anagha jagdale

Fantasy

3  

anagha jagdale

Fantasy

पारितोषिक

पारितोषिक

3 mins
264


आज श्रेयाचं ऑफिसमध्ये अजिबात लक्ष लागत नव्हतं. राहून राहून सावीचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. एक यशस्वी मॅनेजर म्हणून तिचं सगळे कौतुक करायचे. देशपांडे सरांच तर तिच्याशिवाय पान हालत नसे. ऑफिसच्या सगळ्या जबाबदाऱ्या ती नेटाने निभावून न्यायची. सुंदर, स्मार्ट, efficient employee म्हणून तिचा लौकिक होता. पण या सगळ्यात तिच्यातल्या आईची मात्र घुसमट व्हायची. टारगेट्स पूर्ण करता करता घरी जायला उशीर व्हायचा. तोपर्यंत सावी झोपलेली असायची. निहारच्या माघारी खरं तर सावीची तीच आई आणि तीच बाबा होती. पण घराचे हफ्ते, खर्च, सावीची फीज् या सगळ्याचा ताळमेळ जमवण्यासाठी तिला अहोरात्र कष्ट करणे भाग होते. त्यामुळे सावीला पुरेसा वेळ देता येत नाही ही खंत होती. पोरगी मात्र हुशार आणि समजूतदार होती. ती फारसा हट्टही करायची नाही.

आज सावीच्या शाळेत स्नेहसंमेलन होते. सावीचा डान्स होता आणि गुणी विद्यार्थिनी म्हणून तिला पारितोषिक पण मिळणार होते. नेमकं आजच श्रेयाला ऑफिसमध्ये खूप काम होतं आणि सुट्टी मिळणार नव्हती. वीकली रिपोर्ट द्यायचा होता. सावीने “आई, तू पण ये ना”असा हट्ट केला. तिला नाही म्हणताना श्रेयाने डोळ्यातले पाणी लपवलं. सावीचे आजी आबा जाणार होते, पण आई येत नाही म्हटल्यावर पाखरू हिरमुसलं होतं, पण तिने नेहमीसारखा समजूतदारपणा दाखवला.

केबिनमध्ये बसल्याबसल्या तिच्या डोळ्यासमोर लेकीचा चेहरा येत होता. तिच्या मनात विचार आला जर का मला अदृश्य होता आलं असतं तर किती बरं झालं असतं, मी पटकन सावीच्या शाळेत गेले असते आणि इथे माझी सुट्टीपण लागली नसती. टेबलवरच्या गणपतीला मनोभावे हात जोडत तिने म्हटले “देवा, मला थोड्या वेळासाठी अदृश्य होण्याची शक्ती दे. मला माझ्या सावीचं कौतुक पाहायला जायचे आहे. एवढी कृपा कर.”काय आश्चर्य! बाप्पा चक्क बोलला. ”श्रेया मी तुला थोड्या वेळासाठी अदृश्य होण्याची शक्ती देतोय. पण एक वाजेपर्यंत तुला इथे परतायचं आहे. नाहीतर तू इथे नाहीस संगळ्यांना कळेल!”

“ थॅंक यू बाप्पा!” श्रेयामधली आई आनंदून म्हणाली. फटाफट बॅग घेऊन मॅडम निघाल्या. बाप्पाच्या कृपेने अदृष्य झाल्याने ती गेल्याचे कुणालाच कळले नाही. ती पटापट शाळेत पोहोचली. कार्यक्रम सुरू झाला होता. छानछान सजलेल्या आपल्या गोड गोड पाखरांच कौतुक करायला आईबाबा जमले होते. सावीच्या वर्गाचा आता नंबर होता. लाल रंगाच्या फ्रीलच्या फ्रॉकमध्ये दिसणाऱ्या सावीचं रूप आई डोळ्यात साठवत होती. एकमेकांशी जुळवून घेत मुलांचा डांस सुरू होता, नेहमी Recorded Videos बघणाऱ्या श्रेयाला आज live performanceची मजा अनुभवता आली. परफॉर्मन्स नंतर लगेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू झाला. एकएक पुरस्कार announce होत गेले. मग सावीचं नाव announce झालं. तेव्हा मॅडम म्हणाल्या ”आता या वर्षीचा Best Student चा अवॉर्ड मिळतोय, सावी देसाईला. सावीने या वर्षी नुसता अभ्यासच नाही तर डान्स, वक्तृत्व, गायन, स्पोर्ट्स अशा सगळ्याच क्षेत्रात उत्तम कामगिरी केलीय. या शाळेला तिचा खूप अभिमान आहे. ती गुरूजनांचा आदर करणारी, सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारी, नेहमी मदत करणारी मुलगी आहे. तिची आई तिच्यासाठी जे परिश्रम घेतेय त्याची तिला जाणीव आहे. सगळ्या मुलांनी तिचा आदर्श ठेवा.”

मॅडमच्या हस्ते पारितोषिक घेणाऱ्या आपल्या हुशार लेकीला बघून श्रेयाचा ऊर अभिमानाने भरून आला. आपण जे कष्ट घेतोय त्याचं लेकीनी चीज केल्याचं समाधान मिळालं. सावीला पुढे होऊन तिला कुशीत घ्यायचं होतं पण घड्याळाचे काटे १ वाजेकडे सरकत होते. भरल्या डोळ्याने ती ऑफिसमध्ये परत आली. बाप्पा समोर हात जोडत ती म्हणाली” बाप्पा, आज आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण मी तुझ्यामुळे अनुभवला. आपल्या लेकराचं कौतुक अनुभवायला मिळालं. तिला एक चांगली व्यक्ती म्हणून घडवण्यासाठीचे माझे प्रयत्न योग्य दिशेने जात आहेत याचं समाधान तुझ्यामुळेच मिळालं आहे. असाच पाठीशी रहा.”बाप्पा तिच्याकडे पाहून मंद मंद हासत होता.

आज शाळेत अदृश्य होऊन काय काय पाहिलंय ते सावीला सांगायच आणि तिचा आश्चर्यचकित झालेला चेहरा पाहायचा असं तिने ठरवलं. घरी जाताना काहीतरी गिफ्ट आणि आवडीची चॉकलेट पेस्ट्री न्यायला पाहिजे, असं ठरवत असतानाच ऑफिसचा शिपाई येऊन म्हणाला” मॅडम, मोठ्या साहेबांनी बोलावलं, मीटिंगला.” "चला आता कामाला लागलं पाहिजे!" असं म्हणत श्रेयातली वर्किंग वुमन फाइल्स घेऊन निघाली.


ही कथा खरंतर पूर्णतः काल्पनिक आहे. या धकाधकीच्या आयुष्यात, कामाच्या गडबडीत आईवडीलांना आपल्या मुलांच्या जीवनातील बऱ्याच महत्त्वाच्या क्षणांचा साक्षीदार होता येत नाही. आपल्या लेकराच्या वाढीतल्या छोट्यामोठ्या क्षणांना मुकावं लागतं, आपला नाईलाज असतो. मुलांच्या भौतिक सुखासाठी झगडता झगडता बरेचदा मुलांच्या मानसिक गरजा पूर्ण करता येत नाही. त्यांना आपला पुरेसा सहवास देता येत नाही, अशा वेळी खरंच जर अदृश्य होऊन त्यांच्यासोबत ते क्षण जगता आले तर! ही इच्छा कामावर जाणाऱ्या सगळ्याचं हिरकणींची, तसेच सगळ्या दमणाऱ्या बाबांची सुद्धा!

ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका!

धन्यवाद!


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy