आशाताई- एक यशस्वी मराठी उद्योजिका
आशाताई- एक यशस्वी मराठी उद्योजिका


श्रीमती आशा भोसले, म्हणजेच आशाताई, या एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पार्श्वगायिका म्हणजेच ‘प्ले बॅक सिंगर’ म्हणून आपल्या सर्वांनाच चांगल्या परिचीत आहेत. हिंदी आणि मराठी चित्रपाटातील त्यांनी गायलेल्या अनेक गाण्यांनी आपल्याला भरपूर आनंद दिला आहे. त्यांचा जन्म 1933 सालचा. त्यांचे वय आहे आता 84 वर्षांचे. त्यांनी 1943 साली, म्हणजे वयाच्या 10 व्या वर्षापासून पार्श्वगायनाला सुरवात केली. त्या अजुनही ऍक्टिव्ह आहेत. म्हणजे गेली 74 वर्षे त्या पार्श्वगायनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. हिंदी आणि मराठी बरोबर त्यांनी ईतर अनेक भाषांमध्ये गाणी गायली असून त्यांची इंग्रजी गाणी पण प्रसिद्ध आहेत. 1000 च्या वर चित्रपटामध्ये 12000 हजारच्या वर गाणी गाऊन त्यांनी जागतीक विक्रम केला असून ‘गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’ मध्ये याची नोंद झाली आहे. भारत सरकारने पण त्यांचा दादासाहेब फाळके तसेच पद्मविभूषण सारखे सन्माननीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. इतकेच नव्हे तर त्यांना घसघशीत 7 फिल्मफेअर ऍवॉर्डस मिळाली असून 18 वेळा नॉमिनेशन झाले आहे.
मला हल्ली आशाताईंचे अनेक व्हिडिओज बघायला मिळतात. मी तर पहिल्यापासून त्यांचा फॅन आहेच. व्हिडिओमध्ये तसेच त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांमध्ये त्या प्रसन्न चेहेर्याच्या दिसतात. त्यांचे हसणे गोड असते. गालाला छानसी खळी पडलेली असते. पण त्यांच्या डोळ्यातील कारुण्य लपत नाही. त्यांना आयुष्यात भरपूर संघर्ष करावा लागला ही गोष्ट काही लपून राहीलेली नाही. एकीकडे गरीब आर्थिक परिस्थिती. तीन मुलांचा संसार सांभाळण्याची जबाबदारी. पार्श्वगायनाठी लांबवर असलेल्या स्टुडिओजमध्ये मुंबईच्या लोकल ट्रेनच्या गर्दीतून चकरा मारण्याची करावी लागणारी कसरत. हे सगळे करत असतात आपली ज्येष्ठ बहीण लता हिच्यापेक्षा स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करण्यासाठी करावी लागणारी प्रचंड धडपड आणि कष्ट! आशाताई गंमतीने म्हणतात की त्या लता मंगेशकरांची गाणी गाऊ शकतात पण लता मंगेशकर त्यांची गाणी गाऊ शकत नाहीत. आशाताईंनी आयुष्यात अनेक अपस ऍन्ड डाऊन्स बघीतले आहेत. जिवंतपणी आपल्याच दोन मुलांचा मृत्यु बघण्याचे दुर्दैव ओढवले. हे सगळे जे त्यांनी सोसले आहे ते त्यांच्या डोळ्यांमधून स्पष्ट दिसते.
आशाताईंनी उत्तम पार्श्वगायिका होण्याबरोच उत्तम गृहिणी आणि उत्तम आई होण्याचे कसब पण उत्तम रितीने पार पाडले आहे. त्यांच्या तिन्ही मुलांची उत्तम शिक्षणे झाली आहेत. त्यांचा मोठा मुलगा हेमंत पायलट झाला. मुलगी वर्षा उत्तम इंग्रजी पत्रकार झाली. तर धाकटा मुलगा आनंद याने बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. आपल्या मुलांना घडवण्यामध्ये पण आशाताईंचा मोठा हात आहे. त्यामूळे माझ्या दृष्टीने तर त्या ‘सुपर वूमन ‘ आहे.
