे काय प्रयोजन?" त्यांच्या कुठल्याच प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते. कदाचित तो आभास असेलही पण तुझे डोळे ओळखण्यात माझी चूक व्हायची नाही मीरा. शक्यच नाही. डेक्कनचे ते ठिकाण फार वर्दळीचे होते. त्यात तू मला बघितले नव्हते. आपण आधी एकमेकांना बघत असू तसे झाले नव्हते. तो भास होता की वास्तव कोण जाणे पण पुन्हा एकदा तुझे विचार मनात रेंगाळू लागले......
--------------------------------
राघव,
कंटाळा कसा येईल रे? हा आठवणींचा पट बराच मोठा आहे. माहीत आहे मला.
आपण कुणाला इतके आवडायचो ही भावना अत्यंत सुखावह आहे. मला कल्पना ही नव्हती माझी एवढी माहिती तुझ्याकडे होती/आहे. माझा रोल नंबर माहीत असणे म्हणजे खरंच आश्चर्य आहे!
त्या दिवशी तू मला माझे दहावीचे मार्क विचारले होते. काय सांगणार होते मी? जेमतेम फर्स्ट क्लास मिळाला होता. खूप कमी मार्क! माझ्या कडून ही अपेक्षा कुणीच केली नव्हती. पण मला नाही जमलं अभ्यासावर फोकस्ड करणं. अर्थात हे कारण देणं चुकीचे आहे पण माझा हा स्वभाव दोष आहे. एखाद्या गोष्टीतून बाहेर पडायला मला खूप वेळ लागतो, त्रास होतो. दहावीच्या रिझल्ट मुळे माझा कॉन्फिडन्स अजून गेला. माझ्या बाबांसाठी हा मोठा धक्का होता. मला ओरडले नाही पण त्याचं निराश होणं मला अजीबात बघवत नव्हतं. बाबा माझा विकपॉइंट होते.. मला अभ्यास समजत नव्हता, झेपत नव्हता असे नव्हते परंतु मी रीतसर सराव केला नाही. नियोजन शून्य अभ्यास.
काकूंच्या आजरपणाचे ऐकून खरंच वाईट वाटलं. आपल्या माणसाचं आजारपण मनावरचा ताण प्रचंड वाढवतो. आईने आपल्याच मुलाला ओळखू नये?? हे दुःख न पचणारे! या सगळ्याची मला जराही कल्पना नव्हती. मी कधीच तुझ्या बद्दल काही जाणून घेण्याचा प्रयत्न ही केला नाही. नकळत का असेना मी तुला खूप दुखवलय. ही सल मनात कायम राहील राघव.
ड्रॉप न घेण्याचा तुझा निर्णय अगदी योग्यच! अश्याही परिस्थितीत तुझ्या डोक्यात 'मीरा' असणं तुझं तिच्यावरचं प्रेम ठळकपणे अधोरेखित करतं. इतकं निखळ प्रेम मिळवणं भाग्यात असावं लागतं जे बहुदा माझ्यात नव्हतं.
किती कमाल आहे मी तुला पुण्यात दिसणं! पण तुला दिसली ती मीच होते. मी दोन महिने पुण्यात होते. शिवाजी नगरला मी राहायचे. तू किती मनापासून आठवण काढली असेल म्हणूनच तुला मी दिसले. त्यावेळी भेट व्हायला हवी होती आपली. कदाचित नीट बोलता आलं असतं. आपल्यात कधी शांत, सविस्तर बोलणंच नाही झालं. अर्थात त्याला मीच जबाबदार होते. आणि हो, माझ्या आठवणीत रितू मल्होत्राला स्वाभिमान सीरिअल मध्ये वेळ काढून बघणे ही आयडिया अफलातून वाटली रे राघव. मला आता ही सीरिअल नक्की बघायची आहे.

पुढच्या मेल च्या प्रतीक्षेत.....
------------------------------
मीरा,
मी विशेष प्राविण्यासह बारावी उत्तीर्ण झालो. मला पीसीएम ग्रुप मध्ये 82℅ होते. परंतु या मार्कांवर पुण्यात इंजिनिअरिंग ला प्रवेश मिळणे अशक्य होते. पुण्यात शिकण्याचं माझं स्वप्न पूर्ण होणार नव्हतं. बाबा म्हणाले पेमेंट सीट वर ऍडमिशन घेउतात पण मला ते पटत नव्हते. माझ्या मार्कांवर जे कॉलेज मिळेल तिथे ऍडमिशन घेण्याचे मी ठरवले. सुमितला पुण्यात ऍडमिशन मिळाली. आम्ही अगदी पहिल्या वर्गापासून सोबत होतो आणि आता शिक्षणाच्या निमित्ताने का असेना पण दुरावणार होतो. त्यामुळे वाईट वाटत होते. हो पण दिनेशला आणि मला एकाच कॉलेजला ऍडमिशन मिळाली होती आणि तिथे नागपूरचे बरेच विद्यार्थी असल्याने फार मज्जा ही आली. आमचे कॉलेज कडक शिस्तीचे आणि  नावाजलेले होते. मुला मुलींनी उगाचच फिरणे, एकत्र फिरणे, बोलणे याला मज्जाव होता. या कडक वातावरणाचा अनेक प्रेमी युगुलांना त्रास झाला तर काहींनी न जुमानता प्रेम प्रकरण चांगलेच फुलवले....
मी खूप बोलका, मोकळा होतो तरीही मला अद्याप एकही मैत्रीण मिळाली नव्हती. अगदी शाळेत किंवा अकरावी बारावीतही नाही. परंतु येथे मी माझ्या गृप मधील मुलींशी बोलायचो आणि लवकरच मला एक चांगली मैत्रीण मिळाली "निशा". खरंतर मी आणि निशा शाळेत एकत्र होतो आणि राहायला देखील जवळजवळ होतो. पण पूर्वी कधीच मी तिच्याशी इतका बोललो नव्हतो की आमच्यात मैत्री व्हावी. परंतु घरच्यांच्या, आपल्या माणसांपासून दूर राहताना मी तिच्यात आपलं माणूस शोधलं आणि आमच्यात खूप निखळ मैत्री झाली आयुष्यभरासाठी...आमच्या बोलण्यातील स्वाभाविक विषय असायचा कोणी आयुष्यात खास आहे का? आणि मी निशा कडे मन मोकळं करत तुझ्या विषयी व्यक्त झालो. अथ पासून इति पर्यंत सगळं सगळं सांगितलं. तिनेही जमेल तशी माझी मदत करण्याचे आश्वासन दिले. एक मुलगी म्हणून ती तुला कॉल नक्कीच करू शकत होती. मला तर चालणार होतंच पण मी योग्य वेळेचा विचार करीत होतो. कारण तुझे बारावीचे वर्ष होते आणि तुला टेन्शन येईल असे काहीही मला करायचे नव्हते. काय भराभर दिवस सरले मीरा! तुझी बारावी झाली आणि पाहिलं वर्ष उत्तीर्ण करून मी दुसऱ्या वर्षाला गेलो. माझा पाहिल्या वर्षाचा निकाल फारसा बरा नव्हता. पण आता अनपेक्षित गोष्टींची आणि परिस्थिती स्वीकारण्याची चांगलीच सवय झाली होती. त्यामुळे दुसऱ्या वर्षात नीट अभ्यास करण्याचे मी ठरवले होते. तुझ्या निकालाची मी वाट बघत होतो. कुठेतरी मनात सुक्ष्म आशा होती की तुही इंजिनिअरिंगला आणि कदाचित माझ्याच कॉलेजला प्रवेश घेशील. तुझा शैक्षणिक कल जराही माहीत नसताना मी माझ्या कल्पना रंगवल्या होत्या.
निकालाचा दिवस आला. मी तुझ्या कॉलेजला गेलो. तिथे नोटीस बोर्ड वर निकाल चिटकवलेला होता. तुझा निकाल बघून मी अक्षरशः विचारात पडलो. भयंकर संतापलो. एवढे कमी मार्क! काही कळेनासे झाले. तू तर अभ्यासात चांगली होतीस मग निकाल का एवढा वाईट? याला मी तर जबाबदार नाही? तुझ्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केले होते. तुझ्याशी बोलणे टाळले होते. तरी देखील हे असे व्हावे? निदान आपण कॉलेज ला तरी एकत्र असू या आशेवर तुझ्या निकालाने एका झटक्यात पाणी फिरवलं गं. खरं सांगतो मीरा कधी नव्हे तो मला त्या दिवशी तुझा भयंकर राग आला. तू मला खूप निराश केलेस.
आपल्यात काहीतरी सवांद व्हावा, आपली भेट व्हावी या उद्देशाने मी काही दिवसांनी निशाला तुझ्या घरी कॉल करायला सांगितला. एखादे वेळी तू कॉल घेतला नाहीस तर जे कॉल घेतील त्यांच्या कडून तुझी जास्तीत जास्त माहिती मिळविण्याचा प्रयत्न कर असेही सांगितले. आणि तू कॉल घेतला तर काही बाही सांगून तुझ्याशी बोलायचे असे निशाने ठरवले. आणि तिने तुला तसा कॉल केला.. तुझ्या आईने कॉल घेतला.
निशा म्हणाली "काकू मी निशा, मिराची मैत्रीण" ती आहे का घरी?
काकू म्हणाल्या,"बेटा ती तर अमरावतीला असते. तिची तिथे ऍडमिशन झालीय. तुझा काही निरोप होता का?"
यावर निशा काय बोलणार? "ठीक आहे काकू मी नंतर कॉल करेल" असे म्हणून तिने फोन ठेवला. पून्हा एकदा पदरी निराशाच आली. तुझ्या माझ्यातलं अंतर दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं. लहानपणापासून तुझ्यावर असलेलं प्रेम मिळवणं बहुदा माझ्या नाशीबातच नव्हते. सर्वकाही ठीक व्हावे, व्यवस्थित व्हावे म्हणून केलेले हर प्रयत्न निष्फळ ठरत होते. बुद्धी सांगत होती तुला विसर पण मन मानत नव्हते. फार अवघड होते माझ्यासाठी. मी जाणीवपूर्वक अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आणि तसे केलेही.....
-----------------------------

राघव,
तुझी मेल बघून मी अनुत्तरित होते...
तुझी इंजिनिअरिंगला ऍडमिशन झालीय हे मला मी फर्स्ट इअरला असताना कळले.
तू माझा इतका विचार करून देखील मी अपेक्षित निकाल नाही देऊ शकले. आठवी, नववीत उत्तम मार्क मिळवणारी मी दहावी बारावीत काहीच कसे करू शकले नाही हे मलाही न सुटणारे कोडंच आहे. आयुष्याच्या निर्णायक वळणावर मी सपशेल घसरले. यासाठी तू अजिबात जबाबदार नाहीस. माहीत नाही का? पण मन लावून अभ्यास करणे जमलेच नाही. बुद्धी होती पण त्याचा योग्य वापर करताच आला नाही. असं वाटलं संपल सगळं. मी अमरावतीला बीएससी ला ऍडमिशन घेतली. मुलींच्या कोट्यातून शेवटची ऍडमिशन माझी होती. अतिशय लाजिरवाणा प्रसंग होता. पण निभावणे तर होतेच. तू किती निरागस आशा ठेवलीस की कदाचित माझी तुझ्या कॉलेजला ऍडमिशन होईल! मी या सगळ्यावर पाणी फेरलं...मी नेहमीच तुला निराश केले.
तुझ्या आणि निशाच्या मैत्रीतला विश्वास खूप भावला. कुणाजवळ मन मोकळं करताना हा विश्वास असणे फार महत्वाचे. या बाबतीत लकी होतास तू.
आईने ने मला हॉस्टेलला फोन करून सांगितले होते निशा नावाच्या मैत्रिणीचा कॉल येऊन गेला ते. मी तिलाच बोलले "कोण निशा?" माझ्या प्रत्येक मैत्रिणीची इत्यंभूत माहिती आई कडे असे त्यामुळे तिलाही नवल वाटलं पण तिने आठवणीने मला निरोप दिला होता. मला काही संदर्भच लागेना. आईने नक्की चुकीचे नाव ऐकले असावे म्हणून मी विषय सोडून दिला. ही तुझी मैत्रीण असू शकते हे माझ्या लक्षातच आले नाही. मी तशी 'ढ' च होते म्हणा.....
----------------------------
मीरा,
काहीही काय गं बोलतेस?
इंजिनीरिंग चे दुसरे वर्ष सुरू झाले होते. आता आम्ही सिनिअर्स होतो. त्यामुळे जुनीअर्सची रॅगिंग वगरे घेण्याची मुभा होती. (जस्ट गंमत म्हणून घ्यायचो गं, फार कुणाला कधी त्रास दिला नाही) आणि हे सगळं कॉलेज च्या बाहेर. कुणी प्रवासात, इतर ठिकाणी भेटले तर. एकदा अशीच एक संधी आम्हाला मिळाली. सिनिअर्स पुढे सगळे जुनीअर्स अगदी चिडीचूप होते पण त्यांच्यातील एका मुलाच्या तोंडात हसू मावत नव्हते. पठ्य्या फारच बिनधास्त होता. हसरा होता. त्याने प्रथे प्रमाणे स्वपरीचय देण्यास सुरुवात केली. "मी आशिष देशपांडे" म्हणत तो बोलू लागला. आता वेळ होती त्याचे छंद जाणून घेण्याची. इथे फार मज्जा यायची. या विषयावर मस्त खेचता येत होते. आशिष ला काय तर हात बघण्याचा छंद होता. मला विशेष वाटलं. मी विचारले, "आशिष तुला हातावरच्या रेषा बघून एखाद्याचा भूतकाळ किंवा भविष्यकाळ सांगता येतो?"
"हो सर" तो फार आत्मविश्वासाने बोलला. माझा हात उत्सुकतेने पुढे करत मी बोललो,"बघ बरं माझा हात आणि सांग माझ्या भूतकाळात काय घडून गेलंय आणि पुढे काय होणार आहे". त्या वयात आपण फार फार तर काय विचारतो? प्रेम प्रकरण हाच महत्वाचा विषय.
"तुमचं एकीवर खूप प्रेम होतं पण त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही" माझा हात बघत आशिष म्हणाला.
बापरे! मला खूप आश्चर्य वाटलं. परंतु याने असाच तुक्का मारला असेल तर? म्हणून "त्या मुलीबद्दल आणखी काही सांगू शकतोस?" मी पुन्हा त्याला विचारले.
"ती शाळेत तुम्हाला एक वर्ष ज्युनिअर होती" तो ठामपणे बोलला. आता हद्द झाली. कुणी इतकं अंदाजे नाही बोलणार.
सर, "मी खूप अभ्यास केलाय आणि माझे तर्क सहसा चुकत नाहीत" त्याने सांगितले. तो असेही म्हणाला "तुमचं दुसरं अफेअर टिकेल पण या पहिल्या प्रेमाला काहीही भविष्य नाही".
पचवणे जड असले तरी सत्य नाकारून चालणार नव्हते. एवढे प्रयत्न करून देखील तुझा म्हणावा तसा प्रतिसाद नव्हताच.
मी आशिषचे मनापासून आभार मानले आणि पून्हा कधीही त्याची रॅगिंग घेतली नाही.
सगळ्या विषयात उत्तीर्ण होत दुसरे वर्षही संपले. त्यासोबतच निशा सोबतची माझी मैत्री अधिक घट्ट होऊ लागली होती. अनेक विषयांवर आमचे एकमत होत असे. दरम्यान दिनेश जो माझा जिवलग मित्रच नाही तर रूममेट देखील होता तो निशाच्या प्रेमात पडला. ते दोघेही चांगले मित्र तर होतेच शिवाय दोघांचे घराणेही मिळते जुळते होते. त्यांच्या प्रेमाला उज्वल भविष्य होतं. मला वाटत नसली तरी निशा सुंदर होती त्यामुळे तिच्यामागे कॉलेजची बरीच मंडळी होती. पण मला दिनेश आणि निशाची जोडी अजिबात आवडली नव्हती. अर्थात माझ्या वाटण्याला काहीच अर्थ नव्हता. कारण राजा राणीचं छान मेतकूट जमलं होतं. मी आणि निशा एकमेकांना मनातलं सगळं सांगायचो. तिला फार वाटायचे माझी तुझी पुन्हा भेट व्हावी, आपल्यात संवाद घडावा. माझे तिसरे आणि तुझे दुसरे वर्ष सुरू झाले होते. एके दिवशी तू मला धर्मपेठेत दिसली. तू गुलाबाची फुलं घेत होतीस. ते गुलाब बघून मला कससच झालं. कुणासाठी असतील हे गुलाब? मी विचारात पडलो. किती दिवसांनी दिसली होतीस तू! त्यामुळे तुला बघण्याची ही संधी तर सोडायची नव्हतीच. एकतर आधीच तू अमरावतीला शिकतेय असे कळले होते. मी तुझ्या मागे मागे आलो. बुद्धी सांगत होती "रस्त्यात पुन्हा काही गडबड करू नकोस राघव" परंतु हे मन? ते कशालाच जुमानत नव्हते. मी तुला थांबवलच. मी काही बोलणार त्या आधीच तू इतकी चिडलीस... थोड्या अंतरावर असलेली तुझी मैत्रीण तुझ्याकडे आश्चर्याने एकटक बघत होती. कोण कुठला मुलगा तुला रस्त्यात थांववतोय, तू त्याच्यावर चिडतेय तिला काहीच समजत नव्हते. तुझा रुद्रावतार बरंच काही सांगून गेला. बुद्धीचे न ऐकून मी फार मोठी चूक केली होती. तुझ्या सहनशक्तीचा मी अंत पहिला होता आणि परिणाम माझ्या समोर होता. हे सगळं तुझ्या मैत्रिणी समोर झाल्यामुळे मला खूप संकोच वाटला. ती तुझ्याबद्दल आणि माझ्याबद्दलही काय विचार करेल या विचाराने मी खजील झालो. सगळा प्रकार माझे डोळे लख्ख उघडण्यासाठी पुरेसा होता. त्या क्षणी ठरवलं मृगजळा मागे पळणं बास झालं. "मीरा" हा विषय बंद! कायमचा. मी तडक निशा कडे गेलो. झाला प्रकार तिला सांगितला. "तुला काय गरज होती रे शहाणपणा करायची? नेहमी रस्त्यात काय असे उद्योग करतोस तू?" ती दुपटीने माझ्यावर चिडली. मी ही वैतागलो. "मी बोलेन मिराशी" निशा आस्थेने म्हणाली.
मी जरा विचार करून म्हणालो, "झाल्या प्रकाराची माफी मागून राघव असे पुन्हा करणार नाही. सांग मिराला" निशाने लगेच तुमच्या लँडलाईन वर कॉल केला. तू घरी नव्हती आणि कॉल काकूंनी म्हणजे तुझ्या आईने घेतला. "काकू प्लिज मिराला सांगाल निशाचा कॉल येऊन गेला", निरोप सांगून निशाने फोन ठेवला.
मी ही घरी जायला निघालो. खूप निश्चयाने! स्वतःच्या मनाला अगदी निक्षून सांगितले, "मीरा हा विषय बंद म्हणजे बंद" माझ्या वेड्या प्रेमासाठी कुणाला असे त्रास देणे चुकीचेच होते. आज दिनेशचा डायलॉग आठवला, "चंद्र आवडला म्हणून त्याला अंगणात आणता येत नाही" खरेच होते.......
दुसऱ्या दिवशी आमचा लँडलाईन खणखणला... पलीकडून तू बोलत होतीस.
"हॅलो, मीरा बोलतेय" हे ऐकताच मी रागाने फोन ठेवला. मी खरंच चिडलो होतो. शिवाय सगळं संपवलं देखील होतं. मग "पुन्हा कशासाठी हा संवाद?" मी स्वतःशीच पुटपुटलो. तू पुन्हा कॉल केलास आणि "फोन ठेऊ नकोस" मला बजावून सांगितले.
"मला काहीच वाटतं नसेल का रे राघव, भावना काय तुला एकट्यालाच आहेत?" तू बोलत होतीस.
त्यावर मी "सॉरी" एवढेच बोललो.
तू जे काही बोलत होतीस ते ऐकण्यात मला अजिबात रस नव्हता तरीही काही न बोलता मी ऐकत होतो.
"मी कधीच एवढे चिडत नाही. पण काल तुझ्याशी फारच रागावून बोलले. सॉरी राघव" हे बोलताना तुझा स्वर कमालीचा खालावला होता. भावूक झाली होतीस तू. एक दीर्घ श्वास घेऊन तू म्हणालीस, "मला हे शक्य नाहीये राघव. यापुढे प्लिज मला फोन करू नकोस आणि निशाला देखील करायला सांगू नकोस" अगदी तसंच काही वाटलं तर मी स्वतःहून तुला कॉल करेल असे म्हणून तू कॉल ठेवलास. इतका वेळ फोनवर पहिल्यांदा बोललो आपण. तुझ्या या अश्या बोलण्याने मनात काहूर उठलं माझ्या. तुझ्या भावुक होण्याचा काय अर्थ काढायचा होता मी? तुझा कालचा रुद्रावतार आणि आजचे हे असे हळुवारपणे वागणे यांत प्रचंड विरोधाभास होता. मी निशाला हे सगळं सांगितलं. "तुम्ही दोघे एकदा समोरासोमोर बसून बोला बरं, नीट ठरवा तुम्हाला काय हवंय नक्की. एकदाचा काय तो निर्णय घ्या" निशाने मला सल्ला दिला. अजिबात कॉल करायचा नाही अशी तू  ताकीद दिली होती आणि मला पुन्हा तुझे बोलणे खायचे नव्हते. पण मला तुझ्या कडून स्पष्ट "हो" किंवा "नाही" हे उत्तर हवं होतं. इतक्या वर्षांचा भावनिक गुंता सोडवणं अवघड होतं गं. काही दिवसांनी पुन्हा कॉल केलाच तुला. तुझी मैत्रीण स्मिता हिने कॉल उचलला. मी बोललो, "राघव बोलतोय, मीरा आहे का?"
"तू माझ्याशी बोलू शकतोस, मला ठाऊक आहे सगळे. आणि प्लिज विसरून जा रे तिला". स्मिता बोलली.
"आम्ही मागे बोललो तेव्हा मिराच्या बोलण्यातून मला जाणवले की तिला ही माझ्या बद्दल नक्की काही वाटतंय.
"ती असेच काही बोलली असेल, विसर सगळं" स्मिताचं हे बोलणं डोक्यात गेलं माझ्या. "तुमच्यासाठी हा गंमतीचा विषय असेल माझ्यासाठी नाही" मी संतापून फोन ठेवला.
तू लगेच कॉल बॅक केला.
"राघव, एकदा भेटून सविस्तर बोलूया आपण" तू सुचवले.
"चालेल. आपण निशा कडे भेटूया" मी बोललो आणि फोन ठेवला.
माझ्या कडून मी सगळं थांबवलं होतंच पण मनात कुठलाही संभ्रम न ठेवता योग्य पद्धतीने निरोप घ्यावा एवढेच मनात होते.
--------------------------------
राघव,

आगाऊ मुला. चक्क रॅगिंग वगरे हं? किती मुलींना छळलंस? माहिती आहे मला तू तसा नाहीयेस. पण मला हा प्रसंग खूप हसवून गेला. आशिष देशपांडे ने तुला चांगलेच घोळात घेतले बरका. त्याने तुक्काचं मारला. तो तुझ्या वर्मी बसला. किती रे भोळा तू? निशा आणि दिनेश ची जोडी बघून तुम्ही सगळेच मित्र फार प्रेमळ होतात असे दिसतंय..
त्या दिवशी मी तुला धर्मपेठेत दिसले आणि तुझ्यावर बरसले कारण तुझ्याबद्दल केवळ स्मिताला माहिती होते आणि त्या क्षणी माझ्यासोबत माझी दुसरी मैत्रीण होती. कसं असतं ना राघव त्या वयात मनात प्रचंड भीती असते आपल्या विषयी उगाच काही गोष्टी पसरू नये..शिवाय एखादी व्यक्ती आपल्या मनात असली की आपलं वागणं आपसूक बदलतं. आपल्याला वाटतं आपण खूप सहज वागतोय पण इतरांना ते बरोबर जाणवतं. त्यामुळे माझ्या वागण्यातून असे काही जाणवू नये या प्रयत्नात मी नेहमी असायची. परंतू मी असे एवढे चिडायला नको होते. खरंतर मी नाही चिडत अशी पण त्या दिवशी ताबा सुटलाच.....
आम्ही आमच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेलो होतो. ती गुलाबाची फुलं तिच्याचसाठी होती. नाहीतर माझ्या आयुषयात गुलाब वगरे द्यावी अशी खास व्यक्ती कुणीही नव्हती रे.
घरी आल्यावर आईने निरोप दिला निशा चा कॉल येऊन गेला. या वेळी मात्र मला शंका आलीच की ही निशा तुझी कुणीतरी असावी. आई लगेच म्हणाली ,"अगं बोलून घे ना तिच्याशी. काय काम असेल कोण जाणे" "आई, आता किती उशीर झालाय. बोलते नंतर" मी कसं तरी टाळलं. पण आपली आई अत्यंत हुशार असते, ती लगेच म्हणाली, "मागे जिचा कॉल आलेला ती हीच का गं?"
घ्या, माझं तोंड इतकं बघण्यासारखं झालं होतं. त्या "हो" म्हणण्यात काहीही दम नव्हता. मी पण ठरवले की तुला एकदा सांगावे, पुन्हा नको रे मला कॉल करू. मला ही अशी लपवा छापवी, सतत माझ्या भावना संयत ठेवणे कठीण जात होते. त्यामुळे तुला कॉल करायचा ठरवला आणि संधी बघून केलाही. माहिती नाही बोलताना कशी काय हळवी झाले मी. कधी कधी भावना अनावर होतात आणि संयम सुटतो. पण मला वाटलं होतं त्यानंतर थांबेल सगळं. कारण तुझा चिडका स्वर बरोबर पोहोचला होता माझ्या पर्यंत. पण काही दिवसांनी पुन्हा कॉल आलाच. राघव, स्मिता तुझ्याशी बोललेली नाही रे आठवत मला. तुझं माझं बोलणं मला आठवतंय. पण स्मिता? संदर्भ नाही लागला. असो 'जमाना बीत गया' नाही?
---------------------------------

मीरा,
आपले निशा कडे भेटायचे ठरले होते. आपण असे पहिल्यांदा भेटणार होतो. तुला कधीही एका मिनिटापेक्षा जास्त मी बघितले नव्हते(रस्त्यात अजून किती बघायला मिळणार म्हणा) त्यामुळे हे असे भेटण्याचा काहीच अनुभव नव्हता.
मी बाबांशी खोटं बोललो, "बाबा मला उद्या सकाळी मित्राकडे सत्यनारायणाच्या पूजेला जायचे आहे" अचानकपणे सत्यनारायणाच्या पूजेला मी दिलेले महत्व बाबांना गोंधळात टाकणारे होते. त्यांना जरा संशय आलाच. हे कारण अगदी खरं वाटावं म्हणून मी त्यांना सांगितले, "निशा पण येणार आहे सोबत, मी सकाळी तिला घ्यायला जाणार आहे".
सकाळी माझे आवरले आणि मी सायकला पायडल मारणार तेवढ्यात बाबा म्हणाले, "तू निशाला सायकलने नेणार आहेस का मित्राकडे?".
अ...रे देवा! मी चांगलाच फसलो.
मी म्हणालो, "अहो बाबा सायकल फक्त निशाच्या घरापर्यंत नेणार आहे. पुढे तिच्या गाडीने जाणार आहोत आम्ही".
"बरं ठीक आहे" म्हणत बाबांनी सोडले एकदाचे.
हुश्श! सुटलो रे बाबा म्हणत मी ही लगेच पळ काढला.
या 'महत्वपूर्ण भेटीचे' स्वागत करण्यासाठी निशा अतिशय उत्सुक होती. इतक्या दिवसांपासून चर्चेत असलेली 'मीरा' आज तिला प्रत्यक्षात दिसणार होती आणि तेही तिच्याच घरी. तू पहिल्यांदा येणार म्हणून तिला काय करू नी काय नाही असे झाले होते. सकाळचे 9:10 मिनिटे झाली होती. तू अगदी वेळेत पोहोचलीस. बहुदा ऑटोने आली होतीस. मी तर तुझ्या वाटे कडे डोळे लावून बसलो होतो. डार्क पिवळा पंजाबी ड्रेस घातलेली नेहमी सारखीच साधी मीरा माझ्या नजरेस पडली.
"थ्यांक्यु मीरा, तू आलीस" मी मनापासून बोललो.
"ये गं मीरा" म्हणत निशाने उत्साहात तुझं स्वागत केलं आणि आपल्याला नीट बोलता यावे म्हणून लगेच आत निघून देखील गेली.
आईला खोटं कारण सांगून निशा कडे येणे तुला किती अवघड गेले हे तू सांगितले परंतु तू काहीश्या निश्चयानेच तेथे आली होतीस.
मला सुध्दा फार ताणून धरायचे नव्हते. काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लावायचाच होता. मी बोलायला सुरुवात केली. मीरा, "जसे प्रत्येक व्याख्येच्या शेवटी ती नीट समजण्यासाठी एक उदाहरण असते अगदी तसेच मला प्रेमाची परिभाषा कळायला लागली तेव्हा पासून त्याचे उदाहरण फक्त आणि फक्त "तू" आहेस. माझ्यासाठी "प्रेम म्हणजे मीरा" हेच समीकरण आहे. सातवीत असताना तुला पहिल्यांदा बघितले तेव्हा पासून माझ्या याच भावना आहेत. माझ्या या उत्कट, निस्सीम प्रेमळ भावना बघून तू अवाक झालीस. तरीही त्यातून स्वतःला अलिप्त ठेवत तू निग्रहाने बोललीस,"राघव, माझ्या घरात मी मोठी आहे. मला लहान भावंड आहेत. माझ्या आई बाबांना साहजिकच माझ्याकडून काही अपेक्षा आहेत. मला असं कुठलंही पाऊल टाकायचं नाही ज्यामुळे त्यांना त्रास होईल. हे प्रेम वगरे माझ्या आवाक्या बाहेर आहे. माझ्या लहान भावंडांपुढे मला चुकीचा आदर्श ठेवायचा नाहीये रे. आणि तुला सुद्धा लहान भाऊ आहे. त्याचा ही तू विचार करायला हवा ना? या सगळ्या गोष्टी नकोत राघव"
विचारांमध्ये सुस्पष्टता असणारे लोकं मला आधीपासून आवडतात आणि तू तशीच होतीस. तुझा युक्तिवाद खोडून काढणे मला नाही जमले आणि तुझ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देखील माझ्याकडे नव्हते. आपल्या या पहिल्या वहिल्या भेटीत अश्या प्रकारच्या प्रश्नांना सामोरे जाण्याची माझी तयारीच नव्हती..
तुझे विचार आणि माझ्या भावना यात फार फार तफावत होती. आपली वैचारिक बैठक वेगळी होती. मला जाणवले, तुला कधीच माझ्या प्रति तितक्या तीव्र भावना नव्हत्या. मग तुझ्याकडून मी कोणतीही सकारात्मक अपेक्षा करणे चुकीचे होते. माझ्या भावना मी तुझ्यावर लादू शकत नव्हतो. या भेटीचे एकमेव कारण तू आधीच स्पष्ट केले होते. तुला तुझं मत सांगून या प्रकरणाला पूर्णविराम द्यायचा होता. तू इतक्या उत्तम रीतीने हे सगळं हाताळले की तुझ्या मतांचा, भावनांचा आदर करत या संपूर्ण कहाणीला कायमचा पूर्णविराम देण्यास तू मला भाग पाडले.
आपल्याला बोलता यावे म्हणून आत गेलेली निशा बाहेर आली. आपण तिघेही उगाच अवांतर गप्पा केल्या. तिने तुला "पोहे करू का?" आपुलकीने विचारले. तू नाही म्हणाली. शेंगदाण्याचा लाडू दिला. पण तुला शेंगदाणे चालत नाही म्हणून तू ते सुद्धा नाकारलेस. तुझ्याशी आणखी काही बोलायला आमच्या कडे शब्दच नव्हते. तू थोडक्यात पण स्पष्टपणे तुझा नकार कळवळा होतास. इतक्या वर्षापासून तुला जे मी ओळखत होतो त्यावरून असे होण्याची शक्यता अपेक्षित होतीच. खूप वाईट वाटलं होतं गं मीरा. पण निदान आता थांबलच पाहिजे हा निष्कर्ष तरी निघाला होता. सगळं क्लिअर झालं होतं.... मनाला कुठली वेडी आशा राहणार नव्हती.....
मला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन तू गेलीस ती कायमचीच.
निशा साठी हा फार मोठा धक्का होता. तिला आपल्या नात्या कडून खूप आशा, अपेक्षा होत्या. मी मात्र शांत होतो. आठ वर्षापासूनचा मनातील गोंधळ, खळबळ, द्वंद्व जणू शमले होते. आणि तेही योग्य पद्धतीने. तुझा आणि तुझ्या तत्वांचा मनात प्रचंड आदर घेऊन मी देखील निघालो. तुझे मन वळेल असे कितीतरी प्रसंग आलेत तरी तू तुझ्या मतांवर, तत्वांवर ठाम होतीस. फार अभिमान वाटला तुझा मीरा.
त्या क्षणाला मी निर्धार केला आता मागे वळून बघायचे नाही......
त्या दिवशी नंतर आपण आत्ता बोलतोय, तब्बल २० वर्षानंतर!! वाटतच नाहीये इतका काळ निघून गेला म्हणून, असे वाटते की कालचीच गोष्ट आहे.. इतके वर्ष जे काही मनात कुठे तरी खोल खोल पुरवून ठेवले होते ते सगळे स्वछपणे तुला सांगितले. इतके सगळे संयमाने ऐकून घेतल्या बद्दल फार धन्यवाद. प्रेमाची "ती" मनातील एकमेव जागा आपण आपल्या जोडीदाराला केव्हाच देऊन टाकली आहे पण आता मोकळ्या मनाने एका निर्मळ नात्याला सुरवात करूया.  फ्रेंड्स फॉरेव्हर..
----------------------------
राघव,
काय बोलू? कुठून सुरवात करू? खरंच कळत नाहीये. ती भेट माझ्याही कायम स्मरणात राहिली आणि पुढेही राहील. इथेच आपल्यातील संवाद कायमचा हरवला होता.
मी स्वतःला भाग्यवान समजते की माझ्यावर कुणी इतकं निखळ प्रेम केलं. तु जेवढा माझा आदर केलास तेवढाच किंबहुना त्याही पेक्षा जास्त आदर मला तुझा वाटतो आणि कायम वाटत राहील. आपल्याला काय वाटतं त्यापेक्षा दुसऱ्याला काय वाटतं या भावना जाणून घेण्यासाठी मोठं मन लागतं. त्या मोठ्या मनाचा तू आहेस. तू संस्कारी होता, समजूतदार होतास म्हणून मला समजून घेतलेस अन्यथा दुसरा कुणी असता तर कदाचित त्रास झाला असता. जेव्हा पासून मला तुझ्याबद्दल विशेष वाटायला लागलं तेव्हापासून तू दिसला की मी घाबरायचे. कारण माझंही तुझ्यावर मनापासून प्रेम आहे हे नव्हतंच कळू द्यायचं तुला. खरं म्हणजे प्रेम ही अतिशय नैसर्गिक भावना आहे. कुणालाही कुणावरही केव्हाही प्रेम होऊ शकतं. हे सगळं तेव्हाही समजत होतं पण आपल्याला यात पडायचेच नाही असा माझा ठाम निश्चय होता. निशाने तुला छान साथ दिली. त्या दिवशी मी तिच्याशी फार बोललेच नाही. मलाही सुचत नव्हते. जे काही ठरवून आले होते ते फक्त बोलली. तिचे खरंच कौतुक आणि आभारही.....
मी किती गोष्टिंपासून अनभिज्ञ होते राघव. तब्बल वीस वर्षानंतर अचानकपणे फेसबुक वर आपण पुन्हा भेटलो आणि संवाद घडत गेला. सारे काही उलगडले. नियतीच्या मनात नव्हतेच आपले एकत्र येणे. पण एक गोष्ट नक्की ती म्हणजे आपल्यावर खूप चांगले संस्कार झाले होते, आणि आपले मनस्वास्थ्य देखील फार उत्तम जपल्या गेले होते त्यामुळेच तुझा कधी देवदास झाला नाही किंवा मला नैराश्य आले नाही. आपल्याला परिस्थिती स्वीकारता आली.
कधी स्पर्श नाही, खुप सहवास नाही, सवांद अल्पसा. तरीही आपण "त्या" मृदू भावना जपल्या मनाच्या एका कोपऱ्यात हळुवारपणे. अर्धवट राहिलेल्या कहाणीचा क्लेश नाही केला. तरल आठवणी जपत आपापला प्रपंच सांभाळला, निभावला. 
कोण म्हणतं प्रेम आंधळं असतं? मी म्हणेन प्रेमाला दूरदृष्टी असते.....नाही का?
या दीर्घ शाब्दिक संवादाने मन अगदी हलकं झालं. आता खरंच करूया रुजवात नव्या नात्याची. मैत्रीच्या नात्याची.......आणि निभाऊया आयुष्यभर. 
थ्यांक्यु फॉर रिकनेकटिंग राघव!



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance