Ulhas Joshi

Others

4.3  

Ulhas Joshi

Others

मंगळ

मंगळ

8 mins
784


आई वैतागून, निराश होऊन परत आलेली दिसली. आई बाहेरुन येऊन जेव्हा खुर्चीवर बसकण मारते व अंग टाकून देते तेव्हा खुशाल समजावे की बाहेर काहीतरी बिनसले आहे. काहीतरी मनाविरुद्ध घडले आहे.

 

‘काय झाल?’ मी विचारले

 

‘हा मंगळ! तुझ्या पत्रिकेतला हा मंगळ! जिथे तेथे आडवा येतोय मेला!’ आई वैतागाने पुटपुटली.

 

‘म्हणजे तु काय स्थळे वगैरे बघायला गेली होतीस काय?’ मी आईला विचारले. पण तिचे माझ्याकडे लक्षच नव्हते. ‘मुलगी चांगली कोकणस्थ ब्राह्मण आहे. गोरीपान आहे. दिसायला सुरेख नसली तरी नाकीडोळी निटस आहे. चांगली शिकलेली आहे. इंजिनिअर आहे. चांगला जॉब आहे, उत्तम करिअर आहे, चांगली मिळवती आहे. पण याचा काय उपयोग? मंगळापूढे हे सगळे शुन्य!’ आईची पुटपुट चालूच होती.

 

माझ्या पत्रिकेत ‘कडक’ मंगळ असल्यामूळे मुलांचे नकार येणे ही गोष्ट माझ्यासाठी तरी नवीन राहिली नव्हती. ‘आय ऍम युस्ड टू इट नाऊ!’ पण आईचे तसे नाही ना!

 

मी आणि माझी आई आम्ही दोघीच. मी आईचे एकुलते एक अपत्य! मी लहान असतानाच माझे बाबा हार्ट अटॅकने गेले. मग माझ्या आईनेच एका शाळेत शिक्षिकेची नोकरी करत मला मोठ्या कष्टाने सांभाळले, वाढवले, शिकवले, इंजिनीअर केले. इंजिनीअर झाल्यामूळे मला छान प्लेसमेन्ट मिळाली, सॅलरी पॅकेज मिळाले. माझ्या करिअरला छान सुरवात झाली. नुकतीच मी सिनिअर इंजिनीअर झाले. लवकरच माझ्या ग्रुपची हेड पण होईन. थोडक्यात मी आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे. पण आईचे म्हणणे आहे की माझ्या पत्रिकेतील ‘कडक’ मंगळापूढे माझ्या या कतृत्वाला काडिचीही किंमत नाही!

 

मुलगी आहे म्हणजे तिचे लग्न हे व्हायलाच हवे या संस्कारातून आलेली माझी आई. लग्न न झालेल्या म्हणजेच ‘अनमॅरीड’ मुलींना फार दिवस घरी ठेऊ नये. शक्य तेवढ्या लवकर मुलीचे हात पिवळे करावेत. नाहीतर लोक नाही नाही ते बोलू लागतात असे माझ्या आईचे मत आहे. म्हणून मला जॉब लागताच, म्हणजे माझ्या वयाच्या बाविसाव्या वर्षीच माझ्या आईने माझ्या लग्नाच्या खटपटीला सुरवात केली. ती एका प्रसिद्ध वधुवर सुचक मंडळात माझे नाव घालायला गेली. त्यावेळी फॉर्मबरोबर माझी पत्रिका पण जोडायला सांगीतली. माझ्या लहानपणी केव्हातरी केलेली माझी पत्रिका कुठेतरी धूळ खात पडली होती ती आईने मोठ्या मुष्किलीने शोधून काढली. आईने जेव्हा माझी पत्रिका मॅरेज ब्युरोवाल्या बाईंना दाखवली तेव्हा त्या म्हणाल्या, ‘अहो! ही तर मंगळाची पत्रिका आहे. तुमच्या मुलीला कडक मंगळ आहे. ही पत्रिका बघीतल्यानंतर कोणीही तुमच्या मुलीला पसंत करणार नाही. असे करा, दुसरी पत्रिका तयार करा. खोटी पत्रिका तयार करा. हा अष्टमस्थानातला मंगळ दुसरीकडे हलवा! नाहीतर काही खरे नाही!’

 

आई पण घाबरली. तोपर्यंत मला कडक मंगळ आहे हे ठाऊक नव्हते. आई खरच दुसरी पत्रिका करायला निघाली. बोलता बोलता सहज आई हे माझ्याजवळ बोलून गेली तेव्हा मी चांगलीच उखडले, ‘हे असले काही करायचे नाही! खोटी पत्रिका आजीबात करायची नाही. जी पत्रिका जशी असेल तशी देऊन टाक! ज्याना इंटरेस्ट असेल ते येतील!’ मी आईला ठणकावून सांगीतले. आईने पण माझे ऐकले.

 

पण माझी ‘बि ऑनेस्ट विद पत्रिका!’ ही पॉलिसी मात्र चांगलीच महागात पडली.

 

तुमच्या मुलीला कडक मंगळ आहे, सौम्य मंगळ असता तर थोडा तरी विचार करता आला असता असे पण सांगणारे लोक आईला भेटले. म्हणजे ‘कडक’ मंगळासारखा ‘सौम्य’ मंगळ असा पण प्रकार असतो असे पण कळले. माझ्या पत्रिकेतला ‘कडक’ मंगळ म्हणजे जणू काही मी केलेले हे घोर पापच. आता हा मंगळ पत्रिकेतून काढून फेकून तर देता येत नाही. (इकडे भारताचे मंगळयान मंगळावर पोचले सुद्धा आणि आल्याकडचे लोक पत्रिकेतील मंगळाचा विचार करत बसतात, आहे की नाही गंमत?)

 

मंगळ असलेल्या मुलांना मंगळ असलेल्या मुली चालतात असे कोणीतरी माझ्या आईला सांगीतले. म्हणून आईने अशी दोन तीन मुले शोधूनपण काढली. पण त्यातील दोन मुलांच्या आयांना मंगळ असलेली मुलगी नको होती तर तिसर्‍या मुलाच्या बाबतीत त्यांच्या मागण्या फारच जास्त होत्या, अगदी हावरटपणाच्या होत्या. ते काही आम्हाला शक्य नव्हते.

 

मुलींची लग्ने वयाच्या पंचविशीच्या आतच व्हायला हवीत. या वयाततच मुली चांगल्या दिसतात. मुलींनी पंसवीशी ओलांडली की त्या पौढ, पोक्त, काकुबाई दिसायला लागतात असे माझ्या आईचे अजुन एक मत. पण माझे पंचवीस वर्षांच्या आत लग्न काही झाले नाही म्हणून तिला टेन्शन. आता तर मला सत्ताविसावे वर्ष लागले. त्यामूळे आत्ताच मी पोक्त व काकुबाई दिसायला लागले असे आईला वाटु लागल्यामूळे तिचे टेन्शन वाढलेच.

 

‘तु आपले लव्ह मॅरेजच करून टाक!’ आई म्हणाली आणि आईचे हे बोलणे ऐकून मी हादरलेच. कारण कोकणस्थ ब्राह्मण संस्कारात वाढलेली माझ्या आईने ‘लव्ह मॅरेज कर’ म्हणून सांगणे म्हणजे कर्मठ ब्राह्मणाने गोमांसभक्षण करायला सांगण्यासारखेच आहे.

 

‘तुझा नवरा आता तुच शोधून काढ. फक्त तो हिन्दु व ब्राह्मण असावा!’ आई म्हणाली. शेवटी लव्ह मॅरेजमध्ये सुद्धा तिने ‘हिन्दू ब्राह्मण’ ही अट ठेवलीच होती.

 

‘अग आई लव्ह मॅरेज म्हणजे तुला काही खाऊ वाटला का? आणि लव्ह मॅरेज करायच असत तर मी ते केव्हाच केल असत. माझ्यात तेवढ धाडस नाही ना!. मला काही घरातून पळून बिळून जाऊन लग्न करायच नाही. मला तुझ्या पसंतीच्या मुलाशीच लग्न करायच आहे.’ मी आईला निक्षुन सांगीतले. कारण माझ्यासाठी आईने जे कष्ट केले आहेत, खस्ता खाल्या आहेत त्यामूळे मी आईच्या पसंतीच्या मुलाशीच लग्न करायचे ठरवले आहे. कारण एव्हडा ‘रिस्पेक्ट’ ती नक्कीच ‘डिझर्व’ करते.

 

मंगळामूळे मुले मिळत नाहीत आणि लव्ह मॅरेज करायचे धाडस माझ्यात नाही! आपल्या मुलीच्या मागे मुले लागु नयेत त्यामूळे मुलीवर कडक नजर ठेवणार्‍या आईसारख्या बाईच्या हाताखाली मी वाढले. लव्ह मॅरेज कसल करतेय डोंबलाच! लव्ह मॅरेज करायला मुळात कुठल्यातरी मुलाची ओळख लागते. मी म्हणजे या बाबतीत वैराण वाळवंट. ‘लव्ह मॅरेज इज नॉट माय कप ऑफ टी!’ मी केव्हाच ओळखले होते.त्यामूळे बहुतकरून आयुष्यभर ‘अनमॅरीड’ किंवा ‘कुंवारीच’ रहावे लागणार असे मला नाही तरी माझ्या आईला वाटू लागले आहे.

 

आईने पुन्हा एकदा लव्ह मॅरेजचा विषय काढलाच तेव्हा तिच्या समाधानासाठी मी म्हणाले, ‘आहे एक मुलगा! त्याने दोनदा मला लग्नाबद्दल विचारले आहे. मी पण त्याला विचार करून सांगते म्हणून टाळले आहे!’

 

‘अग मग मला बोलली नाहीस कधी! कोण आहे हा मुलगा?’ आईचा चेहेरा जरा आनंदाने उजळल्यासारखा वाटत होता.

 

‘तुला हा मुलगा अजीबात पसंत पडणार नाही! म्हणून मी काही बोलले नाही!’ मी आईला सांगीतले.

 

‘अग पण त्या मुलाचे नाव तरी सांग!’ आई म्हणाली

 

‘त्याचे नाव आहे फ्रान्सीस. माझ्याच कंपनीत काम करतो. खरे म्हणजे तो माझ्याच ग्रुपमध्ये आहे!’ मी आईला सांगून टाकले.

 

‘फ्रान्सीस म्हणजे ख्रिश्चन ना! म्हणजे तु लग्नानंतर ख्रिश्चन होणार की काय?’ आईने घाबरून विचारले. कारण माझ्यासारख्या एका कोकणस्थ ब्राह्मण मुलीने ख्रिश्चन होणे म्हणजे महा भयंकर पाप असाच माझ्या आईचा चेहेरा झाला होता.

 

‘मला माहीत नाही. मी काही त्याची जात विचारली नाही. आणि तो मुलगा नाही तर चांगला तेहतीस वर्षांचा बाप्या आहे. तो आपल्याकडचा नाही. तो फ्रेन्च आहे, फ्रान्सहून आला आहे. मुख्य म्हणजे डायव्होर्सी आहे. त्याचे लग्न झाले होते पण त्याची बायको तिच्या लग्नाआधीच्या प्रियकराबरोबर पळून गेली होती म्हणे!’ मी आईला सांगीतले. हे ऐकून तिला चांगलेच गरगरायला लागले. चांगले तीन दिवस तिला गरगरत होते म्हणे. आपल्या मुलीला हा असा माणूस लग्नाबद्दल विचारतो? हीच काय माझ्या मुलीची किंमत व लायकी वगैरे वगैरे.

 

‘हा फ्रान्सीस कसा आहे?’ पुन्हा एकदा आईने विचारले

 

‘कसा म्हणजे? चांगला हॅन्डसम आहे. पक्का युरोपीयन किंवा कॉकेशियन दिसतो. गोरापान आहे, निळे डोळे आहेत, पिंगट सोनेरी केस आहेत. मुली त्याच्या मागे लागतात. त्याने म्हणे आत्तापर्यंत चार मुलींना तरी नकार दिला आहे. माझ्या बाबतीत म्हणशील तो तो अजूनतरी ‘ओपन’ आहे. पण त्याला जर दुसरी मुलगी मिळाली तर हा चान्स पण गेला.’ असे म्हणत मी आईची गरगर अजून वाढवली व घराबाहेर पडले.

 

‘फ्रान्सीसला घरी बोलव.’ आईने सांगीतले आणि ‘काय?’ म्हणून मीच किंचाळले.

 

‘घरी कशाला?’ मी आईला विचारले.

 

‘मला त्याच्याशी बोलायचे आहे!’ आई म्हणाली. फ्रान्सीसने सुद्धा घरी यायची इच्छा मागेच व्यक्त केली होती.

 

‘ठीक आहे. मी त्याला बोलावते पण मी काही थांबणार नाही! घाला गोंधळ तुम्हा दोघांना काय घालायचाय तो!’ मी म्हणले.

 

‘अग तु तर हवीसच! मला फ्रान्सीसशी इंग्रीमध्ये बोलणे कसे जमणार?’ आई म्हणाली.

 

‘आई! तु शाळेत इंग्रजी शिकवत होतीस विसरू नकोस!’ मी म्हणाले.

 

फ्रान्सीसला आईच्या ताब्यात देऊन मी जी बाहेर सटकले ती चांगले तीन तासांनी परत आले. वाटले आता फ्रान्सीसचा पत्ता कट झाला असेल. मी फ्रान्सीसला नाही सांगण्याऐवजी आईनेच त्याला परस्पर नाही सांगीतलेले बरे.

 

पण झाले भलतेच.

 

मी परत आले तेव्हा आईचा चेहेरा आनंदाने नुसता फुलला होता. ‘अग लग्नानंतर तुला ख्रिश्चन व्हायची काही गरज नाही. फ्रान्सीस म्हणाला की लग्नानंतर तु हिन्दु राहू शकतेस!’ आल्याआल्याच अईने माझ्यावर बॉम्बगोळाच टाकला.

 

‘त्याचे काय जाते सांगायला! मग माझ्या मुलांचा धर्म कोणता? जात कोणती?’ मी पण भडकूनच विचारले.

 

‘हिन्दु’ आई म्हणाली.

 

‘हिन्दु म्हणजे?’ मला काही कळोना.

 

‘अग फ्रान्सीस हिन्दू धर्माची दिक्षा घेतो आहे. कुठल्यातरी आश्रमाशी त्याचे बोलणे झाले आहे. हिन्दू झाल्यावर त्याचे नाव गौतम असणार आहे!’ आई मला खुषी खुषी सांगत होती.

 

वा ऐकावे ते नवलच!

 

‘त्याला देवळात लग्न करायचे आहे ते सुद्धा आपल्या पद्धतीने! अगदी साग्र संगीत सगळ्या धार्मीक विधींसह. तुला नऊवारी साडी नेसायला सांगणार आहे!’ आई म्हणाली

 

‘नऊवारी साडी?’ मी तर चाटच पडले. फ्रान्सीसने कुठल्यातरी लग्नात वधूला नऊ वारी साडीत पाहीले होते म्हणे.

 

‘हो! लग्नाला त्याचे आई वडील फ्रान्सहून येणार आहेत. त्यांची या लग्नाला पसंती आहे. लग्न पण अगदी साधे करायचे. अगदी जवळचीच माणसे बोलवायची!’ आई म्हणाली

 

आता बेशुद्ध पडण्याची पाळी माझ्यावर आली होती.

 

तर बेडेकरांच्या मंदीरात आमचे लग्न पार पडले. फक्त पंचवीसच लोक होते. कारण माझ्या लग्नाने बरेच जण दुखावले गेल्याचे आई सांगत होती. ‘हिला काय कोणी आपल्या जातीतला मिळाला नाही का? चक्क फ्रेन्च माणसाशी लग्न करायला निघाली!’ वगैरे. अर्थात आम्ही काही त्याकडे लक्ष दिले नाही.

 

लग्नाला खरच फ्रान्सीसचे आई वडील फ्रान्सहून आले होते. फ्रान्सीसचे वडील, म्हणजे माझे सासरे चक्क झब्बा पायजम्यात होते तर त्याच्या आई चक्क साडीत वावरत होती. मी पहिल्यांदाच एका युरोपियन बाईला साडीत बघत होते.

 

लग्नांतर मी फ्रान्सला सासरी जाऊन सहा महीने राहून पण आले.

 

‘कसे आहे तुझे सासर?’ आल्यावर आईने माझी हजेरी घ्यायला सुरवात केली.

 

‘अग फारच छान! पॅरिसजवळ त्यांचे भले मोठ्ठे घर आहे. चांगल्या वीस खोल्या आहेत. फ्रान्सीस हा त्यांचे एकुलते एक अपत्य. त्याची गाडी मार्गी लागली म्हणून ते खुष आहेत. आणि गंमत म्हणजे मी माझ्या सासर्‍यांना चक्क मराठी शिकवल.’ मी सांगीतले.

 

‘अग काय सांगतेस काय?’ आई म्हणाली

‘अग माझे सासरे फ्रान्सच्या एका युनिव्हर्सिटीत प्रोफेसर होते. ते फॉरिन लॅन्गवेज डिपार्टपेन्टचे हेड होते. फॉरिन लॅन्ग्वेज कशा शिकायच्या हे त्यांना बरोबर माहीती. केवळ 15 दिवसांत ते उत्तम मराठी बोलायला शिकले. आता ते माझ्याशी फक्त मराठीतच बोलणार आहेत म्हणे’ मी सांगीतलेले ऐकून आईला धन्य धन्य झाल्यासारखे वाटले असेल

 

‘आणि तुझ्या सासुबाई?’ आईने उत्सुकतेने विचारले

 

‘त्या तर ग्रेटच आहेत. त्या कुठल्यातरी कंपनीच्या एम डी होत्या म्हणे. फ्रान्समध्ये त्यांना फार मान आहे. पण घरात त्या कशा अगदी चिअरफूल असतात. सतत जोक करत हसवत असतात. त्यांना साड्या फार आवडल्या. त्यांच्यासाठी चांगल्या डझनभर साड्या पाठवायच्या आहेत. फ्रान्समध्ये त्या साड्याच वापरणार आहेत म्हणे!’ मी सांगीतले.

 

आता माझ्या लग्नाला तीन वर्षे झाली. मला दोन गोंडस मुले आहेत.

 

आजपर्यंत तरी माझ्या पत्रिकेतला ‘कडक’ मंगळ कुठे आडवा आलेला नाही.

 

तर सांगायचे म्हणजे

 

पत्रिका पाहून लग्न ठरवणार्‍या व मुलीच्या पत्रेकेतील मंगळाला घाबरून पळ काढणार्‍या कोकणस्थ ब्राम्हण मुलांना व त्यांच्या आईवडलांना, तसे कशाला अशा सगळ्याच मुलांना व त्यांच्या आईबापांना

‘मारो गोली!’

 

काय पटतय का माझे म्हणणे?


Rate this content
Log in