Ulhas Joshi

Others

2  

Ulhas Joshi

Others

अनुभवाचे बोल

अनुभवाचे बोल

6 mins
1.1K


‘साहेब! तुम्हाला आजचा कार्यक्रम रद्द करता येईल का?’ मला भेटायला आलेले ते वृद्ध म्हणजे ‘बुजुर्ग’ गृहस्थ विचारत होते.

‘रद्द? नाही आता ते शक्य नाही. मोठ्या मेहेनतीने आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे!’ मी म्हणालो.

‘बर तर मग हा कार्यक्रम पुढे तरी ढकला. चांगला 10 दिवस पुढे ढकला!’ ते वृद्ध गृहस्थ अगदी काकुळतीने सांगत होते.

‘का पण? कशासाठी? तुम्हाला याचा काही त्रास होतो का?’ मी पण काहिशा वैतागानेच विचारले.

‘तसे नाही सर! मला काय त्रास होणार? पण आज सकाळी मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणुन मी तुम्हाला सांगायला, म्हणजे सावध करायला आलो!’ ते आजोबा अगदी नम्रपणे म्हणाले.

‘पाऊस?’ असे म्हणुन मी चक्क बाहेर आलो आणि आभाळाकडे नजर टाकली. आभाळ चांगले निरभ्र होते. स्वच्छ सुर्यप्रकाश पडला होता. आकाशात दूरवर साधा काळा राहोच पण पांढरा ढग सुद्धा दिसत नव्हता. तसेच हे पावसाळ्याचे दिवस पण नव्हते. असे असताना हे आजोबा मला पाऊस पडणार आहे असे सांगायला का बर आले होते?

‘ठीक आहे! मी बघतो’ म्हणुन मी त्यांना टोलावले.

 

हा साधारणपणे 50 वर्षांपुर्वी घडलेला प्रसंग आहे. हा प्रसंग घडला उत्तर प्रदेशमधील बिजनौर नावाच्या जिल्ह्यातील चांदौसी या गावात.

 

पुण्यातील डिझेल इंजीने बनवणार्‍या एका प्रसिद्ध कंपनीचा विक्री प्रतिनिधी म्हणुन मी बिजनौरला आलो होतो. ही इंजीने जास्त करून शेतकरी मंडळी विकत घेत असत. या कंपनीचा ‘सेल्स कॅम्पेन’ म्हणुन आम्ही चांदौसी या बिजनौर जिल्ह्यातील महत्वाच्या तालुक्याच्या ठिकाणी शेतकरी मेळावा आणि फ्री सर्विस कॅम्पचे आयोजन केले होते. त्यासाठी आमच्या डिलरने बरीच मेहेनत घेतली होती. आजुबाजुच्या गावातील अनेक शेतकरी मंडळींशी संपर्क साधला होता आणि हा शेतकरी मेळावा चांगला यशस्वी होईल अशी चिन्हे दिसत होती. चांदौसी हे जरी तालुक्याचे ठिकाण असले तरी मोठे खेडेगावच होते. गावातुन जाणारा मुख्य रस्ताच काय तो डांबरी होते. बाकीचे सर्व रस्ते मातीचेच होते. चांदौसीला मोठी बाजारपेठ होती म्हणुन अनेक शेतकरी मंडळी या गावात येत असत. त्या गावामध्ये असलेल्या एकुलत्या एक शाळेच्या पटांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेला सुट्टी असल्यामुळे हे जमले होते. शाळेच्या पटांगणात मोठा शामीयाना उभारला होता. लांबुन येणार्‍या शेतकरी मंडळींसाठी चहापानाची तसेच जेवण खाण्याची व्यवस्था केली होती. चांदौसी गावात असलेल्या एकमेव डाक बंगल्यामध्ये माझा मुक्काम होता. 

 

पहिल्यापासुनच गावातील काही मंडळींचा आमच्या कार्यक्रमाला विरोध असल्याचे माझ्या कानावर आले होते. त्या गावात ईतर डिझेल इंजिने बनवणार्‍या कंपन्यांच्या डिलर्सची पण दुकाने होती त्यामुळे कॉम्पिटिटर होते. त्यांची पण आमच्या कार्यक्रमावर नजर होती. त्यातील काही जणांनी आमचा कार्यक्रम होऊ नये असा प्रयत्न केल्याचे पण कानावर आले होते. त्यामुळे यातील काही जणांनीच आमचा कार्यक्रम होऊ नये यासाठी या आजोबांना माझ्याकडे पाठवले असावे असे समजुन मी त्यांच्या बोलण्याकडे संपुर्णपणे दुर्लक्ष करायचे ठरवले.

 

मी सकाळी साडे नऊ वाजताच चांगले कपडे घालुन कॅम्पेन साईटवर उपस्थीत झालो. हवा स्वच्छ होती आणि भरपुर सुर्यप्रकाश पडला होता. कॅम्पेनची व्यवस्था पण चोख होती. काही माणसे पण जमायला सुरवात झाली होती. बरीच शेतकरी मंडळी त्यांची इंजिने घेऊन आमच्या कॅम्पेनमध्ये भाग घ्यायला निघाल्याच्या बातम्या कानावर येत होत्या. एकुण आमचा कार्यक्रम चांगलाच यशस्वी होणार अशी चिन्हे दिसत होती. त्यामुळे आम्ही सगळे खुष होतो.

 

साधारणपणे सकाळचे 11 वाजले आणि अचानक आकाशात ढगांची गर्दी होऊ लागली. आधी पांढरे असलेले ढग लवकरच काळे होऊ लागले. जोरदार वारे वाहु लागले. बघता बघता आकाश काळ्याकुट्ट ढगांनी व्यापुन गेले. विजांचा कडकडाट सुरु झाला. आधी थोडा थोडा पाऊस सुरु झाला. पण थोड्याच वेळात पावसाने चांगलाच जोर पकडला आणि कोकणात पडतो अशा मुसळधार पावसाला सुरवात झाली. आम्ही लगेच शाळेच्या मुख्य ईमारतीकडे धावलो त्यामुळे पावसापासुन वाचलो. पाऊस एवढा मुसळधार होता की समोरचे काही दीसत नव्हते. तासाभरानंतर पावसाचा वेग कमी कमी होऊ लागला. थोड्यावेळात पाऊस थांबला.. आकाशातील ढग गायब झाले. आकाश पुन्हा पुर्वीसारखे निरभ्र झाले. स्वच्छ सुर्यप्रकाश पडला. वातावरण परत पुर्वीसारखे झाले.

 

पण या तासाभराच्या पावसाने आमच्या कॅम्पेनची पार वाट लावली होती. ज्या मैदानात आम्ही कार्यक्रमाचे आयोजन केले होते ते मैदान आता चिखलाने भरून गेले होते. मैदानात पाण्याची तळी निर्माण झाली होती. आमच्या शामीयानाची पार वाट लागली होती. तो भिजला होता आणि चिखलात पडल्याने मळला होता आणि खराब झाला होता. गावातील रस्त्यांची पण पार वाट लागली होती. सर्व रस्ते चिखलमय झाले होते. अनेक ठिकाणी पाणी साठले होते. या अशा परस्थितीत आमच्या कार्यक्रमाला कोण येणार? त्यामुळे कार्यक्रम रद्द करण्याची पाळी आमच्यावर आली. शेवटी त्या आजोबांचे म्हणणे खरे ठरले होते!

 

आकाश निरभ्र असताना पाऊस पडणार आहे हे त्या आजोबांना कसे कळले याचे मला राहुन राहुन कुतुहल वाटत होते. माझे मन काही मला स्चस्थ बसु देत नव्हते. शेवटी मी त्या आजोबांना भेटायचे ठरवले. तसे ते आजोबा गावातील एक आदरणीय व्यक्त होते. पंडीतजी म्हणुन ते ओळखले जात होते. ते पुर्वी त्या शाळेतच प्रार्थमीक शिक्षक म्हणुन शिकवत होते. जवळपास थोडीफार शेतीभाती पण होती. त्यांचे घर शोधुन काढणे मला फारसे कठीण गेले नाही. तसे त्यांचे घर साधेच होते. वरती पत्र्याचे छप्पर होते.

 

मला पहाताच आजेबा थोडे चमकलेच. मी त्यांच्या घरी येईन अशी बहुतेक त्यांची अपेक्षा नसावी.

 

‘आजोबा! तुमचे म्हृणणे खरे ठरले. पाऊस पडला आणि त्यामुळे आम्हाला आमचा कॅम्पेन कॅन्सल करावा लागला. खरे म्हणजे मी तुमचे ऐकायला हवे होते. सॉरी! पण मला एक सांगा! आकाश निरभ्र असताना आज पाऊस पडणार आहे हे तुम्हाला कसे कळले?’ मी विचारले.

 

‘या माझ्या मागे!’ म्हणुन मला आजोबा त्यांच्या मागील दारी घेऊन आले. त्यांच्या घराच्या मागेच एक छोटेसे शेत होते.

‘ते मुंग्यांचे वारुळ बघता का?’ आजोबा म्हणाले. ‘मी रोज या वारुळातीत मुंग्यांचे निरिक्षण करतो. रोज सकाळी या मुंग्या वारुळातुन बाहेर पडतात आणि वारुळापासुन दूर जातात. पण मी गेले दोन दिवस पहातो आहे. या मुंग्या सकाळी वारुळातुन बाहेर न पडता वारुळाकडे जाताना दिसायच्या. आज तर या मुंग्या जस्तच वेगाने वारुळाकडे जाताना दिसल्या!’

‘बर मग?’ मी विचारले

‘ही झाडे पहा! या झाडांवर तुम्हाला काही पक्षांची घरटी दिसतील. रोज सकाळी हे पक्षी घरट्यातुन बाहेर पडतात. पण गेले दोन दिवस हे पक्षी बाहेर पडुन लगेच परत येताना दिसले. ईतकेच नव्हे तर ज्या घरट्यात पिल्ले आहेत त्या घरट्यातील पाखरे पिल्लांसाठी काहीतरी खायला आणत असल्याचे मला दिसले! पण आज सकाळी हे पक्षी घरट्यातुन अजीबात बाहेर पडले नाहीत! आजोबा म्हणाले.

मला अजुनही आजोबा काय सांगतात हे कळत नव्हते.

‘आज तुम्ही कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकलात? आमच्या गावात अनेक भटकी कुत्री आहेत. ती सारखी भुंकत असतात. पण आज सकाळी एकही कुत्रे भुंकत नव्हते की त्यांचे दर्शन पण होत नव्हते!’ आजोबा सांगत होते.

‘पण याचा पावसाशी काय संबंध?’ मी आजोबांना विचारले.

‘सांगतो!’ आजोबा म्हणाले, ‘निसर्गात काय फेरबदल होणार आहेत याची खबर पहिल्यांदा प्राणी, पक्षी आणि किटकांना लागते. त्यामुळे ते आवश्यक ती तजवीज करायला लागतात. जेव्हा पाऊस यायचा असतो तेव्हा ते सहसा बाहेर पडत नाहीत. मी जेव्हा पहीले की आज मुंग्या भराभरा वारुळाकडे चालल्या आहेत, पक्षी घरट्यातुन बाहेर पडत नाहीत, कुत्री पण कुठे कुठे लपुन बसलेली आहेत, तेव्हाच मला अंदाज आला की आज जोराचा पाऊस येणार आहे. तो सकाळी येईल हा आपला माझा अंदाज होता!’ आजोबा म्हणाले.

‘तुम्ही म्हणालात की तुम्ही 10 दिवसांनी कॅम्पेनचे आयोजन करा! असे सांगण्याचे कारण काय?’ मी परत विचारले.

‘तुम्ही गावातील रस्ते कसे आहेत हे पाहीलेच आहे. आमच्या ईथली जमीन भुसभुशीत आहे. थोडा पाऊस पडला तरी चिखल होतो. हा चिखल वाळायलाच एक आठवडा लागतो. आता हा झालेला चिखल वाळायला कमीत कमी 8 ते 10 दिवस लागतीलच!’ आजोबा म्हणाले.

‘आजोबा तुम्ही ग्रेट आहात’ मी म्हणालो.

‘ग्रेट वगैरे काही नाही! आमचे हे अनुभवाचे बोल आहेत. आम्ही अनुभवाच्या शाळेत शिकुन तयार झालेले लोक आहोत. मी स्वतः शिक्षक होतो. पण अनुभवासारखा दुसरा चांगला शिक्षक नाही. पण तुम्हा तरुण मंडळींना हे पटत नाही. आम्ही तुमच्यापेक्षा कमी शिकलेले असल्यामुळे तुम्हाला आम्ही कुचकामी वाटतो त्यामुळे आमच्या सांगण्याकडे तुम्ही लोक लक्ष देत नाही. लक्षात ठेवा आम्हा बुजुर्गांकडे अनुभवाचा मोठा खजीना असतो. कधी कधी आमचे पण ऐकत जा!’ ते आजोबा गंमतीने हसत हसत म्हणाले.

 

खरच! मला आजोबांचे म्हणणे पटले! खरे ज्ञान हे अनुभवाच्या शाळेतुनच मिळते. पुस्तकी शिक्षणातुन जे ज्ञान मिळते ते अर्धवट असते. अनुभवाची शाळा ही फ्री असते. याला कोणतिही फी द्यावी लागत नाही. याला वह्या, पुस्तके लागत नाहीत. शाळा, कॉलेजसारखे तासंतास वर्गांमध्ये जाऊन बसावे लागत नाही. प्रचंड फिया मोजाव्या लागत नाहीत. तसेच याला वेळेचे बंधन नसते. हे शिक्षण आयुष्यभर फुकट चालु असते. पण याचा एक ड्रॉबॅक आहे. या शिक्षणाला कोणत्याही तर्‍हेचे डिग्री, डिप्लोमा किंवा सर्टिफेकेट मिळत नाही. अजुन एक प्रकार आहे. शाळा, कॉलेजच्या शिक्षणामध्ये आधी शिक्षण मग परिक्षा हा प्रकार असतो. परिक्षांच्या तारखा, वेळापत्रक आधी ठरलेले असते किंवा ठाऊक असते. पण अनुभवाच्या शाळेत आधी परिक्षा आणि मग शिक्षण असा प्रकार असतो. परिक्षेची वेळ ठरलेली नसते. केव्हाही आणि कुठेही परिक्षा घेण्यात येते.

आजोबा या अनुभवाच्या शाळेतून शिकुन, तावुन सुलाखुन बाहेर पडले होते. त्यामुळे त्यांचा पावसाचा अंदाज हवामान खात्यापेक्षाही अचुक निघाला.

 

आता अनुभवाच्या शाळेला किती महत्व द्यायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे.


Rate this content
Log in