याच ‘सूपर वूमन ‘ ची मी आज आगळी वेगळी ओळख करून देणार आहे.
आशाताईंचा दुसरा आवडता छंद आहे तो म्हणजे स्वयंपाक. त्या म्हणतातच की मी जर गायीका झाले नसते तर उत्तम स्वयंपाकीण झाले असते. पार्श्वगायनाच्या छंदाबरोबर त्यांनी हा पण छंद जोपासला. निरनिराळ्या व्हेज आणि नॉनव्हेज डिशेस शिकुन घेतल्या. लोकांना उत्तम संगीताबरोबच उत्तम खाण्याचा आनंद पण द्यावा असे त्यांना वाटू लागले. याच छंदाचे रुपांतर त्यांनी उद्योग व्यवसायात केले. परदेशामध्ये ‘आशाज’ या नांवाच्या रेस्टॉरन्टसी सुरवात आपला धाकटा मुलगा आनंद याच्या सहाय्याने केली. पहिले रेस्टॉरंट दुबई येथे, सन 2002 साली, म्हणजे वयाच्या 59 व्या वर्षी सुरु केले. आशाताईंच्या खास रेसिपिज मिळतील अशी व्यवस्था केली. किचनवर अशाताईंचे खास लक्ष असते. तिथल्या कुकना त्या स्वतः ट्रेनींग देतात. बघता बघता हे रेस्टॉरन्ट लोकप्रिय झाले. आता त्यांची गल्फ आणि ब्रिटनमध्ये मिळून सहा रेस्टॉरन्ट्सची मालीका आहे. ब्रिटनमधल्या बर्मिन्गहॅम येथल्या रेस्टॉरन्टला तर ‘सर्वोत्तम रेस्टॉरन्ट’ म्हणून पुरस्कार पण मिळाला आहे. आता त्यांची भारतामध्ये 15 रेस्टॉरन्ट्स काढण्याची योजना असून त्याची सुरवात दिल्लीपासून होणार आहे. या साठी दहा लाख डॉलर्सची गुंतवणूक त्या करणार आहेत.हा सगळा कारभार जरी त्यांचा धाकटा मुलगा आनंद बघत असला तरी मूळ कल्पना आशाताईंचीच आहे. या मूळे त्या आता एक यशस्वी मराठी उद्योजिका पण झाल्या आहेत. आपली गाण्याची करिअर भरभक्कमपणे चालू असताना, उतार वयामध्ये रेस्टॉरन्टच्या बिझनेसमध्ये शिरण्याचे धाडस आशाताईंनी दाखवले आणि त्यांचा हा प्रयोग त्यांनी यशस्वी पण करून दाखवला. थोडक्यात बिझनेस सुरु करायला वयाचे बंधन नसते. उतार वयात पण बिझनेस चालू करून यशस्वी करून दाखवता येतो हे त्यांनी दाखवून दिले आहे.
माझ्या मते आशाताई या पहिल्यापासूनच उत्तम ‘मार्केटिंग वूमन’ आहेत. त्यांच्या गायनाच्या करिअरमध्ये त्यांनी त्यांच्या मार्केटिंगच्या कौशल्याचे अनेक दाखले दिले आहेत. परंपरेने चालत आलेले भारतीय शास्त्रीय संगीतात प्राविण्य मिळवत असतानाच या संगीताच्या चौकटीत त्यांनी स्वतःला अडकवून घेतले नाही. पाश्चात्य संगीत पण तेवढ्याच सहजपणे स्विकारले. पार्श्वगायनाच्या क्षेत्रामध्ये गायकाचे प्रमुख गिर्हाईक संगीत संयोजक म्हणजेच म्युझीक डायरेक्टर्स असतात. पण याहीपुढे जाऊन आशाताईंनी ओळखले की ज्या कलाकारांवर त्याचे गाणे चित्रीत होणार आहे ते पण त्यांचे कस्टमर्सच आहेत. म्हणुन ज्या कलाकारांवर आपले गाणे चित्रीत होणार आहे त्या कलाकारांच्या चेहेरपट्टीशी आवाजाशी, बोलण्याच्या लकबिशी, उच्चाराशी इतकेच नव्हे तर बॉडी लॅन्वेजशी आपला आवाज मिळता जुळता होईल हे कौशल्य आशाताई तर केव्हाच शिकल्या होत्या. आशाताईंची सर्वच गाणी काही मोठ्या किंवा प्रसिद्ध कलाकारांवर चित्रीत झालेली नाहीत. तर त्यांची अनेक गाणी छोट्या कलाकारांवर पण चित्रीत झालेली आहेत. पण पडद्यावर ही गाणी बघताना तो कलाकार स्वतःच्याच आवाजात गात आहे असे वाटते. लोकांच्या रुचिमध्ये होत चाललेला बदल म्हणजेच ‘मार्केट ट्रेन्ड’ मधल्या बदलाची आशाताईंना बरोबर जाणीव असायची. म्हणुनच त्या नूतन, वहिदा रेहमान, साधना, हेमा मालिनी, नर्गीस या सारख्या आघाडीच्या नायिकांबरोबरच हेलन सारख्या अभिनेत्रीलाही योग्य आवाज देऊ शकल्या. आपले हे मार्केटिंगचे कौशल्य आशाताई नक्कीच त्यांच्या रेस्टॉरन्टच्या बिझनेस साठी उपयोगात आणत असतील.
झनाई भोसले ही त्यांची नात आता त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकून पुढे येते आहे. आनंद भोसले यांची ही कन्या केवळ 15 वर्षांची आहे. पार्श्वगायनाच्या क्षेत्रात तिने काम करायला नुकतीच सुरवात केली आहे. पण याहीपेक्षा एक पाऊल पुढे टाकत, या लहान वयातच तिने मुंबईला स्वतःचे ऍपल रिसेलर स्टोअर ‘आयअझुर’ सुरु केले आहे. आपल्या आजीच्या पावलावर पाऊल टाकून त्यांची ही नात लहान वयातच महिला उद्योजिका बनली आहे. ऍपलचे फ्रँचॅईस मिळणे हे काही सोपे काम नसते. तिथे सगळीकडेच उच्च दर्जाची क्वालिटी लागते. हे शिवधनुष्य पेलण्याचे धाडस त्यांच्या ‘टिन एजर’ नातीने दाखवले हेच मोठे कौतुकास्पद आहे.
एकीकडे आशाताई उतार वयात उत्तम बिझनेस वूमन झाल्या तर त्यांची नात ‘टिन एज’ म्हणजे अगदी तरूण वयातच बिझनेस वूमन झाली. परत बिझनेसला वयाचे बंधन नसते. लहान वयात पण यशस्वी बिझनेस वूमन होता येते हे पण त्यांनी दाखवून दिले आहे.
मला अनेक यशस्वी मराठी गायक गायीका ठाऊक आहेत. गाण्याच्या क्षेत्रात त्यांनी उत्तम करिअर केले आहे. कदाचीत उत्तम पैसे पण मिळवले असतील. पण आशाताईंसारखे बिझनेसच्या क्षेत्रात त्यांनी पदार्पण केले की नाही मला ठाऊक नाही.
आशाताईंनी आपल्या घरात फक्त गायकीच आणली असे नाही तर उद्योजगता आणि उद्यमशीलता पण आणली. मिळालेल्या पैशांची उद्योग व्यवसायात गुंतवणूक केली. मुलांच्या आणि नातवंडांच्या मनात पण तशी मानसिकता निर्माण केली. मला वाटते आशाताईंचे हे एक ‘ग्रेट’ कार्य आहे.
एक यशस्वी महिला उद्योजिका आणि ‘बिझनेस वूमन’ म्हणून माझा आशाताईंना मानाचा मुजरा.