पार्टी
पार्टी


एका पार्टिच्या निमित्ताने अनेक लब्ध प्रतिष्ठीत, मान – सन्मान मिळवलेली माणसे जमली होती. त्यातील काहीजण हे कुठल्या ना कुठल्या तरी कंपन्यांचे सीईओ किंवा एमडी होते. दोघेजण प्रतिष्ठीत डॉक्टर्स होते. त्यांची मोठी हॉस्पिटल्स होती. दोघेजण चित्रपट सृष्टीतले आघाडीचे अभिनेते होते. ते सुपरस्टार म्हणुन ओळखले जात होते. एकाने संगीताच्या क्षेत्रात मोठे नाव आणि प्रतिष्ठा मिळवली होती. देघेजण प्रसिद्ध लेखक होते. त्यातील एकाला ज्ञानपीठ ऍवॉर्डसारखे प्रतिष्ठीत पारितोषीक मिळालेले होते. थोडक्यात ही सगळी नावाजलेली मंडळी होती. सगळेजणच चांगले, उंची पोषाख घालुन आले होते. काहीजण तर चक्क सुटाबुटात होते. त्यांचे सुट पण चांगलेच महागडे वाटत होते.
त्या पार्टीमध्ये एक महिला होत्या. त्या दिसायला अगदी सामान्य आणि साध्या होत्या. त्यांचे कपडे पण अगदी साधे होते. कोणत्याच प्रकारचा छान छोकीपणा त्यांच्यात नव्हता. खरे म्हणजे त्या या पार्टीच्या माहोलमध्ये विसंगतच वाटत होत्या. चुकुन त्या या अशा श्रिमंत आणि माहागड्या पार्टीला आल्या असाव्यात असे वाटत होते. त्यांना पाहुन अनेक जणांच्या कपाळावर नापसंतीच्या आठ्या पण उमटत होत्या. पण त्या मात्र शांत होत्या. शांतपणे हा सगळा तमाशा बघत होत्या.
प्रत्येकाने ओळख करून देण्याची टुम निघाली. आपले नाव आणि आपले पद किंवा उद्योग व्यवसाय या बरोबरच आपल्या ‘अचिव्हमेन्ट्स’ काय आहेत हे पण सांगायचे होते. प्रत्येकाला 5 मिनिटांचा वेळ दिला होता.
प्रत्येकानेच आपली ओळख करून द्यायला सुरवात केली. प्रत्येकाच्या बोलण्यात एक प्रकारचा गर्विष्ठपणा होता, आत्मप्रौढी होती. आपण म्हणजे कोणीतरी ग्रेट आहोत अशी भावना होती. सगळेजण टाळ्या वाजवुन प्रतिसाद देत होते पण या टाळ्या मनापासुन वाजवल्या जात नाहीत हे पण कळत होते.
शेवटी त्या साध्या वेषा
तल्या अगदी सामान्य दिसणार्या महिलेची पाळी आली. त्या महिलेने आपले नाव सांगीतले.
‘आपण काय करता?’ एका एमडीने आढ्यतेखोरपणाने विचारले.
‘सध्या मी काहीच करत नाही. सध्या मी रीटायर्ड आहे. घरीच असते.’ त्या महिलेने शांतपणे उत्तर दिले.
‘हो! पण तुम्ही काय करत होतात हे तरी सांगाल की नाही!’ तो मगासचाच एमडी गर्विष्ठपणे बोलत होता.
‘मी शिक्षिका होते!’ त्या महिलेने शांतपणे उत्तर दिले.
‘ओह! शिक्षिका! आय मिन टिचर?’ तो एमडी काहीशा घृणास्पद नजरेने त्या महिलेकडे बघत बोलत होता. ही किरकोळ टिचर या पार्टीमध्ये काय करते असे भाव त्याच्या चेहेर्यावर होते.
‘शिक्षिका म्हणुन तुम्ही काय केलेत?’त्या एमडीने परत एकदा कुचेष्टेने विचारले. कारण एक सामान्य शिक्षिका फार फार तर काय करणार? फार फार तर एखादे सर्टिफिकेट किंवा ‘उत्तम शिक्षीका म्हणुन एखादे ऍवॉर्ड! अजुन काय?
त्या शिक्षीका शांतपणे हसुन म्हणाल्या ‘ फारसे काही केले नाही! फक्त तुमच्यासारखी माणसे घडवत गेले!’
त्यांचे उत्तर ऐकुन त्या हॉलमध्ये क्षणभर सन्नाटा पसरला आणि मग टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाला सुरवात झाली. याची सुरवात ज्ञानपीठ पारितोषीक विजेत्या लेखकापासुन झाली. कारण तो त्या शिक्षिकेचा विद्यार्थी होता. या सर्वच टाळ्या मनापासुन होत्या.
आता ती सामान्य दिसणारी आणि सामान्य कपडे घातलेली रिटायर्ड शिक्षिका त्या पार्टीमधली सर्वात सन्मान्य व्यक्ति होती. सर्वजण तिच्या पाया पडुन तिचे आशिर्वाद घ्यायला पुढे येत होते. यामध्ये तिच्याशी उद्धटसारखे वागणारा एमडी सर्वात पुढे होता.
थोडक्यात शिक्षक काय करत असतात हे या शिक्षिकेने दाखवुन दिले!
आज शिक्षक दिन आहे. त्या निमित्त माझे सर्व शिक्षकांना आणि शिक्षिकांना मनःपुर्वक प्रणाम