वर्तुळ
वर्तुळ
"कार्तिक, आराध्य या बसा"
तन्वीने दोघांनाही बसायला सांगितले आणि आईला हाक मारली.
"आई..., आ..ई..."
"अगं आले ना.. " लॅपटॉप वर काम करत असलेली तन्वीची आई नेहा, हॉल कडे येत म्हणाली.
"आई हा कार्तिक. रत्नागिरीला असतो. ओळख करून देत तन्वी म्हणाली.
"नमस्कार काकू" कार्तिक अदबीने म्हणाला.
"नमस्कार बेटा" नेहा ने हसून स्वागत केले.
"आणि आराध्यला तू ओळखतेसच"
त्याच्याकडे बोट दाखवीत तन्वी म्हणाली.
"तो तर घरचाच आहे"
आईने असे म्हणताच कार्तिक सोडून सगळे दिलखुलास हसले.
"कसा आहेस आराध्य? बरेच दिवसांनी आलास. बाबांना सांग तुझ्या मी आठवण केली म्हणून. इतक्यात काही कॉल नाही मेसेज नाही. आई करते अधून मधून मेसेज. पण अभिजित फारच बिझी झालाय वाटतं".
"सांगतो. नक्की सांगतो, मावशी फार चिडली आहे असेच सांगतो" सोफ्यावर बसत आराध्य म्हणाला.
"ओह यांना मावशी....म्हणतो हा" कार्तिक मनातल्या मनात म्हणाला. बरं झालं मावशी म्हणतो ते. म्हणजे हा तन्वी चा भाऊ झाला" हा विचार त्याला गोड हसवून गेला.
"बरं आई मी आणि आराध्यने कार्तिक ला जेवायला आणले आहे. तो कंटाळलाय मेस चे जेवण करून. म्हणून म्हटले या अन्नपूर्णे कडे चल. आता काहीतरी खास बेत कर हं"
"छान झाले, तुम्ही बसा मी थोड्याच वेळात वाढते.." नेहा किचन कडे जाते आणि तन्वी ला आत बोलावते.
"तनु, हात धुवून घे आणि तोवर हे दे त्यांना. तू ही घे. भूक लागली असेल. मी स्वैपाकाचे बघते" नेहाने स्टीलचा डबा तन्वी च्या हातात देत म्हटले. तन्वीने त्यातले लाडू काचेच्या बोल मध्ये काढले आणि कार्तिक, आराध्यला दिलेत. आराध्यने ने लगेच घेतले कारण त्याला फार आवडायचे लाडू. पण कार्तिक म्हणाला, "सॉरी तन्वी, हे शेंगदाण्याचे लाडू आहेत ना?"
"हो"
"अग मला शेंगदाण्याची एलर्जी आहे, मला त्रास होतो"
"अरे, याची कुणाला ऍलर्जी असते का? लाजू बिजू नको बाबा..."
"तन्वी, खरंच मला नाही चालत"
"अच्छा ठीक आहे. मी दुसरं काही तरी आणते"
नेहाने वरण भाताचा कुकर लावला, दुपारी केलेली बटाटा भाजी होतीच. फ्रीज मध्ये श्रीखंडही होतं. मस्त पुऱ्या कराव्यात म्हणून ती कणिकच मळत होती तर कार्तिक तन्वीचा हा संवाद तिच्या कानी पडला. तेवढ्यात तनु देखील किचन मध्ये आली.
"आई, अगं कार्तिकला हा लाडू नाही चालत"
"हो ऐकलंय मी. त्या डब्यातला चिवडा दे त्याला" ट्रॉलीतल्या डब्याकडे बोट दाखवीत ती म्हणाली. तन्वी हॉल मध्ये चिवडा घेऊन गेली आणि नेहाचं मन अलगद भूतकाळात गेलं.
"तीही अशीच अचानक घरी आली होती. कॉलेज मध्ये सोबत होतो. पण घरी कधीच आली नव्हती. त्याही दिवशी अभिजित म्हणाला म्हणून मुद्दाम आली. खूप आवडायचा तिला तो. पण कधीच बोलली नाही त्याला. त्याला मात्र गंधही नव्हता तिच्या अबोल प्रीतीचा. मैत्रीण म्हणून मात्र फार जमायचं तिच्याशी. माझा तर बालमित्रच. किती छान ग्रुप होता कॉलेजचा! गुलाबी दिवस ते! मी आणि अभिजित कायम सोबत आहोत पण रश्मी? कॉलेज संपताच लग्न झाले आणि नाहीशीच झाली एकदम. कुणाशी काहीच संपर्क नाही. तिच्या लग्नात मात्र धमाल केली सगळ्यांनी. ग्रुप मधील पहिले लग्न! खूप एन्जॉय केले होते. त्यानंतर इकडे तिकडे विखुरले सगळे....
तिला देखील मी असाच शेंगदाण्याचा लाडू दिला होता तेव्हा तीही म्हणाली होती, "मला ऍलर्जी आहे"
"सगळे लाडू अभिजीतनेच फस्त केले होते.
आज कार्तिक च्या निमित्ताने आठवणी जाग्या झाल्या" मनातल्या मनात बोलत नेहा स्वतःशीच हसली.
कांदा काकडीची कोशिंबीर करून नेहाने पुऱ्या तळायला घेतल्यात आणि तन्वीने पानं वाढली.
"आई, एकदा बघून घे सगळं नीट वाढलंय ना? पुऱ्यांची जागा तेवढी सोडली".
"अ... हो हो व्यवस्थित वाढलंस. तू पानं डायनिंगवर लाव
मी पुऱ्या घेऊन आलेच" नेहा पुऱ्या तळतातळता बोलली.
"चला या, फ्रेश व्हा. जेवण रेडी आहे. तन्वी ने वॉशबेसिन दाखवत दोघांनाही बोलावले आणि स्वतः डायनिंगवर येऊन बसली.
"सावकाश होऊ देत हं" नेहा पुऱ्या वाढताना म्हणाली.
"वाह लाजवाब मावशी! सगळा कसा आवडीचा बेत केलाय" आराध्य श्रीखंडाचा घास घेत बोलला.
"काकू अहो किती केलंय तुम्ही? मला तर घरीच जेवतोय असे वाटतंय" कार्तिक मनापासून बोलला.
"आई, आम्ही घेतो लागेल ते. तू बैस आता"
"बरं मी इथेच आहे. सांगा काही लागलं तर" नेहा हॉल मध्ये सोफ्यावर पेपर चाळत बसली.
"काकू मस्त झालाय स्वैपाक" कार्तिक नेहकडे बघत बोलला.
"ओह, थ्यांक्यु बेटा"
"मावशी सुगरण आहे आमची!" आराध्य ने त्याला दुजोरा दिला.
गप्पा गोष्टी,चेष्टा मस्करी करत मुलांची जेवणं झाली. तन्वीने भांडी आत नेऊन ठेवली आणि पुन्हा सगळ्यांच्या गप्पा रंगल्या.
"बरं मावशी निघू का आता?, आई वाट बघत असेल"
"अरे आईला सांगितले नव्हते का तू आराध्य?"
"सांगितले होते गं, पण बराच वेळ झालाय. उगाच काळजी करत बसते गं ती".
"ओय, कार्तिक, तुझी काही इच्छा दिसत नाहीये जाण्याची" मिश्कीलपणे आराध्य म्हणाला.
"काहीही काय? हे काय उठलोच मी पण" टी टेबल वरचा मोबाईल उचलत कार्तिक म्हणाला. तेवढ्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली......व्हिडीओ कॉल होता.
"हा बोल आई"
"तू रूमवर नाहीयेस वाटतं, नंतर करू का रे ?"
"अग मी माझ्या मैत्रिणीकडे आलो होतो जेवायला. निघतच होतो आता. खूप छान जेवण झालं आज, एकदम घरचा फील आला" कार्तिक जरा बाजूला जाऊन बोलला.
"अरे वाह!, असा हसरा चेहरा बघितला की बरं वाटतं रे"
"बाबा आले नाहीत का अजून"
"आलेत पण जरा बाहेर गेले आहेत"
"अच्छा. बरं आई, ही तन्वी. हिच्याच कडे आलोय मी". तन्वीच्या दिशेने मोबाईल धरत कार्तिक बोलला.
"हॅलो बेटा, सुट्यांमध्ये सगळे मित्र या रत्नागिरीला"
"हो नक्की काकू, आमचा फर्स्ट इअरचा रिझल्ट लागला की गणपतीपुळे ठरलंय आमचं" तन्वी कार्तिककडे बघत म्हणाली.
"आणि आई, 'ही' तन्वीची आई" नेहाकडे मोबाईल वळवत तो म्हणाला.
"नम....स..रश्मी? रश्मी देशमुख?"
"नेहा.....तू?"
"माय गॉड! व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज! रश्मी तू अजूनही तशीच दिसतेय गं"
" काय योगायोग आहे आहे हा नेहा! फार गोड आहे तुझी मुलगी आणि नावही सुंदर आहे. तन्वी"
यांचं अति उत्साही बोलणं पाहून तिघेही मुलं गोंधळली होती.
"ए रश्मी थांब, थांब, एक गंमत दाखवते तुला" आराध्यकडे मोबाईल नेत नेहा अगदी उत्साहाने म्हणाली"
"हा आराध्य, गेस कुणाचा मुलगा असेल हा?
"कोणाचा?" तिने आतुरतेने विचारले.
"अग, अभिजित चा मुलगा आहे हा. अभि आठवतो ना?" तिने हसून पण जरा चिडवत विचारले.
"काय एकावर एक सुखद धक्के देतीयेस तू?. तुम्ही अजूनही इतके सोबत आहात? खूप छान गं"
"मग काय? आम्ही नाही विसरलो जुन्या मैत्रीला" नेहा चिडवत म्हणाली.
"विसरले मी देखील नाही गं, अगदी काहीच नाही. पण.... आयुष्याचे प्राधान्यक्रम बदलले एवढेच. असो प्रत्यक्ष भेटू तेव्हा सविस्तर बोलू".
"रश्मी, केव्हा भेटतेस सांग? आता भेटीसाठी मन अधीर झालंय" नेहा भावुक होत म्हणाली.
"अगं आता येणं व्हायचंच पुण्याला" लवकरच कळवते तुला"
"अच्छा बाय" नेहा ने कार्तिक कडे फोन दिला.
"बाय आई" म्हणत कार्तिकने देखील फोन ठेवला.
नेहा कार्तिक च्या जवळ गेली, त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली,
"कार्तिक, तुम्हा मुलांमुळे आज आमच्या मैत्रीचं वर्तुळ पूर्ण झालं रे. गोल गोल लाडू सारखं. तन्वी आणि आराध्यही त्या मायेच्या उबदार मिठीत हळूच शिरले......
रेणू कुबडे