पार्टी
पार्टी
शिक्षक दिनानिमित्त
पार्टी
एका ‘उच्चभ्रू’ म्हणजेच ‘हाय प्रोफाईल’ पार्टीला अनेक उच्चभ्रू मंडळी जमली होती. त्यांच्याकडे धन, दौलत, संपत्ती, मान, सन्मान, प्रतीष्ठा सर्व काही होते. त्यातील दोघेजण नावाजलेल्या कंपन्यांचे एम. डी होते. दोघे प्रतिष्ठीत आणि नावाजलेले डॉक्टर्स होते. काहीजण नावाजलेले इंजिनिअर्स होते. काहीजण हाय कोर्टात आणि सुप्रीम कोर्टात प्रॅक्टीस करणारे नावाजलेले वकील होते. दोघे चित्रपट अभिनेते होते. ते आता ‘सुपरस्टार’ म्हणून ओळखले जात होते. एकजण अमेरिकेतील नासामधील सायंटिस्ट होता. काही नावाजलेले लेखक होते. त्यातील एक लेखक तर ज्ञानपीठ पारितोषीक विजेते होते. काही महिला पण होत्या. त्यांनी पण कोणत्या ना कोणत्यातरी क्षेत्रात नाव कमावले होते. सगळेजण उंची, थाटमाटाचा पोषाख आणि महागडे कपडे घालून आले होते. त्या ग्रुपमध्ये साठीच्या वयाच्या एक महिला पण होत्या. पण त्या या पार्टीच्या माहोलमध्ये अत्यंत विसंगत दिसत होत्या. कारण त्यांचे कपडे अगदी साधे आणि घरगुती होते. चेहेर््यावर कोणत्याची प्रकारचा मेकअप नव्हता. त्यांना पाहिल्यावर ‘या कोण फालतू बाई पार्टीला आल्या आहेत?’ असेच भाव प्रत्येकाच्या चेहे-यावर येत होते. थोडक्यात या फालतू दिसणा-या बाईने या पार्टीला यायला नको होते असेच सर्वांना वाटत असावे असे दिसत होते.
पार्टीला सुरवात झाली. कोणीतरी टूम काढली की प्रत्येकाने आपली ओळख करून द्यावी. प्रत्येकाने आपले नाव सांगावे, आपला व्यवसाय सांगावा तसेच आपल्या ‘स्पेशल अचिव्हमेन्टस’ काय आहेत हे पण सांगावे असे ठरले. प्रथम एका एम.डी. ने सुरवात केली. त्याच्या बोलण्यात एक प्रकारचा उद्दामपणा, अहंकार आणि गर्विष्ठपणा होता. आपण म्हणजे कोणीतरी ‘ग्रेट’ आहोत हेच सांगायचा त्याचा प्रयत्न होता. मग बहुतेकांनी त्याचीच रिघ ओढायला सुरवात केली. सगळेजणच आपला
बडेपणा, मोठेपणा, कर्तृत्व रंगवून रंगवून सांगु लागले. सगळ्यांच्याच बोलण्यामध्ये अहंकार ठासून भरलेला होता. त्या साध्या वेषातील बाई ही सगळी गंमत एका कोप-यात बसून शांतपणे बघत होत्या.
शेवटी त्या बाईंची पाळी आली. त्यांनी आपले नाव सांगीतले.
‘हो पण तुम्ही सध्या काय करता सांगाल की नाही? ‘ त्या उद्धट एम.डी. ने विचारले.
‘सध्या मी काहीच करत नाही कारण मी रिटायर्ड आहे. घरीच असते’. त्या बाईंनी शांतपणे उत्तर दआले.
‘होय! पण तुम्ही आधी काय करत होता हे सांगाल की नाही?’ त्या उद्धट एम.डी. ने परत विचारले.
‘मी शिक्षिका होते!’ त्या बाईंनी उत्तर दिले.
‘शिक्षिका? आय मिन टिचर?’ तो उद्धट एम. डी. म्हणाला. ही फालतू टिचर इथे कशाला तडमडली असा त्याचा चेहेरा झाला होता.
‘तुमच्या काही स्पेशल अचिव्हमेन्टस असतील तर त्या सांगा!’ तो उद्धट एम. डी. म्हणाला. त्याला वाटले की या फालतू टिचरच्या अशा काय अचिव्हनेन्टस असणार? फारफारतर एखादे सर्टिफिकेट किंवा उत्तम शिक्षक म्हणून मिळालेले एखादे पारितोषीक.
‘फार काही नाही! मी फ्क्त आयुष्यभर तुमच्या सारखी माणसे घडवत गेले’ त्या बाई म्हणाल्या.
त्यांचे उत्तर ऐकून त्या पार्टीत क्षणभार सन्नाटा पसरला आणि मग एकदम टाळ्यांच्या कडकटाला सुरवात झाली. त्याची सुरवात त्या ज्ञानपीठ विजेत्या लेखकापासून झाली कारण तो त्या बाईंचा विद्यर्थी होता. मग सर्वांचीच त्या बाईंच्या पाया पडून त्यांचे आशिर्वाद घेण्याची धडपड सुरू झाली. यामध्ये तो उद्धट एम. डी. सर्वात पुढे होता. आता त्या उच्चभ्रु पार्टीच्या या सामान्य कपड्यातल्या, समान्य दिसणा-या शिक्षिका ‘सेलिब्रिटी’ बनल्या होत्या.
तर अशा प्रकारे अनेक ‘ग्रेट ग्रेट’ लोकांना घडवणा-या सर्व शिक्षक आणि शिक्षिकांना माझा सॅल्युट!
तुमचे काय?